Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : पूरपरिस्थितीमध्ये जनावरांचे व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. विकास खापरे, डॉ. शैलेश इंगोले

Livestock Management : महापुरामुळे जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन तसेच खाद्य व्यवस्थापनात अडचणी येतात. जास्त वेळ खाद्य आणि स्वच्छ पाणी न मिळाल्याने जनावरांची उपासमार होते. पूरपरिस्थिती कमी झाल्यावर विविध संसर्गजन्य आजारांच्या साथी येतात. त्यामुळे जनावरे मोठ्या प्रमाणात बाधित होऊन आजारी पडतात.

हे लक्षात घेऊन जनावरांचे योग्य व्यवस्थापन करावे. पुरामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि साठवून ठेवलेला चारा,खाद्य वाहून गेल्यामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होते. पुरामुळे जिवाणू,विषाणू आणि परजीवींमुळे जनावरांना विविध आजारांचा प्रादुर्भाव होतो. वातावरणातील अचानक बदलामुळे जनावरांची रोगप्रतिकार क्षमता कमी होते, त्यामुळे जनावरे आजारी पडतात.

जनावरांचे व्यवस्थापन

बाधित भागातून जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे.

जनावरांना निवारा, चारा व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.

पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.

विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत.

पुरांमुळे पिके पाण्याखाली गेल्याने चाराटंचाई निर्माण होते. या काळात जनावरांना संतुलित आहार द्यावा.

जनावरांची जखम आयोडीनने स्वच्छ करावी. त्यावर कीटाणूनाशक मलम लावावे. आजारी जनावरांचे पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.

वासरे, दुधाळ जनावरे, गाभण जनावरांना त्यांच्या गरजेप्रमाणे संतुलित आहार उपलब्ध करून द्यावा.

दूषित पाण्यात भिजलेले किंवा बुरशी लागलेले पशुखाद्य आणि वैरण जनावरांना खाऊ घालू नये.

वातावरणाच्या अचानक बदलामुळे जनावरे तणावग्रस्त होतात, रोगप्रतिकार शक्ती कमी होते. जनावरे आंत्रविषार, धनुर्वात, हगवण, फऱ्या, लाळ्या खुरकूत आजारांना बळी पडतात. जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.

पुराचे पाणी साठल्यामुळे काही ठिकाणी डास, कीटकांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे कडुलिंबाचा पाला व शेणाच्या गोवऱ्या पेटवून धूर करावा.

गोठ्यात जनावरांची गर्दी टाळावी. गर्दीमुळे एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांमध्ये आजाराचे संक्रमण वाढेल.

मृत जनावराची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मानवीवस्तीपासून दूर जागेची निवड करावी. ती जागा नाला, ओढा, नदी, विहिरीपासून ५०० फूट दूर असावी.

जनावरांमध्ये संसर्गजन्य आजाराचा प्रसार हवा, पाणी, पक्षी यांच्यामार्फत झपाट्याने होतो. मृत जनावरांच्या नाक, कान, घसा, तोंड, गुदद्वारातून स्राव किंवा दुर्गंधी येण्याची शक्यता असते, त्यासाठी जंतुनाशकाच्या द्रावणात बुडवलेले कापसाचे बोळे घालून ती छिद्रे बंद करावीत. निलगिरी तेल किंवा सुंगधी तेल जनावरांच्या शरीरावर शिंपडावे.

साधारणपणे ८ ते १० फूट खोल खड्डा खणून त्यामध्ये दगडी मीठ घालून त्यावर जनावराचा मृतदेह ठेवावा. पुन्हा दगडी मीठ पसरून कमीत कमी तीन फूट मातीचा थर असावा. मिठामुळे कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते. तसेच मृतदेहाचा दुर्गंध येत नाही. शिवाय मोकाट कुत्री, वन्यप्राणी जमिनीतून मृतदेह शोधून काढणार नाहीत. मृत जनावराचे उत्खनन टाळण्यासाठी त्या जागी तात्पुरते काटेरी कुंपण लावावे.

जनावराची मरतूक झालेल्या जागेभोवती निर्जंतुकीकरण करून ब्लिचिंग पावडरचा योग्य प्रमाणात वापर करावा.

महत्त्वाचे मुद्दे

पूरपरिस्थितीनंतर जनावरांमध्ये परोपजीवींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे सर्व जनावरांचे जंतनिर्मूलन व गोचीड निर्मूलन करून घ्यावे.

जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.

गोठ्यातील सर्व जनावरांची व्यवस्थित पाहणी करावी. आजारी जनावरांना पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.

खाद्य हा जनावरांच्या व्यवस्थापनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे पावसाळ्यात चारा उपलब्धतेचे योग्य नियोजन आवश्यक असते.

सर्व जनावरांना आहारात नियमित खनिज मिश्रण द्यावे. जनावरांच्या आहारात हिरवा आणि वाळलेला चारा द्यावा.

गाभण जनावरांची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. त्यांना कोणत्याही प्रकारचा ताण टाळण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. जनावरांची जास्त गर्दी टाळावी.

पुराच्या वेळी पाण्याबरोबरच अनेक टाकाऊ पदार्थ गोठ्याच्या परिसरात येतात. जनावरांच्या खाद्यात असे घटक येणार नाहीत,याची काळजी घ्यावी.

डॉ. विकास खापरे, ८४११९६४८६६

(पशुवैद्यकीय शरीरक्रियाशास्त्र विभाग,मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT