Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Nutrition : पशू पोषणासाठी संतुलित आहार संकल्पना

Animal Care : संतुलित आहारामध्ये आंबोणाला अतिशय महत्त्व असते. यामध्ये प्रथिने आणि ऊर्जा यांचे प्रमाण अधिक असते. आंबोण मिश्रणाचा १०० किलो तत्त्वावर नमुना बनवावा. यामध्ये विविध खाद्य घटक वापरण्यात येतात. दूध उत्पादनानुसार संतुलित खाद्य व्यवस्थापन ठेवावे.

Team Agrowon

डॉ. जी. एम. गादेगावकर, डॉ. एस. ए. ढेंगे

Animal Husbandry : दुधामध्ये जे अन्न घटक असतात, ते दुधाळ जनावरांच्या शरीरातून पुरविले जातात. एक लिटर दूध उत्पादनासाठी गायीच्या आचळामार्फत साधारण ४०० लिटर रक्ताचे अभिसरण व्हावे लागते. याचाच अर्थ असा की गाईच्या रक्तातूनच दुधातील अन्नघटक तयार केले जातात.

जर आपण खाद्यामार्फत अन्नघटक पुरवले नाहीत तर जनावरे स्वतःच्या शरीरातील ऊर्जा आणि प्रथिनांचा साठा दुग्धोत्पादनासाठी खर्ची करतात परिणामी गाईचे वजन घटते आणि महत्त्वाचे म्हणजे जनावरांच्या प्रजनन क्षमतेवरही याचा विपरीत परिणाम होतो. हे सर्व टाळण्याकरिता संतुलित आहार महत्त्वाचा आहे.

संतुलित आहार नियोजन

जनावरांच्या आवश्यकतेनुसार योग्य त्या प्रमाणात सर्व पोषक अन्न घटकांचे मिश्रण असलेल्या आहारास संतुलित आहार असे म्हणतात. आहारामध्ये वैरण आणि आंबोण या दोन गोष्टींचा समावेश होतो. वैरणीचे हिरवी आणि सुकी वैरण असे दोन भाग पडतात. हिरव्या वैरणीमध्ये एकदल आणि व्दिदल वर्गातील हिरवा चारा यांचा समावेश होतो.

एकदल वर्गातील चाऱ्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, नेपियर घास पॅरा घास यांचा समावेश होतो. अशा प्रकारच्या  एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिने कमी आणि कर्बोदके अधिक प्रमाणात असतात.

द्विदल वर्गातील हिरव्या वैरणीमध्ये चवळी घास, लसूण घास, बरसीम यांचा समावेश होतो. व्दिदल चारा अधिक पौष्टिक असतो. यामध्ये प्रथिने आणि कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. 

सुक्या चाऱ्यामध्ये गव्हाचे काड, ज्वारीचा कडबा, भाताचा पेंडा, मिश्र सुका चारा यांचा समावेश होतो. अशा चाऱ्याचा उपयोग मुख्यत्वेकरून पोटभरू खाद्य म्हणून केला जातो. ती कमी पौष्टिक असतात. असा सुका चारा पचनास देखील जड असतो. 

संतुलित आहारामध्ये आंबोणाला अतिशय महत्त्व असते. यामध्ये प्रथिने आणि ऊर्जा यांचे प्रमाण अधिक असते. खुराक म्हणजे आंबोण मिश्रणाचा १०० किलो तत्त्वावर नमुना बनवावा. यामध्ये विविध खाद्य घटक वापरण्यात येतात. जनावरांना ऊर्जा पुरविण्याकरिता आंबोणामध्ये मका, ज्वारी, बाजरी यांसारखी तृणधान्य वापरण्यात येतात. प्रथिनांचे स्रोत म्हणून सरकी, भुईमूग, जवस, तीळ, सूर्यफूल, सोयाबीनपासून मिळणारी पेंड वापरण्यात येते. तृणधान्य किंवा कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ

उदा. भाताचा किंवा गव्हाचा कोंडा, भाताचे पॉलिश, कडधान्यापासून डाळी बनविताना मिळणारी तूर, उडीद, मूग यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे खुराकात १ ते २ टक्के खनिज मिश्रण, १ टक्का शिंपला पूड किंवा डायकॅल्शिअम फॉस्फेट आणि १ टक्का मीठ यांचा अवलंब करावा. खुराकात विविध खाद्य घटक वापरण्याचे कारण म्हणजे एका खाद्यातील अन्न घटकांची उणीव दुसऱ्या खाद्य घटकातील अन्न घटकांमधून भरून निघते. 

आंबोणामध्ये साधारणतः २५ ते ३५ टक्के पेंड, २५ ते ४५ टक्के  तृणधान्य, २५ ते ४५ टक्के तृण धान्यापासून आणि २० ते ३० टक्के कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ, १ ते २ टक्के खनिज मिश्रण आणि १ टक्का मीठ यांचा समावेश होतो.

दुभत्या जनावरास आंबोण देण्याचे प्रमाण त्यांच्या दुग्धोत्पादनावर अवलंबून असते. दुधाळ गायीस १ ते १.५ किलो अंबोण शरीर पोषणासाठी आणि १ किलो अंबोण प्रति २.५ लिटर दुग्धोत्पादनासाठी द्यावे. उदा. ४०० किलो वजनाची गाय १५ किलो दूध उत्पादन देत असेल तर तिला १.५ किलो अंबोण शरीर पोषणासाठी आणि ६ किलो अंबोण १५ लिटर दुग्धोत्पादनासाठी असे ७.५ किलो अंबोण द्यावे. आंबोणाव्यतिरिक्त अशा गाईला ४ ते ५ किलो सुका चारा आणि ८ ते १० किलो ओला चारा द्यावा.

दुधाळ म्हशींना प्रति किलो दूध उत्पादनासाठी लागणारे अन्नघटक गाईंना लागणाऱ्या अन्न घटकापेक्षा अधिक असतात याचे कारण म्हणजे म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधापेक्षा अधिक असते. म्हशींच्या बाबतीत सांगायचे झाले तर शरीर पोषणासाठी १.५ ते २ किलो अंबोण आणि प्रति २ लिटर दुग्धोत्पादनासाठी १ किलो या प्रमाणात द्यावे.

उदा. ५०० किलो वजनाची म्हैस १० लिटर दूध उत्पादन देत असेल, तर तिला २ किलो अंबोण शरीर पोषणासाठी आणि ५ किलो अंबोण दहा लिटर दुग्धोत्पादनासाठी असे एकूण सात किलो अंबोण द्यावे. या व्यतिरिक्त अशा म्हशींना ६ ते ७ किलो सुका चारा आणि १० ते १२ किलो ओला चारा देण्यात यावा.

अंबोण जनावरास देण्याअगोदर ८ ते १२ तास भिजवून ठेवावे म्हणजे ते रुचकर होते. त्याची पाचकता देखील वाढते. अधिक दूध देणाऱ्या म्हणजेच २० लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाईच्या आंबोणात २० ते २२  टक्के कच्ची प्रथिने आणि ७० टक्के एकूण पचनीय अन्नघटक असावेत. मध्यम दूध देणाऱ्या म्हणजेच १५ किलोपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाईच्या आंबोणात १८ ते २० टक्के प्रथिने आणि ६५ टक्के एकूण पचनीय अन्नघटक असावेत. अंबोण हा घटक खर्चिक असल्यामुळे बचत केल्यास दुग्धोत्पादन अधिक किफायतशीर होते.

आहारातील आंबोणाचे प्रमाण कमी केल्यास दूध उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतात. याचे कारण म्हणजे आहारातून दिलेले अन्न घटक प्रथम शरीर पोषणासाठी वापरले जातात. त्यानंतर उरलेला भाग दुग्धोत्पादनासाठी वापरला जातो. गाईला २.५ लिटर दुग्धोत्पादनासाठी १ किलो अंबोण लागते.

जर गाईला १ किलो खुराक कमी दिला तर २.५ लिटर दूध कमी देईल म्हणजे १ किलो खुराक वाचवून आपण २० रुपये वाचवतो. परंतु २.५ लिटर दुधाचे नुकसान झाल्यास जवळपास ५० रुपयांचे नुकसान होते. म्हणून अंबोण योग्य प्रमाणात दूध उत्पादनानुसार देणे किफायतशीर ठरते आणि काटकसर केल्यास उलट नुकसानच होते.

दूध क्षमतेनुसार खाद्य व्यवस्थापन

गाय, म्हैस व्यायल्यानंतर दूध उत्पादन हळूहळू वाढते. साधारणपणे ४५ ते ५० दिवसांनंतर दूध निर्मितीचा उच्चांक गाठला जातो. त्यानंतर दूध उत्पादनाचे प्रमाण थोडे कमी होते. तीन ते चार महिन्यांपर्यंत दूध उत्पादनामध्ये सातत्य राहते आणि चार महिन्यांनंतर दूध देणे हळूहळू कमी होते. प्रसूतीनंतरच्या पहिल्या ४५ ते ५० दिवसांनी दुधाळ जनावरास दुग्धोत्पादनास आवश्यक असणाऱ्या खुराकाच्या १ ते १.५ किलो अधिक खुराक द्यावा. जेणेकरून गाईची दूध देण्याची कमाल मर्यादा कळू शकेल. तिच्यापासून जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळू शकते.

गाईची कमाल दूध देण्याची मर्यादा किंवा तिची दुग्धोत्पादन क्षमता आनुवंशिकतेने येते. त्यामुळे ही जास्त दूध देण्याची क्षमता गायीच्या अंगी नसेल तर तिला कितीही चांगले खाऊ घातले तर ती जास्त दूध देऊ शकणार नाही म्हणून आपल्या गाईची दूध देण्याची क्षमता किंवा कमाल मर्यादा ओळखता यावी म्हणजे खुराक योग्य प्रमाणात देता येईल. आहारातील अंबोणाचा भाग गाईने दूध काढते वेळी द्यावा. हिरवा चारा दूध काढल्यानंतर व कडबा गव्हाचे काड, सरमाड वगैरे सारखा सुका चारा कोणत्याही वेळेस देण्यास हरकत नाही.

डॉ. जी. एम. गादेगावकर, ९८६९१५८७६०

(पशुवैद्यकीय व पशू विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT