Sugarcane  Agrowon
ॲग्रो गाईड

Sugarcane Irrigation Management : आडसाली उसासाठी ठिबक सिंचनाचे नियोजन

Sugarcane Irrigation : ठिबक सिंचनामुळे पिकांच्या आवश्यकतेप्रमाणे हवे तेवढेच पाणी मुळाशी दिल्यामुळे भूगार्भागातील उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होतो.

Team Agrowon

अरुण देशमुख

Sugarcane Drip Irrigation : ठिबक सिंचनामुळे पिकांच्या आवश्यकतेप्रमाणे हवे तेवढेच पाणी मुळाशी दिल्यामुळे भूगार्भागातील उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होतो. मुळांच्या कक्षेतील ओलावा व हवा यांचे संतुलित प्रमाण पीक वाढीच्या संपूर्ण कालावधीत राखले गेल्याने ऊस उत्पादन ३० ते ३५ टक्यांनी वाढते.

पाण्याच्या अति वापरामुळे जमिनी समस्यायुक्त म्हणजेच खारवट ,खारवट-चोपण आणि चोपण होऊ लागल्या आहेत. जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता झपाट्याने कमी होऊ लागली आहे. तसेच कमी पाऊसमान असणाऱ्या भागामध्ये खास करून उन्हाळ्यात भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने विहीर, कूपनलिकेखालील क्षेत्रात ऊस उत्पादनावर मोठा अनिष्ट परिणाम होत आहे. कमीत कमी पाण्यात व खर्चात आणि जमिनीची सुपीकता व उत्पादकता कायमस्वरूपी टिकवून ठेऊन ऊस या पिकाचे दर एकरी जास्तीत जास्त उत्पादन शाश्वत स्वरूपात घेण्यासाठी ठिबक सिंचनाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करावा.
ठिबक सिंचनामुळे पिकांच्या आवश्यकतेप्रमाणे हवे तेवढेच पाणी मुळाशी दिल्यामुळे भूगर्भागातील उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होतो. मुळांच्या कक्षेतील ओलावा व हवा यांचे संतुलित प्रमाण पीक वाढीच्या संपूर्ण कालावधीत राखले गेल्याने ऊस उत्पादन ३० ते ३५ टक्यांनी वाढते. नत्र आणि पालाशसाठी अनुक्रमे युरिया व पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश या पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा आणि स्फुरदासाठी फॉस्फोरिक आम्ल किंवा मोनो अमोनिअम फॉस्फेटचा वापर ठिबकद्वारे मुळांच्या कार्यक्षेत्रात केल्याने खतांच्या मात्रेत ३० टक्के बचत होते. जमिनीची सुपीकता व उत्पादकता कायमस्वरूपी टिकवून ठेऊन ऊस या पिकाचे शाश्वत स्वरूपात चांगले उत्पादन कायमस्वरूपी घेता येते.

पाणी व्यवस्थापन
आडसाली पीक शेतामध्ये १६ ते १८ महिने असते. उसाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत मुळांशी अपेक्षित पाणी, अन्नद्रव्ये आणि हवा याचे संतुलित प्रमाण असणे अतिशय महत्त्वाचे आहे. आडसाली हंगामातील ऊस पिकाचे पाणी व्यवस्थापन करताना उसाच्या शरीरक्रियाशास्त्रातील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे जरुरीचे आहे.
१) अति पाणी हे ऊस तसेच साखरेचे उत्पादन घटवते. सौम्य प्रमाणात पाण्याचा ताण उत्पादन वाढविते.
२) फुटवे फुटण्याच्या वेळेस जर जास्त पाणी दिले तर मुळाजवळ हवेचे प्रमाण कमी होते, फुटवे कमी निघतात.
३) उसाची उंची तसेच उसाच्या कांड्याची लांबी वाढणे फार जरुरीचे आहे. कारण कांडीत साखर साठवली जाते, उसाचे वजन वाढते.
४) ऊस तोडण्याच्या अगोदर १५ ते २० दिवस पाणी देणे थांबविल्यास उसातील साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

उगवणीची अवस्था:
१) सुरवातीच्या उगवणीच्या अवस्थेमध्ये व कोंब स्थिर होण्याच्या कालावधीत हलके परंतु वारंवार पाणी देणे महत्त्वाचे आहे.
२) सुरवातीच्या काळात जमीन फक्त ओली असणे महत्त्वाचे आहे म्हणजेच जमिनीत हवा खेळती असावी.
३) सुरवातीच्या काळात पाण्याचा ताण असेल तर जमीन कोरडी राहते. त्यामुळे उगवण उशिरा व कमी प्रमाणात होते.
४) पाण्याचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास व शेतात पाणी साचल्यास उसावरील डोळे कुजतात, तसेच उगवून आलेले कोंबही मरतात. उगवणीचे प्रमाण कमी राहते. यामुळे पुढे जाऊन अपेक्षित ऊस संख्या मिळत नाही.

फुटवे फुटण्याची अवस्था ः
१) जमीन वाफशावर राहील एवढेच पाणी दिल्यास, लवकर व भरपूर फुटवे फुटतात. त्यामुळे शेतात एकसारखे ऊस तयार होतात. अपेक्षित उसाची संख्या मिळणे शक्य होते.
२) या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण बसल्यास फुटवे कमी निघतात,
आलेले फुटवे मरतात. ऊस संख्या कमी मिळाल्यामुळे उत्पादन कमी येते.
३) जास्त पाणी दिल्याने उसाच्या मुळांशी हवा राहत नाही. फुटवे फुटण्यावर अनिष्ट परिणाम होतो. फुटलेल्या फुटव्यांच्या वाढीवरही परिणाम होतो.


जोमदार वाढीची अवस्था ः
१) उत्पादन वाढीच्या अवस्थेमध्ये उसास योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण याच अवस्थेमध्ये उसाची उंची, कांड्यांची लांबी व जाडी वाढत असते. याचा प्रत्यक्ष परिणाम उसाचे वजन वाढण्यावर होत असतो. याच अवस्थेमध्ये कांड्यामध्ये साखर साठविण्याचे कार्य सुरु असते. म्हणून हा कालावधी ऊस आणि साखर उत्पादनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. या कालावधीमध्ये उसाची पाण्याची गरज ही सर्वोच्च असते.
२) या कालावधीमध्ये उसाच्या वाढणाऱ्या कोंबाकडील भागामध्ये ओलाव्याचे प्रमाण जर ८५ टक्यांच्या दरम्यान असेल तर कांड्याची लांबी व जाडी वाढून वजन झपाट्याने वाढते.
३) या कालावधीमध्ये पाण्याचा ताण पडल्यास कांड्या एकदम आखूड पडतात, उसाची उंची खुंटते, पर्यायाने उसाचे उत्पादन घटते.
४) पाण्याचा ताण जोमदार वाढीच्या शेवटच्या टप्प्यात पडल्यास ऊस पिकास पक्वता लवकर येते आणि उत्पादन घटते.
५) लागण पिकामध्ये पाण्याचा ताण पडल्यास, खोडवा पिकावरही त्याचा अनिष्ट परिणाम होतो.


पक्वतेची अवस्था ः
१) पक्वतेच्या कालवधीत पिकास थोडा पाण्याचा ताण दिल्यास उसामध्ये साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते. या कालावधीमध्ये उसाच्या वाढणाऱ्या कोंबाकडील भागामध्ये ओलाव्याचे प्रमाण ७४ ते ७६ टक्के असावे.
२) पक्वतेच्या कालावधीत भरपूर पाणी दिल्यास उसाची शाकीय वाढ सुरु राहते. साखर तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. पाण्याचा जास्त ताण पडल्यास ऊस वाढ खुंटते. साखर उत्पादन कमी होते.
कमी पाण्यामुळे जमिनीस भेगा पडल्यास मुळांची वाढ खुंटते.


ठिबक सिंचनासाठी ऊस पिकाची पाण्याची गरज
सूत्र ः

इटीसी = इटीओ x केसी
इटीओ = पीई x के पॅन

इटीसी = पिकाची पाण्याची गरज (मिमि /दिन)
इटीओ = संदर्भीय बाष्पोत्सर्जन (मिमि /दिन)
केसी = पीक गुणांक (क्रॉप कोईफिसेंट)
पीई = उघड्या युएस क्लास ए पॅनमधील बाष्पीभवन (मिमि /दिन)
के पॅन = पॅन कोईफिसेंट (याची किंमत सरासरी ०.८ पकडली जाते)

पीक गुणांकाची (क्रॉप कोईफिसेंट) किंमत ही पिकाच्या वयोमानानुसार म्हणजे वाढीच्या अवस्थेवर अवलंबून असते. ऊस लागणीनंतर पीक गुणांकाच्या किमती खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे बदलतात.

तक्ता: ऊस वाढीच्या अवस्थेनुसार पीक गुणांक
उसाचे वय (लागणीनंतर दिवस )---पीक वाढीची अवस्था ---पीक गुणांक
० -४५---लागणीपासून ते उगवणी पर्यंत ---०.४
४६ - ६०---उगवणीपासून ते फुटवे फुटणे ---०.५ - ०.६
६१ - ९०---फुटव्याचा कालावधी ---०.६-०.८
९१- १४०---फुटवे ते कांड्या सुरु होईपर्यंत ---०.८ - १.००
१४१ -३८०---जोमदार वाढीची अवस्था ---१-१.१०
३८०- ४५० ---जोमदार वाढीचा कालावधी ---१-१.१०
४५१ ते ५४० ---पक्वतेचा कालावधी ---०.७५ ते ०.८०


उसाच्या मुळांची वाढ आणि पाणी शोषण्याची क्रिया ः
१) पोषक वातावरणात ऊस लागण केल्याच्या तिसऱ्या दिवसापासून उसावरील डोळे फुगू लागतात. कांडीला मुळ्या सुटण्यास सुरवात होते.
२) सेटरुट्स ची वाढ झपाट्याने म्हणजे २४ मि. मि. प्रति दिन या वेगाने होते. या मुळांची लांबी १५० ते २५० मि. मि. झाल्यानंतर ही वाढ थांबते. मुळे कालांतराने काळी होतात, कुजून जातात. लागणीनंतर ८ आठवड्यांनी नाहिशी होतात.
३) उसाच्या उगवणीबरोबरच जमिनीमध्ये शूट रूट्स निघायला सुरवात होते. पहिली निघालेली शूट रुट्स सेट रुट्सच्या मानाने जाड असतात. शूट रुट्स जमिनीमध्ये वेगाने वाढतात. या नंतर त्यास फांद्या येऊन झपाट्याने त्यांची वाढ होते.
४) शूट रुट्स वाढण्याचा जास्तीत जास्त वेग ७५ मि. मि. प्रति दिन इतका सुरवातीच्या एक दोन दिवसात असतो. त्यानंतर एक आठवड्याने तो ४० मि. मि. प्रति दिन इतका असतो.
५) जमिनीमध्ये मुळांचा विस्तार हा जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर, केलेल्या मशागतीवर आणि ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. उदा. ३० सें. मी. खोलीमध्ये ४८ ते ६८ टक्के मुळे, ३० ते ६० सें. मी. खोलीवर १६ ते १८ टक्के मुळे, ६० ते ९० सें. मी. वर ३ ते १२ टक्के मुळे, ९० ते १२० सें. मी. वर ४ ते ७ टक्के मुळे, १२० ते १५० सें.मी. वर १ ते ७ टक्के मुळे आणि १५० ते १८० सें. मी. खोलीवर ० ते ४ टक्के मुळे असतात.

तक्ता: ऊस पिकाचे जमिनीच्या खोलीनुसार पाण्याचे शोषण
जमिनीची खोली (सें.मी.) ---पाण्याचे शोषण (टक्के)
० - २०---६२.०
२० - ४० ---२३.४
४० - ६०---८.८
६० - ८०---४.४
८० - १०० ---१.४


तक्ता: ठिबक सिंचनाखाली आडसाली ऊस पिकाची एकरी पाण्याची गरज
महिना ---लागणी नंतर दिवस ---बाष्पीभवन (मिमी /दिन) ---पीक गुणांक ---दरदिवशी पाण्याची गरज (लि.)---महिन्यासाठी एकूण पाण्याची गरज (लि.) ---दर दिवशी ठिबक सिंचन चालविण्याचा कालावधी (मिनिटे)
जुलै ---१५---६---०.४---७६८०---११५२००---३५
ऑगस्ट ---४५---६.५---०.४---८३२०---२४९६००---४०
सप्टेंबर ---७५---६---०.७---१३४४०---४०३२००---६०
ऑक्टोबर ---१०५---७.५---०.७---१६८००---५०४०००---७५
नोव्हेंबर ---१३५---६---०.९---१७२८०---५१८४००---८०
डिसेंबर ---१६५---५---१.०---१६०००---४८००००---७५
जानेवारी ---१९५---४.५---१.१-----१५८४०---४७५२००---७५
फेब्रुवारी ---२२५---५.५---१.१---१९३६०----५८०८००---९०
मार्च ---२५५---६.५---१.१---२२८८०---६८६४००---१०५
एप्रिल ---२८५---७.५---१.१---२६४००---७९२०००---१२०
मे ---३१५---८.५---१.१---२९९२०---८९७६००---१३५
जून---३४५---७---१.१---२४६४०---७३९२००---११५
जुलै---३७५---६---१---१९२००---५७६०००---९०
ऑगस्ट ---४०५---६.५---१---२०८००---६२४०००---९५
सप्टेंबर ---४३५---६---१---१९२००---५७६०००---९०
ऑक्टोबर ---४६५---७.५---१---२४०००---७२००००---११०
नोव्हेंबर ---४९५---६---०.९---१७२८०---५१८४००---८०
डिसेंबर---५२५---५---०.८---१२८००---३८४०००---६०
(टीप ः आपापल्या भागातील तापमान आणि बाष्पीभवनानुसार पाण्याची गरज बदलते)

बाष्पपात्र गुणांक = ०.८ दोन ड्रीपलाईन मधील अंतर = ५ फूट,
दोन ड्रीपरमधील अंतर = ४० सेमी., ड्रीपरचा प्रवाह = २ लि./तास
एकूण पाण्याची गरज = ९८,४०,००० लि.
परिणामकारक पाऊस वजा जाता दर एकरी पाण्याची गरज = ६८, ४०, ००० लि. = ६,८४० क्युबीक मी.
आपल्या भागातील बाष्पीभवनाचा वेग, ऊस वाढीची अवस्था यानुसार ठिबक सिंचनाखाली योग्य प्रमाणात पाणी दिल्यास निश्चितपणे सरी-वरंबा सिंचन पद्धतीच्या तुलनेत ५० ते ५५ टक्के पाण्याची बचत होते. पाणी वापर कार्यक्षमता २.५ पतीने वाढते आणि निश्चितपणे उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ होते.

----------------------------------
संपर्क ः अरुण देशमुख, ९५४५४५६९०२
(उपसरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT