Yashwantrao Chavan Agrowon
ॲग्रो विशेष

Yashwantrao Chavan: यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

Maharashtra First CM: स्व. यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पहिले मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री आणि सहकार व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.

Team Agrowon

सौ. सुरेखा बोऱ्हाडे

Architect of Maharashtra: स्व. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्यानंतर राज्याला एक नवा आयाम दिला. स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, गाढे अभ्यासक, उत्तम वाचक, साहित्यिक, व्याख्याते असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, अर्थमंत्री, भारताचे संरक्षणमंत्री, उपपंतप्रधान, विरोधी पक्षनेते अशी विविध पदे भूषवली.

यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ मध्ये झाला. त्यांच्यावरील वडिलांचे छत्र बालवयात हरवले. त्यामुळे आई विठाईने त्यांना वाढवले. ‘‘बाळांनो, नका डगमग सूर्यचंद्रावरील जाईल ढगू’’ अशा ओव्यांमधून त्यांनी गरिबीच्या अंधारात चाचपडणाऱ्या आपल्या मुलांना धीर दिला. कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरे जायचे ही लढाऊ वृत्ती त्यांच्यात निर्माण केली.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात यशवंतराव सक्रिय सहभागी होते. शाळकरी वयात त्यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीत सहभाग घेतल्यामुळे त्यांना दंड आणि तुरुंगवास ठोठावण्यात आला. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अगोदरच त्यांनी पाश्‍चात्त्य देशातील श्रेष्ठ ग्रंथकारांचे ग्रंथ वाचून काढले.

हिमालयाच्या मदतीला सह्याद्री

स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक मुंबई राज्याचे व मुंबई राज्याच्या विभाजनानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. चीनने भारतावर आक्रमण केल्यानंतर पंतप्रधानांच्या हाकेला ओ देऊन ते महाराष्ट्रातून केंद्रात गेले. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी केली. त्या वेळी ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’ अशा शब्दांत त्यांच्या निर्णयाचे देशभर स्वागत झाले. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यासाठी अनेक आर्थिक धोरणं राबवली. त्यामुळे अनेक क्षेत्रांचा विकास झाला. प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासाच्या समस्या आणि नियोजनाचा पाया घातला.

कृषी विकासातील योगदान

यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक धोरणाचा फक्त पायाच घातला नाही, तर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असणाऱ्या संस्थांचे जाळे निर्माण केले. गुणग्राहक वृत्तीने प्रत्येक क्षेत्रातील ‘उत्तम’ माणसे हेरली. गुणी माणसांचे, कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले. त्यामुळेच महाराष्ट्र राज्याची ओळख एक प्रगतिशील राज्य म्हणून निर्माण झाली. देशाचा कणा असलेल्या कृषी व्यवसायात त्यांनी आमूलाग्र बदल करून, विकास साधला. शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्‍न, भूमिहीनांचा प्रश्‍न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला.

यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनी भूमिहीनांना द्याव्यात. जी जमीन अविकसित, अनुत्पादक व पडीक आहे, अशा जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतीत आधुनिकीकरण आणले.

नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर व्हावा यासाठी नद्यांवर धरणे बांधली. धरणे बांधल्यावर विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले. शेतकऱ्यांनी कृषिशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, यासाठी राज्यात कृषी महाविद्यालय सुरू केली. ग्रामीण भागात शेतीपूरक उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली.

अविकसित भागात विकासासाठी त्यांनी राष्ट्राच्या शेती आणि आर्थिक विकासासाठी अनेक सहकारी संस्था स्थापण्यावर भर दिला. सहकारी पतसंस्था, सहकारी वाहतूक, सहकारी ग्राहक भांडारे, सहकारी श्रमिक संस्था, तसेच सहकारी खरेदी-विक्री संघ निर्माण करण्यावर भर दिला. सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे तसेच अनेकांना राजकारणाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी पंचायत राज या त्रिस्तरीय व्यवस्थेची सुरुवात केली. १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना केली.

राज्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक विकासासाठी शिक्षण आणि साहित्य प्रसारावर त्यांनी मोठे काम केले. यासाठी मराठवाडा विद्यापीठ व कोल्हापूर विद्यापीठाची स्थापना केली. मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्‍वकोश मंडळाची स्थापना केली. ते उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू होते. रसिक व साहित्यिकही होते. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, ऋणानुबंध ही त्यांची साहित्यसंपदा आहे. २५ नोव्हेंबर १९८४ रोजी यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले.

९१५८७७४२४४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT