Agriculture Warehouse : गोदाम उभारणी करतानाचे नियोजन

Warehouse Construction : गोदाम निर्मितीमध्ये गोदामाचा पाया उभारणीस अत्यंत महत्त्व आहे. गोदामाच्या पाया उभारणीचा व पूर्णत्वाचा एक अंतिम भाग म्हणजे प्लिन्थ लेव्हल किंवा पायाचा अंतिम स्तर.
Agriculture Warehouse
Agriculture Warehouse Agrowon
Published on
Updated on

मंगेश तिटकारे, हेमंत जगताप

Warehouse Update : गोदाम पुरवठा साखळीत गोदाम निर्मितीला अनन्य साधारण महत्त्व असले, तरी गोदाम उभारणी हा अत्यंत खर्चीक विषय आहे. त्यामुळे शासनामार्फत शासकीय योजनांच्या माध्यमातून सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटांचे फेडरेशन या समुदाय आधारित संस्थांसाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून बऱ्यापैकी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. गोदाम निर्मितीची तांत्रिक माहिती गोदाम उभारणी करणाऱ्या लाभार्थ्याला मिळावी, त्यासोबतच मजबूत, वैज्ञानिकदृष्ट्या योग्य व प्रमाणित गोदामांची निर्मिती होऊन गोदाम पुरवठा साखळीत सहजरीत्या प्रवेश करण्याचे सूत्र समजावे. त्याआधारे गोदाम पुरवठा साखळीत समुदाय आधारित संस्थांनी व्यवसाय उभारणी करावी, या उद्देशाने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि जागतिक बँक अर्थसाह्यित स्मार्ट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने माहिती देण्यात येते.

गोदामाची निर्मिती करताना गोदामाच्या जागेची निवड, गोदामात उत्पादनाची साठवणूक करण्याची पद्धती, गोदाम व्यवसायातील विविध भागीदार, गोदामाशी निगडित विविध शासकीय योजना अशा विविध मुद्यांची माहिती यापूर्वीच्या लेखांमध्ये घेतली आहे. गोदाम निर्मितीमध्ये गोदामाचा पाया उभारणीस अत्यंत महत्त्व आहे. गोदामाच्या पाया उभारणीचा व पूर्णत्वाचा एक अंतिम भाग म्हणजे प्लिन्थ लेव्हल किंवा पायाचा अंतिम स्तर.

प्लिन्थ लेवल

प्लिन्थ लेवल म्हणजे मूळ जमिनीचा स्तर आणि गोदाम उभारणीकरिता फाउंडेशनमुळे तयार झालेल्या जमिनीचा स्तर किंवा गोदामाचा पाया रचल्यानंतर उत्पादनाची साठवणूक करण्यासाठी तयार झालेला अंतिम सपाट स्तर.

उंची

प्लिन्थ लेव्हल ही गोदामाच्या बाजूला असलेल्या अंतिम रस्त्यापासून किमान ८० सेंमी किंवा २ फूट २० सेंमीपेक्षा उंच असावी. यामुळे उंदीर, घुशी यांना गोदामात शिरण्यास अडसर निर्माण होऊ शकतो. कारण हे प्राणी २ फुटांपेक्षा जास्त उंच उडी मारू शकत नसल्याने गोदामातील धान्याचे नुकसान टाळता येते.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

काळी जमीन असेल तर पायाच्या बाजूला किमान ३ फुटांपर्यंत काळी माती काढून त्यात कठीण मुरूम भरावा. पाणी मारून त्यावर दाब देऊन सपाट करून घ्यावे. याप्रमाणेच ही प्रक्रिया फाउंडेशनच्या आतल्या भागात करून आपल्याकडे मुरूम शिल्लक असेल तर त्यात भरावा, अन्यथा इतर ठिकाणाहून शासनाची रॉयल्टी भरून मुरूम आणून तो भरावा. त्यावर पाणी मारून जास्तीत जास्त चोपून सपाटीकरण करावे. यात जेवढा जास्त कठीण व मऊ मुरूम बसेल तेवढा जास्त वापर करण्यात यावा. त्यावर पाणी मारून पुन्हा सपाटीकरणाची प्रक्रिया राबवावी. त्यानंतर त्यावर १५ ते २० सेंमी नदीच्या वाळूचा थर देऊन पाणी मारून पुन्हा सपाटीकरण करावे.

वाळूच्या थरानंतर २० सेंमी जाडीचा लोखंडी जाळीचा जास्त आणि कमी जाडीचा ६५:३५ या प्रमाणात थर अंथरावा. या थरावर १० सेंमी जाडीचा ७.५ ग्रेड सिमेंट काँक्रीटच्या थरावर १५ ते २० सेंमी जाड एम-२० ग्रेड सिमेंटचे प्रक्रिया केलेले काँक्रीट अंथरावे. हे ट्रिमीक्स काँक्रीट अंथरताना त्या थरातील पाणी, हवा व पोकळी काढून घेतल्याने गोदामाच्या जमिनीच्या थरातील वरील भागाला तडे जात नाहीत. या थराला डायमंड कट किंवा २५ बाय ६ मिलिमीटरच्या रेषा मारणे आवश्यक असते. जेणेकरून गोदामातील ओली जमीन स्थिरस्थावर होताना हवा, पाणी व तापमान यामुळे जमिनीचे आकुंचन व प्रसरण झाल्याने ट्रिमीक्स काँक्रीट केलेल्या जमिनीला तडे जाणार नाहीत.

जमीन वाळल्यानंतर पॉलिसल्फाइड सिलंटने या डायमंड कट गृव्ह्जच्या जागा भरून घ्याव्यात. तसेच जमिनीच्या वापरानुसार त्याची मजबुती आणखी वाढावी. यासाठी ट्रिमीक्सवर आयर्न हार्डनाइट किंवा सिलिकेट पावडर वापरून जमिनीला मुलामा करावा, जेणेकरून गोदामातील जमीन अत्यंत मजबूत होऊन तिचे आयुष्य पुढील ५० ते १०० वर्षे वाढून कितीही मोठा वजनाचा भार ती सहज सहन करू शकते. अशा जमिनीवर कितीही वजनाच्या शेतीमालाची आदळआपट झाली तरी अशा जमिनीचे सहजासहजी नुकसान होत नाही. दुरुस्तीची सुद्धा वर्षानुवर्षे शक्यतो गरज पडत नाही. अशाप्रकारे गोदामाच्या फाउंडेशनच्या वरील मुख्य स्तर मजबूत व देखभाल मुक्त असेल अशा पद्धतीने तयार करण्यात यावा.

जुन्या गोदामांमध्ये प्रामुख्याने प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थाकडे असणाऱ्या गोदामांचे निरीक्षण केले तर त्यामध्ये शहाबादी फरशी बसविलेली आपणास दिसेल. या शहाबादी फरश्या मजबूत असायच्या. परंतु उंदीर, घुशी यासारखे प्राणी एकदा गोदामात शिरले की दोन फरशांच्यामध्ये असणारा सिमेंटचा मुलामा कुरतडून त्याला बिळे पाडायचे. या बिळातून फरश्यांच्या खाली अंथरलेली वाळू उंदीर, घुशी बाहेर काढतात. परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर यामुळे हळूहळू संपूर्ण गोदामातील जमिनीचे नुकसान होते. तसेच खतांच्या साठवणुकीमुळे सुद्धा फरशांचे फार मोठे नुकसान होते. खताचा शहाबादी फरश्या व सिमेंटसोबत संपर्क आल्याने हळूहळू फरशी आणि सिमेंटला लहान लहान खड्डे पडून गोदामाची जमीन खराब होते.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पायाभरणी व प्लिन्थ लेव्हलपर्यंत बांधकाम पूर्ण करताना लाभार्थी वर्ग अथवा बांधकाम व्यावसायिक आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी अथवा स्वार्थासाठी नको तिथे पैसे वाचवायला जातात. कारण गोदामाचे बांधकाम करताना फाउंडेशन व फाउंडेशनच्या अंतर्गत भागातील मुरमाची योग्य प्रमाणात भरणी आणि त्यावर पाणी मारून दाब देऊन सपाटीकरण ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते.

तसेच यानंतर ट्रिमिक्स करण्याची प्रक्रियासुद्धा तितकीच महत्त्वाची असते. परंतु या संपूर्ण कामातच बऱ्याच वेळेस दिरंगाई व वैयक्तिक कलुषित उद्देश ठेवल्यामुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्याच वर्षांत ट्रिमिक्स केलेल्या गोदामाच्या जमिनीला तडे जाण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्लिन्थ लेव्हल सोबतच गोदामाच्या पायात मुरूम भरणे आणि ट्रिमिक्स प्रक्रिया यात कोणताही हलगर्जीपणा व कलुषित उद्देश यांना थारा देणे गोदाम मालकास परवडणारे नाही.

जुन्या गोदामांची परिस्थिती

प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या गोदामांची परिस्थिती बघितली तर ती अत्यंत वाईट असल्याचे विविध ठिकाणी संस्थांच्या गोदामांना दिलेल्या भेटीतून निदर्शनास येते. सरासरी ७०० ते १००० सभासद असणाऱ्या राज्यातील २०,८४४ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांपैकी सुमारे ५००० संस्थांकडे गोदामे आहेत. परंतु काही अपवाद वगळता या गोदामांना गोदाम म्हणावे, की संस्थेचे कार्यालय म्हणावे की आणखी कोणते नाव द्यावे हे समजत नाही. कारण गोदामांची अंतर्गत जमीन खराब झाली आहे, गोदामाचा पाया किंवा फाउंडेशन किंवा प्लिन्थ लेव्हल गोदामाच्या बाहेरच्या रस्त्याची उंची वाढल्याने गोदामाच्या बाहेरच्या जागेचा स्तर व आतल्या जागेचा स्तर एकसमान झाला असल्याने गोदामात सहज उंदीर, घुशी शिरून नुकसान करीत आहेत. पावसाळ्यात गोदामात पाणी शिरत आहे किंवा गोदामाच्या भिंतीत पाणी मुरून भिंतींचे नुकसान होत आहे.

गोदामाच्या आजूबाजूला कुंपण न घातल्याने गोदामाच्या परिसरात जनावरे बांधण्यात येतात, त्यामुळे तेथे रोजच्या रोज पडणारे शेण व गोमूत्र यामुळे गोदामाच्या भिंतीला हानी पोहोचते.

बऱ्याच ठिकाणी संस्थेला जमीन ९९ वर्षांच्या कराराने मिळाल्याने त्यावर गोदाम उभारलेले असते. हे गोदाम सुमारे ३० ते ४० वर्षांचे जुने गोदाम असते. काही काळाने ज्याची जमीन आहे तो गोदामाचा ताबा घेऊन संस्थेचे न ऐकता त्यात मन मानेल तसे घरगुती साहित्य ठेवतो. त्यामुळे सुद्धा गोदाम आणि त्याची अंतर्गत जमीन खराब होते.

काही ठिकाणी गोदामाच्या बाजूला मल, मूत्र, कचरा यामुळे अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. काही ठिकाणी गोदामाच्या आतल्या बाजूला गरीब कुटुंब किंवा बेवारशी लोक राहत आहेत. एका बाजूला शासन या संस्था बळकट व्हाव्यात याकरिता जोरदार प्रयत्न करीत आहे परंतु दुसऱ्या बाजूला काही अपवाद वगळता प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे संचालक संस्थांना पुढे नेण्यास तितकेसे उत्सुक दिसत नाहीत. यामुळे अशा संस्थांची प्रगती व्हावी असे शासनास आणि या संस्थांच्या सभासदांना कितीही वाटत असले तरी जोपर्यंत संस्थांच्या संचालक मंडळास मनापासून वाटत नाही, तोपर्यंत राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना चांगले दिवस

येतील असे वाटत नाही. याला अपवाद काही प्रगती करण्यास इच्छुक संस्था असल्या तरी त्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.

प्रशांत चासकर,

९९७०३६४१३० (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com