डॉ. सोमनाथ माने, डॉ. सुजीत भालेराव
सध्या राज्यात उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअस ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या काळात हवामान कोरडे राहील, उष्णतेची तीव्रता अधिक जाणवेल. वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. हे लक्षात घेऊन जनावरांचे आरोग्य, आहाराकडे लक्ष द्यावे. लहान वासरांची काळजी घ्यावी. उष्णतेच्या ताणामुळे दूध उत्पादन व जनावरांचे आरोग्य प्रभावित होऊ शकते.
सध्याच्या काळातील तापमान-आर्द्रता निर्देशांक
कालावधी : ८ एप्रिल ते १५ एप्रिल
तापमान : ३८ अंश सेल्सिअस ते ४४ अंश सेल्सिअस
आर्द्रता : १५ टक्के ते २५ टक्के
पावसाची शक्यता : नाही
तापमान-आर्द्रता निर्देशांक : ८२.५ (तीव्र उष्णतेचा ताण)
देशी गोवंशाचे व्यवस्थापन
सौम्य ते मध्यम उष्णतेचा ताण राहील.
दिवसभर गोठ्यात पिण्यासाठी थंड पाणी व सावलीची व्यवस्था करावी.
गोठा हवेशीर व स्वच्छ ठेवावा.
संकरित गाय, म्हशींचे व्यवस्थापन
तीव्र उष्णतेचा ताण जाणवेल.
दिवसातून २-३ वेळा जनावरांच्या अंगावर पाण्याचा शिडकावा करावा.
आहारात मीठ ,गूळ,इलेक्ट्रोलाइट्स, बायपास फॅट, व मिनरल मिक्स द्यावे.
दुपारी जनावरांना शक्यतो आराम द्यावा.
जनावरांना पाण्यात डुंबण्याची सुविधा असेल तर पाण्यात डुंबू द्यावे.
दुपारचेवेळी जनावरांच्या अंगावर ओले गोणपाट टाकावे.
चारा देण्याची योग्य वेळ
सकाळी : ६ ते ८
संध्याकाळी : ५ ते ८
दुपारी जनावरांना निवांत रवंथ करू द्यावे.
गोठ्यातील व्यवस्थापन
जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी पुरेसे द्यावे. गोठ्यामध्ये फॅन, फॉगर किंवा स्प्रिंकलरचा वापर करावा, यामुळे उष्णतेचा प्रभाव कमी होतो.
गोठा नियमित स्वच्छ करावा, हवेशीर ठेवावा. गोठ्याच्या छतावर गवत, गोणी किंवा पांढरा रंग लावावा तसेच आतल्या बाजूने काळा रंग लावावा.
मिठाचे खडे किंवा खनिज क्षार मिश्रण रोज द्यावे.
रेतन सकाळी किंवा संध्याकाळी करावे.
जनावरांना सकाळी किंवा संध्याकाळी चरण्यास सोडावे.
पशू व्यवस्थापनासाठी ॲप
फुले अमृतकाळ (Phule Amrutkal) ॲप डाऊनलोड करुन आपल्या भागातील तापमान-आर्द्रता निर्देशांक तपासून जनावरांचे व्यवस्थापन करावे. https://play.google.com/store/apps/details?id=com.dairy.thi
उष्माघाताची कारणे
उन्हाळ्यातील जास्त तापमान, वातावरणात भरपूर आर्द्रता. गोठा कोंदट असणे.
उन्हाच्या वेळेस जनावरांना चरण्यासाठी सोडणे.
पिण्याच्या पाण्याची कमतरता असणे.
जनावरांसाठी दिवसा सावलीची सोय नसणे.
लक्षणे ः
शरीराचे तापमान १०३ ते १०७ अंश फॅरनहाइटपर्यंत वाढते.
जनावराच्या श्वसनाचा वेग वाढतो, हृदयाचे ठोके वाढतात.
जनावर जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करते, लाळ गाळते. नाकातून स्राव येतो. भरपूर तहान लागते. जनावर अस्वस्थ होते. शरीराचा तोल सांभाळता येत नाही.
चालताना अडखळते व कोसळते.
उपचार ः
जनावरांना हवेशीर ठिकाणी बांधावे. गोठ्यामध्ये पंख्याची व्यवस्था करावी, जेणेकरून हवा खेळती राहील.
जनावराचे अंग थंड पाण्याने ओले करावे, जेणेकरून शरीराचे तापमान कमी होईल. पिण्यासाठी भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावे.
पशुवैद्यकाच्या सल्ल्याने थंड ग्लुकोज, सलाईन द्यावे.
प्रतिबंध ः
कडक उन्हात जनावरे चारण्यास सोडू नयेत. उन्हाच्या वेळी जनावरांची लांब वाहतूक करू नये. जनावरांची वाहतूक सकाळी किंवा सायंकाळी करावी.
अंगावर भरपूर केस, लोकर असणाऱ्या जनावरांना अंगावरील केस कमी करावेत.
- डॉ. सुजीत भालेराव ९८९०५०५६४९
(देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय,पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.