डॉ. प्रवीण बनकर
ब्रिटिशकालीन दस्तऐवजावरून एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील पशुधन संपदेची आणि जैविक विविधतेची आपल्याला कल्पना येईल. कित्येक पशुसंपदा आजही आपल्याला दिसतात. भौगोलिक प्रदेशाच्या आधारे, बाह्यरूपाने, पशुपालक समुदायांचा प्रभाव राज्यातील पशुधन संपदेवर दिसून येतो.
भाग ः २
गोवंश संपदा
महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यानंतर १९६० मध्ये निर्माण झाले. तथापि, ब्रिटिश राजवटीत, आजच्या महाराष्ट्र राज्यातील विविध प्रदेश वेगवेगळ्या प्रांत किंवा राज्यांच्या अधीन होते उदा. बॉम्बे प्रेसिडेन्सी (मुंबई बेटे); माळवा (उत्तर महाराष्ट्र); मध्य प्रांत आणि बेरार राज्य (विदर्भ प्रदेश) आणि हैदराबाद राज्य (मराठवाडा प्रदेश) इ. मुंबई (तत्कालीन बॉम्बे) मध्ये गोवंश प्रमुख पशुधन होते आणि ते मुख्यतः दख्खन (बेरार) प्रदेशातून आणले जात होते.
इतर गोवंशाच्या तुलनेत ‘दख्खनी गाय'' लहान आकाराची, स्वभावाने गरीब आणि माफक दूध देणारी असल्याने बॉम्बे डेअरीमध्ये क्वचितच दिसायची. खान्देश, गुजरात आणि म्हैसूर राज्यांमधून सुमारे ५,००० गुरे प्रतिवर्षी ओढकामासाठी आणली जात होती (मुंबई बेटे गॅझेटियर्स, १९०९). यावरून पशुधनाची संपन्नतेची आणि व्यापारी मार्गाची कल्पना आपल्याला येईल. कुलाबा जिल्ह्यात (सध्याचा रायगड जिल्हा), जवळपास सर्व बैल (स्थानिक गुरे) कणखर, सक्रिय आणि सुबक शारीरिक बांध्याचे होते, तथापि, दख्खन आणि गुजरातच्या बैलांच्या तुलनेत स्वभावाने गरीब,लहान आकाराची आणि कमकुवत होते. काही व्यापारी आणि मोठ्या जमीनदार मालकांकडे गुजराती बैल होते (कुलाबा जिल्हा गॅझेटियर्स, १८८३).
खान्देश परिसरात (सध्याचा उत्तर महाराष्ट्र) ‘थिलारी’ नावाची काहीशी लहान परंतु मजबूत आणि कणखर, वेगवान आणि शिकवण्यायोग्य अतिशय हुशार गायी आढळून येत असल्याचे नमूद केले आहे. तत्कालीन उष्ण कोरड्या हवामानात असंबद्धपणे होणारे संकरीकरण आणि चारा टंचाई या प्रमुख अडचणी असल्याचे इंग्रज अभ्यासकांनी टिपून ठेवले आहे. (खानदेश जिल्हा गॅझेटियर्स, १८८०).
नाशिक विभागामध्ये, स्थानिक लहान बांध्याच्या गायींसह सुरती, वऱ्हाडी, किल्हारी किंवा थिलारी, गावरानी, माळवी आणि बहाळी या गोवंशाचे संपादकांनी वर्णन नोंदविलेले आहे. सुरती जातीचे बैल सामान्यतः पांढरे, उंचपुरे आणि वन्य पशुसदृश्य होते. वऱ्हाडी जातीचे बैल दिसायला मोठे आणि सुंदर दिसणारे, पांढरे, लाल रंगाचे असून टेकडीवर चराई करीत नसत. इंदूरहून आणलेले किल्हारी बैल सक्रिय, लांब सरळ शिंगे असलेले, सामान्यतः पांढरे किंवा ठिपकेदार, बैलगाडीकरिता चपळ, वेगवान होते, परंतु शेतातील कामासाठी फारसे उपयुक्त नव्हते. माळवी जातीचे बैल सामान्यतः पांढरे होते, तर गावराणी बैल विविध रंगांचे आणि वाकदार शिंगे असणारी होते.
बहाळी गोवंश प्रामुख्याने इगतपुरीमध्ये आढळणारी, काळ्या रंगाची पांढरी रंगाची मिश्रछटा असलेली (म्हणजे आजचे डांगी गोवंश) होती. माळवी आणि गावरानीपेक्षा काहीशी जास्त किंमत मिळवत होती. (नाशिक जिल्हा गॅझेटियर्स, १८८३). बहाळा वाण हा डांगी गुरांतील एक उपजात असल्याचे शतकापूर्वीच्या दाखल्यावरून पुष्टी मिळते. गुजरात, मध्य प्रदेश, वऱ्हाड भागातून नाशिक प्रदेशात गोवंशाची देवाणघेवाण झाल्याचेही अहवालात सूचित केले आहे.
सातारा विभागात, स्थानिक आणि खिल्लारी अशी दोन गोवंश नमूद असून खिल्लारी हा मोठा आणि अधिक धष्टपुष्ट गोवंश आहे. तरी स्थानिकांच्या तुलनेत त्याचे आयुष्यमान कमी होते. अठराव्या शतकात सुरती गायी आयात करण्यात आल्या होत्या (सातारा जिल्हा गॅझेटियर्स, १८८४).
सोलापूर जिल्ह्यात धनगरी खिल्लारी, देशी (किंवा स्थानिक), लमाणी (किंवा लमाणांची गुरे), माळवी (माळव्यातील), सुरती (गुजरातमधील) आणि गोकाकी (बेळगावमधील गोकाक येथील) अशी विविध जातींची नोंद केलेली आहे.
लमाणीला त्याच्या सुंदरता आणि कमनीय आकारासाठी मौल्यवान मानले जाते, माळवी ही लमाणीची एक मोठी उपजात असल्याचे तसेच सुरती आणि गोकाकी त्यांच्या सुबक डोक्यासाठी प्रशंसनीय असल्याचे नमूद केले आहे. नांगरणीपेक्षा ‘गोकाकी’ बैल बैलगाडीसाठी अधिक योग्य होते (सोलापूर जिल्हा गॅझेटियर्स, १८८४).
कोल्हापूर जिल्ह्यात शेतीकाम आणि ओढकामासाठी वापरल्या जाणाऱ्या हनम किंवा (अर्धमैसूर), सुरती (अर्धगुजराती) आणि खडकी (स्थानिक) अशा तीन प्रकारच्या गोवंशाची नोंद आहे. हनम बैलाचे वर्णन सरळ शिंग असलेला, मध्यम आकाराचा, मजबूत आणि कठोर, परंतु मारक्या स्वभावाचा आणि आवरायला कठीण असे केले आहे. १८८१-८२ मध्ये एकूण बैलांची संख्या सुमारे दीड लाखाच्या घरात होती आणि सन १८५०-१८८० या तीन दशकांत गुजराती गोवंशाच्या मदतीने स्थानिक गोवंशात सुधारणा करण्याचे प्रयत्न करण्यात आले (कोल्हापूर जिल्हा गॅझेटियर्स, १८८६).
पुणे जिल्ह्यात तर तब्बल दहा प्रकारच्या गायींची नोंद करण्यात आलेली आहे. खिलारी, माळवी, घीर, डांगी, देशी, अरबी, नागोरी, वऱ्हाडी, अकुलखाशी आणि हणम, या त्या गायी आहेत. माळवी गुरे ही माळव्यातील विस्तीर्ण चराईक्षेत्रातून वंजारी व लमाणींनी आणली होती; घीर किंवा सुरती (सध्याचे गीर गोवंश) ही दक्षिण काठियावाड मधून आलेली होती;उत्तर ठाणे प्रदेशातून आणलेली डांगी किंवा कोळवण; बेरार म्हणजेच वऱ्हाडातून आणलेली वऱ्हाडी किंवा बेरार गुरे; अरबी किंवा एडन गुरे; फलटणच्या दक्षिणेकडील भटक्या पशुपालकांनी महादेव डोंगरातून हनम गुरे आणली असल्याचे नमूद आहे. जिल्ह्यात व्यावसायिक पशुपालकांचा वर्ग नसून कुणबी मोठ्या प्रमाणात पालनकर्ते असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गुरेढोरे असल्याचे आणि गुरांचा व्यवहार करीत असल्याचे नमूद आहे (पुणे जिल्हा गॅझेटियर्स, १८८५).
विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात खामगाव भागात मध्यम आकाराची गायी आढळून येत असल्याचे नमूद केले असून, उमरडा आणि खामगाव यांच्या स्थानिक घाटी गुरांसह झालेल्या अनिर्बंध संकारीकरणाने मिश्ररंगाचे गुरे निपजली असावीत. (बुलडाणा जिल्हा गॅझेटियर्स, १९१०).
अकोला जिल्ह्यात मोठ्या शिंगांचे, मेळघाट प्रदेशातून आलेले बंजारा बैल तसेच शेजारील माळवा प्रदेशातील (उत्तर महाराष्ट्रातील) लांब शरीर, मोठे कान आणि खूर आणि शेती कामांसाठी उपयुक्त असलेले शिंगाची गुरे नोंदवली गेले आहेत. (अकोला जिल्हा गॅझेटियर्स, १९१०). स्थानिक पांढऱ्या रंगांची उमदी उंचीपुरी, बेरारी म्हणजेच वऱ्हाडी गुरे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात आढळून येतात.
अमरावती जिल्ह्यात उमरडा किंवा गावरानी, खामगाव आणि घाट किंवा पहाडी अशा तीन वेगवेगळ्या गायींच्या जाती आढळून येत असल्याचे नमूद आहे. उमरडा बैल मध्यम आकाराचे आणि पांढरे किंवा लाल रंगाचे असून अमरावती, अचलपूर (एलिचपूर), दर्यापूर आणि चांदूर तालुक्यात पाळले जातात. तथापि, बेरार जातींमधील सर्वात मोठी आणि बलवान, काळ्या रेगुर मातीवर जड कामासाठी योग्य असलेली खामगाव गोवंश दर्यापूर तालुक्यात अधिकांश होते तर मेळघाट किंवा पहाडी जाती ही आकाराने लहान गायींची जात होती. १४) मेळघाट बैल विशेषतः डोंगराळ प्रदेशाच्या परिस्थितीसाठी योग्य होते. या व्यतिरिक्त, वर्धा येथील आर्वी गुरे (सध्याचे गवळाऊ) आणि होशंगाबाद (म.प्र.) येथील माळवी गुरे, उमरडा जातीचे गायी यांच्यात मोठ्या प्रमाणात आंतर-प्रजनन झाल्याचे नमूद केले आहे (अमरावती जिल्हा गॅझेटियर्स, १९११).
यवतमाळ जिल्ह्यात गुरांच्या जाती उदा. माहूर परगण्यामध्ये पैदास होणारे घाट आणि गंगा जातीच्या गायी तसेच मोठे, मजबूत बांधणीचे डोंगरी बैल, विशेषत: नांगरणीसाठी उपयुक्त, घाटोडे किंवा घाटाचे (घाट प्रदेशातील) अशा दोन गोवंशाचा उल्लेख केला आहे. तसेच वऱ्हाडचे (वऱ्हाड प्रदेशातील) नावाचा लहान पण चपळ बेरारी बैल; अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातून आणलेल्या गवळा (सध्याचा गवळाऊ) यासह दारव्हा जात आणि खानदेशी बैल इ. चा उल्लेख केला आहे (यवतमाळ जिल्हा गॅझेटियर्स, १९०८).
वर्धा जिल्ह्यात गवळाऊ नावाने ओळखल्या जाणाऱ्या गायींची उत्तम जात असून इथे बेरार/ वऱ्हाड बैल, माहूरपट्टी गुरे (हैदराबाद परगणा), तेलंगपट्टी (चांदा, सध्याचा चंद्रपूर जिल्हा) येथून आणल्याची नोंद झाली आहे. बेरार/वऱ्हाड येथील गुरे स्थानिक गवळाऊपेक्षा बलवान होती, तसेच माहूरची गुरे लाल, काळी, ठिपकेदार आणि अतिशय मजबूत होती (वर्धा जिल्हा गॅझेटियर्स, १९०६).
नागपूर जिल्ह्यात गवळाऊ जातीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे, विशेषत: कापूस क्षेत्रामध्ये आणि सामान्यतः आर्वी (वर्धा) आणि सौसरमधील खामरपाणी येथून आणल्याची नोंद आहे. त्याचप्रमाणे, रामटेक तहसीलच्या उत्तर भागातील स्थानिक ‘नागपुरी गुरे’, पांढऱ्या किंवा वेगळ्या रंगाची, मध्यम आकाराची शिंगे आणि चपटे कपाळ, गवळाऊ गुरांपेक्षा लांब पाय असलेली म्हणून नोंदवलेली आहेत. तसेच, निकृष्ट, लहान आणि बेढब आकाराची, पातळ आणि लहान शिंगे असलेली ‘गोंडी’ नावाची गुरे देखील नोंदवली गेली (नागपूर जिल्हा गॅझेटियर्स, १९०८).
चांदा (सध्याचा चंद्रपूर जिल्हा) जिल्ह्यात दोन जातींच्या गुरांची नोंद केलेली आहे. माहूर, जुनगाव आणि खमोना येथून आलेली माहूरपट्टी गायी तर अहिरी, दाभा, सिरोंचा आणि घाटकुल परगणा येथील तेलंगपट्टी गायी. ही गुरे सहसा पांढरी आणि लालसर किंवा ठिपके असलेली लाल आणि पांढरी होती. लाल रंगाच्या गायी ‘लाखा‘ आणि कपाळावर पांढरे पट्टे असलेल्या लाल गुरांना ‘लाखा भोंडा‘ तर संपूर्ण काळ्या आणि पांढऱ्या ठिपके असलेल्या गायींना ‘धामंड'' असे संबोधले जात असे (चांदा जिल्हा गॅझेटियर्स, १९०८).
महिष (म्हैस) संपदा
सध्याच्या मुंबई म्हणजे तत्कालीन बॉम्बे बेटांवर, गुजरात, दिल्ली आणि पंजाब (बॉम्बे आयलंडगॅझेटियर्स, १९०९) येथून दुभत्या म्हशी दूध उत्पादनासाठी आणल्या जात होत्या. रेड्यांचा वापर सामान्यतः नांगरणीसाठी, लाकूड ओढण्यासाठी, जड गाड्या ओढण्यासाठी आणि कधीकधी पाण्याच्या पिशव्या वाहून नेण्यासाठी केला जात असे (नाशिक जिल्हा गॅझेटियर्स, १८८३).
कोल्हापूर जिल्ह्यात तीन दशकांपासून म्हैसूर रेड्यांची मदत घेत स्थानिक म्हशीमध्ये सुधारणा केल्या गेल्या (कोल्हापूर जिल्हा गॅझेटियर्स, १८८६).
पूना (सध्याचा पुणे जिल्हा) जिल्ह्यात शिंदण (सिंध म्हशी); कच्छन (कच्छी म्हशी); जाफरी (काठियावाड म्हशी), भेसरी (जाफराबाद म्हशी); सुरती म्हशी, वऱ्हाडी (बेरार म्हशी); नेमाडी (नेमाड, मध्य प्रदेशातून आणलेल्या म्हशी); गावठी किंवा स्थानिक म्हशी; गवळण (गवळी म्हशी); माहुरी (माहूरहून आणलेल्या म्हशी) आणि धनगरी (धनगर म्हशी) अशा एकूण अकरा प्रकारच्या म्हशींचे जाती नोंदविल्या आहेत (पुना जिल्हा गॅझेटियर्स, १८८५).
अमरावती जिल्ह्यात, गावराणी किंवा नागपुरी आणि माळवा म्हशी अशा जातीची नोंद आहे (अमरावती जिल्हा गॅझेटियर्स, १९११).
औरंगाबाद (सध्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा) जिल्ह्यात जालना परिसरात मोठ्या आकाराच्या, पाठीला मोठी रुंदी आणि प्रचंड शिंगे असलेल्या म्हशींची एक उत्कृष्ट जात आढळून आली. या म्हशींचे दूध उत्पादन ८ ते १० सीअर (सध्या ८-१० लिटर) दरम्यान आणि उच्च किमतीची असल्याचे नोंदविलेले आहे. (औरंगाबाद जिल्हा गॅझेटियर्स, १८८४)
डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९
(सहाय्यक प्राध्यापक, पशुअनुवंशिकी व पैदासशास्त्र विभाग, स्ना.प.प.संस्था, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.