Jalna News : ‘‘ज्वारी पेरली. कुठमुठं उगवली. अजून तिला तीन महिने लागतील. आता ओल नाही. द्यायला पाणी नाही म्हणून ती वाढणार नाही. महिनाभरात वाळून जाईल. ज्यांच्याकडे जनावरं आहेत, त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर. खर्च वसूल होणं लई अवघड. यंदा आमची दिवाळी शिमग्याच्या स्वरूपात आहे.
शिमग्याला जसा साऱ्या पिकाचा निवाडा होतो, तसा दिवाळीतच पिकाचा निवाडा होऊन बसला. पुढे एकही पीक हातात मिळणार नाही. कुटुंबाचा खर्च भागवायला पैसे पुरणार नाहीत, तिथं कर्ज फेडणार कुठून?’’ निवडुंगा (ता. जाफराबाद) येथील शिवाजी जगताप त्यांच्या व गावातील खरीप व रब्बीची विदारक स्थिती सांगत होते.
निवडुंगा हे जवळपास ४८७ उंबरे व साडेतीन हजारांवर लोकसंख्या असलेले गाव. येथील दोन वर्षांपासून मिरचीचे बीजोत्पादन घेणारे तेजराव जगताप म्हणाले, ‘‘यंदा मजुरी अन् फवारणी खर्च वाढला. याशिवाय पिकासाठी विकत पाणी घेतल्याने त्या खर्चाची वाढ झाली. आजवर जवळपास २० टॅंकर ४० हजारांचं पाणी ७ किलोमीटर अंतरावरील सातेफळवरून विकत आणून पिकाला घातलं.
पहिलाच तोडा सुरू आहे. आणखी पीक महिनाभर चालंल. किमान १५ टॅंकर आणखी लागतील. एवढं करूनही गेल्या वर्षी ७५ किलो झालेलं मिरचीचं बीजोत्पादन यंदा २०-२५ किलो होते की नाही काय सांगावं. कारणं जमिनीत ओल नाही, द्यायला पाणी नाही अन् ऊन चांगलंच तापतंय.’’
शेतकरी बालू जगताप म्हणाले, ‘‘१८ एकर शेती. त्यात कपाशी व सोयाबीन प्रत्येकी ९ एकर. त्यातून २५ क्विंटल सोयाबीन झालं. सोयाबीनला एकरी खर्च नांगरणी १८००, रोटा १२००, पेरणी १३००, रासणी ८००, खते १२००, तणनाशक १२००, कीटकनाशक ३०००, सोंगणी ३८००, असे मिळून जवळपास १६५०० रुपये खर्च येतो. सोबतच मळणीसाठी क्विंटलला ३०० रुपये व तयार माल बाजारात नेण्यासाठी १०० रुपये प्रतिक्विंटल खर्च येतो.
मला झालेलं उत्पादन व आलेल्या तसेच येणाऱ्या खर्चाचं गणित कसं जुळवायचं. कपाशी एकरी २ ते ३ क्विंटलपुढे जाणार नाही. पहिली वेचणी सुरू त्यात एकरी एक ते दीड क्विंटल माल घरात आला.
एकरी बियाणे १ हजार रुपये, लागवड ५००, नांगरणी १८००, वखरणी १५००, खते ५०००, मजुरी ४२०० रुपये याशिवाय १००० रुपये प्रतिक्विंटल वेचणीचा खर्च. त्यामुळे किमान २५ हजार खर्च येतो. दुसरीकडे तीन ते ४ क्विंटल कापूस पिकला व आजचा बाजारभाव पकडला, तरी तो २८ हजारांच्या आसपास राहील. आता हिशेब तुम्हीच सांगा? काय परवडलं?’’
एकत्र कुटुंबातील ३० एकर व चुलत्याची २० एकर ठोक्याने अशी ५० एकर शेती पाहणारे बाबासाहेब सखाराम जगताप म्हणाले, ‘‘२० एकरांत ४० क्विंटल सोयाबीन झालं. त्यासाठी दीड लाख खर्च झाला. ५ एकरांतील कपाशीतून कापूस अजून घरात यायचायं. पाऊस नसल्यानं १० एकर जमीन पेरायची राहिली.
तूर फुलात पण तिचं पुढे काय होईल सांगता येत नाही. पाण्याशिवाय शेती नाही हे सरकारला कळत नाही का? शिवारातील ओढ्यांवर असलेल्या छोट्या तीन बंधाऱ्यांत पाण्याचा थेंब नाही. पिकाला संकटात पाणी द्यायची सोय नाही, माल विकायला जावं तर रस्ता धड नाही, विजेचं तर विचारूच नका. पाणी असते तर वीज नसतेच, आता तर पाणीच नाही. मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचे वांधे होऊन बसले, पण त्यांच्यासाठी काहीही करून खर्च करावा लागलंच ना.’’
दृष्टिक्षेपात निवडुंगा
एकूण क्षेत्र : १०९४ हेक्टर
पेरणीयोग्य क्षेत्र : ९४९ हेक्टर
खरीप पीकनिहाय क्षेत्र (हेक्टर) : बाजरी १०, मका ७५, तूर ७०, मूग १०, उडीद १०, सोयाबीन ३४५, कपाशी ४६५.
रब्बी पेरणी : २५ हेक्टर (ज्वारी २०, हरभरा ५)
गतवर्षीची रब्बी पेरणी ः २८० हेक्टर
जाहीर दुष्काळ... एक कोडंच...
‘‘जालना जिल्ह्यातील जालना, परतूर, बदनापूर व घनसावंगी या चार
तालुक्यांतील ८ मंडलांत २१ ते २३ दिवसाचे खंड पडले. कमी अधिक प्रमाणात ४ ते ६ पावसाचे खंड राहिले. ४९ पैकी २४ मंडलांत ७५ टक्क्यांपेक्षा आत, १७ मंडलांत ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान, तर केवळ ८ मंडलांत १०० टक्के पाऊस झाला. नदी, नाले, ओढ्यांना पूर नाही, पाणीसाठ्याची अवस्था अत्यंत बिकट आहे.
तरीही जिल्ह्यातील घनसावंगी व जाफराबाद वगळता सर्व ६ तालुक्यांत सरकारनं गंभीर दुष्काळ जाहीर केला. सरकारला जिल्ह्यातील सहा तालुक्यांत गंभीर दुष्काळ वाटला, मग या तालुक्यांच्या मधात असलेल्या दोन तालुक्यांतच कसा वाटला नसंल. हे कोडं काही उलगडत नाही,’’ असा संताप शेतकरी व्यक्त करीत आहेत.- बालू जगताप
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.