
Satara Agriculture News ‘गाव करेल ते राव काय करेल’ या उक्तीची प्रचिती कऱ्हाड (जि. सातारा) तालुक्यात महाराजस्व अभियानातून (Maharajaswa Abhiyan) खुल्या करण्यात आलेल्या नकाशावरील पाणंद, शेती रस्त्यातून (Farm Road) आली आहे. गेली अनेक वर्षे बांधाला बांध असूनही एकमेकांचे तोंडही न बघणारे शेतकरी एकत्र आणण्यात या अभियानातून यश मिळाले आहे.
४० वर्षांहून अधिक काळ बंद असलेले शेतीरस्ते, पाणंदरस्ते शासनाच्या सहकार्याने लोकसहभागातून खुले करण्यात आले आहेत. दंडेलशाहीने अतिक्रमण करून गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेले पाणंद रस्तेही खुले झाले आहेत.
त्यामुळे तालुक्यातील १७ गावांतील ४७.६ किलोमीटर अंतराचे २७ रस्ते खुले होऊन सुमारे ३४९६ शेतकऱ्यांच्या रस्त्याची सोय झाल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
शेतात ये-जा करण्याबरोबरच काढणीयोग्य माल शेताबाहेर नेण्यासाठी पूर्वजांपासून पाणंद रस्ते आहेत. शासनाकडील नकाशावर त्याची नोंदही आहे; मात्र अनेक गावांतील शिवारात ते रस्ते अतिक्रमणात गेले,
त्यामुळे काहींनी न्यायालयात धाव घेतली, तर काहींनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. हेलपाटे घालून अनेकांनी आपले निम्म्याहून अधिक आयुष्य खर्ची घातले तरीही तो प्रश्न सुटला नाही.
त्यावर आता सामंजस्यातून ते प्रश्न मिटविण्यासाठी सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत तोडगा उपलब्ध झाला. संबंधित रस्ते सर्व विभागांच्या सहकार्यातून खुले करण्याची मोहीम महसुल विभागाने सुरू केली आहे.
त्याअंतर्गत जिल्हाधिकारी रुचेल जयवंशी, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय पवार यांनी नकाशावरील शेतीरस्ते, पाणंदरस्ते खुले करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल यांनीही मोठे प्रयत्न केले.
त्यातून कऱ्हाड तालुक्यातील शेणोली मंडलातील शेणोली व शेरे या दोन गावातील दहा रस्ते, उंब्रज मंडलातील शिवडे, खालकरवाडी, चरेगाव शितळवाडी, पाल येथील एक या पाच गावातील सात रस्ते, येळगाव मंडलातील येळगाव, येणपे, माटेकरवाडी, चोरमारवाडी, लोहारवाडी, शेवाळवाडी (येणपणे) या सहा गावांतील सहा रस्ते, कवठे मंडलातील निगडी, उंडाळे मंडलातील उंडाळे, सुपने मंडलातील म्होप्रे आणि काले मंडलातील कासार शिरंबे येथील प्रत्येकी एक असे १७ गावातील ४७.६ किलोमीटरचे शेतीरस्ते खुले करण्यात आले आहेत.
त्या माध्यमातून ४० वर्षांहून अधिक काळ जे रस्ते बंद होते, ते खुले करण्यास प्रशासनाला यश आले. सुमारे तीन हजार ४९६ शेतकऱ्यांना तसेच सुमारे ३६०० एकर जमीन क्षेत्राला त्याचा लाभ झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतूनही समाधान व्यक्त होत आहे.
एकाच गटात, बांधाला बांध असूनही एकमेकांचे तोंडही न बघणारे, जमिनीच्या वादातून कचेरीत तारखेसाठी हेलपाटे मारुन वैतागलेले शेतकरी महाराजस्व अभियानातून एकत्र आण्यात आले.
हे अभियान सर्वांच्याच हिताचे आहे, हे पटल्यानंतर अनेक शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी लोकसहभाग घेतला. त्यातून गेल्या अनेक वर्षांपासून संवाद न साधणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संवाद सुरु झाला आणि रस्तेही खुले झाले. महसुल विभागाला हे मोठे यश मिळाले आहे.
महाराजस्व अभियानातून कऱ्हाड तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेले पाणंद रस्ते, शेतीरस्ते खुले करण्यात यश आले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. तहसीलदार विजय पवार, मंडल अधिकारी, तलाठी यांनी त्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
- उत्तमराव दिघे, प्रांताधिकारी, कऱ्हाड
मंडल अधिकारी, तलाठी व शेतकऱ्यांच्या सहकार्यातून कऱ्हाड तालुक्यात महाराजस्व अभियान यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. त्यातून अनेक वर्षापासून बंद असलेले शेतीरस्ते, पाणंदरस्ते खुले होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली सोय होत आहे. प्रत्येक मंडलातील गावात हे अभियान राबवण्यात येणार असून नकाशावरील रस्ते खुले करण्यात येणार आहेत.
- विजय पवार, तहसीलदार, कऱ्हाड
शेणोली गावातील गावओढ्याचा रस्ता नकाशावर असतानाही २५ वर्षांपासून शेतमाल वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे आम्हाला खुपच लांबून जावे लागत होते. दैनंदिन व्यवहारासाठी तो रस्ता महाराजस्व अभियानातून खुला झाल्यामुळे आमचा मोठा त्रास होऊन आमच्या शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे शासनाचे आम्ही आभार मानतो.
- रघुनाथ कणसे, शेतकरी, शेणोली
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.