Animal Disease : जनावरांच्या खुरांचे आजार अन् उपाययोजना

Animal Care : जनावरांतील खुरांचे बहुतांश आजार हे व्यवस्थापनातील चुकीमुळे होतात. जास्त वजन असणाऱ्या जनावरांमध्ये पुढील पायांच्या आतील बाजूस आणि मागील पायांच्या बाहेरील बाजूस केराटिनचा थर साचतो. त्या जागेवर खुरांची अयोग्य वाढ होते. याचा जनावरांना त्रास होतो, उत्पादन क्षमता कमी होते.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. अमित क्षीरसागर, डॉ. चैत्राली आव्हाड

मानवी नखांप्रमाणे जनावरांच्या खुराचे बाहेरील आवरण हे केराटिनपासून बनलेले असते. आवश्यकतेपेक्षा जास्त वाढलेल्या खुरामुळे जनावर लंगडते. अशी जनावरे काम करू शकतात, परंतु त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता आजाराच्या तीव्रतेनुसार कमी होते.

जनावरांचे चारा खाणे मंदावते, पाणी पिणे कमी होते, जनावरांचे वजन घटते, प्रजननक्षमता खालावते, जनावरांची उत्पादनक्षमता कमी होते.जनावरांतील खुरांचे बहुतांश आजार हे व्यवस्थापनातील चुकीमुळे होतात. जास्त वजन असणाऱ्या जनावरांमध्ये पुढील पायांच्या आतील बाजूस आणि मागील पायांच्या बाहेरील बाजूस केराटिनचा थर साचतो.

त्या जागेवर खुरांची अयोग्य वाढ होते. वातावरणाचा खुरांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. उष्ण आणि कोरड्या वातावरणात खूर कडक आणि ठिसूळ होतात. पावसाळी वातावरणात खूर मऊ होतात, त्यामुळे खुरांमध्ये टोकदार वस्तू शिरल्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची दाट शक्यता असते.

बंदिस्त गोठा आणि गोठ्यातील जमीन कडक असल्यास जनावरांमध्ये आजार जास्त उद्‍भवतात. परंतु त्याच तुलनेत बाहेर चरायला जाणाऱ्या जनावरांमध्ये आजाराचे प्रमाण कमी आढळते. गोठ्याची जमीन कडक असल्यामुळे खुरांना जास्त रक्तपुरवठा होतो. त्यामुळे खुरांची जास्त वाढ होते.

Animal Care
Animal Care : उन्हाळ्यात नवजात वासरांना होणारा हगवण आजार

जनावरे लंगडण्याची प्रमुख कारणे :

१) पशुखाद्यात अचानक केलेला बदल.

२) पशुखाद्यात तंतुमय घटकांचे कमी प्रमाण.

३) पशुखाद्यात कडधान्यांचे जास्त प्रमाण.

४) पशुखाद्यात क्षारांचे कमी प्रमाण.

५) मेदयुक्त खाद्य.

६) गोठ्यातील अस्वच्छतेमुळे जंतूंचे प्रमाण वाढते. त्यामुळे खुरांचे विविध आजार होतात.

खुरांचे मुख्य आजार :

१) भेगा पडलेले खूर :

प्रामुख्याने बायोटिन, झिंक क्षारांच्या कमरततेमुळे खुरांवर भेगा पडतात. भेगा उभ्या आणि आडव्या असतात.

२) सडलेले खूर :

दोन खुरांच्या मध्यभागी जखम होते. त्या जखमेतून घाण वास येणारा स्त्राव येतो. जनावरांना चालताना वेदना होतात आणि ते लंगडतात.

अस्वच्छ गोठा, जनावरे नेहमी चिखलात बांधणे, पाणथळ जमिनीवर जनावरे चारायला नेणे यामुळे हा आजार होतो. हा आजार संसर्गजन्य असून एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांना होऊ शकतो.

३) खुरांमध्ये पू भरणे :

मऊ झालेल्या खुरांमध्ये टोकदार वस्तू शिरल्यास खुराला जखम होऊन जंतुसंसर्ग होतो.

सडलेले खूर या आजारावर लगेच उपचार केला नाही तर खुरांमध्ये पू भरतो.

४) खुराच्या तळव्यावरील अल्सर :

जनावरांवर कामाचा अति ताण, अति व्यायाम, जास्त अंतर पायी चालवणे, गरम जमिनीवर जास्त काळासाठी चालवणे, बसण्याची जागा कडक असणे, अशा विविध कारणांमुळे खुराच्या तळव्यावर

अल्सर होतात.

५) खुराला छिद्र पडणे :

टोकदार दगड, खिळा, काटा किंवा वायर यामुळे खुराला छिद्र पडते. त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन जनावरे लंगडतात.

६) दोन खुरांमधील खाज :

विविध सूक्ष्मजीवांमुळे जनावरांच्या दोन खुरांमध्ये खाज येते.

Animal Care
Animal Care : प्लास्टिक खाणं जनावरांसाठी ठरेल जीवघेणं

७) दोन खुरांमधील गाठ :

काही जनावरांमध्ये दोन खुरांमध्ये गाठ आढळते.

८) अनियमित वाढलेले खूर :

वेळोवेळी खुरांची साळणी न केल्यास खुरे अनियमित वाढतात. वाढलेली खुरे ही चपटी आणि वाकडी होतात.

अनियमित वाढलेल्या खुरांमुळे जनावरांच्या समोरील आणि मागील पायांतील कोन बिघडतो. जनावरांना चालताना त्रास होतो.

९) लँमिनायटिस :

पशुखाद्यातील जास्त प्रमाणात वापरलेली कडधान्ये खुराला होणाऱ्या जंतुसंसर्गास कारणीभूत ठरतात. संसर्गजन्य आजारामध्ये जंतू शरीरामध्ये विष तयार करतात. कमी काम किंवा जास्त काम, प्रसूतीनंतर शरीरात होणारे संप्रेरकांचे बदल लँमिनायटीस या आजारास कारणीभूत ठरतात.

या आजारात जनावरे लक्षणे न दाखवता फक्त लंगडतात. जास्त तीव्रतेच्या आजारात जनावरांच्या खुरांचा आकार बदलतो.

प्रतिबंधात्मक उपाय :

१) दुधाळ जनावरांना दिवसभरात १० ते १४ तास आराम द्यावा.

२) जनावरांना कामाचा अति ताण देणे आणि जास्त व्यायाम टाळावा.

३) अधिक काळासाठी जनावरांना उभे राहाणे टाळावे.

४) जनावरांना योग्य व्यायाम द्यावा.

५) जनावरांचा गोठा नेहमी कोरडा आणि स्वच्छ असावा.

६) गोठ्यात कमी जागेत जास्त जनावरे बांधू नयेत. प्रत्येक जनावराला योग्य जागा मिळेल याची काळजी घ्यावी.

७) आजारी आणि लंगडणाऱ्या जनावरांना मऊ जमिनीवर ठेवावे.

८) वर्षातून दोन वेळेस न चुकता खुरांची साळणी करावी.

९) पशुखाद्यात बदल करत असताना तो अचानक न करता हळूहळू करावा.

१०) पशुखाद्यात कडधान्ये एकाच वेळी जास्त प्रमाणात न देता दिवसातून दोन वेळेस विभागून द्यावीत.

११) अति बारीक केलेला चारा किंवा कडधान्ये जास्त प्रमाणात खाद्यामध्ये देऊ नयेत.

१२) पशुखाद्यात जीवनसत्त्व अ, इ, बायोटिन, जस्त,तांबे, मॅंगेनीज,कोबाल्ट यांचा समावेश असावा. या खनिजांमुळे खुरांचे आरोग्य चांगले राहाते.

१३) खूर सडलेल्या जनावरांना त्वरित वेगळे करावे. गोठा पूर्णपणे निर्जंतुक करून घ्यावा.

१४) खूर मऊ झालेल्या ठिकाणी पशूतज्ज्ञांच्या सल्ल्याने जंतुनाशक मलम लावावे.

१५) खुरांचा आजार असलेल्या जनावरांचे पाय ५ टक्के कॉपर सल्फेटच्या द्रावणाने स्वच्छ धुऊन घ्यावेत.

डॉ. अमित क्षीरसागर, ९४२२६३४५६६, (पशुधन विकास अधिकारी, पशू वैद्यकीय दवाखाना, हात्तूर, जि. सोलापूर)

डॉ. चैत्राली आव्हाड, ९२८४२१५६८४, (पशुधन विकास अधिकारी, पशू वैद्यकीय दवाखाना, केडगाव, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com