Rabi Jowar Agrowon
ॲग्रो गाईड

Rabi Jowar : मूलस्थानी जलसंधारणासह सुधारित जातींचा वापर आवश्यक

रब्बी ज्वारीची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असली तरी उत्पादकता कमी आहे. त्यामागे अयोग्य जमिनीची निवड, कोरडवाहू व पावसावर अवलंबून सिंचन, पारंपरिक जातींचा वापर, अशास्त्रीय पद्धतीने लागवड, पीक संरक्षणाकडे दुर्लक्ष अशी अनेक कारणे दिसून येतात.

टीम ॲग्रोवन

प्रीतम भुतडा, डॉ. के. आर. कांबळे, डॉ. के. डी. नवगिरे

रब्बी ज्वारीची लागवड (Rabi Jowar Cultivation) महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असली तरी उत्पादकता (Jowar Productivity) कमी आहे. त्यामागे अयोग्य जमिनीची निवड, कोरडवाहू (Dry Land) व पावसावर अवलंबून सिंचन (Irrigation), पारंपरिक जातींचा वापर (Jowar Verity), अशास्त्रीय पद्धतीने लागवड, पीक संरक्षणाकडे (Crop Protection) दुर्लक्ष अशी अनेक कारणे दिसून येतात. रब्बी ज्वारीचे उत्पादन (Rabi Jowar Production) वाढवायचे असेल, तर खालील बाबींवर लक्ष केंद्रित करावे.

-योग्य प्रकारच्या सुपीक जमिनीची निवड

-ओलिताखालील क्षेत्र वाढविणे.

-सुधारित जातीचा वापर.

-बीजप्रक्रियेचा अवलंब व खताचा योग्य वापर.

-दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी ठेवून, प्रति हेक्टरी बियाण्याचे योग्य प्रमाण ठेवणे.

-वेळेवर आंतर मशागत व पीक संरक्षणाच्या उपाययोजना करणे.

जमिनीची निवड ः

-मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. हलकी जमीन शक्यतो टाळावी, कारण त्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसल्याने पिकाच्या संवेदनशील काळात पाणी कमी पडते.

मूलस्थानी जलसंधारण ः

-पेरणीपूर्व जमिनीच्या उतारास आडवी मशागत करावी.

-पेरणी पूर्वी १५ दिवस आधी जमिनीत लहान सरी वरंबे किंवा समपातळी वाफे तयार करावेत. त्यामुळे सप्टेंबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यातील पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल.

पेरणीचा कालावधी ः

-ऑक्टोबर महिन्याचा पहिला पंधरवडा (१ ते १५ ऑक्टोबर).

-लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव वाढतो.

-उशिरा पेरणी केली तर बियाण्याची उगवण कमी होते.

बियाणे व पेरणी :

हेक्टरी १० किलो प्रमाणित बियाण्यांची शिफारस करण्यात अली आहे.

बीजप्रक्रीया :

-काणी रोग प्रतिबंधासाठी, गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम प्रति किलो

इमिडाक्लोप्रीड (४८ टक्के एफएस) १४ मिलि प्रति किलो.

पेरणीचे अंतर :

-दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी, दोन ताटांतील अंतर १५ सेंमी ठेवावे.

तणनाशकांचा वापर :

ॲट्राझीन (५० टक्के प्रवाही) १ किलो प्रति हेक्टरी प्रति १ हजार लिटर पाणी या प्रमाणे जमिनीवर पेरणीनंतर, मात्र पीक उगवण्यापूर्वी फवारावे.

लागवडीसाठी सुधारित वाण ः

सुधारित वाण --- प्रसारित वर्ष--- कालावधी (दिवस)--- दाण्याचे उत्पादन (क्विंटल / हे)--- कडब्याचे उत्पादन (क्विंटल / हे.)--- ठळक वैशिष्ट्ये

१) परभणी सुपर मोती--- (एसपीव्ही-२४०७ )--- २०१९ --- ११८-१२० --- ३२ --- ११०-११५ --- हा वाण खोडमाशी, खोडकीड व खडखड्या रोगास मध्यम सहनशील.

२) परभणी मोती--- (एसपीव्ही-१४११)--- २००२ --- १२०-१२५ --- १८-२० --- ६५-७५ --- टपोरा मोत्यासारखा दाणा व कडब्याची प्रत उत्तम, कोरडवाहूसाठी शिफारस.

३) परभणी ज्योती (एसपीव्ही-१५९५ / सीएसव्ही-१८) --- २००६ --- १२५-१३० --- ३८-४० --- ८८-९० --- उंच

वाढणारा पण जमिनीवर न लोळणारा दाण्याची आणि कडब्याची प्रत उत्तम, मावा किडीस प्रतिकारक्षम, ओलिताखाली घेण्याची शिफारस.

४) पीकेव्ही क्रांती--- २००६ --- ११५-१२० --- १७-१९ --- ६५-७० --- कोरडवाहू आणि ओलितासाठी वाण टपोरा चमकदार

दाणा, भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम.

५) फुले यशोदा--- २००० --- १२०-१२५ --- २०-२५ --- ७८ --- कोरडवाहू क्षेत्रातील पाण्याच्या ताणास व अवर्षणास सहनशील.

६) सीएसव्ही २२ आर --- २००७ --- १२० --- २३ --- ७१ --- खडखड्या व खोड माशीस प्रतिकारक्षम.

७) सीएसव्ही २९ आर--- (एसपीव्ही-२०३३) --- २०१२ --- ११८ --- २५ --- ६७ --- खडखड्या व खोड माशीस प्रतिकारक्षम.

८) मालदांडी (एम ३५-१)--- १९३२ --- ११५-१२० --- २०-२५ --- ७०-७५ --- दाण्याचा रंग पांढरा शुभ्र, गोल टपोरा दाणा, भाकरीसाठी चवदार, कडब्याची प्रत मध्यम.

९) फुले रेवती---(एसपीव्ही-२०४८) --- २०१० --- ११५-१२० --- ४०-५० --- ९०-१०० --- ओलितासाठी वाण, टपोरा दाणा,भाकरीची प्रत उत्तम, कडब्याची प्रत उत्तम.

१०) फुले सुचित्रा---२०१२---१२०-१२५ --- ४०-५० --- ९०-१०० --- मध्यम जमिनीसाठी शिफारस खोडमाशी, खोडकिडा व खडखड्या रोगास प्रतिकारक भाकरीची प्रत उत्तम व कडब्याची प्रत उत्तम.

रासायनिक खताचा वापर ः

खताची मात्रा (किलो/हे.)--- नत्र : स्फुरद : पालाश---खते देण्याची वेळ

कोरडवाहू--- ४०:२०:०० --- कोरडवाहूसाठी संपूर्ण खत मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी.

ओलिताखाली--- ८०: ४०: ४० --- एकूण नत्रापैकी अर्धी मात्रा, स्फुरद आणि पालाश संपूर्ण मात्रा पेरणी वेळी द्यावी. उर्वरित अर्धी नत्र मात्रा पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावी.

आंतरमशागत :

रुंद पेरणी पद्धतीचा अवलंब केल्यास कोळपणी सुलभ होते. आंतर मशागतीद्वारे काळ्या जमिनीमध्ये पडणाऱ्या भेगा मातीने बुजतात, त्यामुळे बाष्पीभवनात घट होते. सोबतच पिकांमध्ये सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन (मूग/उडीद/सोयाबीनचे आच्छादन) केल्यास उत्पादनात वाढ होते.

- पहिली कोळपणी – पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी.

- दुसरी कोळपणी – पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी.

- तिसरी कोळपणी – पेरणीनंतर ४० ते ५० दिवसांनी.

सिंचन व्यवस्थापन ः

पिकाच्या संवेदनशील अवस्थेत ज्वारीला पाणी दिल्यास उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळते. पाणी देण्याच्या खालील अवस्था लक्षात ठेवाव्यात.

जोमदार वाढीचा काळ : पेरणीनंतर २५ ते ३० दिवस.

पोटरीत येण्याचा काळ : पेरणीनंतर ५० ते ५५ दिवस.

फुलोऱ्यात येण्याचा काळ : पेरणीनंतर ७० ते ७५ दिवस.

कणसात दाणे भरण्याचा काळ : पेरणीनंतर ९० ते ९५ दिवस.

आरोग्यदायी ज्वारी :

ज्वारीच्या आरोग्यवर्धक गुणधर्मांमुळे ज्वारीची मागणी सातत्याने वाढत आहे. ज्वारीची भाकरीच नव्हे तर ज्वारीच्या इतर पदार्थांचाही आहारात समावेश होत आहे. त्यामुळे आता दरही चांगले मिळू लागले आहेत. कमी पाण्यामध्ये उत्तम उत्पादन देणाऱ्या या पिकांची लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते.

- ज्वारीमधील मुबलक तंतुमय पदार्थांमुळे पचनसंस्था सुरळीत राहून, पोट साफ होण्यास मदत होते. ॲसिडिटीचा त्रास असलेल्यांसाठी ज्वारी अधिक उपयुक्त ठरते. ज्वारीच्या सेवनामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.

-किडनीस्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तीने आहारात ज्वारीचा समावेश करावा. ज्वारीच्या पोषक तत्त्वांमुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते.

-ज्वारीमध्ये लोह तत्त्वही मुबलक असल्याने रक्ताल्पता (ॲनिमिया) असलेल्या व्यक्तीसाठी फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

- ज्वारीतील नीॲसिनमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतो.

- पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि खनिज द्रव्यांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहते.

---------------------

- प्रीतम भुतडा, (सहायक कृषी विद्यावेत्ता), ९४२१८२२०६६

- डॉ. के. आर. कांबळे, (प्रभारी अधिकारी), ९४२१३२५५७५

- डॉ. के. डी. नवगिरे, (ज्वारी रोग शास्त्रज्ञ), ९४२१४६१५७५

(ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT