Animal Care : दुधाळ गाई, म्हशींमधील संसर्गजन्य गर्भपाताचे नियंत्रण

Animal Disease : संसर्गजन्य गर्भपात (ब्रुसेलोसिस) हा आजार कळपातील एखाद्या जनावराला झाला तर, कळपातील इतर गाई, म्हशींमध्ये बाधित चारा, पाणी, अथवा पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या वळू मार्फत आजार पसरतो
Animal
AnimalAgrowon
Published on
Updated on

डॉ. मोहिनी कांबळे, डॉ. अशोक भोसले, डॉ. गोपाळ भारकड

Infectious Abortion (Brucellosis) : संसर्गजन्य गर्भपात (ब्रुसेलोसिस) हा एक अत्यंत महत्त्वाचा जिवाणूजन्य आजार आहे. हा आजार जनावर तसेच मनुष्यामध्ये आढळून येतो. गाभण जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भपात होतो. गर्भपात सहसा गाभण काळात ७ ते ९ महिन्यांदरम्यान होतो. जिवाणूचा संसर्ग प्रामुख्याने गायी, शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये होतो, परंतु तो मनुष्यामध्ये संक्रमित होतो. यामुळे महिलांमध्ये वारंवार गर्भपात, ताप, सांधेदुखी आणि थकवा यासारखी लक्षणे दिसतात. पुरुषांमध्ये कायमचे व्यंधत्व येते. बाधित गाई, म्हशींच्या दुधामधून आजाराचा प्रसार होतो.

आजारामुळे गर्भपात, वासराचा मृत्यू, दुधाचे उत्पादन कमी होणे, जनावरांमध्ये कायमस्वरूपी वंध्यत्व येते, भाकड कालावधी वाढतो. नियंत्रणासाठी नियमित चाचणी तसेच शिफारशीत लसीकरण महत्त्वाचे आहे. आजार कळपातील जनावराला झाला तर, कळपातील इतर गाई, म्हशींमध्ये बाधित चारा, पाणी, अथवा पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या वळू मार्फत आजार पसरतो. कळपातील बाधित वळू सर्व माद्यांना नैसर्गिक रेतनाद्वारे बाधित करतो. सक्रियपणे आजार प्रतिबंधक उपायांचा अवलंब न केल्यास पूर्ण कळप बाधित होण्यास फार वेळ लागत नाही.

वळूमधील लक्षणे :

आजार प्रजनन संस्थेवर परिणाम करतो. वळू तसेच गाई, म्हशींमध्ये आजाराचा प्रसार होतो.

वळूला संसर्ग होतो, तेव्हा तो संभाव्य वाहक बनतो. संपूर्ण कळपात आजार पसरतो. नैसर्गिक रेतनादरम्यान बाधित वळूच्या वीर्यामार्फत गाई आणि म्हशींमध्ये संक्रमण होते.

बाधित वळूमध्ये प्रजनन समस्या दिसतात. परिणामी प्रजनन कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. सुजलेले अंडकोष, शुक्राणूंची गुणवत्ता आणि वीर्यातील शुक्राणूचे प्रमाण कमी होते. यासारखी चिन्हे दिसू शकतात, कालांतराने कायमचे वंध्यत्व येते. यामुळे वळू प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. गर्भधारणेचे प्रमाण कमी होते. यासाठी वळूमधील ब्रुसेलोसिस चाचणी आवश्यक आहे.

Animal
Animal Care : पाळीव प्राण्यांमधील उष्माघात टाळा

गाई, म्हशीमधील लक्षणे :

गाभण काळात सहा ते नऊ या महिन्यात गर्भपात होतो.

व्यायलेल्या गाई,म्हशीमध्ये बारा तासानंतरही वार अडकून रहातो.

दूध उत्पादनात लक्षणीय घट होते.

गर्भपात झाल्यानंतर गर्भाशयामध्ये दाह आणि नेक्रोसिस लक्षणे दिसू शकतात. ताप, सुजलेले सांधे आणि अशक्तपणा ही लक्षणे दिसतात.

नियंत्रणासाठी कृत्रिम रेतन ः

नैसर्गिक गर्भाधारणेदरम्यान बाधित वळूपासून गाई,म्हशींना प्रजनन विकार होण्याची शक्यता असते. नैसर्गिक गर्भधारणा करण्यापेक्षा, कृत्रिम रेतनचा अवलंब फायदेशीर ठरतो. ब्रुसेलोसिससह इतर आजार पसरण्याचा धोका कमी होतो.

या तंत्रज्ञानातून उत्कृष्ट अनुवंशशास्त्र पद्धतीने वासरांची पैदास करता येते.

माणसांना होणारा संसर्ग ः

ब्रुसेला जीवाणूंच्या विविध प्रजातींमुळे होणारा हा आजार प्राण्यांकडून मनुष्यांमध्ये संक्रमित होऊ शकतो.

संक्रमण, न उकळलेले दूध पिल्याने तसेच संक्रमित प्राणी किंवा त्यांचे रक्त, मूत्र आणि प्रजननस्राव यांच्याशी थेट संपर्क आल्याने, पशुपालक, पशुवैद्यक आणि बाधित जनावरांची हाताळणी, प्रक्रिया

करणाऱ्या व्यक्तींना संसर्ग होतो.

उघड्या जखमा किंवा फाटलेल्या त्वचेद्वारे, तसेच डोळ्यातील पटलाद्वारे ब्रुसेला जिवाणू शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे गोठ्यात काम करणाऱ्या लोकांनी स्वच्छता, जैवसुरक्षा पद्धतींचे पालन करणे महत्त्वाचे ठरते.

बाधित जनावरे आपल्या कळपातून काढून टाकावीत. ब्रुसेलोसिसची लस हाताळताना काळजी गरजेची आहे.

Animal
Animal Management : आधुनिक पशू व्यवस्थापन हेच डेन्मार्कचे सूत्र

लक्षणे :

संसर्ग संक्रमित जनावरांच्याकडून होतो. यामुळे वारंवार ताप येणे, थंडी आणि घाम येतो. सतत थकवा, स्नायू, सांधेदुखी आणि डोकेदुखी दिसते.

पुरुषांच्या अंडाशयाला जळजळ होणे, परिणामी वेदना आणि सूज येते. यामुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. वेळेवर उपचार न घेतल्यास कायमचे वंध्यत्व येवू शकते.

प्रादुर्भाव झालेल्या स्त्रियांना गर्भधारणे दरम्यान पोटामध्ये वेदना आणि प्रसूतीदरम्यान त्रास होतो. वारंवार गर्भपात दिसून येतो.

बाधित स्त्रिया किंवा पुरुषांकडून एकमेकांमध्ये हा आजार पसरू शकतो.

जनावरे खरेदी करताना घ्यावयाची काळजी :

ब्रुसेलोसिसमुक्त नोंद असलेल्या विश्वासार्ह पैदासकार किंवा पशुपालकाकडून जनावरे खरेदी करावीत.

नवीन जनावरे आणण्यापूर्वी संपूर्ण आरोग्य तपासणी आणि निदान चाचण्या कराव्यात. दुधाची तपासणी करावी.

गाभण जनावरे विकत घेण्यापेक्षा व्याल्यानंतर वासरू सोबत असलेली जनावरे विकत घ्यावीत.

निदान चाचण्या :

रोझ बंगाल प्लेट टेस्ट (आरबीपीटी) करावी. ही सोपी, कमी खर्चात होणारी, शेतकऱ्यांना करता येण्याजोगी आहे. रक्त किंवा सेरमचा एक थेंब आणि आरबीपीटी अॅंटीजेनचा एक थेंब काचपट्टीवर घेऊन तपासले असता तीन मिनिटात गाय, म्हैस, वळू ब्रुसेलोसिस बाधित आहे का नाही हे कळू शकते.

गाई, म्हशी, वळू खरेदीपूर्वी जागेवर चाचणी करू शकतो. यासाठी ५० रुपये एवढा खर्च येतो.

गर्भपात झालेल्या गर्भाच्या ऊतींमध्ये किंवा गाई, म्हशींच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ब्रुसेला जिवाणू ओळखण्यासाठी बॅक्टेरियल कल्चर आणि पॉलिमरेज चेन रिअॅक्शन (पीसीआर) तंत्र वापरतात. या चाचण्यांद्वारे लवकर तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

पशुवैद्यकाशी संपर्क साधून जनावरांची तपासणी करून गर्भपाताचे कारण निश्चित करावे.

राष्ट्रीय ब्रुसेलोसिस नियंत्रण कार्यक्रम

राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत राष्ट्रीय ब्रुसेलोसिस नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

गर्भपात नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यक आहे. ब्रुसेला जिवाणूंमुळे कळपातील जनावरांचा गर्भपात होऊ नये म्हणून फक्त मादी वासरांना वयाच्या चार महिन्यांपासून ते आठ महिन्यापर्यंत आयुष्यात एकदा ब्रुसेला एबॉर्टस स्ट्रेन-१९ लस द्यावी.

ब्रुसेला एबॉर्टस स्ट्रेन-१९ लस नर वासरू किंवा नऊ महिन्यांच्या वरील मोठ्या जनावरांना दिली जात नाही. या वयानंतर पुन्हा या आजाराविरुद्ध लसीकरण करता येत नाही.

गोठ्यातील प्रत्येक जनावराची वर्षातून किमान एकदा ब्रुसेलोसिसची तपासणी करावी.

संपर्क : डॉ. अशोक भोसले, ७७२१०२५०७३

(सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय व पशू विज्ञान महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com