
डॉ. प्रशांत म्हसे, डॉ. उमा तुमलाम
Animal Management : आधुनिक गोठ्याची रचना साधारणतः अधिक हवेशीर आणि जास्त उजेड पडावा, जनावरांचे ऊन, वारा पाऊस यांपासून संरक्षण व्हावे अशी असते. गोठ्याला चार फूट उंचीच्या भिंती असतात. छतापर्यंत हवा येण्यासाठी मोकळी खिडकी असते. मात्र थंडीमध्ये या रचनेमुळे जास्त थंड हवा गोठ्यात शिरते. जोराचा वारा असेल किंवा पाऊस असेल तर थंडीची तीव्रता अधिक जाणवते. या दिवसांत कॉन्क्रीट पृष्ठभाग जास्त थंड पडतो. त्यावर ओल जास्त असेल तर अधिक थंडावा निर्माण होतो. या दिवसांत रात्रीच्या वेळी योग्य निवाऱ्याची व्यवस्था करावी.
रात्री जनावरे गोठ्यात बांधावीत. गोठ्यात थेट शिरणाऱ्या वाऱ्याला अडसर म्हणून तात्पुरत्या स्वरूपात बारदानाचे पडदे बांधल्यास थंडीचा परिणाम कमी करता येतो. गोठा पूर्णपणे हवा बंद करणे जनावारांच्यादृष्टीने योग्य नाही, कारण त्यामुळे दमट उग्र अमोनिया वायू गोठ्यात निर्माण होऊन जनावारांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो.
गोठ्यातील जमीन कोरडी असावी. शक्य असल्यास लहान वासरे आणि व्यायला झालेल्या गाईंच्या खाली कोरडा भुसा,पाचट, वाळलेले गवत, रबरी मॅट टाकावी.
खूपच जास्त थंडी असल्यास गोठ्यामध्ये विजेचे बल्ब किंवा हिटर लावावेत. जेणेकरून काही प्रमाणात ऊब निर्माण होईल. लहान वासरे आणि नुकत्याच व्यायलेल्या गाईला शेकोटीची ऊब आवश्य द्यावी. नुकत्याच जन्मलेल्या वासराला गाईच्या सान्निध्यात ठेवावे. गोठ्याभोवती हिरवे जैविक कुंपण घातल्यास वाहणाऱ्या गार वाऱ्यास अडथळा तयार होतो.
हिवाळ्यात जनावरांना भरपूर आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक असते. या दिवसात जर कमी पाणी प्यायला दिले तर जनावरांमध्ये बद्धकोष्ठता, अपचन होते आणि पोटात विषारी वायू उत्पन्न झाल्यामुळे पोटफुगी आणि तीव्र पोटदुखीचा विकार होऊ शकतो. खूप वेळ जर जनावरांना प्यायला पाणी दिले नाही आणि मध्ये जास्त कालावधी लोटला तर जनावर एकदम खूप पाणी पिते. यामुळे जनावराला तीव्र पोटदुखी आणि अपचनाचा विकार होतो.
या दिवसांत जनावरांना पाण्याने धुवू नये. त्याऐवजी त्यांना खरारा केल्यास रक्ताभिसरण चांगले होऊन थंडी कमी लागते.
सर्वसाधारण असा समज आहे, की शारीरिक थंडी कमी करण्यासाठी धान्य खाऊ घातल्याने मदत होते. परंतु हा एक गैरसमज आहे कारण अशा खाद्यामुळे उलट अपचन, बद्धकोष्ठता होण्याची शक्यता जास्त असते. या दिवसात हिरवा चारा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे हिरवा चारा जनावरांना जास्त प्रमाणात दिला जातो. हिरव्या चाऱ्यामध्ये एकूण उष्मांक कमी प्रमाणात असतो आणि जास्त खाल्ल्यामुळे पोट जास्त फुगते. त्याऐवजी जनावरांना कोरडा कडबा, वैरण घातल्यास पोटातल्या नैसर्गिक जैविक पचनास चालना मिळून अधिक उष्णता निर्माण होते.
वैरणीची कमतरता असेल तर अतिरिक्त ज्वारी, मका, गहू, बाजरी अशी धान्ये द्यावीत. धान्य विभागून चार पाच वेळेस द्यावे. चारा व्यवस्थापनातील बदल एकदम न करता हळूहळू करावेत, जेणेकरून त्याचा ताण जनावराच्या पोटावर आणि शरीरावर पडणार नाही. प्रत्येक जनावराला पुरेसे खाद्य उपलब्ध होईल या पद्धतीने चाऱ्याचा पुरवठा करावा. विशेषकरून गर्भारपणातील गाई आणि वाढणारी वासरे यांच्या खाद्याची विशेष देखभाल करावी लागते. हिवाळ्यात जनावरांच्या खाद्यात सूक्ष्म घटक, खनिज आणि जीवनसत्त्वाच्या भुकटीचा अंतर्भाव करावा. जनावरांना पोषक आहार दिला गेला तर थंडीपासून त्यांचे संरक्षण होते.
मेंढ्यांच्या अंगावर दाट लोकर असल्यामुळे थंडीत त्या आरामात चरण्यासाठी फिरतात, परंतु शेळ्या मात्र थंडीत गोठ्यामध्येच राहणे पसंत करतात. अशा जनावरांच्या खाली झाडपाला, भुश्शाचे आच्छादन असावे, ज्यामुळे त्यांना उब मिळेल. पण हे आच्छादन जर मलमूत्राने ओले राहिले तर त्यात अमोनिया वायू निर्माण होतो. हा वायू जड असल्यामुळे जमिनीपासून आठ इंचापर्यंत त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे अशा जागी जर एखादे जनावर आजारामुळे बसून किंवा झोपून राहत असेल तर त्याला बाधा होऊन न्यूमोनिया होण्याची शक्यता असते.
जिवाणू आणि विषाणूंचा संसर्ग होऊन फुप्फुस दाह होतो. त्यामुळे हिवाळ्यात जनावरांच्या गोठ्यात स्वच्छ खेळती हवा असणे आणि जनावरांची संख्या मर्यादित असणे आवश्यक असते.गोठ्यात चिखल असल्यास पायाला चिखल्या, सांसर्गिक जखमा होऊ शकतात. चिखलामुळे थंडी वाढते शिवाय जंत, कृमी, माश्या यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मलमूत्र, पाणी यांचा निचरा होईल अशी जमीन आणि गटारांची व्यवस्था करावी. गोठ्यातील जमीन वेळोवेळी स्वच्छ, कोरडी आणि निर्जंतुकीकरण करून घ्यावी. जनावरांच्या खुरांची विशेष काळजी घ्यावी म्हणजे पायाचे विकार टाळता येतील. खूर वाढलेली असल्यास ते कापून घ्यावेत.
साधारणतः थंडीच्या दिवसांत जनावरे वितात. त्यांच्या खाली भुश्शाची गादी करावी. नवजात वासराची नाळ शास्त्रीय पद्धतीने कापून त्यावर औषधाचा बोळा लावावा. वासरास तत्काळ योग्य प्रमाणात कच्चे दूध पाजावे. शेकोटी करावी. दाई पदधतीने ठेवलेल्या वासरांना थोडेसे कोमट दूध पाजावे. वासरांच्या अंगावर गोणपाटाचे पांघरून टाकावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वासरांना लसी आणि जंतनाशक घ्यावे. वासरांचा गोठा स्वच्छ उबदार असावा.
पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार जनावरांचे लसीकरण करावे. त्यापूर्वी जंतनिर्मूलन करावे. सप्टेंबर महिन्यात आंत्रविषाराची लस टोचून घ्यावी. पुढील पंधरवड्यात तोंडखुरी आणि पायखुरीची लसीची मात्रा घ्यावी. डिसेंबर-जानेवारीत एकटांग्या आणि प्लुरोनुमोनीयाचे लसीकरण करावे. या दिवसांत जनावरांच्या अंगावर पिसवा, माशा, डास, गोचीड यांचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो, हे लक्षात घेऊन जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता ठेवावी.
डॉ. प्रशांत म्हसे, ९०११४११०६६
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.