
भीमाशंकर बेरुळे
Will Certificate Legal Process: मृत्युपत्र हे एक कायदेशीर दस्तऐवज आहे जे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कशी हस्तांतरित होईल हे स्पष्ट करते. परंतु मृत्युपत्राचा दस्त तयार केल्यानंतर त्या व्यक्तीने आपला विचार बदलला तर काय होईल? त्यास पर्याय म्हणजे तो मृत्युपत्राचा दस्त रद्द करणे किंवा त्यात बदल करणे होय.
नोंदणीकृत मृत्युपत्र म्हणजे काय?
मृत्युपत्राचा दस्त तयार नोंदणीकृतच असावा कायदा नाही. अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दस्त देखील कायदेशीररित्या वैध आहे. परंतु मृत्युपत्राच्या दस्तावर संशय निर्माण होऊ नये म्हणून मृत्युपत्राचा दस्त नोंदणीकृत केलेले उत्तम. मृत्युपत्राच्या दस्तास मुद्रांक शुल्कातून देखील सूट देण्यात आली आहे, म्हणजेच मृत्युपत्राचा दस्त साध्या कोऱ्या पेपरवर देखील लिहिलेले असेल तरी ते कायद्याने वापरता येईल, फक्त त्यास नंतर काही कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागेल.
मृत्युपत्र म्हणजे भारतीय नोंदणी कायदा,१९०८ च्या अटीनुसार मृत्युपत्राची नोंदणी अनिवार्य नसली तरी, ते त्याची सत्यता वाढवते आणि वारसांमध्ये वाद होण्याची शक्यता कमी करते.
वैशिष्ट्ये
नोंदणीकृत मृत्युपत्र हे अनोंदणीकृत मृत्युपत्राच्या तुलनेत कायदेशीरदृष्ट्या जास्त वैध असते.
मृत्युपत्र नोंदणीकृत असेल तर आव्हान देणे अधिक कठीण होते. पर्यायाने मृत्युपत्राचा दस्त तयार करणाऱ्याची इच्छा पूर्ण होते.
नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करता येते का?
एखाद्याची इच्छा आहे, की त्याची मालमत्ता ही त्याचे पश्चात कोणास मिळावी हे त्याने निर्धारित केले आहे, व त्यानुसार त्याने मृत्युपत्राचा दस्त तयार करून ठेवला. परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली की मृत्युपत्राचा दस्त तयार करणाऱ्यासच तो मृत्युपत्राचा दस्त रद्दबातल करावयाचा आहे किंवा त्यात बदल करावयाचा आहे. अशा परिस्थितीमध्ये पहिला मृत्युपत्राचा दस्त रद्दबातल करणे किंवा त्यात बदल करणे हा एकाच पर्याय शिल्लक राहतो. तर अशा वेळी भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५ च्या कलम ६२ नुसार मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या हयातीत त्याने तयार केलेले पहिले मृत्युपत्र हे रद्दबातल करता येते किंवा त्यात बदल देखील करता येतो, मग ते नोंदणीकृत असो की अनोंदणीकृत. मृत्युपत्र कधीही रद्द करता येते.
भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५ च्या कलम ६२ नुसार मृत्युपत्र करणाऱ्याला, तो मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तर, त्याने पहिल्यांदा तयार केलेले मृत्युपत्र कधीही रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा कायदेशीर अधिकार आहे. केवळ नोंदणीमुळे मृत्युपत्र कायमस्वरूपी होत नाही. नोंदणी केल्यामुळे केवळ मृत्युपत्राची सत्यता आणि मृत्युपत्र करणाऱ्याचा हेतू सिद्ध होण्यास मदत होते, परंतु ते मृत्युपत्र करणाऱ्याचा तो रद्द करण्याचा अधिकार हिरावून घेत नाही. नोंदणीकृत नसलेले मृत्युपत्र, जर नंतर योग्यरित्या अंमलात आणले गेले तर, पूर्वीचे नोंदणीकृत मृत्युपत्र आपोआप रद्द होईल.
नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करण्याची कारणे.
जीवन बदलते आणि मृत्युपत्र बदलण्याची किंवा रद्द करण्याची गरज वेगवेगळ्या कारणामुळे येऊ शकते.
कुटुंबात बदल :
मृत्युपत्र करणाऱ्याने मृत्युपत्र तयार करून ठेवले आणि नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, त्याचा घटस्फोट झाला, किंवा त्याने पुनर्विवाह केला किंवा परिवारामध्ये बदल झाला, नवीन मुलाचा
किंवा नातवाचा जन्म झाला किंवा पूर्वीच्या नावाने नियुक्त केलेल्या लाभार्थीचा मृत्यू झाला किंवा कुटुंबातील सदस्यांचे वेगळे होणे किंवा समेट, कौटुंबिक नातेसंबंधातील बदलांसह सर्व प्राधान्यक्रम बदलतात आणि मृत्युपत्र तयार करणाऱ्याची इच्छा बदलली तर तयार केलेले मृत्युपत्र देखील बदलणे क्रमप्राप्त ठरते.
मालमत्ता किंवा आर्थिक स्थिती बदलणे :
जुन्या मृत्युपत्रात नमूद केलेल्या मालमत्तेची विक्री झाली,जुन्या मृत्युपत्रात समाविष्ट नसलेली व नंतर नवीन मालमत्ता खरेदी करण्यात आली, मोठ्या प्रमाणात वारसा मिळवणे किंवा नवीन दायित्व वाढवणे, किंवा मृत्युपत्रात नमूद मालमत्ता बदलली असेल आणि जुन्या मृत्युपत्रात तुमचा हेतू देखील बदलला असेल जो अचूकपणे प्रतिबिंबित करत नाही.
सध्याच्या लाभार्थ्यांशी वाद किंवा कायदेशीर बाबी निर्माण झाल्या तर अशा परिस्थितीमध्ये मृत्युपत्र देखील बदलणे क्रमप्राप्त ठरते.
जुन्या मृत्युपत्राच्या वेळी फसवणूक, चुकीचे सादरीकरण किंवा जबरदस्ती केली असेल तर:
जर पूर्वीचे मृत्युपत्र दबावाखाली किवा गोंधळात बनवले गेले असेल आणि याची जाणीव मृत्युपत्राचा दस्त तयार करणाऱ्यास नंतर झाली असेल तर ते मृत्युपत्र रद्दबातल करणे क्रमप्राप्त ठरते.
आरोग्य आणि मानसिक स्थिती
मृत्युपत्र तयार करतेवेळी मृत्युपत्राचा दस्त तयार करणाऱ्याची आरोग्य आणि मानसिक स्थिती ही योग्य निर्णय घेण्यास बाधक असेल आणि नंतर तो व्यक्ती त्या आजारातून बरा झाला असेल तर अशा परिस्थितीत तयार केलेले सदरचे मृत्युपत्र रद्दबातल करणे क्रमप्राप्त ठरते.
नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करण्यासाठी कायदेशीर पद्धती
नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत कोणतेही असो, मृत्युपत्र योग्यरित्या रद्द होईल आणि भविष्यात त्याला आव्हान देता येणार नाही याची खात्री करण्यासाठी, काही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून केले पाहिजे. भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५ मध्ये मृत्युपत्र रद्द करण्याच्या कायदेशीर पद्धती नमूद केले आहे. मृत्युपत्र रद्द करणे हा एक कायदेशीर अधिकार आहे, जो तुम्हाला मृत्युपत्र तयार करणाऱ्यास मग तो नोंदणीकृत असो वा नसो, कायद्याने तुम्हाला दिला आहे.
प्रकार १ : नवीन मृत्युपत्र तयार करणे.
मृत्युपत्र तयार करणाऱ्यास जर त्याने तयार केलेले पहिले मृत्युपत्र बदलण्याची किंवा ते रद्दबातल करण्याची इच्छा झाली तर पहिले मृत्युपत्र रद्दबातल करण्यासाठी नवीन मृत्युपत्र तयार करावे, जेणेकरून पहिले मृत्युपत्र आपोआप रद्दबातल होईल. हा मार्ग पूर्वीचे मृत्युपत्र रद्द करण्याचा सर्वमान्य कायदेशीर मार्ग आहे.
भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५ च्या कलम ६२ नुसार कोणतेही नवीन मृत्युपत्र, जर ते योग्यरित्या अंमलात आणले गेले तर, ते आपोआप मागील मृत्युपत्राची जागा घेईल. परंतु कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी, नवीन मृत्युपत्र तयारकरते वेळी पहिले मृत्युपत्र स्पष्टपणे रद्द करण्यांचा एक कलम असावा. जसे की, ‘मी याद्वारे माझ्याद्वारे पूर्वी केलेले सर्व मृत्युपत्र रद्द करतो’. पूर्वीचे मृत्युपत्र नोंदणीकृत असले किवा नसले तरीही ते रद्द करण्याचा हा सर्वात सुरक्षित आणि स्वच्छ मार्ग म्हणून ओळखला जातो.
प्रकार २ : इच्छापत्र नष्ट करणे
भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५ च्या कलम ७० नुसार मृत्युपत्र रद्द करण्याच्या उद्देशाने सदर मृत्युपत्राचा दस्त भौतिकरित्या म्हणजेच मृत्युपत्र जाळणे, फाडणे किंवा अन्यथा नष्ट करणे, मृत्युपत्र रद्द करण्याचा हेतू असलेल्या व्यक्तीने किंवा त्याच्या उपस्थितीत आणि त्याच्या निर्देशानुसार कोणीतरी, मृत्युपत्र नष्ट केला तर ते रद्द होते.पण हे लक्षात असू द्या, की हे कायदेशीररीत्या वैध असले तरी ते धोकादायक आहे आणि म्हणूनच या प्रकाराने तुम्ही केलेले मृत्युपत्र रद्दबातल करण्याचा मार्ग तुम्ही अवलंबू नये.
प्रकार ३ : लेखी दस्ताने रद्द करणे.
मृत्युपत्र तयार करणाऱ्याच्या हयातीत, त्याने तयार केलेले मृत्युपत्र रद्दबातल करण्याची त्याची इच्छा असेल तर कलम ६२ नुसार तयार केलेल्या मृत्युपत्र रद्द करण्याचा दस्त लेखी तयार करून सदर व्यक्तीने तयार केलेले मृत्युपत्र रद्दबातल करता येते.
कलम ६३ अंतर्गत मृत्युपत्रास दोन किंवा अधिक सक्षम साक्षीदारांकडून ते प्रमाणित करणे आवश्यक आहे. साक्षीदार हे प्रौढ आणि सुबुद्ध असले पाहिजेत आणि शक्यतो मृत्युपत्राअंतर्गत लाभार्थी नसावेत. पहिले मृत्युपत्र रद्दबातल करताना नवीन मृत्युपत्र करणे आवश्यक नाही. जरी पूर्वीचे मृत्युपत्र नोंदणीकृत असले आणि नवीन मृत्युपत्र नोंदणीकृत नसले तरी, नवीन वैधपणे अंमलात आणलेले मृत्युपत्र कायदेशीररीत्या अंमलबजावणीस पात्र असेल. जर तुम्ही मृत्युपत्र नोंदणीकृत करायचे ठरवले तर भारतीय नोंदणी कायदा,१९०८ अंतर्गत दुय्यम उपनिबंधक कार्यालयात ते नोंदणीकृत करावे.
नवीन मृत्युपत्र किंवा पहिले मृत्युपत्र रद्द करण्याचा दस्त वकिलांच्या कार्यालयात, नोंदणी कार्यालयात किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा. कुटुंब किंवा विश्वासू व्यक्तींना नवीन मृत्युपत्र किंवा पहिले मृत्युपत्र रद्द केल्याची सूचना द्यावी, जेणेकरून त्यांना किमान तुमच्या सुधारित हेतूबद्दल जाणून घेण्याची संधी मिळेल. परंतु असे करणे मृत्युपत्र तयार करणाऱ्या व्यक्तीवर बंधनकारक नाही.
नोंदणीकृत मृत्युपत्र आहे म्हणून ते रद्दबातल करता येत नाही, असे नाही. वैयक्तिक संबंध, मालमत्तेची मालकी आणि आर्थिक बाबी कधीही स्थिर नसतात, म्हणून, मृत्युपत्र करणाऱ्याला त्याच्या आयुष्यात कोणत्याही वेळी त्याने तयार केलेले मृत्युपत्र रद्द करण्याची किंवा त्यात बदल करण्याची कायद्याने परवानगी आहे.
महत्त्वाचे म्हणजे मृत्युपत्र म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर तुमची मालमत्ता कोण मिळावी ही तुमची इच्छा पूर्णत्वास नेण्याचा दस्त होय. मृत्युपत्रामुळे मृत्यूनंतरच्या गुंतागुंती टाळता येतील. अन्यथा तुमच्या वारसांमध्ये एक दिवस हेवे-दावे व न्यायालयीन वाद-विवाद होऊ शकतो. तसेच अपूर्ण व कायदेशीर बाबींची पूर्तता न करता केलेल्या मृत्युपत्राच्या दस्तामुळे न्यायालयीन वाद-विवाद होऊ शकतात. त्यामुळे अशा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी नेहमीच वकिलाचा सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्याने कोणतेही दस्त तयार करावेत.
कायद्याने मृत्युपत्र रद्द करण्याची मर्यादा काय आहे?
मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या/तिच्या हयातीत मृत्युपत्र रद्द करण्यावर कोणतीही कायदेशीर मर्यादा नाही. तथापि, मृत्युपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारस किंवा मृत्युपत्राला आव्हान देऊ इच्छिणाऱ्या किंवा रद्द करू इच्छिणाऱ्या कोणत्याही (मृत्युपत्र तयार करणारा, त्याचा लाभार्थी शिवाय) तृतीय पक्षासाठी एक मर्यादा कालावधी आहे, जो त्यांनी १९६३ च्या कालमर्यादा कायद्यानुसार, साधारणपणे मृत्युपत्र अस्तित्वात असल्याबद्दल कळल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत सक्षम दिवाणी न्यायालयात त्यास आव्हानीत केले पाहिजे.
नोंदणीकृत असो की अनोंदणीकृत, मृत्युपत्राला मृत्युपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर मृत्युपत्र तयार करणारा, तो तयार करण्यास अक्षम, त्याची फसवणूक, जबरदस्तीने घेतलेला दस्त किंवा अनावश्यक प्रभाव पडून मिळविलेला मृत्युपत्राचा दस्त न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. जो पर्यंत, मृत्युपत्र तयार करणाऱ्याने स्वतः रद्दबातल करेपर्यंत किंवा नवीन वैध मृत्युपत्र तयार करे पर्यंत किंवा सक्षम न्यायालयाने मृत्युपत्र अवैध घोषित करे पर्यंत, तयार केलेला मृत्युपत्राचा दस्त कायदेशीररित्या वैध रहातो.
: bvberule@gmail.com
(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.