
डॉ. विठ्ठल धायगुडे, डॉ. प्रशांत पवार
Ship Farming Tips: कोक्सिडिओसिस हा शेळ्या-मेंढ्यांमधील प्रमुख परजीविजन्य आजार आहे. हा आजार आयमेरिया परजीवीमुळे होतो. हा परजीवी मेंढी, शेळीच्या आतड्यांमध्ये वाढतो, त्यामुळे पचन क्रियेमध्ये अडथळा येतो. या परजिवीची अंडी त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडतात. यामुळे खाद्य, पाणी दूषित होते. दूषित पाणी, खाद्याद्वारे आजाराचा प्रसार वाढतो. विशेषत: ४ ते ६ आठवड्यांच्या लहान करडांमध्ये हा आजार अधिक दिसतो. योग्य उपचार न केल्यास गंभीर परिणाम होऊन जनावर दगावते.
कारणीभूत घटक
अस्वच्छ गोठा, विष्ठा, दूषित पाणी, चारा खाण्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो.
गोठ्यात जनावरांची जास्त गर्दी झाल्यास परजीवींच्या प्रसाराला मदत होते.
पोषक आहाराची कमतरता असल्यास प्रतिकारशक्ती कमी होऊन जनावर आजार पडते.
दूध देणे, गर्भधारणा, अचानक वातावरणीय बदल हे ताणतणावाचे घटक प्रतिकारशक्तीवर परिणाम करतात.
प्रसार
आजाराचा प्रसार संक्रमित जनावरांच्या विष्ठेमधून बाहेर पडलेल्या ईआयमेरिया अंड्यांमधून होतो. अंडी दूषित चारा, पाणी, जमीन याद्वारे जनावरांमध्ये पोहोचतात.
जनावरांच्या आहारातून ही अंडी आतड्यांमध्ये जाऊन वाढतात आणि संक्रमण सुरू होते. दूषित पाणी आणि चाऱ्याचे सेवन हा प्रसाराचा मुख्य मार्ग आहे.
लक्षणे
आजाराच्या लक्षणांची तीव्रता संक्रमित परजीवीच्या प्रजाती आणि जनावरांच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. सौम्य संक्रमण झाल्यास विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत, परंतु तीव्र संक्रमणात पुढील लक्षणे दिसतात.
अतिसार : रक्तयुक्त, जलीय अतिसार होऊ शकतो.
वाढीमध्ये अडथळा : संक्रमित जनावरांची वजन वाढ थांबते किंवा वजन कमी होते.
अशक्तपणा आणि दुर्बलता : जनावरे अशक्त दिसतात, भूक मंदावते आणि हालचाली कमी होतात.
रक्तक्षय : शरीरामध्ये रक्ताची कमतरता होते व श्लेष्मल त्वचा फिकट होते.
निर्जलीकरण : अतिसारामुळे पाणी कमी होऊन शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता होते.
मृत्यू : गंभीर प्रकरणांमध्ये, लहान कोकरू किंवा करडे मृत्यूपर्यंत पोहोचू शकतात.
कोकरे, करडे : विशेषत: ४ आठवडे ते ६ महिने वयाच्या करडांमध्ये हा आजार अधिक दिसतो. या वयोगटातील पिले क्लिनिकल कोक्सिडिओसिस आजारास सर्वांत जास्त संवेदनाक्षम असतात.
निदान
निदानामध्ये लक्षणांव्यतिरिक्त शेण /विष्ठेची सूक्ष्मदर्शीय तपासणी महत्त्वाची असते. या व्यतिरिक्त आजारामुळे दगावलेल्या जनावरांमध्ये शवविच्छेदन अतिशय महत्त्वाचे असते. कॉक्सिडिओसिसमुळे आतड्यामध्ये अतिशय सूचक असे बदल आढळतात.
उपचार
या आजाराच्या उपचारासाठी औषधे उपलब्ध आहेत. लक्षणे दिसताच पशुवैद्यकाशी संपर्क साधून निश्चित निदान केल्यानंतर योग्य उपचार करावेत. लवकर उपचार केल्यास जनावरांची स्थिती सुधारते.
योग्य औषधोपचारासोबत जनावरांना स्वच्छ आणि पोषक आहार दिल्यास त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेसे पाणी दिले पाहिजे.
प्रतिबंध आणि नियंत्रण
निवाऱ्याची नियमित स्वच्छता करावी. विष्ठा आणि दूषित पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी निवाऱ्यात योग्य व्यवस्थापन पद्धती वापरावी.
जनावरांना स्वच्छ पाणी आणि चारा उपलब्ध करावा.दूषित पाणी, अन्नामुळे आजाराचा प्रसार होऊ शकतो.
जनावरांची अतिगर्दी होऊ देऊ नये. गर्दीमुळे परजीवींच्या प्रसाराला चालना मिळते.
ठरावीक काळानंतर औषधे वापरून संक्रमणाची शक्यता कमी करता येते. लहान जनावरांमध्ये आजाराचा धोका अधिक असतो, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी.
- डॉ. विठ्ठल धायगुडे, ९८६०५३४४८२
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.