वाल/ कुळीथ
-पेरणी
-विनामशागत पेरणी ः भात कापणीनंतर (Paddy Harvesting) जमिनीच्या अंगओलीवर विनामशागत वाल/ कडवा वाल पिकाची पेरणी (Sowing) करण्यासाठी भात कापणीनंतर जमीन वाफसा स्थितीत आल्यावर कोणतीही मशागत न करता टोकण पद्धतीने दोन ओळींत ३० बाय १५ से.मी. अंतर ठेवून वालाची पेरणी करावी. पेरणी करते वेळी बियाण्याशेजारी छिद्र करून त्यामध्ये दाणेदार मिश्रखत गुंठ्यास एक किलो या प्रमाणे द्यावे. अशाच पद्धतीने चवळी आणि कुळीथ पिकाची पेरणी जमिनीच्या अंग ओलीवर करणे शक्य आहे.
- मशागतीनंतर पेरणी ः जर जमिनीची मशागत करून वाल पिकाची पेरणी करायची असल्यास, भात कापणीनंतर जमीन वाफसा आल्यानंतर नांगरणी करावी. नांगरणीच्या वेळेस प्रति गुंठा ५० किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून जमीन समपातळीत आणावी. वाल बियाण्याची टोकण पद्धतीने ३० बाय १५ सें. मी. किंवा ३० बाय २० सें.मी. किंवा ३० बाय ३० सें. मी. अंतरावर पेरणी करावी. पेरणीच्या वेळेस ५४० ग्रॅम युरिया आणि ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति गुंठा ओळीमध्ये बियाण्याखाली साधारण ५ सें.मी. खोलीवर द्यावे. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.
-वरील दोन्ही पद्धतीने पेरणी करण्यापूर्वी प्रति किलो बियाण्यास थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या प्रमाणे प्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो बियाण्यास रायझोबिअम २५ ग्रॅम याप्रमाणे जैविक प्रक्रिया पेरणीपूर्वी १ तास आधी व बुरशीनाशकानंतर करावी. बियाणे सावलीत सुकवावे. रायझोबियमच्या प्रक्रियेमुळे मुळावरील गाठीची संख्या वाढून नत्राचे स्थिरीकरण जास्त होते. त्याचा फायदा उत्पादन वाढीत होतो.
-वाल पिकामधील तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर त्वरित (२ ते ३ दिवसांपर्यंत) परंतु उगवणीपूर्व ऑक्झाडायजील (८० टक्के डब्लू.पी.)* या तणनाशकाची २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात जमिनीत पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी.
चवळी
-पूर्वमशागत आणि पेरणी
- जमीन वाफसा स्थितीत आल्यावर मशागतीची कामे करण्यास सुरुवात करावीत. नांगरणीच्या वेळेस प्रति गुंठा ५० किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्टखत मिसळून जमीन समपातळीत आणावी. उताराच्या आडव्या दिशेने ४ बाय ३ मी. आकाराचे सपाट वाफे तयार करावे. दोन वाफ्यामध्ये पाण्याचे पाट ठेवावेत.
-बियाण्याची पेरणी ३० x १५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणीच्या वेळेस ६५ ग्रॅम युरिया, ४५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति वाफा या प्रमाणे खतमात्रा द्यावी. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.
-कोकण सदाबहार आणि कोकण सफेद हे चवळी वाण कोकण विभागात लागवडीसाठी शिफारशीत आहेत. ६ ते ७ किलो प्रति एकरी बियाणे वापरावे.
-पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास थायरम २ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या बुरशीनाशकाची प्रथम प्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबिअम २५ ग्रॅम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५ ग्रॅम या प्रमाणे जैविक प्रक्रिया करावी.
मधुमका
-पूर्वमशागत
-उत्तम निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. भात कापणीनंतर जमीन वाफसा स्थितीत आल्यावर मशागतीची कामे करण्यास सुरुवात करावीत.
-नांगरणीच्या वेळेस प्रति गुंठा १०० ते १२० किलो चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट मातीत मिसळावे. पिकास पाणी देण्यासाठी वाफे तयार करावेत.
-मधुमका लागवडीसाठी ८० ते १०० ग्रॅम बियाणे प्रति गुंठा क्षेत्रासाठी या प्रमाणात बियाणे उपलब्ध करून घ्यावे.
-पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यानंतर २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास अॅझेटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.
- मधुमका बियाण्याची पेरणी टोकण पद्धतीने ६० × २० से. मी. अंतरावर करावी. एका ठिकाणी दोन दाणे सुमारे ४ ते ५ से. मी. खोलीवर पेरावे. पेरणीच्या वेळी ओळीमध्ये ७ ते ८ सें.मी. खोलीवर प्रति गुंठा २ किलो युरिया, ४ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १ किलो म्युरेट ऑफ पोटॅश अशी खताची मात्रा द्यावी.
चारा मका
-पूर्वमशागत व पेरणी
-चाऱ्यासाठी मका लागवड करताना चांगला निचरा होणारी मध्यम प्रतिची सुपीक जमीन निवडावी.
-जमिनीला वाफसा आल्यावर मशागतीची कामे सुरू करावीत. नांगरणीच्या वेळेस प्रति गुंठा १०० ते २०० किलो चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट मातीत मिसळावे.
- लागवडीसाठी ३०० ते ४०० ग्रॅम बियाणे प्रति गुंठा क्षेत्रासाठी आवश्यक असते.
-बियाण्याची पेरणी दोन ओळींमध्ये ४५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणीवेळी प्रति गुंठा १.५ किलो युरिया खताची मात्रा द्यावी. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.
पांढरा कांदा
-वाढीची अवस्था
-पांढरा कांदा रोपवाटिका क्षेत्रातील जमिनीची नांगरट करून ३ मी. लांब × १ मी. रुंद × १५ सें.मी. उंचीच्या गादीवाफे तयार करावेत. या वाफ्यावर प्रति चौरस मीटर ५ किलो शेणखत, ३५ ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मिसळावे.
त्यावर पांढरा कांदा बियाणांची पेरणी करावी. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे. कांदा रोपे पुनर्लागवड करणार असलेल्या शेतांमध्ये जमीन वाफसा स्थितीत असताना मशागतीची कामे सुरू करावीत. नांगरणीच्या वेळेस जमिनीमध्ये २५० ते ३०० किलो शेणखत प्रति गुंठा मिसळावे.
कलिंगड
-पूर्वमशागत व पेरणी
- जमीन वाफसा स्थितीत आल्यावर मशागतीची कामे करण्यास सुरुवात करावीत. लागवड सरी पद्धतीने २ × ०.५० मी. अंतरावर करावी.
-प्लॅस्टिक आच्छादनावर लागवड करणार असल्यास काळ्या रंगाचे २१ मायक्रॉनचे प्लॅस्टिक निवडावे. जमिनीची नांगरट करून जमीन समपातळीत आणल्यानंतर ५ ते ७ सें.मी. उंची व ६० सें.मी. रुंदीचे गादीवाफे तयार करावेत. दोन गादीवाफ्यामधील अंतर २ मीटर ठेवावे. आच्छादन अंथरण्यापूर्वी ठिबक सिंचनाच्या लॅटरल वाफ्यावर पसरून घ्याव्यात. प्लॅस्टिक आच्छादन गादीवाफ्यावर अंथरून कडांवर मातीचा थर द्यावा. आच्छादनावर दोन ओळींमधील अंतर ४५ सें.मी. ठेवून रुंदीच्या दिशेने ३ सें.मी., तर लांबीच्या दिशेने ५० सें.मी. अंतरावर सरळ रेषेत ३ सें.मी. व्यासाची छिद्रे पाडावीत. या छिद्रामध्ये २ ते ३ सें.मी. खोलीवर बियाण्याची पेरणी करावी.
- पेरणीवेळी १.५ किलो चांगले कुजलेले शेणखत, ११ ग्रॅम युरिया, ३२ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति आळे या प्रमाणे खत मात्रा द्यावी. संकरित कलिंगडाला पेरणी वेळी २ किलो चांगले कुजलेले शेणखत, २० ग्रॅम युरिया, ३२ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि १७ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति आळे खतमात्रा द्यावी. खतांचा थेट बियाण्यांशी येणार नाही याची दक्षता घ्यावी.
-रोपांची मर रोगापासून संरक्षण होण्यासाठी पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. तसेच ट्रायकोडर्मा २ ग्रॅम प्रति आळे शेणखतामध्ये मिसळून द्यावे. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.
ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन करताना ९० दिवसांच्या पीक कालावधीमध्ये एकूण नऊ हप्त्यामध्ये खत व्यवस्थापन करावे. पेरणीनंतर १५ दिवसाने ठिबक सिंचनाद्वारे खते देण्यास सुरुवात करावी. पुढील तक्त्यानुसार खत व्यवस्थापन एक आठवड्याच्या अंतराने करावे.
पीक अवस्था --- एकूण हफ्ते --- प्रति एकर प्रति हप्ता खताची मात्रा
०० --- ०० --- १९:१९:१९ --- युरिया --- ०:०:५०
सुरुवातीचा कालावधी --- ३ --- १२ किलो --- १९ किलो --- ४ किलो
वाढीची अवस्था --- ३ --- १२ किलो --- १९ किलो --- ४ किलो
फळधारणा --- ३ --- १२ किलो --- १९ किलो --- ५ किलो
पालेभाजी पिके
-पेरणी
-माठ आणि कोथींबीर लागवडीसाठी २०० ते २५० किलो आणि मुळ्यासाठी १०० किलो चांगले कुजलेले शेणखत आणि ४ किलो १५:१५:१५ या मिश्रखताची मात्रा प्रति गुंठा या प्रमाणे द्यावी.
-माठ, कोथींबीर बियाण्याची दोन ओळीत २० ते २५ सें.मी. तर मुळ्याची ४५ ते ६० सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी. पेरणी टप्प्याटप्प्याने आठवड्याच्या किंवा १५ दिवसांच्या अंतराने करावी.
आंबा
-पालवी अवस्था
१) आंबा बागेमध्ये कोवळ्या पालवीवर मिज माशी तसेच शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. शेंडे पोखरणारी अळी पालवीच्या दांड्याला छिद्र पाडून आत शिरते. आतील भाग पोखरून खाते. परिणामी कीडग्रस्त फांदी सुकून जाते.
प्रादुर्भावग्रस्त भागात अळीची विष्ठा व मृतपेशी आत राहिल्यामुळे फांद्यांवर गाठी निर्माण होतात. अशा फांद्या अशक्त राहतात. किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असल्यास, कीडग्रस्त पालवी किडीच्या अवस्थेसह काढून नष्ट करावी.
-कीडनियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.५ मि.लि.
२) पालवी अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. कोवळ्या पालवीचे किडीच्या प्रादुर्भावाकडे निरीक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, संपूर्ण झाडावर व खोडावर डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) ०.९ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
३) आंबा बागेमध्ये जुन्या अनुत्पादित झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी छाटणी केलेली असल्यास अशा झाडांचे खोडकिडीपासून संरक्षण करण्यासाठी क्लोरपायरिफॉस* २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात दर पंधरा दिवसांनी संपूर्ण खोडावर फवारणी करावी.
वाढत्या तापमानामुळे छाटणी केलेल्या झाडाला सुरुवातीच्या काळात झाडाला १० ते १५ दिवसांच्या अंतराने १५० ते २०० लिटर पाणी द्यावे.
४) नवीन लागवड ः निरभ्र आकाश व वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनात वाढ संभवते. नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून एकदा तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसातून एकदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून एकदा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी द्यावे. रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्याकरिता रोपांच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी. रोपांना वरून सावली करावी.
काजू
-पालवी अवस्था
-काजूच्या नवीन येणाऱ्या पालवीवर ढेकण्या (टी मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहेत. ही कीड पालवीतील रस शोषते. त्यामुळे नवीन पालवी सुकून जाते. त्याच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन* (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि.
टीप ः पानांच्या खालून आणि वरून व्यवस्थित फवारणी करावी. ही फवारणी शक्यतो सकाळी १० पूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी.
-काजू बागेतील गवत, रोगग्रस्त फांद्या काढून बागेची साफसफाई करावी.
-प्रति झाड ताज्या किंवा आठ दिवसांपर्यंत साठविलेल्या गोमुत्राची (२५ टक्के)* या प्रमाणे ५ लिटर द्रावणाची फवारणी करावी. २५
टक्के गोमूत्राची १० लिटर द्रावणाची झाडाच्या बुंध्यामध्ये जिरवणी पालवी आल्यापासून दर महिन्याला एक वेळ या प्रमाणे चार महिने करावी. यामुळे काजू बियांचे उत्पादन व बियांचे आकारमान वाढण्यास मदत होते.
- निरभ्र आकाश व वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनात वाढ संभवते. नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पंधरा दिवसाच्या अंतराने १५ लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्याकरिता रोपांच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी. रोपांना वरून सावली करावी.
सुपारी
-पक्वता
-सुपारीची काढणी घडाची संपूर्ण फळे नारंगी रंगाची झाल्यावर करावी. काढणी केलेल्या फळांवरील सालीचे पट्टे काढावेत. फळे उन्हात ४० ते ४५ दिवस वाळवावेत.
-दक्षिण व पश्चिम दिशेकडून खोडावर सतत पडणाऱ्या तीव्र सूर्यकिरणांमुळे ठरावीक भागातील खोड भाजून निघते. त्या ठिकाणी ते खोलगट व काळे पडते. उन्हापासून सुपारीच्या खोडांचे संरक्षण करण्यासाठी भाजणाऱ्या खोडावर गवताचा पेंढा किंवा सुपारीची झावळी बांधावीत.
-बाष्पीभवनात वाढ संभवत असल्याने सुपारी बागेस ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
(टीप: * लेबल क्लेम नाही, मात्र ॲग्रेस्को शिफारस आहे.)
-------------------
संपर्क ः ०२३५८- २८२३८७
डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१
(ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.