Broiler Chicken Agrowon
ॲग्रोमनी

Broiler Chicken Rate : ब्राॅयलर कोंबडी टोमॅटोपेक्षाही स्वस्त

Anil Jadhao 


अनिल जाधव
Broiler Chicken Price: पुणेः ब्राॅयलर पक्षाचे भाव एकाच महिन्यात जवळपास निम्मे झाले. राज्यात ब्राॅयलचे भाव १४० वरून ७५ रुपयांवर आले. त्यातच मागील तीन दिवसांमध्ये वाढ झाली म्हणून ही भावपातळी दिसते. नाहीतर मागील आठवड्यातील भाव ५५ रुपयांवर होते. सध्या उत्पादन खर्चापेक्षा भाव २० ते ३० रुपयांनी कमी आहेत. अंड्याचे भावही साडेपाच रुपयांवून साडेतीन ते चार रुपयांवर आले. याचा मोठा आर्थिक फटका पोल्ट्री उद्योगाला बसत आहे.

देशातील बाजारात सध्या ब्राॅयलरचे रेट कमी झाले आहेत. किरकोळ चिकन विक्रीचे भाव मे महिन्यातील उच्चांकी ३०० रुपयांपासून आता नरमले आहेत. सध्या मात्र हा भाव २००  ते २५० रुपये प्रतिकिलोवर आला. ब्राॅयलर जिवंत पक्षी म्हणजेच पोल्ट्री उत्पादकांना मिळणारा भाव आणि अंड्याचे भावही कमी झाले. उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्री उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

यंदा अधिक मास आणि श्रावण या दोन्ही महिन्यांमुळे चिकनचा आणि अंड्याचा खप कमी झाला. या काळात चिकनचे भाव कमी होतील, याचा अंदाज पोल्ट्री उद्योगाला होता. त्यादृष्टीने उत्पादन कमी करण्याचा प्रयत्नही झाला. पण अधिकमास सुरु होण्याच्या आधी शेडमधला माल संपला नाही. हा माल अधिकमास सुरु झाल्यानंतरही बाजारात येत गेला. त्यामुळे ब्राॅयलरचे भाव अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात कमी झाले, असे पोल्ट्री उद्योजक अनिल फडके यांनी सांगितले.

असा झाला भाव कमी
मागील काही महिन्यांपासून पोल्ट्री खाद्याचे भाव स्थिरावले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च ८५ ते ९० रुपयांच्या दरम्यान येतो. तर भाव ७५ ते ७८ रुपयांच्या दरम्यान आहेत. म्हणजेच भाव उत्पादन खर्चापेक्षा कमीच आहेत. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे मरतूक, रोगराई आणि वजन वाढण्यात येणाऱ्या अडचणींमुळे उत्पादन कमी होते. यामुळे ब्राॅयलरचा भाव १४० रुपयांपर्यंत गेला होता. काही ठिकाणी भावाने १७० रुपयांचाही टप्पा गाठला होता.  श्रावणामुळे मागणी कमी होते. पण नेमकं या काळात पक्षांच्या वाढीसाठी पोषक वातावरण होत असते. त्यामुळे पुरवठा वाढण्यास मदत झाली. याचा दबाव दरावर आला.

उत्तर भारतातील मार्केट पडले
मध्य आणि दक्षिण भारतात चिकनची मागणी अधिक मासात तेवढी कमी झाली नाही. पण उत्तर भारतात दोन महिने श्रावण पाळण्यात येत असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली. परिणामी उत्तर भारतातील भावही घटले. उत्तर भारतातील राज्यांमध्ये ब्राॅयलरचे भाव सध्या ६० ते ७० रुपयांच्या दरम्यान आहेत. भाव कमी असल्याने माल या भागात पाठवला जात नाही. याचा दबाव आणखी वाढत गेला. श्रावणात मागणी कमी होते. त्यामुळे पुरवठा कमी होणे अपेक्षित असतानाही पुरवठा अपेक्षेपेक्षा जास्तच राहीला, असे महाराष्ट्र पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंतकुमार शेट्टी यांनी सांगितले.

दसऱ्यानंतर वाढेल मागणी
चिकनला श्रावणानंतर मागणी वाढण्यास सुरुवात होईल. पण श्रावण संपल्यानंतरही गणेशोत्सव आणि नवरात्री असते. त्यामुळे चिकनची मागणी दसऱ्यानंतरच चांगली वाढेल, असे पोल्ट्री उद्योगातील जाणकारांनी सांगितले. वर्षभरात सण आणि वातावरणामुळे पोल्ट्रीची मागणी कमी जास्त होत असते. त्यामुळे पोल्ट्री उत्पादकांनी बाजारातील ही स्थिती पाहून नियोजन केल्यास बाजारातील मोठी घसरण काही अंशी कमी केली जाऊ शकते, असेही जाणकार सांगतात. सध्या पोल्ट्री उत्पादकांना ब्राॅयलर पक्षामागे किलोला २० ते ३० रुपयांचा तोटा होत आहे. यामुळे पोल्ट्री उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमले, असे म्हणावे लागेल.

श्रावणात चिकनची मागणी १५ ते २० टक्क्यांनी कमी होत असते. पण नेमकं या काळात पुरवठा वाढला. खाद्याचे स्थिरावलेले भाव, पोषक वातावरण आणि पिलाचे कमी झालेले भाव यामुळे ब्राॅयलर उत्पादन वाढले. सध्या उत्पादन खर्चापेक्षा २० ते ३० रुपये कमी भाव आहे. अंड्याचेही भाव घसरले. याचा मोठा आर्थिक फटका उत्पादकांना बसत आहे. त्यामुळे पोल्ट्री उत्पादकांनी बाजारातील मागणी लक्षात घेऊन उत्पादनात वाढ किंवा घट करावी. यामुळे आर्थिक नुकसान कमी करता येईल.
- वसंतकुमार शेट्टी, अध्यक्ष, महाराष्ट्र पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशन

श्रावण आणि अधिक मासामुळे चिकनला मागणी कमी होते. पोल्ट्री उद्योगाने पुरवठा कमी करण्याची तयारीही केली होती. पण काही दिवस पुरवठा जास्त राहीला. त्यामुळे ब्राॅयलरचे भाव काही दिवस अगदी ५५ रुपयांवर आले होते. पण मागील तीन दिवसांपासून भाव ७५ ते ७८ रुपयांच्या दरम्यान आहेत. श्रावण संपेपर्यंत भाव कमीच राहण्याचा अंदाज आहे.
- अनिल फडके, पोल्ट्री उद्योजक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT