Jowar Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar In Maharashtra: शेतीमालाचा भाव का करता?

Jowar Farming: लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार महारुद्र मंगनाळे यांनी ज्वारी शेतीतील मेहनत, कष्ट आणि भाववाढीवर लेख लिहिला आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवातून ज्वारी उत्पादनाची खरी किंमत आणि बाजारभाव याविषयी खोल विचार मांडला आहे.

महारुद्र मंगनाळे

Farming Challenges: मी काल दुपारी विळा नरेशला देऊन म्हटलं, याला जरा घासून दे. तो सहज बोलला, मामा, तुम्हाला हे काम जमणार नाही. त्याचं म्हणणं खरं होतं. नव्या माणसासाठी हे काम कठीण आहे पण मी ठरवलं की, शेतीतील प्रत्येक काम करू शकतो, हा मला आत्मविश्वास. तो नेहमी खरा ठरतो. ठरल्याप्रमाणे कामाला लागलो.

इतरांनी प्रत्येकी सहा ओळी घेतल्या होत्या. मी चार घेतल्या. मधेच डाव्या हाताच्या अंगठ्यालगतच्या बोटावर विळा लागला. रक्त निघालं. नरेशनं जखमजोडीचा रस पिळला. मी बोटाचा फोटो काढून कामाला लागलो. काही वेळात वैशूच्या पायाला धसकट लागलं. बरंच रक्त निघालं. तिला काम थांबवावं लागलं. मी वेळ होईपर्यंत काम करून माझी पात संपवली.

येऊन ग्लासभर काळी कॉफी पिली. सात वाजता रस-पुरीचं जेवण केलं. हर्षसोबत 'मँन व्हर्सेस वाईल्ड'चा एक इपिसोड बघितला. नऊ वाजता नवेलीकडं गेलो. तासभर पुस्तक वाचलं. दहाच्या सुमारास डोळे झाकू लागल्याने, दात घासून झोपी गेलो.

रात्री पाय दुखू लागल्याने जागी झालो. अंथरूणावर पायाचे काही व्यायाम केले. पण त्रास कमी होत नव्हता. पाय ओढले जात होते. वेदना जाणवत होत्या. हा त्रास माझ्या परिचयाचा होता. कुठलंही नवीन काम केलं की, पहिल्या रात्री हा त्रास होतोच. मोबाईल बघितला. दोन वाजले होते. उठून पाणी पिलं. बाहेर बागेत काही वेळ थांबलो. सायंकाळचं ढगाळ आभाळ गायब झालं होतं. स्वच्छ चांदणं बघून बरं वाटलं. पण पाय दुखतच होते.

मच्छरदाणीत येऊन लोळत पडलो. काही वेळाने झोप लागली. तरीही झोपेत कोणीतरी पाय ओढताहेत असे भास होतच होते. साडेपाच वाजता जाग आली. पक्ष्यांचं संगीत सुरू झालं होतं. पण उठायची इच्छा होत नव्हती. सहा वाजता उठून बाहेर आलो. हटकडं जाऊन चहा घेतला. गेटकडं आलो तर नरेश विळे घासत होता.

कालच ठरलं होतं की, जेवढं कापणं झालयं त्याची कणसं आधी खुडून घ्यायची. सात वाजता ते वावराकडं गेले. खुडलेली कणसं शेततळ्याच्या खालच्या बाजुला वाळवायचीत. छोटी कुदळ आणि हत्त्या घेऊन मी आयचान साफ केलं. काल कापलेला ट्रँक्टरभर कडबा घेऊन नरेश आला. गजाननने तो अंधरून घेतला.त्याच्यावर नारळाच्या झावळ्या टाकून चवाळं अंथरलं. कणसांची एक ट्रीप त्याच्यावर येऊन पडलीय. सकाळच्या टप्प्यातील काम थांबलयं. दरम्यान गजूने आयचनाचे तीन ढिगारे जाळले. मी बागेत पडलेल्या नारळाच्या दोन फांद्या बाहेर काढल्या. माझंही सकाळचं काम संपलयं. अजिबात पाय दुखत नाहीत. सकाळी पोटभर आंबे खाल्ले होते. आता भाजी-भाकरी आणि हिरवी मिरचीचा ठेसा खाल्ला.

बुधवारपासून सलग सहा दिवस कमी-जास्त पाऊस व पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. काहीही करून ही ज्वारी भिजू नये, यासाठी धडपड चालू आहे. वर्षभर मी, रवी बापटले आणि नरेश हिच ज्वारी खाणार आहोत. भिजली की, मुळ चव जाते. म्हणून भिजू द्यायची नाही. गेल्या काही वर्षांत मी जी पिवळीची भाकरी खातोय, तिच्यात अजिबात कडवटपणा नाही. या ज्वारीचं तेच तर वैशिष्ट्य आहे. योगायोगाने या पिवळी ज्वारीत जाणवण्याजोगा कडवटपणा आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ही औषधी ज्वारी आहे.चिमण्यांनी ही ज्वारीचं कमी खाण्याचं हेच कारण असावं.

परवाच पुण्याच्या मित्राने फोन करून सांगितलंय, काहीही भाव असू दे. ५० किलो ज्वारी दे. मी म्हटलं, या ज्वारीच्या खर्चाचा सगळा हिशोब लिहिलाय. एकदा रास झाली की, उत्पादन खर्च कळेल. मग भाव सांगतो. तरीही हा भाव शंभर रूपये किलोपेक्षा जास्त असेल.

ज्वारी सहा-सात कट्टे होईल असा माझा अंदाज आहे. नरेश दहा होतील असं म्हणतोय. विक्रीसाठी थोडीच ज्वारी मिळणार आहे. ज्वारी न भिजता रास झाल्यानंतरचा हा विषय आहे. आभाळाचं ऊन जास्तच त्रासदायक असतं. सगळीकडं गरम झळ्या लागताहेत. याला इलाज नाही. साडेतीन-चार वाजता मला आज परत कापायला जायचंय. त्यामुळं दोन तासाचा आराम गरजेचा आणि उद्या कापणं, खुडणं संपवायचं असं लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठणं आमच्यासाठी युध्द जिंकण्यासारखंच आहे.

या ज्वारीचा दर शंभर रूपये किलोपेक्षा अधिक राहिल, असं मी परवाच्या नोंदीत टाकलं होतं. त्यावर एकाने प्रतिक्रिया टाकलीय. हा दर महाग वाटतोय. याला माझं उत्तर- "ही ज्वारी कोणी विकत घेतलीच पाहिजे आणि मी विकलीच पाहिजे असं नाही. मॉलमध्ये जाऊन एखाद्या वस्तुबद्दल असं म्हणण्याचं धाडस कराल का? फक्त शेतीमालाच्या बाबतीतच असं का वाटतं? आमची ज्वारी ही दुर्मिळ औषधी ज्वारी आहे. मी माझ्याच दराने विकणार. इतरांना याचा भाव ठरवता येणार नाही. पुढच्या वर्षी मी ही ज्वारी पेरेनच असं नाही. पेरली नाही तर, पुढची दोन वर्षे मी हिच ज्वारी आनंदाने खाईन. नाहीतरी आमच्या म्हशीला वर्षभर पाणी पिण्यासाठी पीठ लागतं. या ज्वारीचं पीठ तिच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल!

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT