Animal Husbandry : पशुपालन,सेवा क्षेत्रामध्ये डेन्मार्कची आघाडी

Article by Dr. Rajendra Sarkale : डेन्मार्कमध्ये दूरवर पसरलेली सुपीक जमीन तसेच समशितोष्ण हवामान शेतीसाठी आदर्श आहे. या देशातील पाच टक्के लोक शेती करतात. उर्वरित लोकसंख्या औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे. देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत पुरवठा करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन, गाईपालन, वराहपालन आणि कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात केले जाते.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

Livestock Management : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि बॅंकेचे संचालक आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शासनमान्यतेने आयोजित करण्यात आला होता. दौऱ्यामध्ये स्कॅन्डिनेव्हियन देशामधील शेती, समाजजीवन,बॅंकिंग, प्रक्रिया उद्योग, शेती, संशोधन संस्थांमध्ये भेटी देण्यात आल्या.

ही माहिती लेखमालेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे. डेन्मार्क हा उत्तर युरोप आणि स्कॅन्डिनेव्हियातील विकसित देश आहे. कोपनहेगन राजधानीचे शहर आहे. या देशाची राष्ट्रीय भाषा डॅनिश आहे. या देशाचा राष्ट्रध्वज जगातील सर्वांत जुना ध्वज आहे. दुग्ध उत्पादन, तेलवायू, इलेक्ट्रिक वस्तू, आयटी आदी क्षेत्रांत या देशाने मोठी क्रांती केली आहे. अत्यंत समृद्ध आणि विकसित देश आहे.

डॅनिश लोकांमध्ये शिस्त आहे. डेन्मार्कमधील वास्तुकला प्रसिद्ध आहे. पूर्वी या देशात राजेशाही होती. परंतु, ५ जून १८४९ रोजी डेन्मार्कने राज्यघटनेचा स्वीकार केल्याने वर्तमान संसदीय प्रणाली सुरू झाली. ५ जून हा संविधान दिवस असतो. १९७३ मध्ये डेन्मार्क, ग्रीनलँड व फरो बेटांसह युरोपियन युनियनचा सदस्य बनला. डेन्मार्क हा संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य आहे. डेन्मार्कला मोठा समुद्रकिनारा आहे. सीलँड दक्षिण आणि शेजारची बेटे तसेच लिसेलंड पार्क, वालुकामय समुद्रकिनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहे.

यांत्रिक पद्धतीने शेती :

डेन्मार्कमध्ये दूरवर पसरलेली सुपीक जमीन तसेच समशितोष्ण हवामान शेतीसाठी आदर्श आहे. या देशातील पाच टक्के लोक शेती करतात. उर्वरित लोकसंख्या औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे. गहू, बार्ली, मोहरी ही प्रमुख पिके आहेत. या पिकांखाली एकूण लागवडीच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र आहे. मोठी शेततळी येथे पाहावयास मिळतात. प्रत्येक शेतकऱ्यांकडे सरासरी ७० ते ८० हेक्टर एवढे क्षेत्र आहे.

गवत आणि मका ही प्रमुख चारा पिके आहेत. याचबरोबरीने शुगर बीट, ओट, बटाटा लागवड असते. या देशात सहा महिने ऊन- पाऊस आणि ६ महिने बर्फ असतो. त्यामुळे पिकेसुद्धा मर्यादित स्वरूपात घेतली जातात. शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. अधूनमधून सतत पाऊस पडत असल्याने कृत्रिम सिंचन पद्धतीवरील अवलंबित्व फार कमी आहे. शेतकऱ्यांची जमीन धारणा शेकडो एकर असल्याने बांधरहित, चढ-उतारावरील जमिनीवर यांत्रिक पद्धतीने शेती केली जाते. त्यामुळे मनुष्यबळाचा वापर अत्यंत कमी आहे.

Animal Husbandry
Livestock Farming : जव्हार तालुक्यात पशुधनवाढीला चालना मिळणार

वन क्षेत्र :

या देशामध्ये वनीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. देशातील सुमारे १० टक्के भाग वनाच्छादित आहे. यामध्ये चौदाशे जातींची फुलझाडे, चारशे प्रकारचे शेवाळ, ३० प्रकारचे नेचे व कवक आहेत. जंगलात अॅश, रेड फर, बीच, स्प्रूस, लार्च, पाईन, ओक, आल्डर, पॉपलर, एल्म, मॅपल हे वृक्ष आढळतात. वनामध्ये ससे, मृग, खार, मार्टिन, खोकड आदी प्राण्याची संख्या अधिक आहे. सुमारे ३०० प्रकारचे पक्षी आढळतात.

पशूपालनात आघाडी :

देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत पुरवठा करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन, गाईपालन, वराहपालन आणि कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. जगातील आघाडीच्या बायोटेक कंपन्या आणि औषध संशोधन केंद्रांचा कारभार डेन्मार्कमध्ये चालतो. स्वच्छ नैसर्गिक वातावरण, आधुनिक पायाभूत सुविधा, मानवाधिकाराचा स्वयंस्फूर्त वापर, साक्षरतेचे सर्वाधिक प्रमाण या देशाची प्रमुख वैशिष्ठ्ये आहेत.

Animal Husbandry
Animal Advisory : शेतकऱ्यांना हवामानावर आधारित पशू सल्ला

बँकिंग प्रणाली आणि सहकार :

ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, यूपीआय आदी सेवा उपलब्ध आहे. सहकाराला बरेच महत्त्व आहे. उत्पादक ते ग्राहक अशी शेतीमालाची थेट विक्री केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. वैचारिक देवाणघेवाण सतत चालू असते.

असा आहे डेन्मार्क :

क्षेत्रफळ ४२९२४ चौ.कि.मी. मुख्य भूमीच्या दक्षिणेस जर्मनी, ईशान्येस स्वीडन व उत्तरेस नॉर्वे.

७,३१४ किलोमीटरचा समुद्रकिनारा. बहुतांश प्रदेश सपाटीचा, शेतीयोग्य जमीन, वालुकामय किनारे थोडेसे उंचीवर आहेत.

भारताच्या तुलनेत या देशाची लोकसंख्या अत्यंत विरळ आहे. उच्च दर्जाचे राहणीमान, साक्षरतेचे प्रमाण ९९ टक्के. महिला आणि पुरुषांना काम करण्याची समान संधी आहे.

मुख्य भाषा डॅनिश आहे. व्यापक सरकारी कल्याणकारी कायदे आणि उत्पन्नाच्या समान वितरणामुळे डेन्मार्क हा जगातील सर्वोच्च सामाजिक समानता असणारा देश आहे.

देश समशितोष्ण हवामानाच्या पट्ट्यात आहे. हवामान नेहमी बदलत असते. सरासरी वार्षिक तापमान ८ ते १५ अंश सेल्सिअस, सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७०० ते ७५० मिमि आहे.

वसंत ऋतूतील एप्रिल व मे महिने सर्वांत सौम्य असतात. जून ते ऑगस्ट महिने उष्ण असतात. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत पावसाळी आणि ढगाळ वातावरण असते. हिवाळा डिसेंबर ते मार्चपर्यत असतो. दव आणि बर्फामुळे थंडी जास्त असते.

सहकारी तत्त्वावर समुद्रामध्ये मोठ्या पवनचक्क्या. सुयोग्य नियोजनामुळे पवन आणि सौरऊर्जेची निर्मिती.

पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर वनीकरणास चालना.

चलन डॅनिश क्रोनर आहे. देशाचे दरडोई उत्पन्न ६६,५१६ अमेरिकन डॉलर (२०२२ मधील आकडेवारी). या देशाची अर्थव्यवस्था जगात नवव्या स्थानी आहे.

सेवा, उद्योग व्यवसाय:

सेवा- माहिती तंत्रज्ञान,मासेमारी, व्यवस्थापन आणि पर्यटन हे महत्त्वाचे उद्योग आहेत. औषधनिर्मिती, यंत्र निर्मिती, ऑप्टिकल, फोटोग्राफी, इस्पितळासाठी यंत्रणा, मटण, मासे, फर्निचर, तेल, वायू इत्यादी वस्तूंची निर्यात.

तेलवायू,अंडी, मध, खनिजांची मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीमध्ये डेन्मार्कचा जगात पहिला क्रमांक.

अर्थव्यवस्थेत एकूण नोकऱ्यांपैकी ८० टक्के सेवा क्षेत्रामध्ये. ११ टक्के कर्मचारी उत्पादन क्षेत्र आणि केवळ २ टक्के कृषी क्षेत्रात.

ऊर्जा, जीवन विज्ञान, कृषी, तेलवायू ही मोठी औद्योगिक क्षेत्र. पश्चिम युरोपमधील तिसरा सर्वांत मोठा तेल उत्पादक देश. पवनचक्क्या बनविण्यामध्ये जगातील सर्वांत मोठ्या उत्पादक.

रेल्वे, बस, फेरीबोटने येथील प्रवासी वाहतूक अत्यंत सुरक्षित.अत्यंत प्रगत, स्वयंचलित मेट्रो, रेल्वे व्यवस्था.

सायकल, पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र रस्ता. व्यापारासाठी सागरी वाहतूक.

रस्ते अत्यंत आखीव-रेखीव. डॅनिश एअरलाइन्स मार्फत हवाई वाहतूक .

डॉ.राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२०
( लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com