Pandharpuri Buffalo : चाऱ्याचा खर्च कमी तरीही दूध उत्पादनाला दमदार 'पंढरपुरी म्हैस'

Buffalo Breed : पंढरपुरी म्हैस कमी व निकृष्ट चाऱ्यावर चांगले दूध देते. काटक आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्याने आजारी पडत नाहीत.कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून गर्भधारणेचे प्रमाण चांगले आहे. उत्तम व्यवस्थापन ठेवल्यास दिवसाला १२ लिटर दूध देण्याची क्षमता आहे.
Pandharpuri Buffalo
Pandharpuri BuffaloAgrowon
Published on
Updated on

Animal Care : म्हशीचा विकास आणि उत्पत्ती ही आशिया खंडातील आहे. त्यामुळे जगातील एकूण म्हशींपैकी ९५ टक्के पेक्षा जास्त म्हशी आशिया खंडात आढळतात. त्यांचा एकूण दूध उत्पादनातील वाटा ५५ ते ५७ टक्के आहे.

म्हशीचे वर्गीकरण करताना चिखलात लोळणाऱ्या ( Swamp Buffalo) आणि पाण्यात डुंबणाऱ्या (Water Buffalo) अशा दोन वर्गात प्रामुख्याने केले जाते. इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, चीन आणि मलेशिया या देशातील म्हशी या दलदलीच्या ठिकाणी चिखलात लोळणाऱ्या म्हशी म्हणून ओळखल्या जातात.

आपल्या देशातील सोबत श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशातील बऱ्यापैकी दूध देणाऱ्या म्हशी या पाण्यात डुंबणाऱ्या सदरात मोडतात. आपल्या देशात एकूण २० मान्यता प्राप्त म्हशीच्या प्रजाती आहेत. इतर अनेक म्हशीच्या प्रजाती या स्थानिक भागात आढळतात.

मान्यता प्राप्त म्हशींमध्ये उत्तर भारतात मुर्दाड, निलीरावी, भदावरी, पश्चिम भारतामध्ये जाफराबादी, सुरती, मेहसाणा मध्य भारतात नागपुरी, पंढरपुरी, मराठवाडी, जेरांगी, कालाहंडी, संबळपूर आणि दक्षिण भारतामध्ये तोडा, साउथ कॅनरा, गोदावरी या प्रजातींचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्णाथडी, पंढरपुरी, मराठवाडी, नागपुरी यासह मुऱ्हा, मेहसाणा, सुरती, जाफराबादी या प्रजाती दिसतात.

म्हशीची वैशिष्टे

साधारण १५० वर्षांपासून पंढरपूर भागातील गवळी समाज पंढरपुरी म्हैस सांभाळत आहे. साधारण कोरड्या हवामानास अनुकूल व जादा दूध देणारी ही स्थानिक जात आहे. १६ ते ४७ अंश सेल्सिअस तापमानात तग धरणारी आणि कमी पर्जन्यमान असलेल्या भागात होत असलेल्या ज्वारी, बाजरी, मका या पिकाच्या चाऱ्यावर जादा दूध उत्पादन देणारी ही म्हैस आहे. ही प्रजाती सोलापूरसह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात दिसते.

Pandharpuri Buffalo
Breeds of Cows and Buffaloes : ओळख देशी गाई, म्हशींच्या जातींची...

पंढरपुरी म्हैस आकाराने मध्यम असून चेहरा लांबट व निमुळता असतो. रंग काळा असून काही वेळा राखाडी देखील आढळतो.

शिंगे लांब खांद्याच्या पलीकडे तलवारीच्या आकाराची असतात.

सरासरी लांबी १०० सेंटीमीटर पर्यंत आढळते. कानाची लांबी१९ ते २४ सेंटीमीटरपर्यंत असते.

कास पोटाला चिकटलेली, सड लंबगोलाकार असतात. कास देखील फिकट काळसर रंगाची असते, ठेवण देखील उत्तम असते.

प्रौढ म्हशीचे वजन ३८० ते ४०० किलो आणि रेड्याचे वजन ४५० ते ५०० किलोपर्यंत असते.

रेड्या ३० ते ३५ महिन्यात माजावर येतात आणि ४३ ते ४६ महिन्यात वितात. पुढे ३ ते ३.५ महिन्यात पुन्हा गाभण जातात.

कमी व निकृष्ट चाऱ्यावर चांगले दूध देतात. निकृष्ट वाळलेल्या वैरणीवर देखील दूध उत्पादनामध्ये खंड पडत नाही.

दूध काढण्याच्या सवयी बाबत फार काटेकोर नाहीत. त्यासाठीच कोल्हापूर शहरात दूध कट्ट्यावर त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. घरातील कोणीही दूध काढू शकते.

काटक व रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्याने आजारी पडत नाहीत. पडल्यास तत्काळ उपचाराने बऱ्या होतात.

कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून गर्भधारणेचे प्रमाण देखील खूप चांगले आहे. उत्तम व्यवस्थापन ठेवल्यास दिवसाला १२ ते १५ लिटर दूध देण्याची क्षमता आहे.

प्रजातीचे संवर्धन आणि आनुवंशिक सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून २०१४ पासून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर आणि राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड, आनंद यांच्या सहयोगाने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे पंढरपूरसह माढा, सांगोला, माळशिरस, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, दक्षिण व उत्तर सोलापूर या नऊ तालुक्यात ‘वंशावळ निवडीतून उच्च आनुवंशिक गुणवत्ता असलेल्या पंढरपुरी जातीचे वळू तयार करणे’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या सर्व तालुक्यातून एकूण ४० कृत्रिम रेतन सेवा देणाऱ्या केंद्राच्या माध्यमातून ऑगस्ट, २४ अखेर ६०,१२५ कृत्रिम रेतन करण्यात आली. सदर प्रकल्पाचा २९,९७५ पशुपालकांनी लाभ घेतला आहे.

प्रकल्प सुरू झाल्यापासून आज अखेर ७,४९२ मादी वासरे जन्माला आली आहेत. कार्यक्षेत्रातील ७,०४४ पंढरपुरी म्हशीचे दूध मोजणी करण्यात आली आहे. दूध उत्पादनाच्या बाबतीत पूर्वी १३०० ते १६०० किलो प्रति वेत असणारे दूध उत्पादन हे आज २००० किलोपर्यंत प्रतिवेत गेल्याचे या प्रकल्पातील दूध मोजणीत आढळले आहे. पंढरपुरी म्हशीचे फॅट ८ टक्के असते. त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण एक लिटर दुधामध्ये ६ ग्रॅम पर्यंत आढळले आहे.

Pandharpuri Buffalo
Buffalo Management : म्हशी सारख्या डबक्यातच का असतात?

प्रकल्पातील सर्व पशुपालक हे आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या रेड्या तयार करून दूध उत्पादन वाढवत आहेत. या प्रकल्पातून आज अखेर पशुपालकांच्या गोठ्यात तयार झालेले उच्च वंशावळीचे ३५ वळू हे पशुसंवर्धन विभागाच्या पुणे व औरंगाबाद येथील गोठीत रेतमात्रा प्रयोगशाळा, राहुरी सिमेन स्टेशन, बाएफ पुणे, साबरमती आश्रम गोशाळा, गुजरात, अलमंडी सिमेन स्टेशन, चेन्नई या ठिकाणी रेतमात्रा उत्पादनासाठी पुरवण्यात आले आहेत.

त्यातून उत्पादित रेतमात्राचा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक भागात पुरवठा करण्यात येत आहे. सोबत सोलापूर, जालना, कोल्हापूर, पुणे येथील अनेक प्रगतिशील पशुपालकांना १६ रेडे नैसर्गिक रेतनासाठी पुरवण्यात आले आहेत. या माध्यमातून उच्च आनुवंशिक गुणवत्ता असलेली पैदास निर्माण होऊन पशुपालकांना फायदा होईल.

पंढरपुरी म्हैस वंशावळ सुधारणा प्रकल्प, पंढरपूर येथील प्रकल्प समन्वयक डॉ. राजकुमार वसुलकर म्हणाले की, प्रकल्पामुळे पंढरपुरी म्हशीमध्ये आनुवंशिक सुधारणेसह दूध उत्पादन मोजल्यामुळे त्यांची खरी दूध उत्पादन क्षमता समजली.

पंढरपुरी म्हशींची कार्यक्षेत्रामध्ये संख्या वाढत आहे. प्रकल्पामुळे उच्च वंशावळीचे रेडे विविध राज्यातील संस्थांना पुरविण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात पंढरपुरी म्हशीची विशेष ओळख तयार करून आपल्या राज्यासह इतर राज्यांमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत.

- डॉ. व्यंकटराव घोरपडे, ९४२२०४२१९५, (सेवानिवृत्त सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त, सांगली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com