Nagpur News : संततधार पावसामुळे वांगी उत्पादकता प्रभावित झाली. त्यासोबतच कीड-रोगाचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर झाल्याने सध्या बाजारात वांगी आवक मागणीच्या तुलनेत घटली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून, गेला महिनाभर दबावात असलेले वांगी दरात आता चांगलीच सुधारणा होत क्विंटलमागे तब्बल एक हजार रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
नागपूरच्या कळमना बाजार समितीत ७० टक्के भाजीपाला हा राज्याच्या इतर भागांतून येतो. त्यामध्ये नाशिक जिल्ह्याची आघाडी असल्याचे निरीक्षण वजा अभ्यास तत्कालीन कृषी सहसंचालकांनी केला होता. त्यामुळेच या भागात भाजीपाला उत्पादनाला संधी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तसा प्रस्तावही कृषी आयुक्तालयस्तरावर सादर करण्याची तयारी चालविली होती.
दरम्यान, ते सेवानिवृत्त झाल्याने हा प्रस्ताव पुढे सरकला नाही. भाजीपाल्याबाबत राज्याच्या इतर भागावर अवलंबिता असल्याने हंगामात व त्यानंतरच्या काळातही भाज्यांचे दर वधारतात. सध्या वांगी दराबाबतही असाच अनुभव घेतला जात आहे. जुलै महिन्यात वांगी दर १५०० ते २००० रुपयांच्या पुढे गेले नाहीत. त्यातून उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्य होत नसल्याने काही शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणल्यानंतर वांग्याचे लिलाव न करताच तशीच टाकून दिली होती. असे प्रकार अनेकदा घडल्याचे व्यापारी सूत्र सांगतात.
विदर्भासह राज्याच्या विविध भागांत पावसाची संततधार आहे. त्याचा सर्वाधिक फटका भाजीपालावर्गीय पिकांना बसला आहे. त्यामध्ये वांगीदेखील असून, जुलै महिन्यात १५०० ते २००० रुपयांनी व्यवहार झालेल्या वांग्याला आता प्रति क्विंटल ३००० ते ४५०० रुपयांचा दर मिळत आहे. मात्र, पुढील २५ दिवस ते एक महिना ही तेजी कायम राहील, असे सांगितले जाते.
अमरावती बाजारात २००० रुपयांचा दर
नागपूरच्या कळमना बाजारात वांगी दरात क्विंटलमागे एक हजार रुपयांची तेजी आली आहे. मात्र त्याच वेळी अमरावती बाजार समितीत आवक होणाऱ्या वांग्याला १८०० ते २००० रुपयांचा दर मिळत आहे. विशेष म्हणजे या बाजारात वांगी आवक ही अवघी २० क्विंटलची आहे. पूर्व विदर्भातील भंडारा तसेच ११ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात वांगी लागवड राहते.
नागपूरच्या महात्मा फुले बाजार तसेच कळमना बाजारात आवक होणाऱ्या वांग्याचे दरात जुलैच्या तुलनेत मोठी सुधारणा झाली आहे. एक हजार रुपयांनी वांगी दर वधारत पूर्वीच्या १५०० ते २००० रुपयांवरून ३००० ते ४५०० रुपयांवर पोहोचले आहेत. २० ते ३० दिवस ही तेजी कायम राहील, अशी अपेक्षा आहे.राम महाजन, अध्यक्ष, महात्मा फुले अडत असोसिएशन, नागपूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.