Pune News : १९७२ मध्ये पाण्यासाठी विहीर घेतली होती. त्यानंतर दर वर्षी कमी-अधिक पाऊस होत असल्याने पिण्याच्या पाण्याची फारशी अडचण आली नाही. यंदा पाऊस कमी झाल्याने थोडेफार पाणी आले आहे. पण पुढील सहा महिने हे पाणी राहणार नसल्याने कसे जगायचे याची चिंता लागून राहिली आहे.
खरीप वाया गेल्याने बाजरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. आता जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्नही बिकट होत चालला असून, दिवाळीही सणावरही पाणी फिरावे लागणार असल्याच्या भावना रब्बी हंगामाच्या तोंडावरच राजुरीतील (ता. पुरंदर) शेतकरी विलास भगत यांनी व्यक्त केल्या.
पावसाळ्याच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु जिल्ह्यातील पुरंदरच्या तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या बारामतीच्या हद्दीजवळ असलेल्या राजुरी, रिसे पिसे, नायगाव, पांडेश्वर, माळशिरस, टेकव, कोंडे या गावांत पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. ही सर्व गावे जानाई शिरसाई योजनेच्या कालव्यावर अवलंबून असलेली गावे आहेत. चालू वर्षी या भागात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणेही कोरडीच आहे. त्यामुळे शेती चांगलीच अडचणीत आली आहे.
माजी सैनिक असलेले सदाशिव भगत म्हणाले, की माझ्याकडे साडेचार एकर शेती आहे. यात दोन एकरांवर डाळिंब बाग आहे. त्याची लागवड २०१९ मध्ये केली होती. यंदा फळ धरण्याचे पहिलेच वर्ष होते. पण पाऊस न झाल्याने ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये विकत टँकरने पाणी घेण्याची वेळ आली होती.
बागेला जवळपास २५० टँकरद्वारे पाणी टाकून डाळिंबाचे उत्पादन घेतले. टँकरसाठी नुसता दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च आला आहे. मात्र बाजारभाव चांगले मिळाल्याने एकरी निव्वळ सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. आता पाणी नसल्याने बाग सोडून दिली असून विकत पाणी घेऊन बाग जगवायची झाली तरी जवळच्या पंधरा किलोमीटरच्या अंतरावर टँकरचे पाणी मिळणार नाही, अशी स्थिती आहे.
चाऱ्यांचा प्रश्न बिकट
संबंधित गावात अवघ्या १४ दिवस पाऊस झाला आहे. त्यामुळे आत्तापासून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. या गावांत मागील दोन ते तीन वर्षांत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने चाऱ्याची उपलब्धता चांगली झाली होती. त्यामुळे अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळाले होते.
आता दुधाचे काही प्रमाणात दर कमी झाले आहे. दुसरीकडे चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होऊ लागल्याने शेतकरी उसाच्या वाड्याचा व मक्याची परिसरातील पाच ते दहा किलोमीटर अंतरावरून खरेदी करून जनावरांच्या चाऱ्याची तजवीज करू लागले आहे. त्यातच चाऱ्याचे दर वाढू लागल्याने काही शेतकरी जनावरे नातेवाइकाकडे पाठवून देऊ लागली आहेत.
बारामतीतील पडाने येथील सरूबाई लकडे म्हणाल्या, की आमच्याकडे २०० ते २५० शेळ्या-मेंढ्या आहेत. गावाकडे पाऊस न झाल्याने आता बोपगावकडे आम्ही या शेळ्या मेंढ्या घेऊन चाललो आहे. सहा महिने तरी इकडेच राहणार असल्याने मिळेल तिथे जाऊन शेळ्या मेंढ्या जगवाव्या लागतील.
ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा
पावसाळ्याच्या चार ते पाच महिने पिसे गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. आतापर्यंत या गावात ३५० ते ३७५ टँकर झाले आहेत. गावची एक हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. गावातील नागरिकांचा पिण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
त्यामुळे अजूनही येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरने नाझरे धरणावरून पाणी आणून गावातील आडामध्ये टाकले जाते. त्यानंतर ते पाणी उचलून टाकीत टाकून नागरिकांना दिले जात असल्याचे गावातील नागरिक ज्ञानेश्वर कुटे यांनी सांगितले.
माझ्याकडे तीन जनावरे आहे. जनावरांना खायला चारा नसल्याने उसाचे भेळे गाडीवर घेऊन चाललो आहे. चार रुपयाला एक भेळा घेतला आहे. रोज १०० रुपयांचा चारा लागत आहे. पाणी नसल्याने चारा पीक घेता येईना. त्यामुळे जनावरे फक्त सांभाळायचे काम आता करत आहे.- शिवाजी मुळीक, पिसे, ता. सासवड
राजुरी मंडळात झालेला यंदाचा पाऊस
महिना -- सरासरी पाऊस -- पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
जून -- ११२.३० -- १३.२०
जुलै -- १२७.३० -- ३६.७०
ऑगस्ट -- ९१.०० -- ११.१०
सप्टेंबर -- १३५.२० -- १८८.५०
एकूण -- ४६५.८० -- २४९.५०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.