डॉ. विजयसिंह लोणकर, डॉ. अविनाश कदम
संतुलित आहारामध्ये (Balanced Diet) प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. अंड्यामध्ये (Eggs) भरपूर प्रथिने असतात. प्राणीजन्य प्रथिनांमध्ये सर्वसामान्य लोकांना परवडेल आणि ज्यामध्ये उत्तम प्रतीची मानवाच्या आहारात (Human Diet) आवश्यक असलेली सर्व अमिनो आम्ल अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्याला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमान १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे.
अंड्यातील आरोग्यदायी घटक ः
१) एका अंड्यामध्ये उत्कृष्ट दर्जाची ६.३ ग्रॅम प्रथिने असतात. आपल्या शरीरास अत्यावश्यक असणारी नऊ प्रकारची अमिनो आम्ल आहेत. तसेच ५ ग्रॅम स्निग्ध पदार्थ, ०.६ ग्रॅम पिष्टमय पदार्थ, १० प्रकारची जीवनसत्वे, ११ प्रकारची खनिजे अंड्यामध्ये आहेत.
२) एका अंड्यामधून ७५ ते ८० कॅलरी ऊर्जा प्राप्त होते.
३) अंड्यामध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचेला उत्तेजन देतात. अंड्यास ओमेगा ३ फॅटी आम्लाचा प्रमुख स्रोत म्हणूनही ओळखले जाते. हे आम्ल मेंदूचे कार्य आणि दृष्टी राखण्यास मदत करते. मासे न खाणाऱ्या लोकांसाठी अंडी ओमेगा ३ फॅटी आम्लाचा मुख्य स्रोत आहे. अंड्याचा त्वचेवर चांगला परिणाम होतो.
४) तेलकट त्वचेपासून कोरड्या त्वचेपर्यंत सर्व प्रकारच्या त्वचेवर अंड्याचा चांगला परिणाम दिसून येतो. अंड्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो. अंड्यामधील फॅटी अॅसिडमुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. त्वचेतील सैलपणा कमी होतो. म्हणून अंड्याला ॲन्टी एजिंगसाठी वापरले जाते.
५) अंड्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि सातत्याने खाण्यावर नियंत्रण येते. त्यामुळे जास्त कॅलरीज निर्माण होत नाहीत तर त्या वापरल्या जातात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
६) अंड्यांमध्ये सेलेनियम, तसेच जीवनसत्त्वे अ, ब आणि के असतात. यामुळे कोरोना विषाणूशी लढण्यास आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. अंड्यांमध्ये अमिनो आम्ल आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात जे रुग्णांना विषाणूचा सामना करण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यास मदत करू शकतात. त्यामुळेच कोरोना रुग्णांना अंडी खाण्याची शिफारस केली जाते.
७) लहान मुलांमध्ये कुपोषण टाळण्यासाठी अंड्याचा वापर करता येतो. आजारातून बऱ्या झालेल्या व अशक्त व्यक्ती, गर्भवती स्त्रिया तसेच वयात येणारी मुले मुली यांच्या आहारात उकडलेल्या अंड्यांचा नियमित वापर केल्यास फायदेशीर ठरते.
अंड्यातील घटकांची उपलब्धता ः
१) अंड्यामध्ये काहीसा पारदर्शक म्हणजे पांढरा भाग आणि पिवळा भाग ज्याला आपण बलक संबोधतो असे दोन भाग असतात. त्यापैकी अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रथिने असतात.
२) आपल्यासाठी अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. अंड्यांच्या प्रथिनांमध्ये अँटीऑक्सिडंट्स जसे की फॉस्विटिन, ओहोफेरिन आणि ओव्हलब्युमिन असतात. ही प्रथिने धातूला बांधून किंवा स्कॅव्हेंजिंग फ्री रॅडिकलला बांधून लिपिड ऑक्सिडेशन रोखू शकतात.
३) अंडी अँटीऑक्सिडंटचा संभाव्य नैसर्गिक स्रोत म्हणून वापरली जाऊ शकतात, जी अन्न किंवा सौंदर्यप्रसाधने उद्योगात पुढे वापरली जाऊ शकतात.
४) अंड्यांचे अँटिऑक्सिडेंट कार्य मानवांना मोठ्या संख्येने शरीरामध्ये होणाऱ्या डीजेनेरेटिव्ह प्रक्रियेपासून रोखू शकते. ही प्रथिने पचनास सुलभ असल्याने ती पूर्णपणे शरीरात शोषली जातात. आपले शरीर या प्रथिनांचा पूर्णपणे वापर करू शकते. अंड्यामध्ये असलेली प्रथिने वाया न जाता १०० टक्के वापरली जातात.
५) शरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः बनवून शकणारी नऊ प्रकारची अमिनो आम्ल अंड्यामध्ये आढळून येतात. अंड्यामधील प्रथिने अत्युच्च दर्जाची असतात. इतर कोणत्याही प्रथिनयुक्त आणण्याचा दर्जा ठरविण्यासाठी अंड्यातील प्रथिने मानक म्हणून वापरली जातात.
६) अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये मुबलक असणारे अल्बमिन नावाचे प्रथिन पेशींच्या निर्मितीसाठी आणि वाढीसाठी गरजेचे असते. अंड्यातील प्रथिने पचनास हलकी असल्यामुळे आबालवृद्धांना अंडे पोषक असते. आपल्या स्नायूंचे बळ वाढवण्यासाठी अंड्यातील प्रथिने आवश्यक असतात.
७) अंड्याच्या पांढऱ्या भागात रिबॉफ्लाविन म्हणजेच जीवनसत्त्व ब २ भरपूर प्रमाणात आढळून येते. आपल्या शरीरातील चयापचय क्रियांमध्ये, पेशींच्या निर्मितीमध्ये आणि शरीरामध्ये घडून येणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये हे जीवनसत्त्व महत्त्वाचे असते.
अंड्यातील पिवळा बलक आरोग्यदायी ः
१) अंड्यातील पिवळ्या बलकाबाबत अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. जसे की बलकाचे सेवन हृदयासाठी वाईट असते, बलकामुळे ऍलर्जी येऊ शकते, कोलेस्ट्रॉल वाढू शकते इत्यादी. हे गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.
२) प्रत्यक्षात अंड्याच्या पिवळ्या बलकामधून आपणास भरपूर प्रमाणात पोषणतत्त्वे मिळतात. अंड्यामध्ये समाविष्ट असलेल्या मोठ्या प्रमाणातील प्रथिनांचा साठा वगळल्यास अन्य सर्व पोषकद्रव्ये पिवळ्या बलकातच असतात.
३) अंड्यातील जीवनसत्त्वे, खनिजे ही मेंदू आणि मज्जासंस्थेला प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्यक असतात. बलकामध्ये समाविष्ट असलेली जीवनसत्वे ही अँटिऑक्सिडंट म्हणून आपल्या शरीरामध्ये कार्य करतात.
४) बलकामध्ये असलेले लोह शरीरात पूर्णतः वापरले जाते. तसेच बलकात सापडणारे कोलीन नावाचे द्रव्य मेंदूच्या वाढीमध्ये मदत करते. त्यामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती व आकलनशक्ती सुधारण्यास अंड्याच्या पिवळ्या बलकाचा उपयोग होतो.
५) आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी बलकाची मदत होते. अंड्यामध्ये असणारे अ जीवनसत्त्व आणि कॅरोटेनोईड पिगमेंट दृष्टीसाठी उपयुक्त ठरते. ड जीवनसत्त्व आणि कॅल्शिअम खनिज हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. जीवनसत्त्व ड चा मुख्य स्रोत म्हणून अंडी ओळखली जातात. जीवनसत्त्व ड च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत किंवा ठिसूळ होतात.
६) अंड्याच्या पिवळ्या बलकाचा मध्ये आढळणारे लुटीन आणि जीयाझेनथीन नावाची कॅरोटेनोईड पिग्मेंट डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंड्यातील जीवनसत्त्व-अ, जीवनसत्त्व ब-१२ आणि सेलेनियम फायदेशीर आहे.
एका उकडलेल्या कोंबडीच्या अंड्यामध्ये (५० ग्रॅम) पोषण तत्त्वांचे प्रमाण
( स्रोत ः अमेरिकी कृषी विभाग )
पोषण तत्त्वे --- ५० ग्रॅम उकडलेल्या कोंबडीच्या अंड्यासाठी
ऊर्जा ---७८ कॅलरी
प्रथिने ---६ ग्रॅम
एकूण स्निग्ध ---५ ग्रॅम
मोनोअनसॅच्यूरेटेड स्निग्ध---२ ग्रॅम
पॉलीअनसॅच्यूरेटेड स्निग्ध---०.७ ग्रॅम
सॅच्यूरेटेड स्निग्ध---१.५ ग्रॅम
कर्बोदके ---०.६ ग्रॅम
तंतुमय घटक---० ग्रॅम
सोडियम ---६२ मि. ग्रॅम
शर्करा ---०.५ ग्रॅम
कोलिन ---१४७ मि. ग्रॅम
कोलेस्टेरॉल ---२१३ मि. ग्रॅम
संपर्क ः डॉ. विजयसिंह लोणकर, ७८७५५७०३९२
(सहाय्यक प्राध्यापक,कुक्कुटपालन शास्त्र विभाग,क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.