Animal Health  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Disease : ‘लेप्टोस्पायरोसिस’चे नियंत्रण

Animal Health : पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. त्यात प्रामुख्याने डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया, कॉलरा आणि लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता असते. लेप्टोस्पायरोसिस हा झुनोटिक म्हणजेच प्राणिजन्य मानवीय आजार आहे.

Team Agrowon

डॉ. निशिगंधा कच्छवे, डॉ. रवींद्र झेंडे

पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. त्यात प्रामुख्याने डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया, कॉलरा आणि लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता असते. लेप्टोस्पायरोसिस हा झुनोटिक म्हणजेच प्राणिजन्य मानवीय आजार आहे. याचा प्रसार प्राण्यांच्या लघवीपासून होत असतो. संक्रमित प्राण्यांच्या मूत्रातून लेप्टोस्पायरोसिसचे जिवाणू त्वचेवरील जखमांतून शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे पावसाळ्यात या आजाराची जास्त प्रमाणात साथ दिसून येते.

शेतात साठलेले, पुराचे पाणी किंवा पावसाचे दूषित पाणी यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा (उंदीर किंवा प्राण्यांच्या मूत्राद्वारे) प्रसार माणसांमध्ये तसेच प्राण्यांमध्ये होऊ शकतो. लेप्टोस्पायरोसिसचे जिवाणू पाण्यात तसेच चिखलात अनेक महिने जिवंत राहतात. हा आजार प्रामुख्याने गायी-म्हशी, बैल, अश्‍व, श्वान, शेळी- मेंढी, वराह आणि मानवांमध्ये आढळतो.

आजाराची लक्षणे

गाय, म्हैस :

ताप येणे, सुस्ती /मंदपणा, भूक मंदावणे, लघवीमध्ये रक्ताचे अंश आढळून येणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे, कावीळ होते.

५ ते ९ महिन्यांच्या गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो किंवा मृतगर्भ जन्मतो, शरीरातील रक्त कमी होते.

मोठ्या जनावरांपेक्षा वासरांच्या लघवीमध्ये रक्तस्रावाचे प्रमाण जास्त आढळून येते.

दुभत्या जनावरांमध्ये कासदाह होतो. दीर्घकाळाने यकृत निष्क्रिय होते, मूत्रपिंड सुजते. पोटशूळ होतो.

अश्‍व :

डोळे येणे, प्रकाश सहन न होणे, डोळ्यातून सतत अश्रू येणे, कावीळ होते.

तिसऱ्या तिमाहीमध्ये गर्भपात होतो, स्नायू दुखतात, बद्धकोष्ठता, लघवी कमी होते.

श्‍वान :

श्‍लेष्मल त्वचेमार्फत रक्तस्राव होतो, तोंडाच्या आतमध्ये छल्ले पडतात. श्‍वासामार्फत दुर्गंधी येते, भूक मंदावते.

रक्त कमी होते. हृदयक्रिया जलद होते. उलटी होणे, कावीळ होते.

शेळी आणि मेंढी :

लघवीमध्ये रक्ताचे अंश आढळून येतात. कावीळ, शरीरातील रक्त कमी होते, गर्भपात होतो.

वराह :

भूक मंदावते, कावीळ, डोळे लाल होणे, गर्भपात होतो, स्नायू आकुंचन पावतात, चक्कर येते.

आजाराचा प्रसार

संक्रमित प्राण्यांच्या मूत्राशी थेट संपर्क आल्यास किंवा मूत्र दूषित पाण्याशी आल्यास प्रसार होतो.

जिवाणू जखमेचा ओरखडा, त्वचेचा पडदा, डोळ्यातील म्युकोसाद्वारे प्राण्यांच्या शरीरात शिरतात.

कुरण आणि माती हे मूत्र, गर्भपात, गर्भाशयाच्या स्रावाने दूषित  असू  शकते. गर्भवेष्टण हा जनावरे, डुक्कर आणि माणसामध्ये संक्रमणाचा एक महत्त्वाचा मार्ग  मानला  जातो.

प्रतिबंधात्मक उपाय

लघवीद्वारे संसर्ग होऊ नये म्हणून शेतात स्वच्छताविषयक उपायांचा  अवलंब  करावा.

संक्रमित जनावरांना कळपापासून वेगळे करावे.

नवीन जनावरे संक्रमित नसलेल्या विभागातून खरेदी  करावीत.

पाळीव आणि वन्य प्राण्यांच्या लघवीमुळे पाण्याच्या वाहिन्या, खाद्य कुंड आणि साठवलेले खाद्य दूषित होऊ नये याची दक्षता  घ्यावी.

गर्भपात झालेला गर्भ आणि गर्भाचा पडदा योग्य प्रकारे नष्ट करावा.

कुरण, आवार आणि शेडमध्ये जनावरांची अतिशय गर्दी होऊ नये, याची काळजी घ्यावी.

पावसाळा आणि ओलसर पृष्ठभागावर आजाराचे जिवाणू अनेक दिवस जिवंत राहतात. त्यामुळे गोठ्यांची नियमित स्वच्छता करावी. सोडिअम हायपोक्लोराइट, कॅल्शिअम क्लोराइड आणि सोडिअम हायड्रॉक्साइडसारख्या जंतुनाशकांचा वापर गोठा स्वच्छ करण्यासाठी करावा.

उंदीर हे लेप्टोस्पायरोसिसचे मुख्य वाहक आहेत. म्हणून उंदीर नियंत्रण आणि स्वच्छता काळजीपूर्वक करावी.

श्‍वानांसाठी सेवेन इन वन (डीएचपीपीआयएल) लस उपलब्ध असून ती दर वर्षी टोचून घ्यावी.

मानवामधील लक्षणे

जिवाणूंचा प्रादुर्भाव वाढून आजार वाढण्याचा कालावधी दोन दिवसांपासून चार आठवड्यांपर्यंत असतो. ताप येणे हे आजाराचे पहिले लक्षण आहे. कधी कधी तापासह थंडी वाजते, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, गुडघे दुखणे, पाठदुखी, डोळे लाल होणे, पुरळ येणे, मान आकडणे, कावीळ होणे ही प्रामुख्याने लक्षणे दिसतात.

लेप्टोस्पायरोसिस हा गरोदर स्त्रियांसाठी प्राणघातक ठरतो. तसेच गर्भपातास कारणीभूत ठरू शकते.

आजाराचा प्रसार

जिवाणू लागण झालेल्या श्‍वान, गाई-गुरे, घोडा, मांजर आणि इतर प्राण्यांच्या लघवीमध्ये आढळतात.

संक्रमित प्राण्यांच्या लघवीचा खाद्यपदार्थ, सांडपाणी किंवा साठलेल्या पावसाच्या पाण्याशी प्रत्यक्ष संपर्क आल्यास आणि या पाण्याशी मानवाचा संपर्क आल्यास त्वचेवरील असलेल्या जखमांतून किंवा डोळे किंवा तोंड यासारख्या श्‍लेष्मल त्वचेतून हे जिवाणू मानवांच्या शरीरात प्रवेश करू शकतात.

ऊस, भात शेतीमध्ये काम करणारे शेतकरी, जलवाहिन्या, गटारे यामध्ये काम करणारे मजूर यांचा संक्रमित पाण्याशी संपर्क आल्यास या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकते.

मानवामधील प्रतिबंधात्मक उपाय

पादत्राणे न घालता पावसाच्या पाण्यात जाणे टाळावे. पावसाच्या पाण्यात जाऊन आल्यास तत्काळ हात-पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.

पायावर जखम असल्यास आणि भात, ऊस, पावसाच्या पाण्यात/ दूषित पाण्यात जाणे आवश्यक असल्यास गमबुट वापरावेत.

संक्रमित जनावरांशी संपर्क आल्यानंतर हातपाय साबणाने स्वच्छ धुवावेत.

घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.

- डॉ. निशिगंधा कच्छवे, ९२८४८०११७७

(पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५२ टक्क्यांवर

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पावसाची मध्यम ते दमदार हजेरी

Book Review: अर्थवेचक गोष्टगुंफण

Darwin Theory: ‘डार्विन उत्क्रांती’ सिद्धांताच्या निमित्ताने...

Interview with Dr. Suhas Diwase: राज्यातील जमीन मोजणी जलद आणि पारदर्शक होणार

SCROLL FOR NEXT