Agriculture Warehouse Agrowon
ॲग्रो विशेष

Warehouse Construction : गोदाम उभारणीमध्ये वजन काटा महत्त्वाचा...

Warehouse Management : गोदामाशी संबंधित व्यवसायात वजन काट्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. वजन काट्याच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये वजन काटा, प्लॅटफॉर्म, एक छोटी खोली आणि वजन काटा चालविणारा व्यवस्थापक यांचा समावेश होतो.

Team Agrowon

मंगेश तिटकारे, हेमंत जगताप

Agriculture Warehouse : गोदामाची निर्मिती करताना जागेची निवड, साठवणूक करण्याची पद्धती, गोदाम व्यवसायातील विविध भागीदार, गोदामाशी निगडित विविध शासकीय योजना अशा विविध मुद्यांची माहिती यापूर्वीच्या लेखांमध्ये आपण घेतलेली आहे. गोदाम निर्मितीमध्ये गोदामाची पाया उभारणी, गोदामाचे छत, अंतर्गत रस्ते, फुटपाथ यासोबतच गोदामातील साठवणूक करण्यात येणाऱ्या उत्पादनाचे योग्य व अचूक वजन करण्यासाठी गोदाम परिसरात वजन काट्याची उभारणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

मजबूत फुटपाथची निर्मिती

गोदामाच्या अंतर्गत रस्त्याची निर्मिती करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला गरजेनुसार व उपलब्ध जागेनुसार फुटपाथची निर्मिती आवश्यक असते. त्यासाठी अंतर्गत मजबूत रस्ते ही गोदाम व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची बाब आहे.

रस्ता तयार करण्यापूर्वी सुरुवातीचा पाया बनविताना कडक मुरूम आणि खडीचा वापर करावा. त्यासाठी १०० मिलिमीटर जाडीचा एम ७.५ प्रतीचा (१:४:८ गुणोत्तरानुसार) काँक्रीटचा थर तयार करावा. त्यानंतर २५० ते ३०० मिलिमीटर जाडीच्या ट्रिमीक्स कॉंक्रीटचा वापर करावा.

ट्रिमीक्स कॉंक्रीटचा थर सपाट करण्यासाठी ट्रॉवेलिंगचा वापर करावा. खडबडीत भागावर खराट्याने मुलामा द्यावा.

ट्रिमीक्स कॉंक्रीटचा थर दिल्यानंतर प्रत्येक १०० मीटर अंतरावर अथवा नेमणूक केलेल्या अभियंत्याच्या सूचनेनुसार प्रत्येक २५ मीटर अंतरावर फट ठेऊन त्यात शालीटेक्स पॅड आणि पॉलीसल्फाईड सिलंट भरावे.

प्रत्येक ४ मीटर अंतरावर २५ बाय ६ मिलिमीटर मापाची फट तयार करून त्यात पॉलीसल्फाइड सिलंट भरावे.

गोदामातील अंतर्गत रस्ते तयार करताना लेसर तंत्रज्ञान काँक्रीट पेवरचा सुद्धा वापर करावा. वास्तविकपणे शासकीय किंवा खाजगी उद्योजक यांच्यामार्फत गोदाम उभारणी करताना वरील प्रक्रिया केली जाते. परंतु सद्यःस्थितीत शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था आणि महिला बचत गटांचे फेडरेशन यांनी अशा तांत्रिक प्रक्रिया राबवाव्यात यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे.

वजन काट्याचे महत्त्व

गोदामाशी संबंधित व्यवसायात वजन काट्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. वजन काटा गोदाम व्यवसायात पर्यायी उत्पन्न मिळवून देतो. वजन काटा ही एक वाहनाचा भार मोजणारी यंत्रणा आहे. याला वेइंगब्रिज सिस्टीम, ट्रक स्केल किंवा रेलरोड स्केल असे म्हणतात. सामान्यत: काँक्रीट फाउंडेशन किंवा स्टीलवर कायमस्वरूपी वजनकाट्याची उभारणी केली जाते. त्यावर एक प्लॅटफॉर्म बसविण्यात येतो, प्लॅटफॉर्मचा वापर त्यावर व्यवस्थितपणे वाहन उभे करून संपूर्ण वजन मोजण्यासाठी केला जातो.

वजन करण्याची प्रक्रिया

साधारणपणे वाहनाचे वजन करण्याचे दोन मार्ग आहेत. सुरुवातीला वजन काट्यावर काहीही सामान ठेवलेले नाही याची खात्री करावी. वजन करताना वाहन प्लॅटफॉर्मवर ठेवून वजन करावे. जर संपूर्ण वाहनावरील माल त्यावर बसत नसेल तर दोन भागांत ट्रक आणि माल याचे वजन करावे. वजनकाट्यावर वजन करताना खालील काही सूचनांचे पालन करावे.

प्लॅटफॉर्मवर वाहन उभे करताना वाहनाचा वेग कमी असावा.

प्लॅटफॉर्मवर वाहन उभे करताना अचानक ब्रेक लावू नये.

प्लॅटफॉर्म योग्य स्थितीत असावा. वजन शून्य स्तरावर ठेवावे.

प्लॅटफॉर्मवर ट्रक उभा करताना योग्य स्थितीत उभा करावा. त्यानंतर मालाने भरलेल्या किंवा रिकाम्या ट्रकचे वजन करावे.

ट्रकचे वजन केल्यावर स्लिपवरील वजन व्यावहारिक आकडेवारीनुसार नमूद असावे. तसेच इतर सर्व तपशील वजनाच्या स्लिपवरील उर्वरित जागेत मावेल अशा पद्धतीने वजनाच्या स्लिपची रचना करावी. सुरुवातीला भरलेल्या ट्रकचे वजन करावे आणि नंतर मोकळ्या ट्रकचे वजन करावे. जेणेकरून मालाचे वजन मिळेल किंवा उलट पद्धतीने सुद्धा ही प्रक्रिया करता येते.

व्यवस्थापन

वजन काट्याच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये वजन काटा, प्लॅटफॉर्म, एक छोटी खोली आणि वजन काटा चालविणारा व्यवस्थापक यांचा समावेश होतो. उद्योग क्षेत्रात व गोदाम व्यवसायात वजन काटा प्रामुख्याने अन्नधान्य, प्रक्रिया उद्योगात आवश्यक कच्चा माल किंवा प्रक्रिया केलेला माल याचे वजन करण्यासाठी केला जातो. चुकीच्या वजनामुळे औद्योगिक क्षेत्र किंवा शेतकरी कोणतीही व्यक्ति असो यांना मोठ्या आर्थिक तोट्यास सामोरे जावे लागते. व्यापारात असणारा व्यापारी अथवा शेतकऱ्यांनी वजनात गोलमाल झाल्याचा अनेक वेळा अनुभव घेतला आहे.

वेगवेगळ्या वजन काट्यांवर शेतीमालाचे वजन करताना वजनात तफावत असल्याचा या लोकांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. वेगवेगळ्या सोयाबीन व मका प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांच्या वजनकाट्यात सुद्धा तफावत असल्याचे दिसून आले आहे. एका कारखान्यात केलेले शेतीमालाचे वजन व दुसऱ्या कारखान्यात केलेले वजन यामध्ये बऱ्याच वेळा फरक दिसतो. त्यामुळे गोदाम व्यवसाय व व्यापार क्षेत्रात वजनकाट्याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे लक्षात येईल.

वजन काटा उभारणी केल्यावर वजनकाटयाच्या संपूर्ण आयुष्यात वजन काट्याने अचूक वजन दाखविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वजन काटा टिकाऊ व विश्‍वसनीय असेल तर गोदामचालकास पर्यायी उत्पन्न मिळू शकेल. टिकाऊ व उत्तम वजन काटे कोणत्याही वातावरणात उदा. पावसाळी वातावरण अथवा उन्हाळी वातावरणात उत्तम कार्य करून अचूक वजन दाखविण्याचे काम करतात. कोणत्याही वातावरणामुळे टिकाऊ व उत्तम वजन काट्यातून चुकीचे वजन दाखविले जात नाही. त्यामुळे वजन काट्यामध्ये नवीन तंत्रज्ञानानुसार नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून वारंवार सुधारणा अथवा बदल करून घ्यावेत.

(माहितीचा स्रोत : भारतीय अन्न महामंडळ माहिती पुस्तिका व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सनदी अभियंता यांची गोदाम उभारणीविषयक माहिती पुस्तिका)

वेइंगब्रिजचे प्रकार

खड्डा करून त्यावर वेइंगब्रिजची उभारणी

या प्रकारच्या वजन काट्याच्या उभारणीमध्ये खड्डा खणून त्यात वजनकाटा उभारावा. जमिनीच्या किंवा रस्त्याच्या पातळीला प्लॅटफॉर्म बांधावा. अशा प्रकारच्या वजन काट्याच्या उभारणीत रॅम्प बांधायची गरज नसते. त्यामुळे कमी जागेत वजन काटा उभारणी करता येऊ शकते.

जमिनीवरील वेइंगब्रिजची उभारणी

या प्रकारच्या वजन काटा उभारणीत जमिनीवर वजन काटा उभारला जातो. प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूंनी वाहन चढ व उतार करण्याच्या अनुषंगाने रॅम्प बनविण्यात येतो. वजन काटा उभारणी शक्यतो गोदामाच्या समोरच्या बाजूस रस्त्याच्या कडेला करावी. जेणेकरून बाहेरून आलेला शेतीमाल वजन करून गोदामात उतरवून पुन्हा रिकाम्या वाहनाचे वजन करणे सोपे होते किंवा याच प्रकारे गोदामातील शेतीमाल वाहनात भरून लगेच समोर वजन करणे सोईस्कर असते.

याचप्रमाणे बाहेरून येणारे जाणारे ट्रकसुद्धा या वजनकाटयाचा वजन करण्यासाठी उपयोग करू शकतात. जेणेकरून या उत्पन्नाच्या माध्यमातून वजन काटा कार्यान्वित करण्याचा खर्च निघू शकतो. जवळपास औद्योगिक वसाहत असेल तर त्या परिसरात हमखास वजन काटा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो. परंतु अशा ठिकाणी व्यावसायिक स्पर्धा असते.

वजन काटा उभारणीसाठी स्वतंत्र शासकीय योजना उपलब्ध नाही, परंतु विविध पायाभूत सुविधा उभारणीच्या योजनांची अथवा कृषी मूल्य साखळीशी निगडित योजनांची अंमलबजावणी करताना महत्त्वाचे आवश्यक घटक गृहीत धरून त्यास योजनेच्या रचनेनुसार अनुदान दिले जाते. सर्वसाधारणपणे ४० टन ते ५० टन वजन करण्याची क्षमता असणारे वजन काटे उभारण्यात येतात.

एक ट्रकचे वजन करण्यासाठी त्याच्या वजनानुसार आणि तेथील क्षेत्रानुसार सुमारे १०० ते १५० रुपये शुल्क आकारले जाते. सुमारे ५ ते १० लाख रुपयांपर्यंत वजन काटा उभारणीचा खर्च होत असल्याचे शेतकरी कंपनी व सहकारी संस्था या समुदाय आधारित संस्थांना दिलेल्या भेटीत निदर्शनास येत आहे.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ,प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain in Maharashtra : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात पावसाचा 'येलो अलर्ट'  

Onion Management : दर्जेदार कांदा उत्पादनासाठी अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

Election Expenditure : खर्च तपासणीसाठी गैरहजर राहणाऱ्या १२ उमेदवारांना नोटिसा

Digital Water Management : ‘डिजिटल वॉटर मॅनेजमेंट’ उपक्रमाची संकल्पना

Kolhapur Soybean Rate : हमीभाव केंद्रावर सोयाबीनची विक्रीसाठी नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT