Drought Crisis : सोयाबीन नाहीच; कपाशीलाही आठ-दहा बोंड

Soybean Cotton Production : अकोला जिल्ह्यातील बहुतांश शेती ही पावसावरच अवलंबून आहे. सोयाबीन आणि कापूस ही दोन जिल्ह्याची प्रमुख पिके आहेत. या पिकांवरच वर्षभराचे अर्थकारण चालते. यंदा या दोन पिकांपैकी सोयाबीनने शेतकऱ्यांना आर्थिक फटका दिला
Drought
DroughtAgrowon
Published on
Updated on

Akola News : सोयाबीन साधलंच नाही. सध्या शेतात कपाशीचे पीक उभे आहे. झाडे सुकू लागली आहेत.. ज्या आठ-दहा बोंड्या लागलेल्या आहेत त्यामधून जो क्विंटल-दोन क्विंटल कापूस येईल तेवढ्यावरच हा हंगाम आटोपण्याची शक्यता व्यक्त करताना शेतकरी अस्वस्थ होत होते.

अकोला जिल्ह्यातील बहुतांश शेती ही पावसावरच अवलंबून आहे. सोयाबीन आणि कापूस ही दोन जिल्ह्याची प्रमुख पिके आहेत. या पिकांवरच वर्षभराचे अर्थकारण चालते. यंदा या दोन पिकांपैकी सोयाबीनने शेतकऱ्यांना आर्थिक फटका दिला.

तालुक्यातील दहिगाव गावंडे, अन्वि मिर्झापूर, मूर्तीजापूरमधील अनभोरा आदी गावांत खरीप हंगामाची वाताहत झाली आहे. या भागात २१ ते २३ दिवसांचा खंड पडलेला आहे. उर्वरित दिवसात जो पाऊस झाला त्याचेही प्रमाण कमीच होते. यंदाच्या खरिपात बहुतांश शेतकऱ्यांना बरोबरीही नाही झाली. घरून खर्च लावण्याची वेळ येऊन ठेपली. अद्याप विम्याचा मागमूसही नाही. शासकीय मदतही अद्याप पोचली नसल्याचे शेतकरी सांगत होते.

योगेश दादाराव गावंडे यांनी १२ एकरात सोयाबीन, तुरीची लागवड केली होती. ते म्हणाले, की पावसाचा महिनाभराचा खंड पडल्याने पिकाची वाढ झाली नाही. सोयाबीनच्या झाडाला चार-सहा शेंगा लागल्या, त्यातही दाणे भरले नव्हते.

Drought
Drought Crisis In Diwali : पीक-पाण्याशिवाय चैतन्य कुठून येणार?

आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले, तर त्यांना एकरी ५० किलो उत्पादन झाले. यामुळे सोयाबीनची सोंगणी न करता थेट ट्रॅक्टर फिरवून पीक जमिनीत गाडले. शेतात सध्या तुरीचे पीक उभे आहे. पण ओल नसल्याने खुंटले आहे. तासात अनेक ठिकाणी खाडे पडलेले आहेत. काही ठिकाणी अमरवेलीचा विळखा आहे. '

सोयाबीनला मिळून १० हजारांवर खर्च आला, पण एकही रुपया परत आला नाही. शेतातल्या बोअरवेलला साडेसात अश्‍वशक्तीचा पंप तीन अश्‍वशक्तीचेही पाण्याची धार देत नाही, अन्‌ काही वेळातच पाणी आटते. रब्बीकरिता पैसाही नाही, अन्‌ पाणीही नाही.

आशीष प्रकाश काळे म्हणाले, की यावर्षी सात ते आठ जुलैला पेरणी केली. पावसाअभावी सोयाबीन नगण्य पिकले. मागच्यावर्षी आठ ते १२ क्विंटलपर्यंत उतारा लागला होता. यावर्षी एक ते दोन क्विंटल होत आहे. सोयाबीनचे पीक खर्चालाही महाग झाले. सोयाबीनमध्ये पेरलेली तीन एकरातील तुरीचे पीकही कापून टाकले. कारण तुरीची वाढ झाली नव्हती. रब्बीसाठी पैसा उभा करण्याचे आता आव्हान आहे.

ऋषिकेश गावंडे म्हणाले, की ६ जुलैला सोयाबीन आणि तुरीची लागवड केली होती. तुरीची वाढ न झाल्याने पीक कापून टाकले. ४० दिवसांचा खंड पडल्याने सोयाबीनचा एकरी तीन क्विंटलचा उतारा लागला.

यंदा एकरी २० हजारांपर्यंत खर्च झाला. खते, कीटकनाशकांचा खर्च अवाढव्य होत आहे. मजुरीचेही दर वाढले. शेतातील तूर, सोयाबीन दोन्ही पिके तोट्याची राहिली. आता रब्बीसाठी शेत तयार करीत आहे. जमिनीत काहीच ओल नसल्याने कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा सुरु आहे. ते पाणी कधी व कितीवेळ मिळेल हे ही निश्‍चित नाही.

Drought
Marathwada Drought : मराठवाड्यातील दुष्काळाबाबत सरकार अनभिज्ञ

रब्बी साधायचा कसा?

खरिपाचे नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हा पर्याय असतो. पण यंदा पाऊस कमी झाल्याने जमिनीत ओल नाही. दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांश हरभरा पेरणी आटोपलेली राहते. पीक ताशी लागून कुठे डवऱ्याचा एक फेरही झालेला असतो. यंदा ओल नसल्याने बिकट परिस्थिती आहे. काटेपूर्णा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात हे गाव येते.

प्रकल्पातून ७ नोव्हेंबरपासून पहिले आवर्तन सुरु होणार असल्याची घोषणा झाली आहे. पण, हे पाणी गावशिवारात पोचायला वेळ लागतो. शिवाय हे पाणी लिफ्ट करून शेतीला द्यावे लागते. यासाठी विजेचा ठावठिकाणा नाही. सर्व शेतकऱ्यांकडे वीज जोडण्या नाहीत. आठ-दहा शेतकऱ्यांमधून

एखाद्याकडे सिंचनासाठी साहित्य आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्या शेतकऱ्याचे सिंचन होईल व नंतर दुसऱ्यांना पाणी घेता येईल. तोपर्यंत आवर्तन बंद होण्याची शक्यता अधिक आहे. खरिपात बरोबरीही झालेली नसल्याने रब्बीसाठी आता बाहेरून पैसा उभा करावा लागणार आहे. ही परिस्थिती जशी छोट्या शेतकऱ्याची तशीच मोठ्यांच्याबाबतही झालेली आहे.

ठळक बाबी

- ऑगस्टमधील पावसाच्या खंडामुळे खरिपाची वाताहत

- सोयाबीनला सर्वाधिक फटका, एकरी १ ते ३ क्विंटल उत्पादकता

- कोरडवाहू कपाशीचे पीकही बेभरवशाचे, झाडे सुकू लागली.

- खरिपाने दगा दिल्याने आता रब्बीकडून अपेक्षा

- रब्बी लागवडीसाठी जमिनीत ओल नसल्याने अडचण

- कालव्याचे पाणी मिळणार, पण यंदा त्यालाही मर्यादा.

- पाणी लिफ्ट करण्याची कसरत

- शासकीय मदतीची सर्वत्र आस

- पीकविमा भरपाई कधी मिळेल, असा सर्वत्र प्रश्‍न

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com