Chicken : चिकनसाठी कोंबडी मागा दीड ते दोन किलो वजनाचीच!

कुक्‍कुटपालन शास्त्र विभागातील तज्ज्ञांचा सल्ला
 Chicken
ChickenAgrowon
Published on
Updated on

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर ः करारदार कंपन्यांकडून अधिक वजनांच्या कोंबडीची विक्री होत असल्याने चिकनमधील (Chicken) पौष्टिक घटकांचा ऱ्हास होत अपेक्षीत चव मिळत नाही. परिणामी खवय्ये चिकनपासून दुरावत असल्याचे निरीक्षण एका अभ्यासात नोंदविण्यात आले आहे. याचा थेट परिणाम देशभरातील पोल्ट्री व्यवसायावर (Poultruy Business) होत असल्याने शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोंबडी खरेदी करताना तिचे वजन दीड ते दोन किलो इतके असेल, यावर भर देण्याचा सल्ला ‘माफसू’ (MAFSU) अंतर्गत कार्यरत असलेल्या नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी दिला आहे.

 Chicken
Poultry Feed : कोंबडी खाद्यात ‘गवार मील' चा वापर

पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. त्यानंतरच्या काळात या क्षेत्रात कंपन्यांचा शिरकाव झाला. कंपन्यांनी करारावर या व्यवसायाकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. एक दिवसाच्या कोंबडी पिल्लाचा पुरवठा करीत त्यांचे वजन दीड ते दोन किलो झाल्यानंतर विक्रीसाठी लिफ्टिंग करण्यास सुरुवात केली. आता मात्र कोंबडीचे वजन तीन ते चार किलो झाल्यावरच कंपन्या लिफ्टिंग आणि विक्री करीत आहेत. दीड ते दोन किलो वजन होण्यासाठी लागणाऱ्या खाद्यामध्येच आता तीन ते चार किलो कोंबडीचे वजन होते. त्यामुळे खासगी कंपन्या अधिक वजनाच्या कोंबड्यांचा पुरवठा बाजारात करीत आहेत. यातून कंपन्यांचे उत्पन्न वाढत असले तरी खाणाऱ्यांना मात्र योग्य प्रतीचे चिकन मिळत नाही, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. सरासरी २८ दिवसात कोंबडीचे दीड किलो वजन होते. या काळातील चिकन कोवळे असते. शास्त्रीयदृष्ट्या त्यातील मीट फायबर चांगले असतात, मात्र वजन वाढले तर लवचिकपणा आणि रसाळपणा कमी होते, असा मुद्दा तज्ज्ञांनी मांडला आहे. त्यामुळेच वजन वाढलेल्या कोंबडीचे चिकन हे रबराप्रमाणे लागते, असा अनेक खवय्यांचा अनुभव आहे. अपेक्षित चव मिळत नसल्याने परिणामी ग्राहक दिवसेंदिवस चिकनपासून दुरावत असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

 Chicken
कोंबडी अंडी देत नाही काय करायचं?

मांसल कोंबडीचे वजन किती असावे याबाबत आम्ही अभ्यास केला आहे. त्या अंतर्गत एक ते तीन किलो वजनाच्या कोंबड्यांची निवड करण्यात आली. त्याचे चिकन लोकांना खाण्यासाठी देण्यात आले. त्याची चव गुणात्मकरित्या नोंदविता यावी याकरिता एक ते पाच गुण निर्धारित केले. यातूनच दीड ते दोन किलो वजनाच्या कोंबडीला खवय्यांची पसंती मिळाली. वजन वाढल्यास कोंबड्यांना सांभाळणे अवघड होते. त्या कमी खातात आणि विष्ठा अधिक करतात. परिणामी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि मरतूक वाढते, अशा अडचणी कुक्कुटपालकाच्या समोर आहेत.
- डॉ. मुकुंद कदम,
विभागप्रमुख, कुक्‍कुटपालन शास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय,नागपूर


तरूणाईंमध्ये चिकनची क्रेझ असली तरी अधिक वजनाच्या कोंबडीचे चिकन खाण्यात आल्यास त्यांचा भ्रमनिरस होतो. परिणामी खवय्यांनी जागरुकपणे दीड ते दोन किलो जिवंत कोंबडीच्या चिकनची मागणी करावी. करारदार कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकाला अडचणीत आणण्याचे काम करीत आहेत. हा प्रकार थांबावा यासाठी शासनस्तरावरून जागृतीचे प्रयत्न व्हावे.
- अतुल पेरसपूरे,
पोल्ट्री व्यावसायिक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com