Animal Husbandry : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुपालन व्यवसाय अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर बनवता येतो. इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित स्मार्ट कॉलर, स्वयंचलित दुग्धसंकलन यंत्रणा, पशू ताण व्यवस्थापन प्रणाली, तसेच डेटा विश्लेषणाच्या साह्याने शेतकऱ्यांना पशुव्यवस्थापनात मोठी मदत होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे आरोग्य, उत्पादन क्षमता, आणि संरक्षण अधिक प्रभावी पद्धतीने व्यवस्थापित करता येते. सध्याच्या काळात जनावरांच्यामध्ये आजाराचा प्रसार, आपत्कालीन परिस्थिती (पूर, आग, दुष्काळ इत्यादी) तसेच पर्यावरणीय समस्या भेडसावत आहेत.
पशुपालनातील आव्हाने
आरोग्य आणि व्यवस्थापन
योग्य आरोग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे जनावरांच्या मृत्युदरात वाढ होते, ज्यामुळे आर्थिक तोटा होतो. जनावरांच्या आरोग्यविषयक समस्या जसे की ताप, पचनविकार आणि प्रजननासंबंधित अडचणी वेळेवर ओळखता येत नाहीत.
आपत्ती व्यवस्थापन
पूर, दुष्काळ, आग, वादळ किंवा मिथेन गॅस गळती यासारख्या आपत्ती जनावरे आणि मानवासाठी देखील धोका पोहोचवितात. यामुळे अन्नसुरक्षा साखळी खंडित होऊन शेती अर्थव्यवस्थेला फटका बसतो.
पायाभूत सुविधांचा अभाव
ग्रामीण भागात पशुंसाठी आवश्यक औषधोपचार, पशुवैद्यकीय सुविधा आणि अद्ययावत उपकरणांचा अभाव आहे. परिणामी, शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणे खर्चीक आणि वेळखाऊ ठरते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव
पशुपालन अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशिन लर्निंग आणि डेटा विश्लेषण यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर येत्या काळात महत्त्वाचा ठरणारा आहे.
सरकारी योजनांचा प्रसार
विविध सरकारी योजना आणि अनुदाने उपलब्ध असली तरी लोकांच्यापर्यंत त्यांचा प्रसार होत नाही. योजना अंमलबजावणी, जागरूकता, आणि प्रशिक्षण यामध्ये अनेक अडचणी येतात.
स्मार्ट कॉलर प्रणालीचे फायदे
आरोग्य तपासणी यंत्रणा
इंटरनेट ऑफ थिंग्ज अंतर्गत सेंन्सर सतत तापमान, हृदयगती, हालचाली आणि इतर आरोग्य निदेशकांचे निरीक्षण करतात. यातील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण करून संभाव्य आजारांची आगाऊ सूचना मिळते. उदाहरणार्थ, प्रजननासाठी योग्य वेळ किंवा पचनविकार यासारख्या समस्या ओळखून वेळेवर उपाय करता येतील.
आपत्कालीन इशारे
इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित पर्यावरणीय सेंन्सर पूर, आग, वादळ किंवा मिथेन गॅस गळतीसारख्या आपत्ती ओळखून तत्काळ इशारा देतील. मशीन लर्निंगच्या माध्यमातून अल्गोरिदमच्या मदतीने आपत्तीची तीव्रता आणि संभाव्य धोका विश्लेषित केला जातो. ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर योग्य निर्णय घेता येईल.
स्थान शोधण्याची सुविधा
इंटरनेट ऑफ थिंग्ज अंतर्गत नेटवर्कमधील जीपीएस ट्रॅकिंगमुळे हरवलेल्या जनावरांचा शोध घेणे सोपे जाते. मशीन लर्निंगच्या साह्याने जनावरांच्या हालचालींचे विश्लेषण करून त्यांच्या सवयी आणि संभाव्य धोक्यांची माहिती मिळवता येईल.
डेटा संकलन आणि विश्लेषण
इंटरनेट ऑफ थिंग्ज प्रणालीद्वारे गोळा केलेली माहिती रिअल-टाइममध्ये क्लाउडवर पाठवली जाते. मशिन लर्निंग अल्गोरिदम विविध प्रकारचे विश्लेषण करून पशुपालकांना आरोग्यविषयक सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ, तापमानवाढीमुळे जनावरांच्या वर्तनातील होणारे बदल ओळखता येतील.
उत्पादकता वाढ
मशिन लर्निंग आधारित विश्लेषणामुळे जनावरांची उत्पादकता वाढवण्यासाठी योग्य सल्ला मिळतो. उदाहरणार्थ, जनावरांसाठी योग्य आहार योजना तयार करून उत्पादनक्षमता वाढवता येते.
मोबाइल आणि वेब अॅप
इंटरनेट ऑफ थिंग्ज प्रणालीशी जोडलेल्या मोबाइल अॅप्सद्वारे पशुपालकांना आरोग्यविषयक माहिती, आपत्तीविषयी सूचना आणि अन्य मार्गदर्शन मिळते. मशिन लर्निंग मॉडेल्समुळे अॅप्स अधिक चांगल्या प्रकारे कार्यरत राहतात.
‘स्मार्ट कॉलर’ प्रणाली
पशुपालनातील तंत्रज्ञान आणि माहिती प्रसाराबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरतो. यासाठी डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञान आधारित स्मार्ट कॉलर प्रणाली विकसित करत आहेत. ही प्रणाली पशुधनाचे आरोग्य, सुरक्षा, आणि व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि मशीन लर्निंगच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘स्मार्ट कॉलर’ प्रकल्प आधुनिक शेती आणि पशुपालनासाठी एक प्रभावी आणि शाश्वत उपाय आहे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित होणारी ही प्रणाली पशुपालकांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवणार आहे.
डॉ. जयश्री खरात
(सहायक प्राध्यापक) : jpkharat@dkte.ac.in
पूर्वा कुलकर्णी (विद्यार्थिनी) : purvak0907@gmail.com
(टेक्स्टाइल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, डीकेटीई सोसायटी, इचलकरंजी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.