Rabies Control Agrowon
काळजी पशुधनाची

Rabies Disease Control : ‘रेबीज’च्या समूळ उच्चाटनासाठी एकत्र येऊया

Rabies Disease : स्लग ः जागतिक रेबीज दिन विशेष

Team Agrowon

डॉ. सागर जाधव
Rabies Disease Control : रेबीज या एकमेव आजारात १०० टक्के मृत्युदर आहे. त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करून आजाराचे समूळ उच्चाटन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक रेबीज दिन’ म्हणून साजरा केला जातो.

कुत्रा चावल्यानंतर होणारा आजार म्हणजे ‘रेबीज’. हा अत्यंत जीवघेणा आजार असून, योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यू होण्याची शक्यता असते. सर्वप्रथम लुईस पाश्‍चर या शास्त्रज्ञाने रेबीजवरील लसीचा शोध लावला. त्यांच्या स्मृतिपीत्यर्थ रेबीज रोगाचे मनुष्य व पशूमध्ये नियंत्रण व जागरूकता निर्माण करून समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक रेबीज दिन’ म्हणून साजरा केला जातो. कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत लोकांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. त्यामुळे या दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी लोकांमध्ये जनजागृती केली जाते.

परिचय व रोगाची कारणे ः
- हा विषाणूजन्य रोग असून, बंदुकीच्या गोळीच्या आकाराचा असतो.
- प्रामुख्याने रेबीज झालेल्या कुत्र्याने चावा घेतल्यास, ओरखडल्यास किंवा त्यांच्या लाळेचा माणसाच्या उघड्या जखमेसोबत संपर्क आल्यास प्रादुर्भाव होतो.
- वटवाघळाच्या शरीरामध्ये सुद्धा हे विषाणू आढळतात. त्यामुळे वटवाघूळ चावल्यानंतरही रेबीज होण्याची शक्यता असते.
- रेबीज झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून रेबीजचा प्रसार होतो.
- रेबीज हा श्‍वानांचे १०० टक्के लसीकरण करून बचाव करता येणारा विषाणूजन्य झूनोटिक आजार आहे.

रेबीज होतो कसा? ः
- रेबीज झालेल्या कुत्र्याने चावा घेतल्यास, ओरखडल्यास किंवा त्यांच्या लाळेचा उघड्या जखमेसोबत संपर्क आल्यास रेबीजचा प्रादुर्भाव होतो.
- रेबीजग्रस्त कुत्र्याच्या लाळेचा डोळ्यातील, तोंडातील, नाकातील श्‍लेष्मल आवरणाचा संपर्क आल्यास आजार होतो.
- रेबीजग्रस्त जनावर चावल्यानंतर त्याच्या लाळेतील विषाणू जखमेतून मनुष्य व जनावरांच्या मांसपेशीत प्रवेश करतात. तेथून मज्जातंतूंद्वारे मणका व मेंदूपर्यंत पोहोचतात. विषाणू मध्यवर्ती चेतासंस्थेत प्रवेश करून त्याची संख्या वाढवतो. त्याचा प्रसार वाढेल तसा मेंदू आणि मणक्याला सूज येऊन मृत्यू उद्‍भवतो.
- मेंदूमध्ये विषाणू त्यांची संख्या वाढवून मेंदूमध्ये दाह निर्माण करतात. लाळग्रंथीमध्ये जाऊन लाळ दूषित करतात.
- रेबीजग्रस्त जनावर दुसऱ्या पशूला किंवा मनुष्यास चावल्यानंतर रेबीज रोगाचा प्रादुर्भाव होतो.
- पिसाळलेले जनावर शरीरावर मेंदूच्या अंतरापासून कुठे चावा घेते, त्यानुसार रेबीज विषाणूचा प्रसार कालावधी अवलंबून असतो. हात किंवा पाय यांच्या तुलनेत मानेजवळ किंवा डोक्याला चावल्यास विषाणूचा प्रसार झपाट्याने होतो.

रेबीजग्रस्त कुत्र्याची लक्षणे ः
- बाधित श्‍वान बऱ्याचदा धावत सुटतात. दिसेल त्या पशू व मनुष्यास चावा घेण्याचा प्रयत्न करते.
- जबड्याच्या स्नायूंना पक्षाघात झाल्यामुळे जबडा बंद करता येत नाही. त्यामुळे जास्त प्रमाणात संसर्गित लाळ गळते.
- श्‍वान भुंकण्याचा प्रयत्न करते. पण आवाज बसका व व्यथित रडल्यासारखा येतो. अशावेळी अंधाराच्या व अडचणीच्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करते.

जनावरांतील लक्षणे ः
- यामध्ये विशेषतः आक्रमक किंवा मलूल अशा दोन प्रकारची लक्षणे दिसून येतात.
१) आक्रमकता ः अनियंत्रित अतिउत्तेजित वागणे, पाण्याची भीती
वाटते, क्वचित प्रसंगी स्वच्छ हवेची भीती वाटते. श्‍वसनसंस्थेचा अर्धांगवायू होतो. हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू होतो.
२) मलूल किंवा मंद प्रकार ः
- मनुष्यामध्ये आढळणाऱ्या २० टक्के केसेस यामध्ये मोडतात. हा प्रकार ओळखणे अवघड असते.
- यामध्ये मांसस्नायू सैल होतात. जबड्याच्या खालील मांसस्नायू सैल झाल्यामुळे अन्न व पाणी पिता येत नाही.
- संवेदना कमी होतात. मनुष्य कोमा अवस्थेत जातो. मृत्यू होतो.
- मेंदू व चेतासंस्थेवर झालेल्या परिणामामुळे जनावरांमध्ये खुंट्या भोवती गोल गोल फिरणे, झाडावर किंवा भिंतीवर डोके आपटण्याची लक्षणे दिसून येतात.
- गळ्याच्या आणि जबड्याच्या मांसपेशी सैल पडल्याने तहान लागूनसुद्धा पाणी पित नाही. पाण्याला घाबरते.
- जनावर लाकूड, खडे खाण्याचा प्रयत्न करते. निर्जीव वस्तूंवर किंवा माणसांवर धावून येते.
- जनावर सतत हंबरते, कान टवकारते व उधळण्याचा प्रयत्न करते.
- जनावराची भूक मंदावते, दात खाते व दूध उत्पादनात घट होते.
- श्‍वासोच्छ्वासाला मदत करणारे स्नायू लुळे पडल्यामुळे श्‍वासोच्छ्वास बंद पडून मृत्यू होतो.

माणसातील लक्षणे ः
- ताप येणे, चावलेल्या ठिकाणी जळजळ होते.
- डोके व अंग दुखणे, स्नायू आखडणे.
- भूक मंदावणे, घसा खवखवणे, उलट्या होणे.
- प्रकाश, आवाज व पाणी यांची भीती निर्माण होते.
- नाडीचे ठोके वाढतात, बाहुल्या विस्फारतात, बुबुळे मोठी होतात.
- तोंडातून लाळ व फेस येतो, श्‍वसनास त्रास होऊन रुग्ण कोमात जाऊन मृत्यू होतो.

प्रतिबंधात्मक उपाय ः
- प्रतिबंधात्मक लसीकरण करणे हाच उत्तम पर्याय आहे
- कोणताही कुत्रा चावल्यास खबरदारी म्हणून लगेच प्रतिबंधात्मक उपाय करावेत. 
- चावा घेतलेली जखम धावत्या नळाच्या पाण्याखाली साबणाने १५ मिनिटे स्वच्छ धुवावी. जखम धुऊन झाल्यावर त्यावर ॲन्टिसेफ्टिक लावावे.
- जखमेत संसर्ग होऊ नये यासाठी तज्ज्ञांना भेटून उपचार करावेत.
- जखमेवर पट्टी बांधू नये. जखमेस टाके घालू नयेत.
- रेबीज प्रतिबंधात्मक लस पशूंना किंवा मनुष्याला कुत्रा चावलेल्या दिवशी (० दिवस), तिसऱ्या, सातव्या, चौदाव्या, अठ्ठाविसाव्या व नव्वदाव्या दिवशी पशुवैद्यकाकडून, तर मनुष्यास नजीकच्या सरकारी दवाखान्यातून टोचून घ्यावी.

घ्यावयाची काळजी ः
- संशयित अथवा रेबीज झालेले जनावर इतर जनावरांपासून वेगळे बांधावे. त्याचे १० ते १४ दिवस निरीक्षण करावे.
- संसर्गित जनावरांचा चारा, पाणी वेगळे ठेवावे.
- संसर्गित जनावरांच्या नैसर्गिक स्रावांच्या (लाळ, लघवी, डोळ्यांतील पाणी) संपर्कात स्वतः आणि इतर जनावरांना येऊ देऊ नये.
- दगावलेल्या जनावराचे मल-मूत्र, चारा, पाणी यांची योग्य विल्हेवाट लावावी.
- पाळीव पिले ३ महिने वयाची होताच रेबीज प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी. त्यानंतर ३ महिन्यांनी बूस्टर डोस द्यावा.

डॉ. सागर जाधव, +९१ ९००४३ ६१७८४
(पशुधन विकास अधिकारी
बाचणी, ता. कागल, जि. कोल्हापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT