Sugarcane : आडसाली उसासाठी खत, पाणी व्यवस्थापन

आडसाली उसाच्या अपेक्षित उत्पादनासाठी योग्य जमिनीची निवड, पूर्वमशागत, सेंद्रिय खतांचा पुरेसा वापर, हिरवळीची पिके, बेणे निवड, योग्य लागण पद्धतीचा अवलंब, बेसल मात्रा आणि उगवणीच्या काळातील योग्य पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे.
Sugarcane
Sugarcane Agrowon

अरुण देशमुख

आडसाली ऊस (Sugarcane) कमीत कमी १६ महिने व जास्तीत जास्त १८ महिने शेतात असतो. उसाची बायोमास (Biomass) तयार करण्याची क्षमता व उत्पादन (Sugarcane Production) देण्याची क्षमता इतर पिकांच्या तुलनेने अतिशय जास्त आहे. म्हणून, उसाची पाण्याची गरज इतर पिकांच्या तुलनेने जास्त आहे. तरीही ऊस पीक इतर पिकांच्या तुलनेत पाण्याचा ताण बऱ्यापैकी सहन करते. पाणी व्यवस्थापन (Water Management) करताना उसाच्या शरीरक्रियाशास्त्रातील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे जरुरीचे आहे.

१) अति पाणी हे ऊस तसेच साखरेचे उत्पादन घटवते. सौम्य प्रमाणात पाण्याचा ताण ऊस उत्पादन वाढविते.

२) फुटवे फुटण्याच्या वेळेस जर जास्त पाणी दिले तर मुळाजवळ हवेचे प्रमाण कमी होते. फुटवे कमी निघतात.

३) उसाची उंची तसेच कांड्याची लांबी वाढणे जरुरीचे आहे, कारण यामध्ये साखर साठवली जाते. उसाचे वजन वाढते.

४) तोडण्याच्या अगोदर १५ ते २० दिवस पाणी देणे थांबविल्यास उसातील साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

Sugarcane
Sugarcane : नवीन ऊस लावणीला वेग

पाण्याची गरज ः

उसाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत मुळांशी अपेक्षित पाणी, अन्न आणि हवा याचे संतुलित प्रमाण असणे अतिशय महत्त्वाचे आहे. जमीन कायमस्वरूपी वाफशावर असणे जरुरीचे आहे.

उगवणीची अवस्था :

- उगवणी अवस्था तसेच कोंब स्थिर होण्याच्या कालावधीत हलके, परंतु वारंवार पाणी देणे महत्त्वाचे आहे.

सुरुवातीच्या काळात जमीन फक्त ओली असणे महत्त्वाचे आहे. जमिनीत हवा खेळती असावी.

- सुरुवातीच्या काळात पाण्याचा ताण असेल तर जमीन कोरडी राहते. त्यामुळे उगवण उशिरा आणि कमी प्रमाणात होते.

- पाण्याचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास, शेतात पाणी उभे राहिल्यास उसावरील डोळे कुजतात, तसेच उगवून आलेले कोंबही मरतात. उगवणीचे प्रमाण कमी राहते. यामुळे पुढे जाऊन अपेक्षित ऊस संख्या मिळत नाही.

Sugarcane
Sugarcane : ऊस शेतीमधील माझे अनुभव...

लागण हंगाम आणि पीक कालावधीप्रमाणे पाण्याची गरज

हंगाम --- महिना---कालावधी (महिने)---सरी- वरंबा पद्धतीने पाण्याची गरज (हे.सेंमी.) ---ठिबक सिंचनासाठी पाण्याची गरज (हे. सेंमी.)

आडसाली---जुलै-ऑगस्ट---१७-१८---३५०---१७०

पूर्वहंगामी ---ऑक्टोबर-नोव्हेंबर ---१४-१६---३००---१५५

सुरू---जानेवारी-फेब्रुवारी ---१२-१४---२५०---१३०

खोडवा---नोव्हेंबरपासून फेब्रुवारीअखेर ---१२-१३---२५०---१२५

खत व्यवस्थापन ः

ऊस पिकाची अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. १ टन ऊसनिर्मितीसाठी जमिनीतून १.१ किलो नत्र, ०.६ किलो स्फुरद आणि २.२५ किलो पालाश शोषून घेतले जाते. म्हणजेच हेक्टरी १५० टन ऊस उत्पादनासाठी जमिनीतून १६५ किलो नत्र, ९० किलो स्फुरद आणि ३३७.५ किलो पालाश शोषून घेतले जाते. त्याप्रमाणात अन्नद्रव्य पुरवठा करणे जरुरीचे आहे.

सरी डोस ः

- मुळांची चांगली वाढ होऊन भरपूर फुटव्यासाठी शेत नांगरणीच्या वेळेस दर एकरी १० टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. आणि बेसल / सरी डोस म्हणून एकरी गंधक २४ किलो, फेरस सल्फेट १०

किलो, झिंक सल्फेट ८ किलो, मॅंगेनीज सल्फेट १० किलो, निंबोळी

८० किलो, बोरॉन २ किलो आणि एकूण खतमात्रेच्या नत्र १० टक्के, स्फुरद ५० टक्के आणि पालाश ५० टक्के वापर करावा.

आडसाली हंगामासाठी रासायनिक अन्नद्रव्यांची शिफारस

विभाग------रासायनिक खतांची शिफारशीत मात्रा (किलो / हे.)

---------------- नत्र---स्फुरद ---पालाश

पश्‍चिम महाराष्ट्र ---४००---१७०---१७०

मराठवाडा------४००---१७०---१७०

विदर्भ ---४००---१७०---१७०

(टीप : १) वरील खतांची शिफारस सर्वसाधारण आहे. माती परीक्षणानुसार रासायनिक खताची मात्रा द्यावी.

२) को- ८६०३२ या ऊस जातीसाठी वरील शिफारशीत खतांपेक्षा २५ टक्के मात्रा वाढवून द्यावी.

---------------------------

संपर्क ः अरुण देशमुख, ९५४५४५६९०२

(उप सरव्यवस्थापक आणि प्रमुख कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा.लि., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com