भीमाशंकर बेरुळे
Legal Awareness: प्रत्येक कराराची सुरुवात ही ठरावाने होते. अशा ठरावाच्या निर्मितीसाठी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस प्रस्ताव केला पाहिजे आणि दुसऱ्या व्यक्तीने तो प्रस्ताव स्वीकारला पाहिजे. जेव्हा प्रस्ताव स्वीकारण्यात येतो तेव्हा त्या प्रस्तावाचे ठरावात रूपांतर होते. कायदेशीर कराराच्या निर्मितीमध्ये ठराव हा कायदेशीर असला पाहिजे. भारतीय करार कायद्याच्या कलम १० मध्ये कायदेशीर कराराची व्याख्या पुढील प्रमाणे दिली आहे.
‘जर दोन व्यक्तींमधील ठराव करार पात्र व्यक्तींनी आपल्या मुक्त संमतीने केला असेल आणि त्याचा उद्देश व प्रतिफल कायदेशीर असेल आणि तो ठराव कोणत्याही कायद्याने व्यर्थ ठरवला नसेल तर असा ठराव कायदेशीर करार होतो. तसेच तो ठराव लेखी असावा अथवा नोंदवलेला असावा अशी अट असेल तर, तो लेखी वा नोंदवलेला असला पाहिजे.’
वैध कायदेशीर कराराची व्याख्या
एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस प्रस्ताव केला आणि दुसऱ्या व्यक्तीने तो प्रस्ताव स्वीकारला, तेव्हा त्या प्रस्तावाचे ठरावात रूपांतर होते. कायदेशीर कराराच्या निर्मितीमध्ये ठराव हा कायदेशीर असला पाहिजे.
कायदेशीर कराराच्या आवश्यक अटी
एखादा ठराव कायदेशीर करारामध्ये रूपांतर व्हावयाचा असेल तर त्या ठरावाने खालील अटींची पूर्तता केली पाहिजे, त्यालाच कायदेशीर करार असे म्हणता येईल.
१) किमान दोन व्यक्ती
दोन व्यक्तींमध्ये ठराव होण्यासाठी किमान दोन व्यक्ती आवश्यक असतात. यातील एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस प्रस्ताव केला पाहिजे, दुसऱ्या व्यक्तीने त्यास स्वीकृती दिली पाहिजे. असा प्रस्ताव आणि प्रस्तावाची स्वीकृती या दोन्हीही कायदेशीर असल्या पाहिजेत.
२) करार करण्यास पात्र
ठराव करणाऱ्या दोन्ही व्यक्ती या करार करण्यास पात्र असल्या पाहिजेत. करार पात्र व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती सज्ञान (१८ वर्षे पूर्ण) असून, जिची बुद्धिमत्ता सुज्ञ आहे आणि ज्याला कोणत्याही कायद्याने करार करण्यास अपात्र, ठरविले नाही अशी व्यक्ती होय. जर एखाद्या ठरावातील एक व्यक्ती सज्ञान आणि दुसरी अज्ञान असेल तर तो ठराव कायदेशीर करार होत नाही. तो ठराव कायद्याने व्यर्थ समजला जातो.
३) मुक्त संमती
कायदेशीर कराराच्या निर्मितीमध्ये ठराव करणाऱ्या दोन्ही व्यक्तींची संमती कोणत्याही दबावाशिवाय असली पाहिजे. म्हणजेच कराराच्या दोन्हीही व्यक्तीनी स्वेच्छेने ठरावातील दिलेले आपापले वचने पूर्ण करण्यास तयार असले पाहिजेत. जेव्हा एखाद्या ठरावास व्यक्तीने दिलेली संमती ही बलप्रयोग, अनुचित प्रभाव, कपट, खोटे विधान आणि चूक यांपैकी कोणत्याही एका कारणाने दिलेली असेल, तेव्हा ती संमती मुक्त होत नाही. या कारणाशिवाय देण्यात येणारी संमती ही मुक्त समजण्यात येते, म्हणून व्यक्तीची ठरावास संमती मुक्त असेल तरच कायदेशीर करार अस्तित्वात येतो.
४) कायदेशीर उद्देश
कायदेशीर कराराच्या निर्मितीमध्ये ठरावाचा उद्देश हा कायदेशीर असला पाहिजे जर ठरावाचे उद्दिष्ट हे दुसऱ्या व्यक्तीची फसवणूक करणारे असेल किंवा कायद्याने प्रतिबंध केलेले कृत्य करण्याबाबत असेल किंवा कायद्यातील तरतुदींचा भंग करणारे किंवा नियमांविरुद्ध असेल किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या जिवीतास किंवा त्याचा मालमत्तेस धोका पोहोचवणारे असेल किंवा अनैतिक अथवा सामाजिक धोरणाविरुद्ध समजले जाणारे असेल तर असे ठराव बेकायदेशीर असतात.
५) कायदेशीर मोबदला
कायदेशीर करारासाठी जसे ठरावाचे उद्दिष्ट हे कायदेशीर असावे लागते, त्याप्रमाणे मोबदला देखील कायदेशीर असले पाहिजे.
६) कायद्याने प्रतिबंधित ठराव
कायदेशीर कराराच्या निर्मितीसाठी दोन व्यक्तींमध्ये झालेला ठराव हा कायद्याने प्रतिबंधित नसला पाहिजे. भारतीय करार कायद्याने काही ठराव हे कायद्याने प्रतिबंधित ठरविले आहेत, जरी असे ठराव करार पात्र व्यक्ती, मुक्त संमती, कायदेशीर उद्देश आणि कायदेशीर मोबदला यासारख्या अटी पूर्ण करीत असेल, तरी ते कायदेशीरदृष्ट्या निरर्थक करार समजण्यात येतात. उदा. विवाह प्रतिबंध ठराव, व्यापार धंदा प्रतिबंध ठराव, न्यायदानाच्या कामात हस्तक्षेप करणारा ठराव, पैजेचा ठराव इत्यादी हे सर्व ठराव कायद्याने प्रतिबंधित समजण्यात येतात.
७) ठरावाच्या अटी
अटी या निश्चित आणि निसंदिग्ध असल्या पाहिजेत कारण भारतीय करार कायद्याचा कलम २९ मध्ये ज्या ठरावाचा अर्थ स्पष्ट होत नाही आणि जे ठराव अनिश्चित अर्थाचे असतात ते सर्व ठराव व्यर्थ समजण्यात येतात. उदा. ‘अ’ या शेतकऱ्याने ‘ब’ या शेतकऱ्यास शेत विकण्याचा करार केला. या ठरावामध्ये ‘अ’ हा ‘ब’ला कोणते शेत विकणार आहे, याचा अर्थ स्पष्ट होत नसल्याने तो ठराव व्यर्थ होतो.
८) ठरावातील वचनांची पूर्तता
ठरावातील वचनांची पूर्तता शक्य झाली पाहिजे. कायदेशीर कराराच्या निर्मितीमध्ये ठरावात दिलेल्या वचनाची पूर्तता करणे शक्य झाले पाहिजे. कलम ५६ प्रमाणे ज्या ठरावांची अंमलबजावणी अशक्य असते, ते व्यर्थ समजण्यात येतात.
९) कराराचे लेखी स्वरूप
कायदेशीर बाबींचा पूर्तता ठराव हा लेखी/तोंडी असला तरी चालतो. परंतु कायद्याने तो लेखी करून त्याची रीतसर नोंदणी करण्याविषयीचे बंधन घातले असेल तर तो करार लेखी, स्वरूपात केलेला असावा लागतो, तो तोंडी करून चालत नाही. अशा प्रकारे मालमत्तेच्या, जमिनीच्या खरेदी-विक्रीचे करार हे लेखी स्वरूपात असावे लागतात. त्यांची रीतसर नोंदणी करावी लागते. अशाप्रकारे दोन व्यक्तीमध्ये झालेल्या ठरावाने सांगितलेल्या सर्व अटींची पूर्तता केल्यास तो ठराव कायदेशीर करार होतो. जर तुमचा करार वैध असेल तर त्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते, अवैध करार हे न्यायालयात अमान्य असतात.
: bvberule@gmail.com
(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथेनायब तहसीलदार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.