Drip Irrigation Benefits : ठिबक सिंचनाचे तंत्र समजून घेणे का आहे महत्त्वाचे?

Drip irrigation technology : ठिबक सिंचन तंत्रज्ञान हे दाबावर चालणारे तंत्रज्ञान असून प्रत्येक ड्रीपरमधून एकसारखे पाणी मिळणे अपेक्षित आहे. परंतु शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर फक्त पाणी देण्याचे एक साधन म्हणून करतात. ठिबक सिंचन संचाचे पूर्ण फायदे मिळण्याकरिता तांत्रिक पद्धतीने वापर करण्याची गरज आहे.
Drip Irrigation
Drip IrrigationAgrowon

डॉ.बी.डी.जडे

Irrigation Update : ठिबक सिंचन संच बसविण्यापुर्वी सर्वांत प्रथम आपल्या शेतातील माती आणि पाण्याचे परीक्षण करून घ्यावे. शेतीचे सर्व्हेक्षण व्यवस्थित करावे. त्यानुसार ठिबक सिंचनाचा आराखडा करावा. सर्व्हेक्षण म्हणजे शेताची फक्त लांबी, रुंदीचे मोजमाप नव्हे. सर्व्हेक्षण करताना जमिनीचा चढ-उतार पाहावा.

जमिनीचा प्रकार, सिंचनाचा स्रोत, पाण्याची उपलब्धता, पाण्याची खोली, गुणवत्ता तपासावी. त्याच बरोबर पाण्याच्या स्त्रोतमध्ये एप्रिल, मेमधील उपलब्धता बघूनच किती क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणता येईल हे ठरवावे.

कोणत्या पिकाची लागवड करणार आहे, त्याच्या लागवडीचे अंतर काय असणार? विजेची उपलब्धता, मजुरांची उपलब्धता, पाण्याच्या स्रोतावरील पंपाची सविस्तर माहिती सर्व्हेक्षण करताना दिली पाहिजे. लांबी, रुंदी टेप किंवा जीपीएस साधनाने व्यवस्थित मोजून घ्यावी. अंदाजाने सांगू नये.

सर्व्हेक्षणाच्या माहितीनुसार शेतामध्ये ठिबक सिंचन संच उभारण्यासाठी आराखडा तयार केला जातो. यामध्ये शेताची लांबी, रुंदी नुसार मेनलाइन, सबमेन लाइनची लांबी, ठिबक सिंचनाच्या इनलाइन नळीची लांबी किती ठेवावी हे ठरविले जाते.

जमीन चढ-उताराची असेल, तर इनलाइन ठिबकची निवड करावी. आराखड्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे पाइपलाइनचा आकार, लांबी, इनलाइन नळीचा आकार, लांबी ठरविली जाते. अंदाजाने इनलाइनचे बंडल आणून वाटेल तेवढी नळीची लांबी ठेवू नये. अन्यथा शेवटी पिकांना पाणी कमी मिळेल, सगळीकडे एकसमान पाणी मिळणार नाही. डिझाइन प्रमाणेच सेक्शन करावेत.

Drip Irrigation
Drip Irrigation Scheme Subsidy : ठिंबक सिंचनासाठी मिळणार ८० टक्के अनुदान; अर्ज कुठे करायचा?

ठिबक सिंचन संचाची आखणी आराखड्यानुसार करावी. यामध्ये कोणतीही तडजोड करू नये. खर्च कमी यावा म्हणून तडजोड करताना महत्त्वाचे घटक न घेता शेतामध्ये ठिबकची उभारणी केल्यास अपेक्षेप्रमाणे फायदे मिळणार नाहीत.

ठिबक सिंचन हे दाबावर चालणारे असल्यामुळे प्रेशर गेज असावा. पाण्याच्या स्त्रोतानुसार आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. पाण्यासोबत वाळू किंवा कच येत असल्यास सॅण्ड सेप्रेटर फिल्टरची निवड करावी. पाण्यासोबत गाळ, शेवाळ येत असेल तर सँड फिल्टरची निवड करावी. जर पाण्यात वाळू येत नसेल, जास्त शेवाळ येत नसेल तर स्क्रीन अथवा डिस्क फिल्टरची निवड करावी.

काही शेतकरी स्क्रीन फिल्टरची जाळी काढून ठेवतात, तसे करू नये. तसे केल्यास पाण्यातील कचरा, घाण यामुळे ड्रीपर बंद पडण्याची शक्यता असते.

ठिबक सिंचन संचामधून कोणत्याही पिकास पाणी देत असाल त्या प्रत्येक वेळी ठिबक संचासोबत पाण्यात विरघळणारी खते फर्टिलायझर टँकद्वारे द्यावीत. ठिबक सिंचनाची उभारणी करताना प्रेशर गेज फिल्टर जवळ बसवावा. आता पोर्टेबल प्रेशर गेज उपलब्ध आहे.

मेन आणि सबमेन लाइनसाठी लागणारे पीव्हीसी पाइप २ ते २.५ फूट जमिनीच्या आत खोल ठेवून मातीने व्यवस्थित झाकावेत. पीव्हीसी पाइपवर सूर्यप्रकाश पडल्यास, संपर्क आल्यास आयुष्य कमी होते. ठिबक सिंचन संचामधील सर्वच घटक उच्चतम गुणवत्तेचे असावेत.

ठिबक सिंचनात सर्वांत महत्त्वाचा घटक इनलाइन नळी आहे.ठिबक सिंचन तंत्रामध्ये प्रत्येक ड्रीपरमधून एक समान पाणी मिळणे गरजेचे असते. त्याच बरोबर दोन ड्रीपरमधील अंतर सुद्धा एकसमान असावे.

बऱ्याच शेतकऱ्यांचे पाण्याचे स्रोत हे विहीर किंवा बोअरवेल आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत विहीर आहे त्यांच्याकडे फक्त स्क्रीन फिल्टर बसविलेले आहे. कारण पाण्यात फक्त तरंगणारे पदार्थ, काडीकचरा, पालापाचोळा येतो म्हणून साधा स्क्रीन फिल्टर वापरत असाल तर फिल्टर कधी जाळी ठिबक सिंचन सुरू असताना काढून वाहत्या पाण्यात स्वच्छ धुऊन परत ठेवावी.

स्क्रीन फिल्टरची जाळी धुण्यासाठी किंवा स्वच्छ करण्याकरिता ५ ते १० मिनिटे लागतात. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत बोअरवेल असेल तर त्यांनी आणि पाण्यासोबत वाळूचे कण किंवा कच येत असेल तर अशा वेळी शेतकऱ्यांनी सँड सेप्रेटर फिल्टर बसविले पाहिजे. सँड सेपरेटरखाली चेंबर आहे. त्या चेंबरमध्ये वाळू किंवा कच जमा होते.

चेंबरच्या खाली ड्रेन व्हॉल्व्ह दिले आहेत. त्यातून वाळू / कच बाहेर निघून जाते, फिल्टर स्वच्छ होतो. जर पाण्याचा स्रोत नदी किंवा शेततळे किंवा धरणाच्या बॅकवॉटर वरून असेल तर पाण्यासोबत शेवाळ किंवा गाळ येतो. अशा वेळी सँड फिल्टर बसविला पाहिजे.

जर सँड फिल्टर बसविले असेल तर फिल्टर नियमित बॅक वॉश करावा म्हणजे फिल्टरमधील वाळूच्या वरच्या थरावर जमा झालेला मातीचा गाळ, शेवाळ बॅकवॉशद्वारे बाहेर पडेल. गरज असल्यास सँड फिल्टरमधील वाळूची हालचाल करावी, म्हणजे मातीयुक्त पाणी आणि शेवाळ बाहेर पडेल आणि सँड फिल्टर स्वच्छ होईल.

इनलाइन आणि सबमेन लाइनच्या शेवटी फ्लश व्हॉल्व्ह असतो. पाइप लाइनमधील घाण बाहेर पडावी म्हणून १५ दिवसातून एक वेळा फ्लश व्हॉल्व्ह उघडून पाण्याच्या दाबाने पाइपलाइन स्वच्छ करून घ्यावी. इनलाइन नळ्यांची शेवटची टोके एंड कॅप उघडून स्वच्छ कराव्यात. एका वेळी ३ ते ४ नळ्यांची एंड कॅप उघडून नळ्या स्वच्छ कराव्यात.

Drip Irrigation
Drip Irrigation : ठिबक कंपन्यांना सेवा पुरविणे बंधनकारक करा

ठिबक नळीची स्वच्छता

बऱ्याचदा ठिबक सिंचन संचासाठी अॅसिड प्रक्रिया कशी करावी हे माहिती नसते. शेतकरी ड्रीपरमधून पाणी येणे बंद होत नाहीत तोपर्यंत काहीच करीत नाहीत. ड्रीपरमधून पाणी येणे बंद झाले, किंवा पाणी येणे अतिशय कमी झाल्यावर अॅसिड प्रक्रिया करतात.

एका प्लॅस्टिक टबमध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिड घेऊन त्याच इनलाइन नळ्यांची बंडल बुडवावे. अॅसिडमुळे नळ्यांच्या बाहेरील भाग स्वच्छ धुतला जातो आणि नळ्या चकचकीत होतात. अगदी काही प्रमाणात अॅसिड नळीच्या आत जाते.

इनलाइन नळ्यांमधील ड्रीपर नळीच्या आत असल्यामुळे अॅसिड ठिबक मधून दिले पाहिजे. त्यासाठी हायड्रोक्लोरिक किंवा फॉस्फोटिक किंवा सल्फ्युरिक अॅसिडचा उपयोग करावा. पाण्यात क्षार विरघळण्याकरिता अॅसिड किती लागते हे बघावे. व्हेंच्यूरीद्वारे अॅसिड ट्रिटमेंट करावी. अॅसिडची मात्रा टाकत असताना शेवटच्या ड्रीपर मधील पाण्यात लिटमस पेपर बुडविला नंतर सामू आला पाहिजे. अंदाजे अॅसिडची मात्रा ठरवू नये.

ड्रीपर बंद पडण्याची वाट न बघता पीक लावण्यापूर्वी आणि पीक काढल्यानंतर अॅसिड प्रक्रिया करावी. ठिबकमधून नियमित पाण्यात विरघळणारी फॉस्फोरिक अॅसिड युक्त खते सोडावीत म्हणजे ड्रीपरमध्ये क्षार साचून बंद पडणार नाही, ड्रीपर स्वच्छ राहतील.

अॅसिड प्रक्रिया झाल्यानंतर २४ तास ठिबक सिंचन संच बंद ठेवावा, नंतर दुसऱ्या दिवशी इनलाइन नळ्यांची एका वेळी ३ ते ४ टोके उघडावी, पाण्याच्या दाबाने स्वच्छ करावीत. त्यानंतर पुढील ३ ते ४ नळ्यांची टोके उघडावीत.

इनलाइन नळ्यामध्ये, जैविक चिकटपणा तयार झाला असेल तर ड्रीपर बंद पडण्याची शक्यता असते. त्याकरिता ब्लिचिंग पावडर प्रक्रिया ॲसिडप्रक्रियेप्रमाणेच करावी. दोन्ही प्रक्रिया एकाचवेळी करू नयेत. अॅसिड आणि ब्लिचिंग प्रक्रियेमध्ये एका आठवड्याचे अंतर असावे.

पिकाच्या गरजेनुसार पाणी द्या...

बऱ्याच जणांना पिकाच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज किती आणि ठिबक सिंचन संच किती वेळ चालवावा हे कळत नाही. बहुतेक शेतकऱ्यांनी विहिरीजवळ ऑटोस्विच बसविले आहे. शेतामध्ये जर चार व्हॉल्व्ह बसविले असतील, तर आम्ही सर्व व्हॉल्व्ह उघडून ठेवतो. वीज आली की पंप सुरू होतो आणि वीज गेल्यानंतर पंप आपोआप बंद होतो.

जोपर्यंत वीज असते तोपर्यंत ठिबकने पिकाला पाणी देणे सुरू असते. अशा पद्धतीने आपण ठिबक सिंचन तंत्राचा वापर करीत असाल तर अत्याधुनिक ठिबक सिंचनाचे अपेक्षित फायदे मिळणार नाहीत.

पिकाच्या गरजेनुसार ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. जमीन वाफसा अवस्थेत राहील एवढाच वेळ ठिबक संच सुरू ठेवावा. ठिबक सिंचन सुरू असताना दाब तपासावा. फिल्टर जवळ १.५ ते २ किलो / चौ.कि. सबमेनच्या शेवटी १ किलो तर ड्रीपर जवळ किंवा इनलाइन नळीच्या शेवटी ०. ८ ते ०.९ शेवटी ०.८ किलो /चौ.कि दाब असणे गरजेचे आहे.

ठिबक सिंचन जर रात्र भर सुरू ठेवला तर पाटपाण्यापेक्षाही जास्त पाणी पिकाला देत आहात असा त्याचा अर्थ होतो. त्याच बरोबर दिलेली खते झिरपून वाहून जातात. पिकाच्या मुळांजवळ हवेचे संतुलन नसल्याने जमिनीत पिकांच्या मुळांजवळ जो पर्यंत वाफसा स्थिती निर्माण होत नाही तो पर्यंत पिकांची मुळे अन्नद्रव्ये आणि पाण्याचे शोषण करू शकणार नाही.

म्हणजे पिकांची वाढ होणार नाही. म्हणून जमीन वाफसा स्थितीत राहील एवढाच वेळ ठिबक सिंचनाने पिकास पाणी द्यावे. मधून मधून प्रत्येक ड्रीपरमधून सारखे पाणी पडते की नाही हे बघावे.

संपर्क - डॉ.बी.डी.जडे, ९४२२७७४९८१, (लेखक जैन इरिगेशनमध्ये वरिष्ठ कृषी विद्या शास्त्रज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com