Poultry Diseases Agrowon
ॲग्रो गाईड

Poultry Diseases : कोंबड्यांमधील सांसर्गिक आजारांचे नियंत्रण

कोंबड्यांमध्ये निरनिराळ्या वयोगटांत विविध संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो.

टीम ॲग्रोवन

डॉ. बी. पी. कामडी, डॉ. व्ही. एस. धायगुडे - आपल्या सभोवतालच्या वातावरणात सदैव विविध प्रकारचे जिवाणू, बुरशी, विषाणू इत्यादी असतात आणि त्यांचा प्रादुर्भाव झाला असता कोंबड्या, जनावरांमध्ये विविध आजार होतात. परंतु अशा सूक्ष्म जिवांच्या प्रसारासाठी व वाढीस शेडमधील प्रतिकूल परिस्थिती आणि कोंबड्यांची उत्तम प्रतिकारशक्ती (Better Immunity Of Chickens) यामुळे आजाराचा प्रादुर्भाव होत नाही. मात्र व्यवस्थापनातील त्रुटीमुळे रोगकारक जिवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण मिळाल्यास त्यांचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि कोंबड्यांमध्ये आजाराचा प्रसार (Disease Transmission in Chickens) होतो.

कोंबड्यांमध्ये निरनिराळ्या वयोगटांत विविध संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये फुफ्फुसदाह, रक्ती हगवण, पुलोरम, टायफॉइड, पॅराटायफॉइड, कॉलरा, श्‍वसनसंस्थेचे विकार, मानमोडी, इन्फेक्शियस ब्राँकायटिस, गंबारो, इन्फेक्शियस लँरिगो ट्रॅकायटिस, देवी हे महत्त्वाचे आजार आहेत. प्रादुर्भावामुळे कोंबड्यामध्ये वजन घटते, मृत्यू होतो.

म्हणून कोंबड्यांचे विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी नियंत्रणाची उपाययोजना करणे गरजेचे आहे. एकदा प्रादुर्भाव झाला की उपचार करणे अत्यंत महागडे ठरते. काही विषाणूजन्य आजारांवर उपचारसुद्धा उपलब्ध नाहीत.

प्रसाराचा मार्ग ः

१) कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव आजारी कोंबडीपासून दूषित झालेल्या हवेवाटे किंवा दूषित झालेल्या खाद्य, पाण्यावाटे त्याच प्रमाणे आजारी कोंबडीच्या अधिक जवळचा संबंध आल्यास होते.

२) आजाराचे जंतू रोगबाधित कोंबडीच्या विष्ठेतून, नैसर्गिक स्राव यातून पसरतात. शेड अस्वच्छ असल्यास, अशा वातावरणात रोगकारक जंतूंची वाढ झपाट्याने होते, संसर्ग वाढतो. त्यामुळे शेडमध्ये प्रत्येक कोंबडीस योग्य जागा, स्वच्छ, शुद्ध हवा, खाद्य, पाणी यांचा पुरवठा करावा. जेणेकरून कोंबडीची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील, आजाराचा संसर्ग होणार नाही.

३) दूषित खाद्य भांडी, पिण्याची भांडी प्रसार होण्यास कारणीभूत असतात. शेडमधील लिटर ओले झाल्यास अशा वातावरणात रोगकारक जंतूंची वाढ झपाट्याने होते. आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. उदा. रक्ती हगवण.

जैवसुरक्षा उपाययोजना ः

१. सर्व प्रथम कोंबड्यांचे शेड असलेली जागा फेन्सिंग करून सुरक्षित करावी. मुख्य प्रवेशाच्या ठिकाणी “प्रतिबंधित क्षेत्र” असा फलक लावावा. जेणेकरून अनोळखी ये-जा करणारे लोक शेडमध्ये येणार नाही. कारण अशा व्यक्तींवाटे आजाराचे जीवजंतू आपल्या शेडमध्ये येऊ शकतात.

२. कोंबड्यांच्या शेड जागा निवडत असताना ती लोकवस्तीपासून दूर असावी. इतर पोल्ट्रीफार्मपासून दूर आणि उंचावर पाण्याचा व्यवस्थित निचरा होणाऱ्या ठिकाणी असावी, जेणेकरून शेडच्या अवतीभोवती पाणी साठून राहणार नाही. कारण साठलेल्या दूषित पाण्यामुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

३. अवांतरित लोकांची शेडमध्ये ये जा प्रतिबंधित करून त्याची योग्य नोंद ठेवावी कारण अशा व्यक्तीच्या चपलांवाटे किंवा कपड्यांवाटे आजाराचा प्रसार होत असतो.

४. कोंबड्यांच्या शेडच्या अवतीभोवती बिनकामाची झाडे किंवा झुडपे नसावीत. जेणेकरून जंगली पक्षी येणार नाही. कारण कोंबड्यांच्या आजारासाठी जंगली पक्षी वाहक म्हणून काम करतात. त्यामुळे आजाराचा प्रसार कोंबड्यांमध्ये होण्याची शक्यता असते उदा. बर्ड फ्लू.

५. प्रत्येक शेडमध्ये कामगारांसाठी वेगळी पादत्राणे तसेच कपडे उपलब्ध करून द्यावेत. यामुळे होणारा रोगजंतूचा प्रसार थांबेल.

६. प्रत्येक शेडच्या सुरुवातीला स्वच्छ फुटबाथ असावा. यामध्ये जंतुनाशक पदार्थ किंवा द्रावण असावे. जेणेकरून चपलांवाटे आलेल्या रोगाजतूंचा नाश होईल. शेडमध्ये त्यांचा प्रसार होणार नाही.

७. कुठल्याही कारणामुळे कोंबडी मृत पावल्यास इतरत्र फेकून न देता त्याची योग्य विल्हेवाट लावावी. जाळावी किंवा खोल खड्ड्यात पुरावे.

८. दुसऱ्याच्या शेडमध्ये किंवा कोंबडी आजारी असलेल्या शेडमध्ये भेट दिल्यानंतर स्वतःच्या शेडमध्ये जाऊ नये. कारण आपल्या कपड्यांवाटे किंवा चपलांवाटे रोगजंतू आपल्या शेडमध्ये प्रवेश करू शकतात.

९. शेडमध्ये वापरायची विविध दूषित उपकरणे आजाराचा प्रसार करू शकतात. म्हणून शेडमधील उपकरणे वापर करण्यापूर्वी आणि वापर झाल्यानंतर निर्जंतुक करावीत.

१०. उंदीर, कीटक व साप इत्यादी प्राणी कोंबड्याच्या विविध रोगजंतूंसाठी रोगवाहक म्हणून काम करतात. आजारांचा प्रसार करतात म्हणूनच यांचा प्रवेश शेडमध्ये होणार नाही याची काळजी घ्यावी.

११. शेडमध्ये वापरायचे तूस त्याचप्रमाणे कोंबडी खाद्य, पाणी यामध्ये संसर्गजन्य जिवाणू, बुरशी किंवा विषाणूंचा प्रादुर्भाव नसावा, याची काळजी घ्यावी.

१२. जर आपल्या शेडमध्ये एखाद्या आजाराचा उद्रेक होऊन कोंबड्यामध्ये मरतुक झाल्यास शेड स्वच्छ धुऊन जंतुनाशक द्रावण फवारावे. कमीत कमी ३ आठवड्यांपर्यंत नवीन कोंबड्या आणू नये.

१३. साथी वेळेस आजारी कोंबडी आणि निरोगी कोंबडी एकाच शेडमध्ये असतील, तर आजाराचा प्रसार त्वरित होतो. म्हणून आजारी कोंबड्यांना वेगळे करून योग्य उपचार करावेत. त्यामुळे निरोगी कोंबड्यांमध्ये प्रसार होण्याची शक्यता कमी होईल.

१४. प्रसार झालेल्या शेडमधील भांडी, उपकरणे, काम करणारे कामगार, त्यांच्या अंगावरील कपडे, त्याच्या वाहनाबरोबर जंतू दुसऱ्या शेडमध्ये येऊन आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे त्यांचा प्रवेश बंद करावा.

१५. मृत कोंबड्यांची त्वरित विल्हेवाट लावावी.

१६. नियमितपणे विशिष्ट कालावधीत कोंबड्यांचे रक्तद्रव्य, विष्ठा, नाकांतील तसेच घशातील स्राव नमुने गोळा करून पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी. जेणेकरून एखादी साथ येण्याआधीच त्याची माहिती होईल. त्यानुसार उपाय योजना करता येतील.

१७. शेडमधील लिटर दररोज दोन ते तीन वेळा खाली-वर हलवावे. लिटरवर जास्त प्रमाणात पाणी सांडणार नाही याची काळजी घ्यावी कारण लिटरमध्ये पाणी अधिक प्रमाणात सांडल्यास रक्तीहगवणसारख्या आजाराचा प्रादुर्भाव होतो.

१८. कमी जागेत जास्त कोंबड्यांची गर्दी झाल्यास वातावरणात अमोनियाचे प्रमाण वाढते. त्यामुळे श्‍वसन संस्थेचे आजार वाढतात. कोंबड्या एकमेकांच्या जास्त जवळ असल्याने आजाराचा संसर्ग लवकर पसरतो. यावर उपाय म्हणून शेडमध्ये पुरेशी जागा असावी, हवा खेळती असावी. लिटरची स्वच्छता ठेवावी.

१९. कोंबड्यांना नियमितपणे लसीकरण करावे. मानमोडी व देवी आजारावरील प्रतिबंधक लस नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाने, तालुका लघू पशुवैद्यकीय चिकित्सालये इ. ठिकाणी उपलब्ध असते.

२०. कोंबड्यांमध्ये मरतुक आढळल्यास पशुवैद्यकाच्या साहाय्याने शवविच्छेदन करून योग्य औषध द्यावे जेणेकरून मरतुक थांबेल. आर्थिक हानी होणार नाही.

संपर्क ः डॉ. व्ही. एस. धायगुडे, ९०८२२९२३४१

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT