Cattle Conservation : गीर गोवंशाचे संवर्धन

Article by Manik Rasve : परभणी जिल्ह्यातील रिडज (ता.जिंतूर) येथील आयुर्वेदिक तज्ज्ञ सुरेश खापरे यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायात चांगला जम बसविला आहे. मात्र गीर गायींचे संगोपन व संवर्धनाची आवड व तेच उद्दिष्ट ठेऊन त्यांनी या कार्यास पंचवीस वर्षांपासून वाहून घेतले आहे.
Cattle Conservation
Cattle ConservationAgrowon
Published on
Updated on

माणिक रासवे

Cattle Farming : बोरी (ता.जिंतूर, जि. परभणी) येथील डॉ. सुरेश उद्धवराव खापरे सुमारे पंचवीस वर्षांपासून वैद्यकीय व्यवसायात गुंतले आहेत. नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातून त्यांनी ‘बीएएमएस’ ची पदवी संपादन केली आहे.

त्यांच्या कुटुंबाची रिडज व नागापूर (ता.जिंतूर) शिवारात एकूण ७० एकर काळी कसदार जमीन आहे. शेताजवळून करपरा नदी वाहते. सिंचनासाठी विंधन विहिरींची व्यवस्था आहे. डॉ. सुरेश यांचे वडील व बंधू शेती पाहतात.

गोपालनाची जपली आवड

सुरेश यांनी वैद्यकीय व्यवसायात गर्क राहूनही शेतीशी नाळ जपली आहे. त्यांनी सुमारे २५ वर्षांपासून देशी गोपालन- संवर्धनाची आवड जोपासली आहे. पूर्वी त्यांच्याकडे लाल कंधारी व देवणी या जातीच्या गायी होत्या. साहिवाल, थारपारकर, गीर यापैकी दुग्ध उत्पादनाच्या निकषावर त्यांनी गीर गोपालन करण्याचे ठरविले.

त्यानुसार गुजरात राज्यातून १२ जातिवंत गीर गायी खरेदी करून चार वर्षांपासून ते या गोवंशाचा सांभाळ करीत आहेत. टप्प्याटप्प्याने संख्या वाढवत आजमितीला लहान- मोठ्या गायी मिळून गीर गोवंशाच्या पशुधनाची संख्या ४० पर्यंत पोचली आहे. सांगली येथून खरेदी केलेला एक जातिवंत गीर नंदीही ( वळू) आहे.

Cattle Conservation
Cattle Conservation : गीर गोवंशाचे संवर्धन करणारी बन्सी गोशाळा

सुसज्ज शेड

गायींची संख्या वाढल्यामुळे पूर्वीच्या साध्या गोठ्यामध्ये संगोपन करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे २०२३ मध्ये जिंतूर- परभणी राष्ट्रीय महामार्गा जवळील नागापूर शिवारातील करपरा नदीकाठच्या शेतामध्ये १३० बाय १३० फूट जागेत टीप पत्र्याचे सुसज्ज शेड उभारले. तसेच मुक्त संचार गोठ्याची उभारणी केली. दुभत्या, गाभण, भाकड गायी, वासरे, नंदी असे मिळून पाच स्वतंत्र ‘कंपार्टमेंट्स’ तयार केले आहेत.

त्यानुसार गव्हाण आहे. त्यात सुक्या, ओल्या चाऱ्यासोबत क्षाराच्या चाटणविटा ठराविक अंतरावर ठेवल्या आहेत. दुभत्या गायींना दूध देण्याच्या प्रमाणानुसार सरकी पेंडीचा खुराक तसेच एकूणच खाद्य व्यवस्थापनात हिरवा, चारा, कडबा, सोयाबीन आदी भुस्सा यांचा वापर होतो. कुट्टी केल्याने चारा वाया जात नाही.

मुक्त संचार गोठा

प्रत्येक ‘कंपार्टमेंट’ च्या मागील मोकळ्या जागेत गाय, वासरांना फिरता यावे यासाठी मुक्त संचार गोठा तयार केला आहे. त्या जागी पिण्याच्या पाण्याचे हौद आहेत. गोठ्यात शेण जमा केले जाते. गोखूर खत तयार होते. सात एकर क्षेत्र चरण्यासाठी राखीव ठेवले आहे. या ठिकाणी दररोज दोन ते तीन तास गायींना चरावयास सोडले जाते.

जातिवंत नंदीद्वारे नैसर्गिक पद्धतीने प्रजनन केले जाते. त्यातून शुध्द पैदास केली जाते. सुमारे १२ ते १४ महिन्यात वेत होते. शेडच्या जागी चारा साठविण्याची व्यवस्था केली आहे. गाय आजारी पडल्यास जुन्या गोठ्यात चारा- पाण्याची व्यवस्था करण्यात येते. कालवडीचे संगोपन करून ८ ते १० महिन्यांच्या वळूची विक्री केली जाते.

दूध, तूप निर्मिती व विक्री

सध्या ७ ते ८ गायी दुभत्या आहेत. दररोज ३० ते ४० लिटर दूध उत्पादन मिळते. बोरीमधील सुमारे १० ते १२ ग्राहकांकडे रतीब असून प्रति लिटर ७० रुपये दराने दुधाची विक्री होते. शिल्लक दुधावर पारंपारिक पद्धतीने प्रक्रिया करून तूपनिर्मिती केली जाते. वर्षाला १०० ते १२५ किलो तुपाची विक्री प्रति किलो २५०० रुपये दराने होते.

उत्पन्न वा नफा मिळवणे हा आपला मुख्य हेतू नाही असे डॉ. सुरेश सांगतात. गोठ्यात तयार होणाऱ्या गोखूर खताचा स्वतःच्याच शेतीत वापर होतो. मागील काही वर्षापासून शेतीत रासायनिक खतांचा वापर थांबवला आहे. रासायनिक अवशेषमुक्त चारा व अन्नधान्यांचे उत्पादन घेण्याकडे कल आहे.

Cattle Conservation
Cattle Conservation : सेवाभावी वृत्तीने नृसिंहवाडीत गोसंवर्धन

कार्याचा झाला सन्मान

डॉ. सुरेश यांचे शेत घरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. मात्र दररोज सकाळी किमान दोन तास व त्याच पद्धतीने संध्याकाळी ते गोसंगोपनाला वेळ देतात. व्यवस्थापनासाठी दोन मजूर तैनात केले आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नुकताच पश्चिम विभागीय कृषी मेळावा झाला. त्यातील पशू प्रदर्शनात डॉ. सुरेश यांच्या गीर गायींचा सहभाग होता. उत्कृष्ट संगोपनाबद्दल प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.

चारा पिकांचे नियोजन

दरवर्षी दहा एकरांवर रब्बी ज्वारीची लागवड असते. त्यापासून १० हजारांहून अधिक पेंढ्या कडबा उपलब्ध होतो. या व्यतिरिक्त तीन ते चार एकरांत विविध चारा पिके व त्यात मका, लसूण घास, नेपियर आदींचा समावेश असतो.

पडीक असलेल्या क्षेत्रात पवना जातीचे गवत मुबलक प्रमाणात चरावयास उपलब्ध होते. त्यामुळे दर्जेदार दुग्धउत्पादन मिळते. यंदा या भागात कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी स्थिती उद्भवली. येत्या काळात चारा व पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरेश यांनी चारा कायम उपलब्ध राहावा यासाठी नियोजन केले आहे.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या मान्सून्नोतर पावसामुळे जमिनीत ओलावा उपलब्ध झाला. त्यावर अन्य पिके घेण्यापेक्षा ज्वारीची पेरणी केली. सागवान वृक्षाच्या लागवडीतही ज्वारीचे आंतरपीक घेतले आहे. सोयाबीन, हरभरा आदींचा भुस्सा जमा करून साठविण्यात येणार असून तो वर्षभर पुरणारा आहे.

डॉ. सुरेश खापरे ८२०८६७०४१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com