Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Protect : जनावरांमधील उष्माघाताकडे लक्ष द्या

Team Agrowon

डॉ. सुधाकर आवंडकर, डॉ. चैतन्य पावशे

Animal Health : उन्हाळ्यात बहुतेक भागातील तापमान ४५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक असते. अशा अतिउष्ण वातावरणाचा जनावरांवर ताण येतो. परिणामी, पचन संस्था आणि प्रजनन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. उत्पादकता खालावते. जनावरांचे खाद्य, वैरण खाण्याचे प्रमाण कमी होते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.

ताणामुळे नवजात वासरांवर कायमचा दुष्परिणाम होऊ शकतो. म्हशींची चामडी काळ्या रंगाची आणि केसविरहित असते, तसेच त्यांच्या चामडीत घाम ग्रंथी अतिशय कमी असतात म्हणून त्यांची वाढीव उष्णतेस प्रतिरोध करण्याची क्षमता कमी असते. अशा वेळी जनावरांची योग्य निगा राखणे आवश्यक ठरते. अन्यथा, पावसाळ्याच्या सुरुवातीस प्रसार होत असलेल्या संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये पसरतात.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

गोठ्यात स्वच्छ आणि ताजी खेळती हवा

येईल यासाठी पुरेशी वायुविजन व्यवस्था असावी.

गोठ्याचे छत उष्णतारोधी असावे. छतावर उष्णतारोधी पांढरा रंग लावावा. छतावर वाळलेल्या गवताचा किमान सहा इंचाचा थर द्यावा. त्यावर सूर्यप्रकाशाला परावर्तित करणारे चमकदार आवरण लावावे. त्यामुळे गोठ्यातील वातावरणाचे तापमान कमी राखण्यास मदत होते.

छताची उंची कमीत कमी दहा फूट असावी. त्यामुळे गोठ्यात हवा खेळती राहते.

गोठ्याचा तळ सिमेंट काँक्रीटचा असावा. मात्र निसरडा नसावा. त्यास पाणी आणि मूत्राचा निचरा होण्यासाठी प्रमाणशीर उतार असावा.

दिवसांतील उष्ण काळात गोठ्याच्या खिडक्या, दारे किंवा उघड्या बाजूवर गोणपाटाचे पडदे लावावेत. त्यावर पाणी शिंपडावे. संध्याकाळी वातावरण थंड झाल्यानंतर पडदे काढून टाकावेत.

शक्य असल्यास गोठ्यात पंखे, कुलर आणि स्प्रिंकलरचा वापर करावा.

जनावरांना उघड्यावर, उन्हात किंवा उन्हाच्या झळा बसतील अशा ठिकाणी बांधू नये.

गोठ्यात गर्दी होईल इतक्या जास्त संख्येत जनावरे ठेवू नयेत. प्रत्येक जनावरास ४० ते ५० चौरस फूट जागा असावी.

मुक्तसंचार गोठा पद्धतीत प्रती जनावर ३५ ते ४० चौरस फूट मोकळी आणि ७ ते ८ चौरस फूट छतयुक्त जागा असावे. मोकळ्या जागेत सावली देणारी झाडे असावीत.

गर्भकाळाच्या शेवटच्या टप्प्यात तसेच प्रसूतिक्षम जनावरांना १२ चौरस फूट

छतयुक्त आणि तेवढीच मोकळी जागा उपलब्ध असावी.

वळूस १२ चौरस फूट छतयुक्त आणि १२० चौरस फूट मोकळी जागा उपलब्ध असावी.

जनावरांच्या गोठ्याभोवती सावली देणारी झाडे पुरेशा संख्येत असावीत. गोठ्याभोवती असलेली झाडी सावली देऊन उष्णता कमी करण्यास मदत करतात. तसेच झाडांमुळे उन्हाच्या झळा लागत नाहीत.

सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून जनावरांचे रक्षण करावे. पशुपालाकांकडे गोठे नसतील तर त्यांनी पालापाचोळ्यापासून तात्पुरते गोठे उभारावेत. त्याभोवती शेडनेट लावावी.

उन्हाळ्यात पाण्याचे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा जास्त असते. त्यामुळे ते पाणी कमी पितात. पाणी कमी प्यायल्यामुळे तसेच सुकी वैरण शरीरात अधिक उष्णता तयार करीत असल्याने वैरण खाण्याचे प्रमाण कमी होते.

जनावरांना दिवसातून चार वेळा वैरण द्यावी. हिरव्या वैरणीचे प्रमाण वाढवावे. जनावरे हिरवी वैरण आवडीने खातात. त्यामुळे त्याच्या शरीरास आवश्यक पोषण मुल्यांची पूर्तता होते. हिरव्या वैरणीत ७० ते ९० टक्के पाणी असते. त्यामुळे शरीराचे निर्जलीकरण होत नाही.

खाद्यातून पोटॅशिअम, सेलेनीअम, क, इ आणि सी जीवनसत्त्वांचा पुरवठा करावा.

जनावरांना सकाळी आणि संध्याकाळी चरावयास सोडावे.

शिजलेले आणि शिल्लक राहिलेले अन्न त्यांना देऊ नये. पीठ, ब्रेड, तांदूळ यांसारखे जास्त शर्करायुक्त खाद्य जास्त प्रमाणात देऊ नये. खाद्य आणि वैरणीचे प्रमाण ४०:६० असावे.

उन्हाळी ज्वारीस कापणी आधी २ ते ३ वेळ ओलित करावे. जेणेकरून त्यापासून विषबाधा होणार नाही.

वैरणीत १८ ते २० टक्के पचनीय तंतुमय पदार्थ असावेत. सुलभ पचनासाठी त्यांना विशिष्ट यीस्ट आणि विशिष्ट कवकांचे कल्चर वापरावे. खाद्यात ढेपीचे प्रमाण वाढवावे.

दुधाळ जनावरास १८ टक्के जास्त प्रथिन युक्त वैरण खाऊ घालावी. त्यांना क्षार मिश्रण नियमित द्यावे. शक्य असल्यास बायपास फॅट द्यावे.

जनावरांना पाण्यातून योग्य प्रमाणात मीठ, गूळ आणि लिंबू द्यावे.

हिरव्या वैरणीच्या उपलब्धतेसाठी उन्हाळ्यात मूग, ज्वारी, मका यांसारख्या चारा पिकांची लागवड करावी.

निकृष्ट वैरणीवर युरिया, मळी आणि क्षार मिश्रणाची प्रक्रिया करून पौष्टिकता वाढवावी. त्यासाठी १ किलो गूळ, २ किलो युरिया, १ किलो क्षार मिश्रण आणि १ किलो मिठाचे २० लिटर पाण्यात मिश्रण तयार करून १०० किलो सुक्या वैरणीवर सावलीत फवारावे. वैरण सुकल्यानंतर जनावरांना द्यावी.

उन्हाळ्यात जनावरांची वैरण खाण्याची इच्छा कमी होते. पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. म्हणून दिवसातून तीन ते चार वेळा त्यांना थंड, स्वच्छ आणि ताजे पाणी उपलब्ध करून द्यावे. गरम पाणी पिण्यास देऊ नये. पिण्याचे पाणी साठविण्यासाठी मातीच्या माठाचा वापर करावा.

जनावरांना प्रति तास तीन ते पाच लिटर पाण्याची गरज असते. त्यामुळे पुरेसे थंड आणि स्वच्छ पाणी उपलब्ध असावे.

जास्त उष्णतेच्या काळात जनावरांच्या शरीरावर दिवसातून चार वेळा पाणी शिंपडावे. शक्य असल्यास म्हशींना तळ्यात पोहण्यास न्यावे. दुपारी त्यांच्यावर थंड पाणी फवारल्यास उत्पादन वाढीस फायदेशीर ठरते.

आवश्यक लसीकरण सकाळी किंवा संध्याकाळी करावे. माजावर आलेली जनावरे सकाळी किंवा संध्याकाळी थंड वेळी भरवावीत.

माशा, डास, कीटक, गोचीड, पिसा अशा बाह्य परोपजीवीचा बंदोबस्त करावा. त्यासाठी करंज आणि नीम तेलाचे सम प्रमाणात मिश्रण करावे. एक लिटर स्वच्छ पाण्यात २० मिलि मिश्रण आणि साबणाची १० ग्रॅम भुकटी मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण अर्धा तास मुरू द्यावे. त्यानंतर जनावरांच्या अंगावर आणि गोठ्यात फवारावे.

पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशक द्यावे. उष्माघात झाल्यास पशुवैद्यकांचा विनाविलंब सल्ला घ्यावा आणि योग्य उपचार करावेत.

उष्माघाताची लक्षणे

जनावरांच्या वागणुकीत बदल होतो. जनावर अस्वस्थ होते. सावली शोधते. खाली बसत नाही.

जनावर क्षीण आणि मलूल होते. नाकातून रक्त येते. हगवण लागते. नाक आणि डोळे लाल होतात. हृदय गती वाढते. जनावरांची भूक कमी होते.

दुधाळ जनावरांचे दूध देण्याचे प्रमाण कमी होते. दुधातील स्निग्ध आणि प्रथिनांचे प्रमाण कमी होते, गुणवत्ता खालावते.

वळूंची प्रजनन क्षमता कमी होते. त्यांच्या वीर्याची प्रत खालावते.

गाई-म्हशींचे ऋतुचक्र अनियमित होते. गाभण राहण्याची शक्यता कमी होते, गर्भपात होतो.

वयात येण्याचा कालावधी वाढतो. नवजात वासरांत मरतुक होते.

वेळीच उपाययोजना न केल्यास उष्माघातामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते.

डॉ. चैतन्य पावशे ९५०३३९७९२९

(स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT