Grape Management
Grape Management Agrowon
ॲग्रो गाईड

Grape Management : बदलत्या वातावरणानुसार बागेतील उपाययोजना

Team Agrowon

डॉ. आर.जी. सोमकुंवर,

डॉ. अजयकुमार उपाध्याय

सद्यःस्थितीत आकाश निरभ्र असून दिवसाच्या तापमानात थोड्याफार प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मात्र रात्रीच्या तापमानात (Temperature) बऱ्यापैकी घट दिसून येत आहे. सध्या द्राक्ष (Grapes) बागा वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आहेत. या बदलत्या वातावरणामुळे बागेत काही अडचणी दिसून येत आहेत. त्यासाठी परिस्थितीनुसार योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.

दोडा अवस्थेतील गळ होणे

बऱ्याचशा बागेत या वातावरणात घडातील दोडा अवस्थेत गळ होताना दिसून येते. काही ठिकाणी छाटणी झाल्यानंतर प्रीब्लूम अवस्थेतील द्राक्ष घडाच्या विकासात तापमानामध्ये अचानक बदल झाल्यामुळे ही समस्या उद्‍भवते. हलक्या जमिनीमध्ये ही परिस्थिती जास्त प्रमाणात दिसून येते.

दाट कॅनॉपी असलेल्या बागेत कॅनॉपीच्या खालील भागातील पूर्ण घड खाली झालेला दिसून येईल. दाट कॅनॉपीमध्ये गर्दी झाल्यामुळे त्या ठिकाणी घडाच्या विकासास आवश्यक असलेल्या शरीरशास्त्रीय हालचालींचे संतुलन बिघडल्यासारखी परिस्थिती दिसून येते. काही परिस्थितीत घड पूर्ण खाली झालेला दिसेल. बऱ्याच ठिकाणी प्रीब्लूम अवस्थेतील बागेमध्ये गळ व्यवस्थित होण्यासाठी बागेला पाण्याचा ताण दिला जातो.

मात्र हा ताण नेमका किती आवश्यक आहे याचा अंदाज नसतो. किंवा पाणी किती द्यावे म्हणजेच फुलोरा गळ व्यवस्थित होईल याची माहिती नसते. परंतु घडाचे थिनिंग व्यवस्थित व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पाण्यावर नियंत्रण ठेवले जाते. भारी जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे वेलीच्या वाढीचा जोमदेखील तितक्याच प्रमाणात जास्त दिसतो. त्यामुळे घडाच्या देठाची पकड तशीच टिकून राहताना दिसेल.

परंतु हलक्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे बागेला पाणी कमी दिल्यास वेलीला ताण बसेल. हा ताण फक्त वेलींच्या फुटीच्या वाढीवर बसतो असे नाही. तर या काळात वाढत असलेला घडा ज्याला ‘सिंक’ म्हणतो त्यावर जास्त प्रमाणात दाब पडतो. अशातच वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग कमी होतो व ‘सोअर्स सिंक''चे संतुलन देखील बदलते. त्यामुळे बागेत ही परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीमुळे बागेत पूर्ण वर्षभर केलेली मेहनत वाया जाते. यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

उपाययोजना

बागेत पाण्यावर नियंत्रण न ठेवता, बागेला आवश्यक तितके पाणी द्यावे. जमिनीनुसार किंवा वेलीच्या वाढीनुसार पाण्याची किती गरज आहे याची माहिती प्रत्येकाकडे नसेल, अशा परिस्थितीत जमीन वाफसा स्थितीत येईल तितकेच पाणी द्यावे. वाफसा परिस्थिती कशी असावी हे समजून घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

त्यासाठी ठिबकचे पाणी ज्याठिकाणी पडते त्याच्या पुढे साधारण २० ते २५ सेंमी खोल बोदामधील माती हाताने काढावी. या मातीचा गोळा करून तो साधारणपणे ५ फूट अंतरावर फेकावा. मातीचा गोळा तुटल्यास त्या बागेत पाण्याची गरज आहे असे समजावे. जर मातीचा गोळा तसाच राहिल्यास तर त्या दिवशी बागेत पाणी देण्याची आवश्यकता नसेल.

फुटीचा शेंडा खुडून घ्यावा. बऱ्याचवेळा बागायतदार ८ दिवसांपूर्वी शेंडा पिंचिंग केल्याचे सांगतात. परंतु शेंडा पिंचिंग केल्याच्या २ ते ३ दिवसांनंतर वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींमध्ये पुन्हा संतुलन निर्माण होते आणि पुन्हा बगल फुटी निघण्यास सुरुवात होते. प्रीब्लूम अवस्थेत एकदा शेंडा थांबविला, की पुन्हा बगल फुटी निघताना दिसून येतील.

परंतु मणी सेटिंगनंतर ही परिस्थिती दिसणार नाही. म्हणून बागेत अशी परिस्थिती दिसल्यास किमान एका वेलीच्या ८ ते १० फुटींचा शेंडा मारून घ्यावा. एक पान काढले तरी चालेल किंवा वेलीच्या काडीला जखम केली तरी त्याचे चांगले परिणाम मिळू शकतील.

तसेच द्राक्ष घडावर या वेळी सायटोकायनीन युक्त संजीवकांची फवारणीसुद्धा फायद्याची ठरू शकते. परंतु त्याची मात्रा कमी प्रमाणात असल्यास फायदा होईल. अन्यथा, अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत.

घडाचा ‘स्प्रिंग’प्रमाणे आकार

बऱ्याच बागांमध्ये प्रीब्लूम अवस्थेत साधारणतः फळछाटणीच्या २० ते ३० दिवसांच्या दरम्यान ही परिस्थिती आढळून येईल. घडाचा विकास चांगला होण्यासाठी बागेत प्रामुख्याने जीए ३ सारख्या संजीवकांचा वापर केला जातो. घडाच्या प्रीब्लूम अवस्थेत फळ छाटणीनंतर १८ व्या दिवशी १० पीपीएम जीए ३ आणि त्यानंतर ५ दिवसांनी पुन्हा १५ पीपीएम जीए ३ ची फवारणी करावी. या फवारणीमुळे घडाच्या पाकळ्यांची लांबी वाढून दोन पाकळ्यांतील अंतरदेखील वाढते.

तसेच पेशींची संख्या वाढून पेशींचा आकार वाढणे या महत्त्वाच्या घडामोडी द्राक्ष घडात दिसून येतात. यामुळे घड सुटसुटीत होतो. या घडाचे जास्त प्रमाणात थिनिंग करण्याची आवश्यकता पडत नाही. थिनिंगचे चांगले परिणाम येण्याकरिता जीए ३ द्रावणासाठी वापरलेल्या पाण्याचा सामू (६.५ ते ६.७५) व संजीवकाच्या द्रावणाचा सामू (५.५ ते ६) असणे गरजेचे आहे. हा सामू येण्यासाठी युरिया फॉस्फेट किंवा सायट्रिक ॲसिडचा वापर केला जातो.

परंतु पाण्याची गुणवत्ता खराब असेल किंवा योग्य सामू मिळवून घेता आला नाही तर घडाच्या पाकळ्यांची लांबी व अंतर अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. त्यामुळे बागायतदार जीए ३ ची मात्रा जास्त प्रमाणात घेऊन फवारणी करतात. तसेच विविध प्रकारच्या जैव संप्रेरकांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.

सुरुवातीच्या काळात वाढत असलेल्या घडाला आवश्यकतेपेक्षा जास्त मात्रा झाल्यास घड वाढण्यासोबतच त्याचा ‘स्प्रिंग’ प्रमाणे आकार आल्याचे चित्र तयार होते. तसे झाल्यास तो पुन्हा सरळ होण्याची शक्यता कमी असते. थोड्याफार प्रमाणात असे झाले असल्यास घडाच्या परिस्थितीनुसार १ ते दीड ग्रॅम युरिया प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी. शक्यतो शिफारस केलेल्या संजीवकांचा वापर करावा.

पाने पिवळी पडणे

बऱ्याचशा बागेत फळछाटणीनंतर निघालेल्या नवीन फुटींवर पानांच्या वाट्या झालेल्या दिसून येतात किंवा पाने पिवळी पडत असल्याचे दिसते. वाढत्या तापमानात बागेला जास्त पाणी दिल्यास आर्द्रतादेखील तितक्याच प्रमाणात वाढलेली दिसून येते. अशा परिस्थितीत ‘थ्रीप्स’चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ही कीड पानांतील रस शोषण करते. त्यामुळे पाने अशक्त होऊन पानाची वाटी झालेली दिसते. ही परिस्थिती फक्त शेंड्याकडील कोवळ्या पानांवर दिसून येते. जुन्या पानांवर ही स्थिती दिसत नाही.

दुसऱ्या परिस्थितीत पानांच्या शिरा हिरव्या आणि आतील भाग पूर्णपणे पिवळ्या जाळीप्रमाणे दिसून येतो. ही परिस्थिती फेरसच्या कमतरतेमुळे होते. काही बागेत पानाच्या कडा फक्त पिवळ्या पडलेल्या दिसतात हे मॅग्नेशिअम कमतरतेचे लक्षण आहे. मागील काही दिवसांत जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मुळाच्या कक्षेतील अन्नद्रव्यांचे वहन पूर्णपणे झालेले असेल.

वेलीतील अन्नद्रव्ये पूर्ण संपल्यामुळे फळ छाटणीनंतर निघालेल्या नवीन फुटीच्या वाढीकरिता जमिनीतून अन्नद्रव्यांची पूर्तता न झाल्यामुळे पाने पिवळी पडून वाढ थांबलेली दिसेल. तसेच नत्राच्या कमतरतेमुळे पूर्ण वेल पिवळी पडलेली दिसून येईल.

ही परिस्थिती टाळण्यासाठी फळछाटणीपूर्वी माती परीक्षण आणि देठ परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बागेत फेरस सल्फेट १० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट १५ किलो प्रति एकर प्रमाणे जमिनीतून द्यावे. त्वरित उपाययोजना म्हणून फेरस सल्फेट व मॅग्नेशिअम सल्फेट २ ते ३ ग्रॅम प्रमाणे १ ते २ फवारण्या करून घ्याव्यात.

- डॉ. आर. जी. सोमकुंवर,

९४२२०३२९८८

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र,

मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT