Pune News : वाढत्या उष्म्याचा त्रास मानवासह पशुधनालाही होऊ लागला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात चारा आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे आता उष्माघाताचा धोका वाढल्याने पशुपालक चिंतेत आहेत. पशुधनाला उष्माघातापासून बचावासाठी विविध उपाययोजना पशुसंवर्धन विभागाने सूचविल्या आहेत.
उष्माघातामुळे पशुधनाच्या शरीरक्रियेवर परिणाम होऊन पशुधन आजारी पडू शकते किंवा दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याच्या विविध भागांतील पारा आता चाळिशीच्या पार गेला आहे. अनेक भौगोलिक क्षेत्रात उष्णलहरी सुरू झाल्या आहेत.
यामुळे लहान वासरे, करडे, काळ्या अथवा गडद रंगाचे प्राणी, श्वासाच्या आजाराने ग्रस्त अथवा आजारी पशुधन, वराह, नुकतेच लोकर कापलेल्या मेंढ्या, दुभते पशुधन अशा विविध पशुधनास व कुक्कुट पक्ष्यांना उष्माघाताचा जास्त धोका निर्माण झाला आहे.
यामुळे उष्माघात किंवा उष्णलहरींच्या प्रकोपाचा प्रभाव झालेले पशुधन ओळखणे अत्यंत महत्त्वाचे झाले असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी म्हटले आहे. यामध्ये पशुधनाला धाप लागणे, श्वासोच्छ्वासाची गती वाढणे, पाणी जास्त प्रमाणात पिणे, चारा पाणी खाण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट, पशुधन सुस्तावणे, लाळ गळणे, नाकपुड्या कोरड्या पडणे, ही उष्माघाताची लक्षणे असून, या लक्षणांकडे पशुपालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
उष्ण लहरी/उष्माघातापासून पशुधन व कुक्कुट यांचा बचाव करण्यासाठी पशुधनास सावलीत किंवा निवाऱ्यात थंड जागेत ठेवावे. शक्य असल्यास फॅन लावावेत, थंड पाणी पिण्यासाठी पुरवावे, एका जागेत पशुधनाची दाटी करू नये, गोठ्यातील पशुधनाची घनता कमी करावी.
शेतीविषयक व इतर कामासाठी वापरण्यात येणाऱ्या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नये. कुक्कुट पक्ष्यांसाठी पक्षीगृहाच्या शेडवर गवताचे आच्छादन करावे, पक्षिगृहाच्या जाळ्यांना पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे. तसेच पक्षिगृहात भरपूर खेळती हवा राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
टोल फ्री क्रमांकावर साधा संपर्क
राज्यातील कोणत्याही गावांमध्ये पशुधन तसेच कुक्कुट पक्ष्यांमध्ये उष्माघात किंवा उष्णलहरींच्या त्रासाची लक्षणे निदर्शनास आल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी.
तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या कॉल सेंटरमधील दूरध्वनी क्रमांक १९६२ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित दूरध्वनी करून त्याची माहिती द्यावी, तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष संबंधित जिल्हा यांच्याशी ही संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यामध्ये सध्या १५३ फिरती पशुवैद्यकीय पथके कार्यरत असून, सदर सेवा १९६२ या क्रमांकावर मुंबई शहर व उपनगर वगळता उर्वरित राज्यात उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.