सातारा जिल्ह्यात आसू (ता. फलटण) येथील सचिन ताम्हाणे यांनी साहिवाल (Sahiwal Cow) देशी गोपालनावर (Desi Cow Rearing) आधारित शेती, दुग्ध व्यवसाय (Dairy Business), आरोग्यदायी अन्न व समाधानी जीवन देणारे समृद्ध, शाश्वत ‘मॉडेल’ तयार केले आहे.
वैदिक, आयुर्वेदिक शेती (Ayurvedic Farming) हा त्यांच्या जगण्याचा मुख्य आधार आहे. तुपासह गोआधारित उत्पादनांना घरूनच सशक्त बाजारपेठ तयार केली आहे. ‘यू-ट्यूब चॅनेल’च्या माध्यमातून तरुणांना वैदिक गोपालनाची दिशा देण्याचे कामही ताम्हाणे यांनी सुरू केले आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण हा प्रामुख्याने दुग्ध उत्पादकांचा तालुका आहे. येथील आसू येथील युवा शेतकरी सचिन जगन्नाथ ताम्हाणे यांनी त्यात आपली वेगळी ओळख तयार केली आहे.
त्यांनी ‘बीबीएम’ (बिझनेस मॅनेजमेंट) विषयात पदवी घेतली. घरची दहा एकर बागायत शेती आहे. शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीच विकसित करण्यास सुरुवात केली.
गोपालनावर आधारित शेती
अभ्यासू व जिज्ञासावृत्ती जपलेल्या सचिन यांनी रासायनिक अवशेषमुक्त, आरोग्यदायी व शाश्वत शेतीचे महत्त्व ओळखले. श्री. अ. दाभोळकर यांचा प्रयोग परिवार, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, पाणी पंचायत यांची प्रेरणा मिळाली.
पुढची पिढी व शेतीही त्यांना निरोगी ठेवायची होती. सचिन म्हणतात, की आपल्या शरीराचे कार्य पंचत्वांवर आधारित आहे. वैदिक शेतीचा तोच पाया आहे. त्यामुळे वैदिक, आयुर्वेदिक व योगिक शेती केंद्रस्थानी ठेवून तसे व्यवस्थापन सुरू केले.
वैदिक शेतीतील व्यवस्थापन
हरियानातून साहिवाल जातीच्या आठ गायी आणल्या. त्यासाठी पाच लाखांपर्यंतच खर्च आला. घराशेजारी ५० बाय ४५ फूट क्षेत्रफळाचा मुक्तसंचार गोठा व सावलीसाठी शेड उभारले. गाई आपल्या वातावरणात ‘सेट’ व्हाव्यात यासाठी विशेष काळजी घेतली.
आदर्श गोपालनातील ठळक बाबी
१) गोठ्याचे वेगवेगळे विभाग. सध्या लहान-मोठ्या मिळून ४० गायी. सर्व साहिवाल. एक खिलार. एक नंदी.
२) गायींना संपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीचा औषधोपचार, चूर्ण व खुराक.
३) दिवसातून चार तास विविध रागांवर आधारित संगीत ऐकवले जाते.
४) अग्निहोत्राची राखमिश्रित पाण्याचा पिण्यासाठी वापर.
५) गोठ्यात पहाटे चारपासून कामास सुरुवात. दिवसभरात तीन प्रकारचा चारा कुट्टी स्वरूपात.
६) पहाटे पाच व सायंकाळी पाच वाजता हाताने धारा काढल्या जातात.
७) ‘वेस्ट डीकंपोस्ट कल्चर’ आणून त्याचे ताजे द्रवरूप कल्चर दिले जाते. त्यातून गायींचे स्वास्थ्य चांगले राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे कल्चर अनेक शेतकऱ्यांना मोफत दिले आहे.
वैदिक पद्धतीने तूपनिर्मिती
वैदिक पद्धतीने तूपनिर्मिती केली जाते. आदल्या दिवशी विरजण लावले जाते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लाकडी रवीच्या साह्याने दही घुसळण्यास सुरुवात होते. लोणी देखील मातीच्या भांड्यात कढवले जाते.
चुलीवर मंदाग्नीवर तूप तयार होते. पहाटे पाच वाजता काढलेल्या धारेचे दूध चुलीवर गरम केले जाते. पहाटे सहाच्या आत ही सर्व कामे उरकली जातात.
दुधापासून दिवसाकाठी दीड ते दोन लिटर तूप तयार होते तुपापासून नाकात घालावयाचे औषध (नस्यधृत) तयार केले जाते. ताकापासून कॅल्शिअम टॉनिकची निर्मिती. तुपाचे ५००, १००० मिलिचे पॅकिंग. ३४०० रुपये प्रति लिटरप्रमाणे विक्री.
गोआधारित उत्पादने
१) सकाळच्या पहिल्या प्रहराचे शेण व गोमूत्र धरले जाते. शेणापासून गोमय साबण, धूप, फेसपॅक, दंतमंजन, मूर्ती, पणत्या, गोवऱ्या आदी उत्पादने निर्मिती. गोमूत्रापासून शाम्पू, गोअर्क.
२) गोखूर खत तयार करून त्याचा स्वशेतात वापर.
३) नैसर्गिक पद्धतीने ऊस उत्पादन. नैसर्गिक शेती उत्पादकांचा सचिन यांचा गट. गटाच्या गुऱ्हाळघरात सेंद्रिय गूळ तयार केला जातो. त्याची किलोला १२० रुपये दराने विक्री.
४) स्व-उत्पादित डाळींचा किलोला १५० ते १७० रुपये, सोनामोती गहू ८० रुपये तर खपली गव्हाचा १०० रुपये प्रति किलो दर.
५) सर्व उत्पादनांची ‘माउथ पब्लिसिटी’ झाल्याने घरूनच विक्री. वेबसाइट देखील तयार.
६) सहाशेहून अधिक ग्राहक जोडले आहेत. आठ देशांत उत्पादनांना मार्केट.
७) गोमय आधारित उत्पादनांची वार्षिक उलाढाल १२ लाख, तर शेतीतील एकूण उलाढाल ४० लाखांच्या आसपास.
मानसिक व शारिरिक स्वास्थ्य देणारी शेती
सचिन सांगतात, की वैदिक शेतीचेच आयुर्वेदिक व योगिक शेती हे भाग आहेत. या शेतीमुळे तुमचे आरोग्य ठणठणीत राहते. आम्ही दररोज सकाळी व संध्याकाळी अग्निहोत्र करतो. त्यामुळे आजूबाजूचे पर्यावरण, शरीर व मनही शुद्ध राहते.
वैदिक शेतीकडे तरुणांनी वळावे यासाठी सचिन चार वर्षांपासून यू-ट्यूब चॅनेल चालवीत आहेत. त्यामाध्यमातून ४५ हजारांवर शेतकरी जोडले आहेत. आजी, आई, वडील, पत्नी अंकिता, चुलते विष्णू ताम्हाणे यांचे सहकार्य व अन्नदाता समूहाचे मार्गदर्शन मिळते.
शेतकऱ्यांनी स्वतःसाठी सात्त्विक पिकवावे, स्वतःचा दर ठरवावा. निसर्गाची पूजा करून त्यास एकरूप जीवनशैली घडविणे आवश्यक असल्याचे सचिन सांगतात.
परिपूर्ण गोशाळा, वैदिक शेती व शाश्वत जीवनशैलीचे ‘मॉडेल’ उभारण्यासाठी १२ एकर डोंगराळ जमीन खरेदी केली आहे. येथे गटाद्वारे काम सुरू असून, आमच्या ऋषिवेद परिवाराचे हे उदिष्ट असल्याचे सचिन सांगतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.