Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Census : पशुगणनेत पहिल्यांदाच भटक्या पशुपालकांचा समावेश

Team Agrowon

अजिंक्य शहाणे

Animal Care : भारतात दर दहा वर्षांनी ज्याप्रमाणे जनगणना होणे अपेक्षित असते, त्याच प्रमाणे दर पाच वर्षांनी पशुधनगणनासुद्धा होते. भारतातील पशुगणनेची सुरुवात १९१९-२० मधे झाली. या गणनेत देशातील सर्व पाळीव प्राण्यांचा समावेश असतो. यात महाराष्ट्रातील डुकरापासून ते अरुणाचल प्रदेशमधील याकपर्यंत सर्व प्राण्यांची गणना केली जाते.

देशात यापूर्वीची पशुगणना २०१९ मध्ये झाली तर या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये २१ वी पशुगणना करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. त्याच्या पूर्वतयारीची प्रक्रिया मागील वर्षभरापासून सुरू आहे. प्रत्यक्ष गणना सप्टेंबर महिन्यापासून सुरू होऊन डिसेंबरपर्यंत चालेल, अशी शक्यता आहे. यातून जमा झालेल्या माहितीवर प्रक्रिया करण्याचे काम एक-दोन महिने सुरू राहील.

२१ व्या पशुगणनेचे महत्त्व

आजवरच्या पशुगणनेच्या तुलनेत २१ व्या पशुगणनेचे एक खास वैशिष्ट्य आहे. भारतातील सर्व भटक्या पशुपालकांसाठी ही गणना अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण गेल्या शंभर वर्षांत यंदा पहिल्यांदाच यात भटक्या पशुपालकांची वेगळी गणना होणार आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. कारण त्यामुळे भटके पशुपालक भारताच्या नकाशावर येतील आणि त्यांचे भारतासाठीचे योगदान, अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनातील (GDP) वाटा सगळ्यांना कळेल.

शेती आणि पशुधन भारतीयत्वाचे अभिन्न अंग आहे. महाराष्ट्रातील जनावरांच्या स्थानिक जाती हे आपले वैभव आहे. परंतु या जातींची संभावना, Non Descript/ Indigenous अशी केली जाते. वास्तविक येथील स्थानिक पशुपालक समाज, समूहांनी शेकडो वर्षांच्या परंपरेने या पशू प्रजातींचे जतन व संवर्धन करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम केलेले आहे. या स्थानिक प्रजातींना या पशुगणनेमुळे स्वतंत्र ओळख मिळणार आहे.

भारतातील अनेक समुदायांसाठी, समूहांसाठी भटके पशुपालन ही एक जीवन जगण्याची शैली आहे. मुख्यतः कोरडवाहू क्षेत्रात हे विशेषत्वाने जाणवते. आजवरचा इतिहास पाहता भटक्या पशुपालकांनी एक कळीची भूमिका बजावल्याचे दिसून येते. पर्यावरणाचे संतुलन आणि स्थानिक जैवविविधता राखण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आज जगभरात पर्यावरण संतुलन आणि स्थानिक जैवविविधतेबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. परंतु भारतासारख्या देशात या गोष्टी राखण्यात भटक्या पशुपालकांचे योगदान हे नेहमीच दुर्लक्षित राहिलेले आहे.

त्यामुळेच या पशुगणनेतून सामान्य लोकांचा भटक्या पशुपालकांबद्दलचे समज बदलण्याची वाट मोकळी होऊ शकते. त्या दृष्टीने ही गणना म्हणजे एक उत्तम संधी आहे. ही पशुगणना कशी करावी यासंदर्भात सांख्यिकी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि काही सामाजिक संस्थांसोबत बऱ्याच चर्चा झाल्या. त्यातून भटक्या पशुपालक समाजापर्यंत कसे पोहोचता येईल यासाठीची एक रणनीतीसुद्धा तयार करण्यात आलेली आहे. यात सामाजिक संस्था आणि वैयक्तिक कामे करणाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. कारण हेच लोक भटके पशुपालक आणि सरकार यांच्यामधील दुवा असणार आहेत.

बरेच भटके पशुपालक आपली गुरे घेऊन भटकंती करत असतात. त्यात काही वर्षभर, काही सहा महिन्यांसाठी तर काही तीन महिन्यांकरिता गुरांच्या चारा व पाण्यासाठी गावाबाहेर जातात. यादरम्यान त्यांना बऱ्याच अडचणींचा सामनासुद्धा करावा लागतो. या प्रवासादरम्यान ते बऱ्याच सरकारी योजनांना किंवा गणनेला मुकतात. त्यामुळे या वेळेच्या पशुगणनेत जास्तीत जास्त भटक्या पशुपालकांच्या नोंदी झाल्या तर भटक्या पशुपालकांकडे असलेल्या गुरांची संख्या सरकारला कळेल. धोरणे, योजना आखताना ही गोष्ट निर्णायक ठरेल.

भटके पशुपालक म्हणजे कोण?

महाराष्ट्रात अनेक भटके पशुपालक आहेत आणि ते शेळी, मेंढी, गाय, म्हैस, उंट, घोडा, कुत्रा, कोंबडी, गाढव, डुक्कर इत्यादी प्राण्यांचे संगोपन करतात. भटके पशुपालक कोण याच्या अनेक व्याख्या आहेत. त्यातील जगभरात प्रचलित एक व्याख्या म्हणजे ती व्यक्ती पारंपरिक भटका पशुपालक हवा, त्याच्या एकूण कौटुंबिक उत्पन्नापैकी ५० टक्के वाटा पशुपालन उद्योगातून यायला हवा, त्याची गुरं/जनावरं सामुदायिक संसाधने, जसे कुरण क्षेत्र किंवा जंगल यावर अवलंबून हवे, तो आपल्या गुरांसाठी एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतर करतो. या चार पैकी कुठलेही तीन नियम जो पूर्ण करत असेल तर त्याला भटके पशुपालक म्हणू शकतो.

पशुगणनेचे फायदे

१) भटक्या पशुपालनात कुठले प्राणी आहेत आणि ते किती आहेत याची संख्या कळेल.

२) सरकारी योजनांमध्ये त्यांचा समावेश करण्यास मदत होईल.

३) पशू आरोग्य विषयक अनेक समस्यांचे निराकरण होईल.

पशुगणनेतील आव्हाने

१) भटके पशुपालक कोण याबद्दल संभ्रम निर्माण केला जाऊ शकतो.

२) भटक्या पशुपालकांसोबत शासकीय कर्मचाऱ्यांचा संवादाचा अभाव असल्याने ते माहिती देण्यास नकार देऊ शकतात किंवा चुकीची माहिती देण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

३) भौगोलिकदृष्ट्या बघितल्यास महाराष्ट्रात अनेक दुर्गम भाग आहेत त्यामुळे सर्व ठिकाणी पोहोचणे कर्मचाऱ्यांना शक्य होणार नाही. सध्या पावसाळा सुरू असल्याने बरेच पशुपालक राहत असलेल्या दुर्गम भागांत पोहोचणे फार कठीण आहे.

४) भटक्या पशुपालाकांबद्दल मर्यादित माहिती उपलब्ध आहे.

भटक्या पशुपालकांचे कर्तव्य

१) संबंधित समाजातील पुढाऱ्यांनी जास्तीत जास्त पशुपालाकांपर्यंत पोहोचण्यास मदत करावी.

२) गणना करण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य व अचूक माहिती द्यावी.

३) समाजातील कुठल्याही समारंभात किंवा मेळाव्यात शासकीय पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांना समाविष्ट करून समाजविषयक माहिती उपलब्ध करून द्यावी.

४) घरातील सर्व व्यक्तींना याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. बऱ्याचदा ही माहिती फक्त पुरुषांपुरती मर्यादित असते आणि गणना करताना जर तो पुरुष घरात किंवा त्या स्थानावर नसेल तर योग्य माहिती मिळणार नाही. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला याची माहिती द्यावी.

५) जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या धार्मिक गुरूंची, पूजनीय व्यक्तींची मदत घ्यावी.

सामाजिक संस्थांची भूमिका

१) जास्तीत जास्त भटक्या समुदायापर्यंत पोहोचण्यास शासकीय अधिकाऱ्यांना मदत करणे. संस्था या गणनेत शासकीय कर्मचारी आणि पशुपालकांमधील दुवा असणार आहेत; त्यामुळे आपली भूमिका किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहीत हवे.

२) समाजात पशुगणनेबद्दल जागरूकता निर्माण करावी.

३) सुरुवातीला भटक्या समाजापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांना पोहोचण्यासाठी स्वतः त्यांच्यासोबत जाऊन पशुपालकांची भेट घ्यावी जेणेकरून विश्वास संपादन होईल आणि संवाद वाढेल.

४) इतर संस्थांसोबत एकत्र येऊन अजून माहिती घ्यावी.

अशा प्रकारची गणना देशात पहिल्यांदाच होत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पण आपण एका ध्येयाने एकत्र येऊन प्रयत्न केले तर आपल्याला जास्तीत जास्त भटक्या पशुपालकांना यात समाविष्ट करून घेता येईल. त्यासाठी पशुसंवर्धन खात्याच्या कर्मचाऱ्यांपासून ते राज्यातल्या पशुधनाबाबत सजग असणाऱ्या सामाजिक संस्थांपर्यंत सर्वच घटकांनी यात हिरिरीने उतरले पाहिजे.

(लेखक ‘सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव्ह, नागपूर’चे प्रकल्प संचालक असून, पशुपालक समूह व पशूंच्या देशी जातींचे अभ्यासक आहेत.) ९४०४०१४९१४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

UPSC Success Story : देवडीच्या अश्पाक मुलाणीचे ‘युपीएससी’मध्ये यश

Water Pollution : पुणे परिसरातील प्रदूषित पाणी थेट उजनी धरणात

Rabi Season 2024 : रब्बी हंगामासाठी ४५ हजारांवर क्विंटल बियाण्यांची मागणी

Ujani Dam : दीड महिन्यात उजनीतून सोडले १०० टीएमसी पाणी

Kandalwan : अतिसंवेदनशील कांदळवनांवर सीसीटीव्हीचा वॉच

SCROLL FOR NEXT