Indian Agriculture : राज्यातील जवळ जवळ ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. हवामान बदलाच्या काळात कोरडवाहू क्षेत्रात कमी पाण्यावर येणारी भरडधान्य पिके घेणे सहज शक्य आहे. भरडधान्य पिके ही नैसर्गिक संकटांचा (दुष्काळ, अतिवृष्टी, रोगराई) सामना करून थोडीफार का होईना उत्पादनाची शाश्वती शेतकऱ्यांना देऊ शकतात. मात्र सातत्याने या पिकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी, नैसर्गिक संकटांमध्ये या पिकांचे मोठे नुकसान होते. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.
भरडधान्य आणि तृणधान्य यांचा वेदांपासून इतिहास सापडतो. भरडधान्य भारतीय समाज जीवनाच्या आहारातील प्रमुख घटक राहिलेले आहेत. ही अभिमान बाळगण्यासारखी परंपरा आहे. मात्र सद्यःस्थितीत भरडधान्याचे वास्तव काय आहे? भरडधान्य लागवडीत घसरण का झाली? कोरडवाहू शेतीमध्ये भरडधान्यांचा पीकपॅटर्न विकसित का झाला नाही? हे प्रश्न महत्वाचे आहेत. २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्यात आले. तरीही भरडधान्यांची लागवड आणि उत्पादनात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. एकंदर कृषी धोरणात उच्च उत्पादकता गाठण्याच्या उद्देशाने बागायती क्षेत्रातील काही प्रमुख पिकांवर भर देण्यात आला. त्यामुळे एकपीक पद्धतीचा पॅटर्न पुढे आला. परिणामी, कोरडवाहू परिसरातील भरडधान्य आणि डाळवर्गीय पिके मागे पडून व्यापारी, नगदी पिकांचा वरचष्मा निर्माण झाला.
भरडधान्य म्हणजे काय?
भरडधान्य म्हणजे एक प्रकारची तृणधान्य म्हणता येतील. यात ज्वारी, बाजरी, रागी (नाचणी), राळा, वरई, कोदो, कुटकी, सावा, कुट्टु, राजगिरा इत्यादींचा समावेश होतो. या धान्यांना खाण्यापूर्वी भरडले जाते म्हणून त्यांना ‘भरडधान्य’ असे म्हटले जाते. भरडण्याच्या प्रक्रियेमध्ये धान्याभोवतालचे पौष्टिक कवच अर्धवट सोलले जाते. ही पिके अतिशय कमी पाण्यावर येतात. प्रामुख्याने मध्यम ते हलक्या जमिनीत आणि उष्ण, समशीतोष्ण व थंड अशा तिन्ही हवामानांत ही पिके घेतली जातात.
भरडधान्यांमध्ये उच्च आहारमूल्य आहेत. त्यामुळे मानव आणि पक्ष्यांसाठी अन्नधान्य म्हणून ते अत्यंत उपयुक्त ठरतात. तसेच त्यात मोठ्या प्रमाणात सेल्युलोज व इतर पदार्थ असतात. त्यामुळे हा चारा, खुराक जनावरे आवडीने खातात. त्यामुळे काही भागांत तर चारापिके म्हणूनही त्यांची लागवड केली जाते. तसेच या पिकांच्या वाढीसाठी विशेष रासायनिक खते द्यावी लागत नाही. त्यामुळे ही पिके घेणे सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात आहे. भरडधान्यांना ‘गरिबांचे धान्य’ असेही म्हणतात. त्यामुळे या पिकांना सामाजिक प्रतिष्ठा नाही. मात्र भरडधान्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समृद्ध स्रोत आहे. ते ग्लुटेनमुक्त असून त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, ज्यामुळे सेलिआक रोग किंवा मधुमेह असलेल्या लोकांसाठी भरडधान्य उपयुक्त आहे.
मोहीम अपयशी
भारताच्या पुढाकारातून २०२३ हे `आांतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३` म्हणून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जाहीर करण्यात आले. अन्न सुरक्षितेमध्ये भरडधान्याचे योगदान वाढणे, भरड धान्याचे उत्पादन वाढविणे, प्रकिया उद्योग सुरु करणे, भरडधान्याची वाहतूक-स्टोअरेज आणि वापर सुनिश्चित करणे आणि भागधारकांच्या सहभागाने भरडधान्याचे शाश्वत उत्पादन व गुणवत्ता राखणे हे त्यामागचे प्रमुख उद्देश होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०२२ रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरे करण्याची आठवण करून देऊन सर्वांनी मिळून एक जनआंदोलन उभारण्याचे आणि भरडधान्यांविषयी जागरुकता वाढवण्याचे आवाहन केले.
केंद्र शासनाने शहरी अशासकीय संस्थाद्वारे जागृती, प्रकिया उद्योग, मॉलमधील पॅकिंग करून विक्री व्यवस्था उभारणे आदी कार्यक्रम घेतले. त्यासाठी सरकारी पैशांमधून अशासकीय संस्थाद्वारे (एनजीओद्वारे) शहरांमध्ये शेतकऱ्यांना वगळून सेमिनार आणि बैठका घेतल्या. मात्र शेतकऱ्यांना भरडधान्यांचे बियाणे उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्यासाठी मूल्य साखळी उभारणे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. त्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्यात आली नाही. केंद्र सरकारने भरडधान्यांबद्दल जागृती, प्रबोधन, मार्गदर्शन करण्यासाठीच्या मोहिमांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. पण या सगळ्यातून शेतकऱ्यांना वगळल्यामुळे या मोहिमांना अंगभूत मर्यादा आल्या. प्रशासन, सहभागी अशासकीय संस्था, शहरी मध्यम वर्ग, रिटेल विक्री व्यवस्था, प्रस्थापित प्रक्रिया उद्योग, ग्रामीण भागातील दलाली-मध्यस्थी करणारा वर्ग इत्यादीपुरतीच या मोहिमा मर्यादित राहिल्या.
परिणामी २०२३-२४ च्या महराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार भरडधान्याचे एकूण लागवड क्षेत्र ३ हजार हेक्टरने घसरले असून उत्पादनातही २३ हजार टन घट झाली. एकंदर भरडधान्यांच्या बाबतीत पुरवठा मूल्यसाखळी निर्मिती, प्रक्रिया उद्योगांचे जाळे, सामाजिक प्रतिष्ठा या आघाड्यांवर नन्नाचा पाढा असल्यामुळे सरकारला कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना भरडधान्य लागवडीकडे वळवण्यात अपयश आल्याचे दिसून येते.
उदासीन दृष्टिकोन
कोरडवाहू भागात भरडधान्य पिके घेण्याची एक परंपरा होती. ती अल्प प्रमाणात अजूनही टिकून आहे. या परंपरेला शेतकऱ्यांनी स्वत:साठी जिवंत ठेवले आहे. मात्र भरडधान्यांचे वाण जतन करणे, बियाणे वापरणे, योग्य भाव मिळवून देणे, बाजार व्यवस्था विकसित करणे, प्रक्रिया उद्योग उभारणे, ग्रामीण भागात साठवणुक व्यवस्था उपलब्ध करून देणे इत्यादीसाठी राजकीय व्यवस्थेचा पुढाकार असायला पाहिजे होता. मात्र या सर्वच बाबतीत शासन पातळीवर खूपच उदासीनता आहे.
या उदासीनतेचे एक उदाहरण म्हणजे पिवळी ज्वारी (सेंद्री) हे ज्वारीचे गावरान वाण. खरीप हंगामात अतिशय कमी पाण्यावर येणारे हे पीक. पावसात ३० ते ४० दिवसांचा खंड पडला तरीही तग धरून उभे राहणारे वाण आहे. १९७२ च्या दुष्काळात अनेक शेतकऱ्यांना या वाणाने आधार दिला होता. मराठवाड्यात अन्नधान्य आणि जनावरांचा चारा (वैरण-कडबा) यासाठी या वाणाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात होते. या पिवळ्या ज्वारीमध्ये शून्य साखर असल्याने मधुमेह रुग्णासाठी ते अमृत आहे. मराठवाड्यात अनेक डॉक्टर ही ज्वारी खाण्याचा सल्ला देतात. पण आजघडीला खूप कमी शेतकरी ही ज्वारी पिकवतात. सरकारने पुढाकार घेऊन ज्वारीच्या या वाणामध्ये सुधारणा करण्यासाठी संशोधनाला चालना देणे आणि उत्पादन वाढवणे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक होते. पण तसे काहीच झाले नाही. परिणामी, हे वाण आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशीच बिकट स्थिती इतर भरडधान्य पिकांचीही आहे.
भरडधान्यांचा पीकपॅटर्न विकसित करण्यासाठी गुंतवणुकीचा परतावा देणारी मूल्यसाखळी निर्माण करणे, भरडधान्य लागवड व उत्पादन वाढवणे, विक्री व्यवस्थापन, ग्रामीण भागात प्रकिया उद्योगाची उभारणी, आहारात भरडधान्यांचा वापर वाढवणे यासाठी सरकारने पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
उच्च आहार मूल्यवर्धन
ज्वारी-बाजरीची भाकरी, नाचणीचे मुडदे, बाजरीची खिचडी, नाचणी डोसा, रागीची लापशी, वरई पुलाव असे काही पदार्थ आपल्या आहारात पूर्वीपासूनच होते. ज्वारी तसेच बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ-तूप आजही राज्याच्या ग्रामीण भागात आवडीने खाल्ले जाते. सर्वच प्रकारच्या भरडधान्यांपासून धिरडे, धपाटे, थालीपीठ, उपमा असे रुचकर खाद्यपदार्थ तयार करता येतात. एवढेच नाही तर भरडधान्यांवर प्रक्रिया करून लाह्या, पोहे, पापड, पास्ता, कुकीज, बिस्किटे, शेवया आदी अनेक पदार्थ करता येतात. प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून महिला, युवकांना रोजगार निर्मितीची मोठी संधी आहे.
मात्र भरडधान्यास सरकारने राजकीय कार्यक्रम पत्रिकेवर प्राधान्याने घेतले नाही. तसेच या भरडधान्यास प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत भरडधान्याचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांनी स्वतः पुरतेच मर्यादित ठेवले आहे.
(लेखक शेती, पाणी आणि दुष्काळ या प्रश्नांचे अभ्यासक असून ‘द युनिक फाउंडेशन, पुणे’ येथे वरिष्ठ संशोधक आहेत.)
९८८१९८८३६२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.