डॉ. कृष्णा गिऱ्हे, डॉ. बालाजी अंबोरे
Diseases in Goat: सांसर्गिक कॅप्रिन प्ल्युरोपन्यूमोनिया
सांसर्गिक कॅप्रिन प्ल्युरोपन्यूमोनिया हा एक गंभीर आजार आहे. हा आजार शेळ्यांना आणि काही जंगली रवंथ करणाऱ्या जनावरांना होतो. हा आजार मायकोप्लाझ्मा कॅप्रिकोलम सबस्पी जिवाणूमुळे होतो.
प्रसार
हा अत्यंत संसर्गजन्य श्वसन आजार आहे शेळ्यांना प्रभावित करतो. संक्रमित जनावरांच्या जवळच्या संपर्कातून निरोगी जनावरांना पसरतो. त्याच्या प्रसारास कारणीभूत घटकांमध्ये गोठ्यात जास्त गर्दी, खराब वायुविजन आणि तणाव यांचा समावेश होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
संक्रमित शेळ्या किंवा दूषित चारा, पाणी यामुळे कळपात आजाराचा वेगाने प्रसार होतो. आजार संक्रमित जनावरे, दूषित उपकरणे किंवा एरोसोलाइज्ड श्वसन स्राव यांच्या थेट संपर्काद्वारे पसरतो.
लक्षणे
श्वसन आणि एकूण स्वास्थ्यावर परिणाम दिसतो.
न्यूमोनियामुळे संक्रमित शेळ्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, जलद आणि उथळ श्वास घेतात. खोकला, श्वास घेण्यास त्रास, नाकातून स्राव, ताप, आणि भूक कमी होते.
प्रभावित शेळ्यांमध्ये अशक्तपणा, सुस्ती आणि वजन कमी होण्याची लक्षणे दिसतात. ही लक्षणे वेगाने वाढू शकतात, ज्यामुळे तीव्र श्वसन त्रास आणि उपचार न केल्यास मृत्यूदेखील होतो.
उपचार
पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचा वापर करावा.
आवश्यक असल्यास द्रव थेरपी, बाधित शेळ्यांना योग्य पोषण द्यावे
प्रतिबंधात्मक उपाय
न्यूमोनिया संसर्गजन्य असल्यामुळे आजारी जनावर ओळखून त्वरित वेगळे करावे. जेणेकरून कळपातील इतर जनावरांना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. आजारी जनावरांवर पशुवैद्यकांच्या मदतीने प्रतिजैवक वापरून त्वरित उपचार करावेत.
गोठ्यामध्ये गर्दी टाळावी. हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
गोठा स्वच्छ ठेवावा, जेणेकरून जनावरांच्या मलमूत्रापासून अमोनियासारखा वायू तयार होणार नाही.
वेळोवेळी जंतनाशक द्यावे.
शेळ्या किंवा मेंढ्या अधिक अंतरावर वाहून नेऊ नये. वाहून न्यायचे असल्यास त्यांना ताण कमी करणारे औषधे द्यावीत.
नियमति संसर्गजन्य आजारांचे लसीकरण करावे.
नवीन विकत घेतलेल्या शेळ्या, मेंढ्या लगेच आपल्या कळपात मिसळून घेऊ नयेत. आधी त्यांना विलगीकरण कक्षात ठेवावे, जेणेकरून एखाद्या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास कळून येईल.
जनावर दगावले असल्यास त्याची योग्य विल्हेवाट लावावी. खोल खड्ड्यात पुरावे. या पद्धतींचा अवलंब केल्यास बाधित जिवाणू किंवा विषाणू इतर जनावरांमध्ये पसरणार नाही.
आजारी जनावरांमुळे दूषित झालेली जागा आणि उपकरणे त्वरित निर्जंतुक करून घ्यावीत.
हायपोथर्मिया
शरीराचे तापमान सामान्य पातळीपेक्षा कमी, जास्त होणे याला हायपोथर्मिया म्हणतात. शेळ्या, मेंढ्या थंड हवामानास जास्त संवेदनशील असतात.
कारणे
थंड वातावरण, पाऊस, थंड वारे.
शरीर भिजल्यामुळे उष्णता झपाट्याने कमी होते.
कुपोषण, आजार किंवा प्रसूतीनंतरची कमजोरी.
जास्त लहान वय, आजारी प्राणी जास्त संवेदनशील
लक्षणे
शारीरिक सामान्य तापमानापेक्षा तापमान कमी असते.
त्वचा थंड पडते, विशेषतः कान आणि पाय.
जनावर सुस्त होते, हालचाल कमी होते.
तापमान कमी झाल्यावर शरीर थर थर कापते.
जनावराची खाण्या-पिण्याची इच्छा कमी होते.
हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास दर कमी होतो.
उपचार
गोठ्यात उष्ण तापमान राहील याची काळजी घ्यावी. शेळ्या, मेंढ्यांना कोरड्या, उबदार ठिकाणी ठेवावे.
गरम पाणी, गूळ पाण्यात मिसळून द्यावा. ऊर्जा देणाऱ्या औषधांचा वापर पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार करावा.
गंभीर परिस्थितीत पशुवैद्यकाकडून शिरेवाटे सलाइन द्यावे.
प्रतिबंधात्मक उपाय
थंड हवेपासून कळपाचे संरक्षण करावे, विशेषतः नवजात करडांचे थंडीपासून संरक्षण करावे.
आहार ऊर्जादायी असावा, जेणेकरून थंडीत शरीराचे तापमान नियमित राहील.
कोकरांना थंडी जास्त वाजत असेल तर छोटी शेकोटी, विजेचा दिवा किंवा विजेची शेगडी वापरून गोठ्यातील हवा उबदार ठेवावी. त्यामुळे करडांना सर्दी, हगवण आणि न्यूमोनिया यांपासून संरक्षण होईल. शेकोटी करताना जास्त धूर होणार नाही याची काळजी घ्यावी. गोठा एकदा उबदार झाल्यानंतर शेकोटी विझवावी.
विजेचा दिवा साधारणपणे करडांपासून २० इंचांपेक्षा जास्त उंचीवर छताला टांगावा. विजेचा दिव्याला संरक्षक पिंजरा असावा.
शेळ्या, मेंढ्यांचे मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जात असेल, तर त्या ठिकाणी एका कोपऱ्यात बंदिस्त गोठा असावा. जेणेकरून रात्रीच्या वेळी शेळ्या, मेंढ्या तेथे जाऊन बसतील. यामुळे त्यांचे थंडीपासून संरक्षण होईल.
शेळ्या, मेंढ्या आणि लहान करडांना सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात मोकळे सोडावे.
मावा
देवीप्रमाणे लक्षणे असणारा हा विषाणूजन्य आजार आहे. शेळ्या, मेंढ्यामध्ये प्रामुख्याने करडांमध्ये आढळून येतो.
नाकाच्या भोवती जास्त प्रमाणात काळसर खपली पकडलेल्या जखमा दिसतात.नाक, कास, शरीराच्या इतर भागावर जखमा दिसतात. ताप येतो, बाधित शेळी, मेंढी चारा कमी खाते.
आजार एकदा झाला की त्याच शेळी, मेंढीमध्ये परत हा आजार दिसून येत नाही.
प्रसार
बाधित जनावरांचा प्रत्यक्ष संपर्कामुळे दूषित झालेल्या गव्हाणी, पाण्याचे टब इत्यादींमार्फत होतो.
दाटीवाटी, अस्वच्छता हे प्रसाराचे मुख्य कारण आहे. बाधित व निरोगी शेळ्या, मेंढ्या एकत्र ठेवल्यास प्रसार वाढतो.
लहान करडे, कोकरांची काळजी घेणे गरजेचे आहे. लहान पिले मावा संसर्गास लवकर बळी पडतात.
आठवडी बाजारात मावा बाधित शेळ्या, मेंढ्यांच्या संपर्कामुळे निरोगी कळपात प्रसार होऊ शकतो.
लक्षणे
ओठ, नाकपुडीच्या बाजूला, तोंडामध्ये सुरुवातीला पुरळ येतात. नंतर जखमा होऊन खपल्या दिसतात.
ओठ, हिरड्यांना झालेल्या जखमांमुळे खाद्य खाता येत नाही. त्यामुळे त्या कमजोर आणि अशक्त होतात.
बाधित शेळी, मेंढी बरी होण्यासाठी १ ते २ महिन्यांचा कालावधी लागतो. हा विषाणू थंड व कोरड्या हवामानात जास्त काळ तग धरू शकतो. मात्र अति जास्त व अति कमी तापमानात मरतो.
मावा आजार झालेल्या पिलांमध्ये सुरुवातीला हिरड्यांवर पुरळ येतात. नंतर पुरळ फुटून हिरड्या लालसर होतात. गाठी येऊ शकतात. तोंडातील जखमांमुळे करडांना कासेतील दूध पिणे अवघड जाते.
रोगग्रस्त करडांमार्फत दूध पिताना शेळीच्या सडाला देखील संसर्ग होऊ शकतो. त्या जागी पुटकुळ्या येऊ शकतात. सडाला बाहेरून प्रादुर्भाव झाल्यास शेळ्या करडांना दूध पिऊ देत नाहीत. शेळ्या, मेंढ्यांना कासदाह होतो.
हा आजार प्राण्यांमधून मानवाला होणाऱ्या रोगसमूहात येतो. हा आजार प्राणी प्रसारित आहे. सडाला प्रादुर्भाव झालेल्या शेळ्यांचे दूध काढल्यास याच प्रकारचा संसर्ग दूध काढणाऱ्या व्यक्तीच्या हाताला, बोटांना होऊ शकतो. दूध काढणाऱ्या व्यक्तीच्या तळहात, बोटांवर छोटे पुरळ येतात.
उपचार
विषाणूजन्य आजारामुळे कोणत्याही प्रतिजैविकाचा वापर होत नाही.
जखमा सकाळी आणि संध्याकाळी पोटॅशिअम परमॅंग्नेटच्या द्रावणाने धुऊन स्वच्छ कराव्यात.
तोंड, ओठांवरील जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी हळद, लोणी किंवा दुधाची साय किंवा बोरो ग्लिसरीन लावावे..
खाद्यामध्ये मऊ, लुसलुशीत चारा, कोथिंबीर, मेथी घास द्यावे.
अशक्तपणा दूर करण्यासाठी लापशी, गूळ पाणी यांसारखे पौष्टिक पदार्थ द्यावेत.
प्रतिबंधात्मक उपाय
कोकरू एक महिन्याचे झाल्यावर लसीकरण करावे.
चांगल्या परिणामांसाठी, २ ते ३ महिन्यांनंतर लसीची दुसरी मात्रा देणे आवश्यक आहे.
लसीकरण नसलेल्या शेळी, मेंढीचे संक्रमित फीडलॉट्समध्ये प्रवेश करण्यापूर्वी लसीकरण करावे.
- डॉ. कृष्णा गिऱ्हे ९९२२४१७०१८
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.