Poisonous Plants : चारा टंचाईमुळे उपाशी असलेली जनावरे मिळेल ती वनस्पती चारा म्हणून खातात. भुकेच्या तावात अधाशीपने चारा खाताना विषारी वनस्पती देखील खाल्ल्या जातात. त्यामुळे जनावराला विषबाधा होऊन जनावराचा मृत्यू देखील होऊ शकतो.
उग्र वासामुळे तसेच चवीला रुचकर नसल्यामुळे जनावरे शक्यतो विषारी वनस्पती खात नाहीत. पण बऱ्याचदा दुष्काळी भागात चारा टंचाईमुळे जनावरे या हिरव्या वनस्पतींकडे आकर्षित होऊन नाइलाजास्तव विषारी वनस्पती खातात.
त्यामुळे अशा विषारी वनस्पती खाल्याने जनावरांना विषबाधा होते. याशिवाय जास्त वेळ उपाशी असलेल्या जनावराला चरण्यासाठी सोडल्यानंतर जनावरे अधाशीपणाने चरतात. त्या वेळी देखील विषारी वनस्पती खाण्यात येऊन विषबाधा होण्याची शक्यता वाढते. विषबाधा टाळण्यासाठी आपल्या परिसरात उगवणाऱ्या विविध प्रकारच्या विषारी वनस्पतींची माहिती आपल्याला असायला हवी. आपल्याकडे सहसा कण्हेर, घाणेरी, रुई किंवा रुचकी, रानमोहरी, धोत्रा, बेशरम
या विषारी वनस्पतींच प्रमाण जास्त आहे.
कन्हेर
यापैकी कन्हेर ही वनस्पती आपल्याला माहितीच आहे. या वनस्पतीच्या बिया अत्यंत विषारी असतात. जनावराने या वनस्पतीची पाने किंवा बिया जास्त प्रमाणात खाल्ल्यास, जनावरांची भूक मंदावणे, पोटात वेदना होणे, हगवण लागणे, आकडी येणे अशी लक्षणे दिसतात. हृदयाचे ठोके कमी होऊन शेवटी जनावराचा मृत्यू देखील होऊ शकतो.
रुई किंवा रुचकी
विषारी वनस्पती पैकी दुसरी महत्वाची वनस्पती आहे रुई किंवा रुचकी. या वनस्पतीचे सर्वच भाग जसे की पाने, फुले, शेंगा या विषारी असतात.रुईची पाने जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास लाळ गळणे, घसा जळजळणे, पचनास त्रास होणे, वेदना व जुलाब होणे ही लक्षणे दिसतात. या वनस्पतीमधील विषारी घटकांचा विशेषतः हृदयावर विपरीत परिणाम होतो. हृदयाचे ठोके अनियमित होतात. आणि शेवटी हृदयक्रिया बंद पडून जनावराचा मृत्यू होतो.
बेशरम
बेशरम या वनस्पतीमुळेही जनावरांना विषबाधा होते. ही वनस्पती खाल्यामुळे शेळ्यांमध्ये विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच मेंढी व वासरांमध्ये देखील विषबाधा होते. लाळ गळणे, जुलाब होणे, डोळ्यांची बुब्बुळे मोठी होणे, जनावर थरथर कापणे, चक्कर येऊण मृत्यू होणे अशी लक्षणे दिसतात.
घाणेरी
घाणेरी ही विषारी वनस्पती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पती मधील विषारी घटकांमुळे यकृताची हानी होते. भूक मंदावणे, वजन घटणे, कावीळ होणे ही लक्षणे दिसून येतात.जनावराची त्वचा सूर्यप्रकाशाला संवेदनशील होते. यामध्ये शक्यतो डोळे व कान या भोवतीची त्वचा, नाक, कासेवरील त्वचा जास्त बाधित होते.
अशा प्रकारच्या विषारी वनस्पती चारा कापताना किंवा कुट्टी करून देताना खाद्यात येणार नाहीत याची काळजी घ्यावी. याशिवाय आपल्या भागातील विषारी वनस्पती ओळखून त्याठिकाणी जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत.
गोठ्यात नियमित फिरून पाहणी करावी. त्यामुळे जनावराच्या वागणुकीत झालेला बदल, विषबाधेशी निगडीत लक्षणे लगेच लक्षात येतात. अशी काळजी घेतली तर आपल्या जनावराला विषबाधेपासून नक्कीच वाचवता येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.