Coarse Grain Processing : फडतरे यांची उत्पादने पोहोचली तब्बल आठ देशांत

Agriculture Processing Industry : देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे तात्यासाहेब व सरोजिनी फडतरे या दांपत्याने सुमारे चौदा वर्षांपूर्वी भरडधान्यांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला.
Agriculture Processing Industry
Agriculture Processing IndustryAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : वडापुरी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील मूळ रहिवासी तात्यासाहेब फडतरे यांनी पत्रकारितेसह विविध क्षेत्रांत बारा वर्षे नोकरी केली. नोकरीचा राजीनामा देऊन ते सुमारे १५ वर्षांपूर्वी पूर्णवेळ कृषी प्रक्रिया उद्योगात उतरले. शेतकरी कंपनी स्थापन केली. दरम्यान, धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेले त्यांचे वडील रामचंद्र यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्याच वेळी स्वतःसह समाजासाठीही काहीतरी विधायक करण्याची त्यांची इच्छा झाली.

त्यातून पौष्टिक भरडधान्यांपासून विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याचे पक्के केले. गृहविज्ञान शास्त्रातील पदवीप्राप्त पत्नी सरोजिनी यांचीही साथ मिळाली. त्यांच्याच माहेरघरी म्हणजे देवळाली प्रवरा (जि. नगर) येथे आज या दांपत्याचा प्रक्रिया उद्योगाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारलेला पाहण्यास मिळतो. शिवाय वडापुरी येथेही पीठनिर्मिती प्रकल्प आहे. कमी रकमेच्या बॅक कर्जापासून सुरुवात करीत चौदा वर्षांच्या कालखंडानंतर आज एक कोटी रुपयांच्या आसपास उद्योगात गुंतवणूक झाली आहे.

बाजारपेठेत झाला ब्रॅण्ड लोकप्रिय

‘समृद्धी ॲग्रो’चा ‘गुड टू इट’ हा ब्रॅण्ड राज्यातच नव्हे तर देशात व परदेशात लोकप्रिय झाला आहे.त्यामागे उत्पादनांची गुणवत्ता, सचोटी, अविरत कष्ट, संवादकौशल्य, सातत्य, बाजारपेठांचा अभ्यास आदी वैशिष्ट्यांचे योगदान आहे. सुरुवातीच्या काळात विविध पदार्थ तयार करून ग्राहकांची त्यास पसंती मिळवली. पुणे येथील ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनातूनही नवे ग्राहक जोडले.

तीसहून अधिक पदार्थ

ज्वारी, बाजरी, नाचणी आदींपासून इडली, शंकरपाळे, चकली, पोहे, रवा, विविध पिठे, चिवडा, नाचणीचा डोसा, बिस्किटे, लाडू, फ्लेक्स, पॅनकेक मिक्स आदी पदार्थांची निर्मिती होतेच. शिवाय, कोद्रा, बर्टी, सावा आदी दुर्मीळ भरडधान्यांवरही प्रक्रिया केली जाते. तीसहून अधिक प्रकारचे पदार्थ आज तयार होतात. प्रतवारी, रवा निर्मिती, पोहे निर्मिती यंत्रे, रोस्टर, फ्रायर, कुकर, स्टीमर, ड्रायर अशा २१ प्रकारची सुमारे ६४ लाखांपेक्षा अधिक रकमेची अत्याधुनिक यंत्रे देवळाली येथील प्रकल्पात आहेत.पॅकिंग करताना ऑक्सिजन व तापमान नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेचा वापर होतो.

Agriculture Processing Industry
Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

शेतकऱ्यांकडून खरेदी

बहुतांश कच्च्या मालाची खरेदी राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांकडून होते. प्रकल्प सुरू केला त्या वेळी महिन्याला तीन क्विंटलपर्यंत धान्य लागे. आता दर महिन्याला दहा टनांपेक्षा अधिक त्याची गरज भासते. त्यासाठी राज्यभरातील दहा शेतकरी उत्पादक कंपन्या व तीनशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांसोबत नेटवर्क उभारले आहे. वॉटर संस्थेशी जोडलेल्या शेतकऱ्यांचीही यात मदत होते.बाजारभावांपेक्षा एक रुपया प्रति किलो अधिक दर देऊन जागेवर खरेदी केली जाते.

परदेशात होते निर्यात

अमेरिका, दुबई, नेदरलँड, बेल्जियम, कॅनडा, न्यूझीलंड, इंग्लंड, सिंगापूर आदी आठ देशांत आज फडतरे यांची उत्पादने निर्यात होतात. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, जिओमार्ट, वेलनेस आदी ऑनलाइन रिटेलिंग क्षेत्रातील कंपन्यांकडेही उत्पादने उपलब्ध केली आहेत. स्वतःचे www.gud2eat.in हे संकेतस्थळ असून त्याद्वारेही विक्री होते. पुण्यात १००, राज्यात ३००, तर देशभरात एक हजारापेक्षा अधिक ठिकाणी उत्पादनांची विक्री होत आहे. उत्पादनांचे महत्त्व कळावे, ती पाहता यावीत यासाठी छोटा मॉल उभारला आहे.

Agriculture Processing Industry
Agro Processing Industry : उसाच्या साखरेवर आधारित पर्यावरणपूर्वक डिटर्जंट पावडर

मिलेट रेस्टॉरंट

कोल्हापूर येथे तेथील व्यावसायिकासोबत भागीदारी करून ‘मिलेट रेस्टॉरंट’ उभारले आहे. या रेस्टॉरंटचे जाळे तयार करून भरडधान्यांवर आधारित पदार्थ सर्वत्र देण्याचे नियोजन आहे. राज्यात ११ ठिकाणी फ्रॅंचाईसी प्रस्तावित आहेत.

महिलांच्या रोजगारासाठी प्रयत्न

आपला उद्योग तर यशस्वी झाला, पण आपल्याबरोबर अन्य लोकांचीही प्रगती व्हावी असा फडतरे यांचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळावा, त्यांचे जीवनमान उंचावले जावे अशी त्यांची धडपड आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून ८ ते १० स्थानिकांना दैनंदिन रोजगार दिला आहे. दिवाळी फराळ, बाजरी, मूग, मटकीचे सांडगे आदी हातांद्वारे बनविलेल्या मालाची देशात, परदेशात मागणी वाढवून महिलांना त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे. जात्यावर पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या हरभरा, तूर, मूग, उडीद, मटकी यांसह कडधान्यांच्या डाळींना बाजारात मोठी मागणी आहे. अशा सेंद्रिय डाळींच्या विक्रीवर भर देत त्यातून रोजगार निर्मितीचे काम सुरू केले आहे.

दहा लाखांची मिळाली फेलोशिप

दूरदर्शन कृषी सन्मान, २०१९ ॲग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक तसेच २०२३ मध्ये हैदराबाद येथील संस्थेकडून बेस्ट स्टार्टअप (पौष्टिक अनाज ॲवॉर्ड), २०२४, मध्ये लोकल बंधन संस्थेकडून (मुंबई)स्टार असे विविध १४ पुरस्कार मिळाले आहेत. यंदा दिल्ली येथील बुद्ध संस्थेमार्फत १० लाखांची ‘फेलोशिप’ही मिळाली आहे.

तात्यासाहेब फडतरे

९४०४३२७८५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com