Climate Chnage Agrowon
ॲग्रो गाईड

Climate Change : वातावरण बदलाच्या तडाख्यात लडाखकडे पर्याय कोणते?

आपली अनेक पारंपारिक पिके ही वातावरण बदलास सक्षमपणे सामोरे जात असल्याचे अनुभव अनेक शेतकरी सांगतात. तसेच जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आणि जिवाणूंची संख्या जास्त असल्यास अशी जमीन अनियंत्रित, अनियमित पावसास यशस्वीपणे सामोरी जाते. ती वाहून तर जात नाहीच, पण भूगर्भात पाणी साठाही वाढवते. भारताचे शेजारी राष्ट्र भूतान आणि आपले एक संघ राज्य सिक्किम ही त्याची यशस्वी उदाहरणे आहेत. आता प्रश्न आहे की वातावरण बदलाच्या तडाख्यात सापडलेला लडाख हा छोटासा केंद्रशासित प्रदेश सेंद्रिय शेतीकडे वळून स्वत:चा बचाव करू शकतो का?

डॉ. नागेश टेकाळे

चीनव्याप्त तिबेटला जोडलेले लडाख हे थंड पर्वतीय वाळवंट म्हणून ओळखले जाते. रुसलेला मॉन्सून (Monsoon Update) आणि पाण्याची कमतरता (Water Shortage) यामुळे शेती बहुतांश नसल्यासारखीच आहे. तरिही भौगोलिक परिस्थितीला सामोरे जाताना अनेक वनस्पती, प्राणी आणि शेतकऱ्यांची मोजकीच पिके आढळून येतात. त्यांची गणना स्थानिक संवेदनशील गटामध्ये (Endemic) केली जाते. लडाखची स्थानिक बाजारपेठ आणि तेथील लोकजीवन या अशा पद्धतीशी शेकडो वर्षांपासून जोडलेले आहे. वातावरण बदलाच्या (Climate Change) समस्येतून मार्ग काढण्यासाठी पाच पर्याय वापरणे गरजेचे आहे.

१. नैसर्गिक खनिज स्रोतांचा (म्हणजे जीवाश्म इंधन) कमीत कमी आणि आवश्यक तेवढाच वापर करणे.

२. रासायनिक खतांचा अतिरेक न करता योग्य पद्धतीने वापर करणे.

३. नवीन बियाणांची निर्मिती

४. पारंपारिक बियांना जीवदान

५. सेंद्रिय शेतीस पुरस्कृत करणे.

केंद्र शासन या भागात पर्यटन, महामार्ग, ऊर्जानिर्मितीला प्रोत्साहन देत असले तरी शेती आणि त्यातून लोकांना उपलब्ध होणारे अन्न हा स्थानिकांसाठी कायम जिव्हाळ्याचा प्रश्न राहिलेला आहे. कमीत कमी पाणी, वाळवंटी वातावरणात थोड्या फार मातीच्या थरावर आणि रक्त गोठवून टाकणाऱ्या थंडीमध्येही शेती करतात. बार्ली, बक व्हीट (Buck Wheat) गहू, भरड धान्य, बटाटा, वाटाण्यांचे विविध प्रकार, ॲप्रिकॉट, सफरचंद, काही कंदमुळे, भाज्या यांचे पीक घेतात.

त्याला जोड असते ती पर्वतीय शेळ्या, मेंढ्या, याक, घोडे यांच्या पालनाची. शासनाच्या प्रयत्नातून आजकाल काही हरितगृहे आणि अन्य भाज्यांचे उत्पादनही होऊ लागले आहे. लडाखी शेतकऱ्यांची परसबाग विविध भाज्यांनी समृद्ध असते. मात्र वाढत्या पर्यटनासोबत अनेक अनिष्ट गोष्टींचा शिरकाव होत आहे. जंक फूडच्या विस्ताराबरोबरच स्थानिक आहारापासून नवी पिढी दूर जात असल्याची चिंता जुन्या पिढीला सतावत आहे.

स्थानिक आहाारास प्रोत्साहन देण्याचा एक पर्याय म्हणजे युवक युवतींमध्ये सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करणे. त्यातून लडाख २०२५ पर्यंत संपूर्ण सेंद्रिय दर्जा मिळवण्याची घोषणा लडाखचे लेफ्टनंट गर्व्हनर यांनी जुलै २०२० मध्ये केली. आजकल संपूर्ण सेंद्रिय असा विषय आला की सर्वात प्रथम आठवते, ती श्रीलंका. मात्र श्रीलंकेसारखी घिसाडघाई करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खताचा वापर वाढवणे, त्यासाठी आवश्यक सेंद्रिय खतांची उपलब्धता करणे, पशुपालनाला प्रोत्साहन देणे, पारंपारिक पाण्याचे स्रोत जागृत करणे अशी एकेक उद्दिष्ट्ये ठरविण्यात आली आहेत.

शेतकऱ्यांमध्ये या तंत्राचा प्रसार करण्यासाठी कृषी विभागाकडून मुळातच रासायनिक खते, कीडनाशकांची कमी किंवा शून्य वापर करणारी ४० गावे निवडली आहेत. फक्त अल्पभूधारकांचा समावेश असलेल्या या प्रयोगात सेंद्रिय शेतीला जैवविविधतेचे जोड देत विषमुक्त अन्नाला प्राधान्य देण्यात आले. पशुधनामध्येही स्थानिक पशूनांच प्राधान्य दिले.

लडाख विकल्प संगम या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ही संस्था लडाखचे पर्यटन संपूर्ण सेंद्रिय शेतीशी जोडण्यासंदर्भात लक्ष देणार आहे. त्यांच्यासमोर उदाहरण आहे, ते भूतान या देशाचे. हा देश सेंद्रिय आणि प्रदुषणमुक्ततेमुळेच पर्यटनामध्ये आघाडीवर आहे. मागील आठवड्यात अमेरिकेने सर्वात सुरक्षित आणि आनंदी पर्यटनासाठी भूतानला प्रथम क्रमांक दिला आहे तो याचसाठी.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून लडाख विकल्प समितीने पारंपारिक सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शेतीमालाची उत्तम दराने जागेवरच खरेदी केली जात आहे. या शेतीमालाच्या विक्रीसाठी लेह, कारगिल आणि अन्य ठिकाणी बाजारपेठ निर्माण केली. सोबतच पारंपारिक बियांच्या साठवणूकीसाठी संकलन ते बीज बॅंक सुरू केली आहे.

लडाखमधील स्थानिक पशुधन विकासासाठी उत्तम जनावरांची अंतर्गत देवाणघेवाण सुरू केली. त्यातूनच उत्कृष्ट जाती वेगळ्या केल्या जात आहेत. त्यांच्या चरण्यासाठी गवताळ कुरणे विकसित केली जात आहेत. सेंद्रिय खतांच्या उपलब्धतेसाठी शेणखताची साठवण, कंपोस्टिंगवर भर दिला जात आहेत. या साऱ्या प्रक्रियेमध्ये लडाख येथील कृषी विज्ञान केंद्र महत्त्वाचे ठरले आहे. शेतकऱ्यांमध्ये हरितगृहासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारावर भर दिला आहेत. त्यातही सेंद्रिय भाजीपाल्याला प्राधान्य दिले जात आहेत. सेंद्रिय भाजीपाला उत्पादनामध्ये भारत सरकारच्या उच्च उंचीवर संरक्षण संशोधन संस्थेचेही मार्गदर्शन मिळत आहे.

लडाख विकल्प संगमची महत्त्वाची कार्ये

-लडाखच्या विविध भागत पारंपारिक अन्न महोत्सव भरविणे.

- शिधा वाटप केंद्रात स्थानिक धान्ये व त्यातील विविधतेला प्राधान्य देणे.

-शालेय आहारामध्ये पारंपारिक स्थानिक आहाराचा समावेश करणे.

-सर्व शासकीय कार्यक्रम, उत्सव, कार्यशाळांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्ये, फळे, भाज्या यांचेच पदार्थ, पेये उपलब्ध करणे.

-लेह, कारगिल आणि अन्य लहान शहरातील हॉटेल, रिसॉर्ट, गेस्ट हाऊस व्यावसायिक आणि धार्मिक स्थळांमध्ये स्थानिक अन्न पदार्थांना प्राधान्य देण्यास प्रोत्साहन देणे. प्रोत्साहनामध्ये विशेष आर्थिक मदतीची तरतूद करणे.

- येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक फळांची ‘लडाख टोपली’ भेट देणे. यातूनच सीबकथॉर्न हे जीवनसत्त्व ‘क’ ने समृद्ध असे स्थानिक फळ पर्यटकांपर्यंत पोचत आहे.

-मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये सेंद्रिय शेती, पारंपारिक पिके, अन्न पदार्थ यांची माहिती अंतर्भूत करणे.

-स्थानिक फळ उत्पादनाला जोड म्हणून प्रक्रिया केंद्राच्या उभारणीला प्राधान्य देणे.

-लडाख पर्वतीय पर्यटनास कृषी पर्यटनाची जोड देणे. त्यातून स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मिती करणे.

-वातावरण बदल आणि त्याचा लडाखवरील परिणाम आणि कृषी क्षेत्रामध्ये करावयाचे नावीन्यपूर्ण बदल याबाबत सातत्यपूर्ण संशोधन करण्याच्या उद्देशाने लडाख येथील कृषी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन शिष्यवृत्त्या देणे.

-वातावरण बदल, रासायनिक खते, कीडनाशकांच्या विपरीत परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जन जागृतीचे कार्यक्रम करणे. उदा. पदयात्रा.

केंद्र शासनाची “पारंपारिक कृषी विकास योजना” प्रत्येक लडाखी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोचली आहे.

आनंदाचे मोजमाप

लडाखी लोकांच्या आनंदाचे मोजमाप करणे आणि त्यावर सेंद्रिय शेतीचा झालेला परिणाम जाणून घेणे, लडाख विकल्प संगमचे पुढील ध्येय आहे. त्यासाठी ‘संगम’ ने एकूण ९ मापदंड ठरविले आहेत.

१. प्रत्येकास अन्न सुरक्षा आहे?

२. प्रत्येकास रोजगार, अर्थार्जन आहे?

३. प्राथमिक गरजा पूर्ण होतात?

४. समाधानी आहात?

५. समाजात बदल जाणवतो?

६. सर्वांना समान संधी उपलब्ध आहे?

७. सर्व कारभार लोकशाहीने चालतो?

८. या कार्यक्रमामधून पारंपारिक संस्कृती आणि एकात्मतेचे प्रदर्शन होते?

९. परिसंस्था जतन होत आहे?

स्थानिकांकडून या सर्व प्रश्नांचे उत्तर ‘हो’ येणे अपेक्षित आहे. त्यावरच ‘संपूर्ण सेंद्रिय लडाख’ कार्यक्रमाचे भवितव्य ठरणार आहे. आज हा केंद्रशासित प्रदेश जेवढा भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील आहे, तितकाच तो वातावरण बदलासाठीसुद्धा. त्यामुळेच लडाख येथील पारंपारिक पिके, उत्पादित सेंद्रिय अन्न, त्यापासून बनविले जाणारे विविध स्वादिष्ट पदार्थ यातून शेतकऱ्यांचे मनोबल वाढू लागले आहे. पर्यटनाला कृषी क्षेत्राची जोड देत तेही मुख्य प्रवाहात जोडले जात आहे. येथील सेंद्रिय शेतीचे प्रयोग भुतान, सिक्किमप्रमाणेच एक आगळा, वेगळा प्रयत्न ठरतील, यात शंका नाही. आपल्या पर्यटनाच्या यादीमध्ये लडाख नक्की असेल हे पाहतानाच तेथील सेंद्रिय शेतीचे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची संधी आपण नक्कीच घेऊ या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT