
डॉ. प्रशांत म्हसे, डॉ. उमा तुमलाम
Animal Respiratory Issues : हिवाळा हा ऋतू आरोग्यदायी आहे. या काळात आजाराचे प्रमाण इतर ऋतूपेक्षा कमी असते. हा काळ जनावरापासून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी पोषक असतो. जर जनावरांची योग्य प्रकारे निगा राखली तर या कालावधीत फायदेशीर उत्पादन मिळू शकते. जनावरांवर पडणारा शारीरिक तणाव हे संसर्गजन्य आजार होण्यामागचे मूळ कारण असते.
वातावरणात होणारा अचानक बदल, प्रवास, थंडी, पावसात भिजणे, गर्दी, दमट आणि ओलसर रोगट हवामान, धूळ, धूर, प्रदूषण, खाण्यापिण्यातील बदल, व्यवस्थापनातील उदासीनता, लसीकरण आणि इतर आजार, कृमींचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव, गर्भारपणा, जीवनसत्त्व, खनिजांचा अभाव, प्रजनन आणि दुग्धोत्पादन इत्यादी कारणांमुळे जनावरे तणावात असतात. काही जंतू निरोगी जनावरांचा घसा, श्वसनसंस्थेमध्ये सामान्यतः उपद्रव न करता राहत असतात.
उदाहरणच द्यायचे झाल्यास घटसर्प आणि संसर्गजन्य फुफ्फुसदाह म्हणजेच मायकोप्लाज्मासारखे जिवाणू. परंतु जेव्हा जनावरांवर ताण तणावाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा हे जिवाणू जनावरांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचा फायदा घेऊन प्रादुर्भाव करतात. रक्तात शिरकाव करतात आणि इजा पोहोचविण्यास सुरुवात करतात, त्यांची संख्या झपाट्याने वाढत जाते. हे जंतू आजारी जनावराच्या शरीरातील थुंकी, लाळ, दूध, मलमूत्र इत्यादी वाटे बाहेर पडतात आणि इतर निरोगी जनावरांमध्ये पसरतात. अशाप्रकारे तीव्र श्वसन संस्थेच्या आजाराचा प्रसार सुरू होतो.
थंडीच्या काळातील आजार :
थंडीच्या दिवसांत जनावरांना श्वसन संस्थेचे गंभीर आजार होतात. यामध्ये नासिका बाधित झाल्याने होणारे सर्दी पडसे, सायनस दाह, घशाचा दाह होतो. तसेच श्वसन नलिकेचा दाह, फुफ्फुस दाह, फुफ्फुसावरण दाह हे आजार होतात. श्वसन संस्थेचे बहुतेक जंतू हवेतून पसरतात. त्यामुळे त्यांचा प्रसार अतिशय झपाट्याने होतो.
सर्दी पडसे :
हे सामान्य फ्लू सारख्या विषाणूमुळे जनावरांत होऊ शकते. परंतु जिवाणूंची बाधा, बुरशी तसेच काही परोपजीवी कृमी, कर्करोग यामुळे बाधा होते. सर्दीमध्ये जनावरांच्या नाकातून चिकट पिवळसर स्राव येतो, जनावरास थोडासा ताप येतो, डोळ्यांमधून अश्रू वाहतात, शिंका येतात, जनावर नाक भिंतीवर घासतात, मान हालवतात.
नासिका चोंदल्यामुळे अस्वस्थ होतात, नाकातून घोरल्यासारखा आवाज येऊ शकतो, सायनस दाह असल्यास डोके भिंतीवर दाबून धरतात. कधी कधी तीव्र दाह असल्यास नाकातून रक्त किंवा गुठळ्या पडू शकतात.
श्वसन नलिकेचा दाह :
रोगजंतूंचा श्वसननलिकेत संसर्ग झाल्याने तसेच सर्दी पडशाचे लवकर उपचार न केल्याने श्वसन नलिकेचा दाह होऊ शकतो. यामध्ये श्वसनास त्रास होणे, खाणे पिणे बंद होणे, खोकला येणे असे लक्षणे दिसून येतात.
घशाच्या वेदना वाढतात. डोळे लाल होतात.
घटसर्प :
जिवाणूजन्य आजारामध्ये घसा आणि श्वसननलिकेचा अतिशय गंभीर दाह होतो. यामध्ये श्वसननलिकेला सूज येते, जनावराला श्वास घेणे अशक्य होते.
रक्तात जंतू गेल्यामुळे अति तीव्र ताप देखील येतो. जनावरांचे खाणे पिणे पूर्णपणे थांबते. नाक, डोळ्यांतून स्राव गळतो, तोंडातून लाळ गळत असते.
फुफ्फुसदाह :
श्वसन नलिका तसेच रक्तामध्ये रोगजंतू दीर्घकाळ राहिले तर पुढे ते फुफ्फुसामध्ये संक्रमण करतात. यामुळे दमा होतो.
हा आजार प्रामुख्याने हिवाळ्यात आढळून येऊ शकतो. काही आजाराचे जंतू फुफ्फुस्दाह झाल्यावर हवेतून इतर जनावरांमध्ये अतिशय झपाट्याने पसरतात. जनावरास आधी भरपूर ताप येतो, चारा- पाणी खायचे बंद करून जनावर एकाच जाग्यावर सुस्त बसून राहते. सकाळच्या वेळी आणि सायंकाळच्या वेळी जनावर जास्त खोकते.
आजारात कोरडा आणि दीर्घ काळ बरा न होणारा खोकला दिसून येतो. फुफ्फुस किती प्रमाणात बाधित झाले आहे, त्याप्रमाणे खोकल्याची तीव्रता कमी अधिक असते.
नाकातून अती चिकट पिवळसर किंवा हिरवट स्राव मोठ्या प्रमाणावर गळतो. फुफ्फुसदाह असणाऱ्या जनावरांच्या शरीराचा ऱ्हास होत जाऊन त्यांचे वजन कमी कमी होत जाते.
जनावराची कार्यक्षमता संपू लागते आणि थोडं जरी चालले तरी त्याला धाप लागते. छातीतील तीव्र वेदनेमुळे जनावर आखडून उभे राहते तसेच मान छातीवर टाकून पडून राहते.
फुफ्फुसावरण दाह :
फुफ्फुसदाह संसर्ग जास्त तीव्र प्रमाणात आणि दीर्घ कालावधीसाठी जनावराच्या श्वसनसंस्थेमध्ये राहिला आणि त्याचा योग्य उपचार केला गेला नाहीत तर त्याचे पर्यावसान फुफ्फुसावरण दाहामध्ये होते.
यामध्ये फुफ्फुस बाधित असतेच, त्यात गळू झालेले असतात. फुफ्फुसाच्यावरील पिशवी सारखे आवरण संसर्गित होऊन त्यामध्ये सूज निर्माण झाल्याने पाणी आणि पू साचायला लागतो.
जनावराच्या शरीराचे तापमान आधी वाढून नंतर कमी कमी होत जाते. फुफ्फुसदाह झाल्यावर दिसणारी सगळे लक्षणे यात दिसतात. त्याचबरोबर छातीत पाणी साकाळल्यामुळे हालचाल कमी होते
छातीतील असहाय वेदनांमुळे जनावर वाकून समोरच्या पायांत जास्त अंतर ठेवून ताठून मान खाली घालून उभे राहते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना :
तज्ज्ञ पशुवैद्याकामार्फतच या जनावरांचे औषधोपचार करावेत.
हिवाळ्यात जनावरांच्या दैनंदिन व्यवस्थापनामध्ये त्यांच्या शरीरावर ताण पडू नये म्हणून प्रतिकूल हवामानापासून संरक्षण करणे सगळ्यात महत्त्वाचे असते.
वातावरणामधील तापमानाच्या बदलामुळे जनावरांच्या शरीराच्या तापमानात देखील आवश्यक बदल होत असतो आणि शारीरिक तापमान एका विशिष्ट मर्यादेत राखले जाते. त्यासाठी जनावरांमध्ये निर्माण होणारी अंतर्गत शारीरिक उष्णता आणि बाहेरील वातावरणातून मिळणारी उष्णता यांचा समतोल राखला जातो.
बाह्य वातावरणातील तापमानात अचानक जास्त चढ-उतार झाला तर शरीराला या तापमानाशी जुळवून घ्यायला अधिक श्रम पडतात. म्हणजेच जास्त तणाव येतो.
वातावरणातील तापमानात होणारा बदल लहान पिले, वासरे आणि तणावग्रस्त जनावरांना जास्त त्रासदायक असल्याने तापमान अधिक खाली आले तर ते सहन करू शकत नाहीत.
थंडीच्या दिवसांत जनावरे अधिक खाद्य खाऊन जास्त ऊर्जा निर्माण करायचा प्रयत्न करतात. ही ऊर्जा शरीराच्या तापमानाचा समतोल राखण्यास मदत करते. वातावरण थंड असल्यास कमी उष्णता बाहेर पडते. घाम, कातडीची जाडी, रंग, केस यावरही उष्णतेचे बाहेर पडणे अवलंबून असते.
हिवाळ्यात वातावरण जनावरांच्या शारीरिक तापमानापेक्षा थंड असते. सभोवतालच्या थंड जमिनीशी जनावराचा संपर्क येतो. याशिवाय वेगाने वारे वाहत असतील तर जनावरच्या शरीराला थंड हवा झोंबते आणि तणाव वाढतो. हवेतील ओलावा जास्त असल्यास जनावराची शारीरिक उष्णता अधिक खर्ची पडते. जास्त आद्रता आणि थंड हवामान यामुळे गोठ्यातील भिंती, जमीन तसेच छत आणि त्वचा यावर ओल येते. जनावरांनी खालेल्या चाऱ्यातून त्याच्या शरीराला पोषणासाठी आणि उत्पादनासाठी ऊर्जा मिळत असते. जर शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी या ऊर्जेचा अधिक उपयोग झाला तर जनावराच्या वाढीवर आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम पाहायला मिळतो.
- डॉ. प्रशांत म्हसे, ९०११४११०६६ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.