Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Success Story : ‘एकीचे बळ, मिळते फळ’ ही म्हण प्रत्यक्षात उतरविण्याचे काम चिखली (ता. बदनापूर, जि. जालना) येथील श्री स्वामी समर्थ महिला डाळ मिल उत्पादक गटाच्या १५ महिला सदस्यांनी केले आहे. सकारात्मक विचार आणि कामात सातत्य ठेवले तर यशाला गवसणी घालता येऊ शकते.
Agriculture Processing Industry
Agriculture Processing IndustryAgrowon

संतोष मुंढे

Shri Swami Samarth Mill Manufacturer : चिखली (ता. बदनापूर, जि. जालना) येथील प्रयोगशील शेतकरी महिलांनी २०१३ मध्ये महिला बचत गटाची सुरुवात केली. गटातील सदस्या दरमहा शंभर रुपये बचत करायच्या. परंतु नुसती बचत करून करायचे काय? हे लक्षात घेऊन प्रक्रिया उद्योगातून रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने पंधरा महिला एकत्र आल्या. अडीच वर्षांपूर्वी महिलांनी श्री स्वामी समर्थ महिला डाळ मिल उत्पादक गटाची स्थापना केली.

गटाच्या अध्यक्ष रूपाली नितीन निकम आणि सचिव वंदना सुनील देशमुख यांच्या माध्यमातून एकत्र आलेल्या शुभांगी पवन सोळुंके, शशिकला भास्कर जाधव, विजयमाला प्रल्हादराव निकम, मीरा अरुण निकम, भारती सूर्यकांत निकम, सुवर्णा पंजाबराव सोळुंके, छाया चंद्रकांत निकम, रुखमन मुरलीधर खरात, गीता परमेश्‍वर धनेधर, मनीषा कृष्णा वखरे, अलका सुदर्शन राऊत, चंद्रकला संतुकराव अंबिलवादे व कमल विनायकराव निकम यांनी विविध शेतीमाल प्रक्रियेविषयी चर्चा केली.

गटासमोर डाळ मिल, शेवया निर्मिती तसेच मसाला उद्योगाचे पर्याय होते. प्रत्येक उद्योगासाठी लागणारा कोणता शेतीमाल आपल्या गाव शिवारात सहज उपलब्ध होऊ शकतो याबाबत चर्चा झाली. यातून मूग, तूर, हरभरा, उडीद इत्यादी शेतीमाल गावशिवार उपलब्ध होता. त्यामुळे गटाने डाळ मिल प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.

भांडवल, प्रकल्पाची उभारणी

गटाने बदनापूर पंचायत समितीअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत (उमेद) डाळ मिल प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली. अनेक वर्षांपासून केलेल्या आर्थिक बचतीचा गटाला प्रकल्प उभारण्यासाठी मोठा आधार मिळाला. बचतीमुळे सुमारे नऊ लाखांची गुंतवणूक डाळ मिल प्रक्रिया उद्योगासाठी करणे गटाला शक्य झाले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत तीन लाखांचे कर्ज मिळाले.

Agriculture Processing Industry
Food Processing : साताऱ्यात अन्नप्रक्रिया उद्योजकता प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बचत गटाच्या सचिव वंदना सुनील देशमुख यांनी कर्जाचे हप्ते फिटेपर्यंत गटाला प्रक्रिया उद्योगासाठी जागा दिली. साधारणपणे २२ बाय २८ फूट जागेवर पत्र्याचे शेड तयार करून प्रक्रिया उद्योग उभारणी करण्यात आली. यासाठी बचत गटातील सर्व पंधरा सदस्यांचे सहकार्य लाभले. सुरुवातीला स्वतःकडे उपलब्ध असलेल्या तूर, मूग, उडीद, हरभरा आदींवर शेतीमालावर प्रक्रिया करून परिसरातील ग्राहकांना डाळीची विक्री करण्यात आली.

त्यानंतर इतर शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेली तूर विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून डाळनिर्मितीला गती देण्यात आली. केवळ डाळ उत्पादन आणि विक्री करून भागणार नसल्याने परिसरातील शेतकरी कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन डाळ मिल व्यवसायाबरोबरच गटाने गहू स्वच्छता यंत्र, शेवया तयार करण्याचे यंत्र, शेंगा फोडणी यंत्र, मसाला तयार करण्याचे यंत्र, गव्हाचा चीक काढण्याचे यंत्र आणि पिठाची गिरणी खरेदी केली. यासाठी दहा लाखांची वाढीव गुंतवणूक केली.

प्रक्रिया आणि विक्रीचे नियोजन

गटाने प्रक्रिया उद्योग सुरू केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात २०२२ मध्ये तीन क्विंटल डाळीची विक्री केली. २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड आणि जालना येथे गटाने दहा क्विंटल डाळीची विक्री केली. २०२४ मध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि सिल्लोडमध्ये आतापर्यंत नऊ क्विंटल डाळीची विक्री झाली आहे.

जवळपासच्या गावातील शेतकऱ्यांकडील तूर खरेदी करून डाळ तयार केली जाते. जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीना यांच्या संकल्पनेतून बचत गटासाठी तयार केलेल्या ‘जालना जीविका’ या ब्रँडखाली डाळीचे पॅकिंग केले जाते. पॅकिंग केलेली डाळ जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वितरकांकडे विक्रीसाठी पाठवली जाते. सध्या तुरीचा भाव साधारणपणे ११,५०० रुपये प्रति क्विंटल आहे.

Agriculture Processing Industry
Processing Industry : महिलांनी अन्नप्रक्रिया उद्योग उभे करावेत: दिलीप वळसे पाटील

तयार तूरडाळ १५० ते १६० रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जाते. याशिवाय शेतकरी तसेच ग्राहकांना मजुरीवर डाळ तयार करून दिली जाते. गटाने २०२२ मध्ये २०० क्विंटल डाळ ८०० रुपये प्रति क्विंटल दराने तयार करून दिली. २०२३ मध्ये २५० क्विंटल डाळ ९०० रुपये आणि यंदा आतापर्यंत १०० क्विंटल डाळ ९०० रुपये प्रति क्विंटल दराने ग्राहकांना तयार करून दिली आहे.

बचत गटाद्वारे तयार झालेली डाळ रसायन अवशेष विरहित असल्याने ग्राहकांकडून चांगली मागणी असते. मागील दोन वर्षांत गटाला वार्षिक दोन लाखांचे उत्पन्न झाले. तसेच डाळ मिल वगळता इतर प्रक्रिया उद्योगातून जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न झाल्याची माहिती अध्यक्ष रूपाली निकम व सचिव वंदना देशमुख यांनी दिली.

गटाने घेतले प्रशिक्षण

गटाच्या सदस्यांनी प्रक्रिया उद्योगाला सुरुवात करण्यापूर्वी डाळ निर्मितीचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर आणि उमेद अभियानांतर्गत घेतले होते. गटाच्या अध्यक्षा रूपालीताईंना उमेद (जि. जालना), जल जीवन मिशन, (छत्रपती संभाजीनगर), कृषी विभाग (जालना) यांच्यातर्फे उत्कृष्ट व्यवसायाबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

रूपाली निकम ७६२०१२८३७२

वंदना देशमुख ८३९०३१८९०९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com