Book Review  Agrowon
ॲग्रो विशेष

Book Review : हवामानाची तोंडओळख

Weather forecast Book Review : हवामानाविषयी मराठीमध्ये फारच कमी माहिती उपलब्ध आहे. जी काही माहिती उपलब्ध होते, ती प्रामुख्याने मॉन्सूनचे पूर्वानुमान, अंदाज आणि तत्सम विषयाची आणि तीही केवळ सरकारी पातळीवरून, सरकारी भाषेमध्ये!

Team Agrowon

सतीश कुलकर्णी

Book : हवामानाविषयी मराठीमध्ये फारच कमी माहिती उपलब्ध आहे. जी काही माहिती उपलब्ध होते, ती प्रामुख्याने मॉन्सूनचे पूर्वानुमान, अंदाज आणि तत्सम विषयाची आणि तीही केवळ सरकारी पातळीवरून, सरकारी भाषेमध्ये! (म्हणजे सोपी भाषा अवघड कशी करायची, यासंबंधीचे सरकारी अधिकाऱ्यांचे स्वतःचे एक खास भाषाशास्त्र आणि व्याकरण असते.) त्यामुळे चांगले शिक्षण घेतलेल्या प्रौढ माणसांची अनेक वेळ अर्थ समजता समजता मारामार होते.

अशा वेळी अल्पशिक्षित शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या तर ते डोक्यावरूनच जाते. अशा वेळी काही तथाकथित तज्ज्ञ ग्रामीण बोलीभाषेमध्ये काहीही अव्वाच्या सव्वा दावे व खऱ्या खोट्या ग्रामीण म्हणी, कल्पना यांच्या आधारे लोकांमध्ये हवामान विषय नेतात.

त्यांनी दिलेले अंदाज किती खरे आले आणि किती खोटे यांचे दावे आपण थोडे बाजूला ठेवून पाहिले तरी अशा लोकांची प्रसिद्धी वाढत चालल्याचे आढळेल. खोट्या कल्पनांचा लोकांमध्ये शास्त्रीय म्हणून प्रसार होण्याचा धोका मोठा आहे. अशा वेळी मुलांना, सामान्यातील सामान्य माणसाला समजेल, अशा भाषेमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी केला आहे. ते स्वतः भारत सरकारच्या सेवेमध्ये ४० वर्षे कार्यरत होते. त्यातही पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे कामही दीर्घकाळ केले आहे. मुलांसाठी या विषयाची तोंडओळख म्हणून हवामानाविषयीचे Weather messenger हे एक पुस्तक इंग्रजीतून प्रथम लिहिले होते. त्याला अनेक शाळांकडून चांगला प्रतिसादही मिळाला.

मात्र ही माहिती मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचली पाहिजे, या ध्यासातून प्रयत्न सुरू झाले. या भाषांतराच्या कार्यामध्ये डॉ. मनीषा खळदकर, विनायक खळदकर, विनायक देव, सौ. अस्मिता देव, सौ. सुहासिनी पवार यांची मोलाची मदत झाली. मूळ पुस्तकामध्ये आवश्यक ती भर घालण्यात आली. या पुस्तकाची निर्मिती प्रामुख्याने विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेवून झालेली असली तरी सर्वसामान्य नागरिकांना हवामान विषयाची तोंडओळख होण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल.

हवामान बदलामुळे शेतकरी व समाजाला सामोरे जाव्या लागणाऱ्या संकटांची मालिका विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सातत्याने मांडत आहेत. मात्र आजही अनेकांना हवामान हा प्रकारच नेमका कळलेला नसतो. त्यामुळे एक किंवा अनेक संकल्पनाची सरमिसळ करून गोंधळ घालणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या अवतीभवती तज्ज्ञ म्हणून वावरताना दिसतात. अभ्यासानुसार या संकल्पनामध्ये हवामान, पर्यावरण (Enviornment), परिसंस्था (Ecosystem), परिस्थितिकी (Ecology), पृथ्वीच्या १४ कि.मी, व त्यावरील उंचीवरील भौतिकी व रासायनिक विषयांचा अभ्यास (Aeronomy), वातावरणाचा सर्वात खालील स्तराचा - मुक्त वातावरणाचा अभ्यास (Aerology), पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचा व त्यातील भौतिकी प्रक्रियांचा अभ्यास (atmospheric science), सागरशास्त्र (Oceanography), वसुंधरा शास्त्र (Earth science) असे वेगवेगळे प्रकारही पडतात.

नुसत्या हवेचा विचार केला तरी हवेचे विविध घटक, त्यांच्या मापनासाठी वापरली जाणारी साधने; हवेचे तापमान, त्याचे प्रकार, कमी अधिक तापमानामध्ये मानवी शरीर, पिके यावरील परिणाम, त्यापासून बचावासाठी घरांपासून विविध बाबी यांचा समावेश होतो. वारे व त्यांचे प्रकार, हवेतील पाण्याची वाफ, त्यातून तयार होणारे विविध प्रकारचे ढग, त्यांचे वर्गीकरण, निरीक्षणे यांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. विजांचे चमकणे या बाबीचा परिचय करून देण्यापासून त्यापासूनच्या संरक्षणापर्यंतची माहिती देणारे एक प्रकरण आहे. या सर्वसामान्य ज्ञान देणाऱ्या माहितीनंतर भारतीय हवामान, मॉन्सून, दुष्काळ, पूर, पावसाचे आम्लयुक्त वगैरे विविध प्रकार अशा तुलनेने आपल्याशी जोडलेली माहिती दिलेली आहे.

हवामानाचा अंदाज मांडणाऱ्या विविध भारतीय संस्थांचा ओळख आणि त्यांच्या संकेतस्थळांची माहिती देण्यात आलेली आहे. एकूणच हवामान साक्षरता वाढविण्यासाठी अशा पुस्तकाची गरज मराठी भाषेमध्ये कायमच राहणार आहे. अर्थात, मराठी शब्दांसोबतच इंग्रजी शब्दही देण्यात आलेले आहे. त्याचा फायदा दोन्ही भाषा जाणणाऱ्यांना होणार आहे. हवामान बदल आणि त्याचा आपल्यावर
होणारा परिणामही मांडण्याचा त्रोटक प्रयत्न केला आहे. अर्थात, याविषयातील अभ्यास सतत सुरू असून, त्याविषयी शेतीमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येकालाच अपडेट राहावे लागणार आहे, यात शंका नाही.


ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

Rohit Patil NCP-SP : विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना मोठा फटका; तरिही सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचाच

Maharashtra Assembly Result 2024 : अहिल्यानगर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘सुपडासाफ’

Food Processing Industry : प्रक्रिया उद्योगात मिळविली ठळक ओळख

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

SCROLL FOR NEXT