Farm road  agrowon
ग्रामविकास

Farm Road : शेतरस्त्यांचा प्रश्‍न कधी सुटणार?

Agriculture Road Issue : अनेक वर्षांपासून शिव, पानंद शेत रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. येथील सर्व शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Team Agrowon

Sewage Farm Road : शेतांचे कच्चे रस्ते ही नेहमीच मोठी समस्या राहिली आहे. आज शेतीमाल वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी ज्या रस्त्यांवरून ही वाहने धावणार आहेत ते शेतरस्ते खड्डे, दगडधोंडे आणि धुराड्याने माखलेली दिसतात. खरे तर मागच्या काही वर्षांत देशात झालेली ‛रस्ते क्रांती’ आपल्या सर्वांचे जीवन सुसह्य करणारी ठरली, अनेक व्यवसायांना गतिमान करणारी ठरली. शेतीमालाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास उत्पादित पक्का माल इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी यामुळे फार मदत होतेय. त्यामुळे पैशात आणि वेळेत होणारी बचत आपल्यासाठी अधिक महत्त्वाची ठरते. आपण यावर समाधान व्यक्त करतो. परंतु एकंदरीत कृषी उत्पादन प्रक्रियेचा विचार केला तर जमीन तयार करण्यापासून ते शेतीमाल काढणीपर्यंत लागणाऱ्या खर्चाची कपात शेतीसाठी चांगले रस्ते दिले तर शक्य आहे, हे समजून घेतले पाहिजे.

शेतीच्या रस्त्यांचं अर्थचक्र

१) आजकाल शेतात जाण्यासाठी बैलगाडीच्या तुलनेत दुचाकीचा वापर वाढला आहे. त्यामुळे इंधनासाठी लागणाऱ्या खर्चात अपरिहार्यपणे वाढ झालेली आहे. त्यात शेताचे कच्चे रस्ते या खर्चात अधिक वाढ करतात. उदा. चांगल्या रस्त्याने ५० किलोमीटर प्रति लिटर चालणारी दुचाकी शेतीच्या रस्त्याने ३०-३५ किलोमीटरच चालते. म्हणजे इंधनात होणारा खर्च जवळपास दीड पट वाढतो. अल्पभूधारक शेतकऱ्याचा इंधनामागे होणारा जादाचा खर्च सरासरी प्रतिदिन ४० रुपये जरी गृहीत धरला तरी महिन्याकाठी हा खर्च १००० ते १२०० रुपयांनी वाढतो आणि वर्षाअखेर हाच आकडा १० ते १२ हजार रुपये होतो. हा आकडा एका एकरातून मिळणाऱ्या निव्वळ नफ्याच्या जवळपास आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर खर्चात कपात करणे हे पर्यायाने आले. परंतु शेतीच्या कच्च्या रस्त्यांमुळे खर्चात वाढच होत आहे.

२) पावसाळ्यात खर्चाचे हे प्रमाण अधिक तीव्र होते. वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढतो. वाहन शेताच्या रस्त्याने चिखलात अडकले म्हणजे दुसऱ्या पर्यायी वाहनाची मदत घेऊन ते बाहेर काढावे लागते. बैलगाडीतून शेतीमाल वाहताना बैलांचे पाय चिखलात फसतात आणि बऱ्याच वेळा ते खाली बसून जातात. अशावेळी सुद्धा शेतकऱ्याला पर्यायी वाहनाची व्यवस्था करावी लागते. ही शेतकऱ्यांसाठी अधिक खर्चाचीच बाब ठरते.

३) शेतीच्या कच्च्या रस्त्यांमुळे मजुरीत प्रचंड वाढ होते. उदाहरण द्यायचे झाल्यास केळीच्या घडाची वाहतूक करताना तो घड शेतातून मालाच्या गाडीपर्यंत आणण्यासाठी साधारण सात रुपये प्रतिघड याप्रमाणे मजुरी लागते. मात्र पावसाळ्यात चिखलामुळे मालाची गाडी बऱ्याच वेळा शेताच्या बांधापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे शेतीमाल आणि मालाच्या गाडीपर्यंतचे अंतर वाढते. त्याचा परिणाम मजुरीवर होतो. मग तो वाहतूक खर्च १५ ते २० रुपये प्रतिघड एवढा वाढतो. अशाप्रकारे इतरही शेतीमाल वाहतुकीचा खर्च वाढतोय.

४) पावसाळ्यात खताची वाहतूक असेल वा मजुरांची, शेत थोडं लांब असेल तर चिखलामुळे शेतात पोहोचण्यापर्यंत साधारण दोन तास हमखास उशीर होतो. यामुळे मजुरांच्या काम करण्याच्या वेळेवर मर्यादा येतात. एरवी दिवसभर होणारे अपेक्षित काम पूर्ण होत नाही, राहिलेल्या कामासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा काही मजूर न्यावे लागतात. याचाच अर्थ पक्क्या रस्त्यांच्या अभावी शेतकऱ्यांच्या खर्चात अपरिहार्य वाढ होते.

दुखापत-जीवितहानीचा प्रश्‍न

कित्येकदा शेताच्या रस्त्याने शेतीमालाने भरलेली बैलगाडी उलटी झाली, ट्रॅक्टरची ट्रॉली उलटी झाली अशा बातम्या आपल्या कानावर येतात. यात अनेकदा शेतकऱ्यांना, शेतमजुरांना जबर दुखापत होते कधी तर जीवितहानी देखील होते. शेतीमालाचेही नुकसान होतेच. या सर्वांचे मूळ कच्चे रस्ते असतात. गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर किंवा शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची चर्चा होते. परंतु शेताच्या कच्च्या रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांची चर्चा कुठे दिसून येत नाही.

शेतरस्त्यांचे अन्य प्रश्‍न

कृषिमित्र गणेश बिचारे कळवतो की त्याच्या अडीच एकर शेतजमिनीला कुठल्याही बाजूने रस्ता नाही. शेतात एखादे वाहन न्यायचे असेल तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या संमतीने त्यांच्या शेतीतून ते वाहन न्यावे लागते. शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टर न्यायचा असेल वा काढणीच्या वेळेस थ्रेशिंग मशिन न्यायचे असेल तर संबंधित शेतकऱ्यांच्या अनुकूलतेनुसार निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे बऱ्याच वेळा मानसिक अस्वस्थता जाणवते. शिवाय कामे वेळेवर न झाल्यामुळे पिकाच्या अंतिम उत्पादनात काही अंशी परिणाम होतात. राज्यातील इतर भागातही ही समस्या आहे.

शेतीच्या कच्च्या रस्त्यांच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी बऱ्याच भागात शेतकरीच पुढे सरसावले दिसतात. एकमेकांच्या आर्थिक साह्यातून खडी टाकणे, रोलर फिरवणे अशी तात्पुरत्या स्वरूपाची कामे करताना दिसतात. रस्त्यांचे इतर प्रश्‍न शेतकरी एकमेकांच्या सामंजस्याने सोडवतात. परंतु बऱ्याच वेळा रस्त्यांवरून शेतकऱ्यांचे वाद होतात, कधी कधी त्याचे पर्यवसान हाणामारीत होते, नाहक वाद वाढतात, मानसिक तणाव येतो, कोर्टकचेरी मागे लागते, पैसा खर्च होतो. त्यामुळे या समस्येला शेतकऱ्यांच्या एकोप्यातून सोडवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. सोबतीला शासनाने शेतीच्या रस्त्यांसाठी भरीव आर्थिक तरतूद आणि प्रभावी व नियोजित वेळेत रस्त्यांची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. शासनस्तरावरून शेतीच्या रस्त्याच्या कामांना गती मिळणे आवश्यक आहे. असे म्हणतात विकासाची एक्स्प्रेस चांगल्या रस्त्यांवरून धावते. चांगले शेतरस्ते हे कृषी क्षेत्राच्या परिणामी शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे द्योतक आहे, हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

- योगेश पाटील, मु. पो. अंतुर्ली ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT