Soil Management : जमिनी विविध कारणांमुळे खराब होऊ शकतात. त्यातील दूषित व प्रदूषित पाण्यामुळे जमिनी जेव्हा खराब होतात, तेव्हा त्यात केवळ क्षारांचेच प्रमाण वाढते असे नाही, तर हानिकारक रसायनेही असू शकतात. अशा जमिनी खारवलेल्या, क्षारयुक्त, रसायनांनी भरलेल्या असल्याने त्यात वनस्पतींची वाढ होत नाही. परिणामी, अशा जमिनी पिके घेण्यासाठी योग्य राहत नाहीत. परिणामी प्रदूषित जमिनी पूर्णपणे पडीक राहून शेतकऱ्यांचे नुकसान होते. माती निर्जीव व पडीक झालेली असते. .विशेषतः कारखान्याच्या सांडपाण्याचा कोणत्याही मार्गाने शेतात शिरकाव होत असेल, तर नुसतीच नापीक होते असे नाही, तर ती बऱ्याचदा त्यात विषारी घटकांचे प्रमाणही वाढलेले असते. अशा जमिनीवर पडणारे पाणी वाहताना दूषित होऊ शकते आणि ते जिथे मिळते, त्या ओढे, नाले किंवा प्रवाहालाही प्रदूषित करू शकते. त्याच प्रमाणे असे पाणी जमिनीत सातत्याने मुरत राहिल्यास ते भूजलही विषारी करू शकते. हेच पाणी आपण उपसून अन्य शेतामध्ये सिंचनासाठी वापरल्यास ती जमीनही क्षारयुक्त होऊ शकते. असेच चक्र चालू राहते..जमीन दूषित, प्रदूषित होण्याची प्रमुख कारणेसिंचनासाठी आवश्यकतेपेक्षा खूप अधिक पाणी देणे.खोल बोअरवेलचे अधिक क्षारयुक्त पाणी सिंचनासाठी वापरणे.रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर.एकच एक पीक सतत घेणे.कारखान्याचे सांडपाणी भूजलात जाणे किंवा मातीत पसरणे.कारखान्यातून उत्सर्जित होणाऱ्या राख, धूर यातून विषारी पदार्थ हवेत किंवा जमिनीवर पसरणे.प्रदूषित जमिनीखालील भूजलही प्रदूषित होते. असे भूजल अन्य शेतात वापरल्यास तेथील माती प्रदूषित होणे.परिसरातील खाण कामामुळे उडणारी धूळ, खराब पाणी शेतात पसरल्याने जमीन प्रदुषित होते. तसेच खाणीतील खनिजे काढताना निघालेले पाणी किंवा खनिजे धुऊन सोडलेले पाणी शेतात पसरून ती माती प्रदूषित होते. अशी प्रदूषित माती कशी सुधारायची, याची माहिती घेण्यापूर्वी आपण जमीन सुपीक असणे म्हणजे काय ते पाहू..Soil Testing: मातीपरीक्षणातून रब्बीसाठी खतांचे करा नियोजन.जमीन सुपीक किंवा उपजाऊ असणे म्हणजे काय?जमिनीत योग्य प्रकारचे सूक्ष्मजीव योग्य प्रमाणात असणे. त्यांची सूक्ष्म जीवसृष्टी तिथे एक विशिष्ट अन्नसाखळीची निर्मिती करून त्यात एकमेकांचे अस्तित्व टिकवते. हेच सूक्ष्मजीव जमिनीतील विविध अन्नघटक झाडांना व पिकांना शोषून घेण्यायोग्य स्थितीत आणतात. त्यामुळे ही जीवसृष्टी झाडांसाठी उपयुक्त व मदतगार ठरते. हे जिवाणू किंवा सूक्ष्मजीव केवळ जिवंत असतानाच मदत करतात असे नाही, तर ते मृत पावल्यानंतर त्यांच्या शरीरातील अन्नघटक झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. या सूक्ष्मजीव सृष्टीच्या पोषणासाठी झाडेही त्यांनी तयार केलेल्या अन्नातून अकोलाइट्स (म्हणजेच विशिष्ट शर्करा) मुळाद्वारे जमिनीत सोडत असतात. असे हे परस्परावलंबन आहे. ही सूक्ष्मजीव सृष्टी मातीत टिकणे, सक्रिय राहणे हे मातीतील सेंद्रिय पदार्थ आणि आर्द्रतेवर अवलंबून असते. कोरड्या जमिनीत वा अल्प आर्द्रतेत हे टिकाव धरू शकत नाहीत. या सूक्ष्मजीव सृष्टीचीही एक अन्नसाखळी असते. जिवाणू, प्रोटोझुवा, एकपेशीय वनस्पती, बुरशी, कीटक हे सगळे एकमेकांचे भक्ष्य किंवा भक्षक असतात. जमिनीत असणारे सेंद्रिय पदार्थही या अन्नसाखळीचा भाग असतात. हे परस्परावलंबन जेवढे भक्कम, तेवढे पीक गुणात्मक व संख्यात्मक बाबतीत भरघोस येते..माती दूषित व प्रदूषित होते म्हणजे काय? तर वर वर्णन केलेली अन्नसाखळी उद्ध्वस्त होते. म्हणजेच जमिनीत वाढलेले विविध क्षार किंवा जड धातू हे घटक सूक्ष्मजीवांसाठीही अधिक हानिकारक ठरतात. स्वतःचे अस्तित्व टिकविण्याचा ताण सूक्ष्मजीवांवर वाढतो. त्यांची कार्यशीलता मंदावते वा पूर्णपणे थांबते. त्यांची संख्या कमी होत जाते. साहजिकच ते झाडांना वा पिकांना अन्नघटक उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. परिणामी सुरुवातीला अशा जमिनीमध्ये पिकांचे उत्पादन कमी कमी होत जाते. अंतिमतः पिके व झाड वाढणार नाही, अशी स्थिती निर्माण होते. अशा जमिनीत शेती करण्याची शेतकऱ्याची कितीही इच्छा असली तरी उत्पादनच येत नाही म्हणून पडीक ठेवण्यावाचून पर्याय राहत नाही.जमिनी उपजाऊ कशा करायच्या?अशा जमिनी उपजाऊ करण्याच्या साधारण बायोरेमेडिएशन आणि बायोऑगमेंटेशन या दोन पद्धती आहेत. त्या दोन्हीही पद्धतीमध्ये सूक्ष्मजीव सृष्टी अत्यंत महत्त्वाची आहे. एकतर सूक्ष्मजीव सृष्टीला मदत करावी लागते किंवा सूक्ष्मजीव सृष्टीची मदत घ्यावी लागते..१. बायोरेमेडिएशन पद्धतीबायोरिमेडिएशन (Bioremediation) म्हणजे पर्यावरणातील (हवा, पाणी, माती) दूषित पदार्थ काढून टाकण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा, वनस्पतींचा आणि इतर सजीवांचा वापर करण्याची प्रक्रिया होय. याला मराठीत जैविक उपचार किंवा जैविक पुनरुत्थान असेही म्हणतात. जिथे जीवाणू, बुरशी किंवा वनस्पती यांसारख्या सजीवांचा वापर करून प्रदूषके शोषून घेतली जातात, जमा केली जातात किंवा त्यांचे अपघटन केले जाते..या पद्धतीमध्ये प्रदूषित जमिनीतच तग धरून राहिलेल्या सूक्ष्मजिवांची मदत घेतली जाते. हे सूक्ष्मजीव त्या दूषित, प्रदूषित जमिनीतूनच गोळा केले जातात. ते कोणत्या रसायनांचे व पदार्थांचे विघटन करतात, हेही तपासले जाते. त्यातून योग्य त्या उपयुक्त सूक्ष्मजिवांची प्रयोगशाळेत वाढ केली जाते. प्रयोगशाळेत वाढवलेले हे जीवाणू, बुरशी व अन्य सूक्ष्मजीव यांचा समुच्चय (Microbial Consortia) पुन्हा त्याच प्रदूषित मातीत सोडले जातात. हे जिवाणू प्रदूषण करणाऱ्या रासायनिक मूलद्रव्याच्या गुंतागुंतीच्या रेणूंचे विघटन करतात. म्हणजे त्यांच्या रेणूमधील बंध तोडले जातात. बंध तुटल्यामुळे त्यांचे रूपांतर कमी गुंतागुंतीच्या रेणूमध्ये होते. परिणामी त्यांचे विघटन वेगाने होते. या प्रकारे जमिनीतील त्या विषारी रसायनांचा प्रभाव कमी होत जातो. या प्रक्रियेमुळे मातीतील झाडांना व पिकांना उपयुक्त ठरणाऱ्या जिवाणूंचा प्रभाव वाढत जाऊन त्यांची संख्या वाढत जाते. या उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढविण्यासाठी तिथे काही प्रमाणात सेंद्रिय पदार्थांची उपलब्धताही करून द्यावी लागते.सातत्याने खते, कीटकनाशके व तणनाशके यांच्या वापरामुळे क्षारांचे प्रमाण वाढलेल्या शेतीमध्येही या पद्धतीचा वापर करता येतो. अशा प्रदूषणमुक्त झालेल्या जमिनीत जिवामृत व तत्सम सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून भरघोस व दर्जेदार उत्पन्न घेता येते. रसायनमुक्त शेतीकडे ही वाटचाल ठरू शकते..बायो रेमिडिएशन पद्धतीचे उदाहरण...रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्यागाव या बंदरात बोट बांधणी व दुरुस्तीचे काम चालते. त्यामुळे तिथे व आजूबाजूच्या मोठ्या क्षेत्रातील मातीत तेल व रसायने मिसळत राहतात. परिसरातील माती आणि पाणी प्रदूषित होत राहते. त्यावर रत्नागिरीच्या मत्स्य पालन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने काम केले. त्या परिसरातील विविध ठिकाणाहून मातीचे नमुने गोळा केले. त्या मातीतील तग धरून राहिलेल्या सूक्ष्मजिवांचा विशेषतः जिवाणू व बुरशींचा शोध घेतला. प्रयोगशाळेत त्यांची कृत्रिमरीत्या वाढ करण्यात आली. वाढवलेले सूक्ष्मजीव मिऱ्यागावच्या मातीत ठिकठिकाणी पेरले वा सोडले गेले. याचे खूप चांगले परिणाम मिळाले आहे. या जिवाणू व बुरशीमुळे मातीतील तेल व रसायने यांचे विघटन वेगाने होऊ लागले. त्यामुळे तेथील प्रदूषण वेगाने कमी झाले. त्यातून माती हळूहळू उपजाऊ होऊ लागली. या उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन या उपक्रमाला गौरवण्यात आले आहे..Soil Erosion: जमिनीची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना.२. बायोऑगमेंटेशनया उपायामध्येही जिवाणू, बुरशी, शेवाळ आणि एकपेशीय वनस्पतींपासून बनवलेल्या समुच्चयातूनच (Microbial Consortia) तयार केली जाणारी यंत्रणा वापरली जाते. हे घटकही वरील प्रमाणेच काम करतात. तीच प्रक्रिया घडते, मात्र इथे वापरले जातात ते या मातीत नसणारे पण आता मातीमध्ये असलेल्या प्रदूषित घटकांचे विघटन करू शकणाऱ्या विशेष जिवाणूंचा समुच्चय. तो मातीत सोडला जातो, किंवा पेरला जातो. हे सोडलेले जिवाणू अधिक क्रियाशील राहण्यासाठी तेथे एक अन्नसाखळी निर्माण करणे आवश्यक असते. या पद्धतीत आवश्यक जिवाणू व अन्य घटकांची निवड खूप अभ्यासपूर्वक करावी लागते. कारण त्यांच्यामध्ये असंतुलन निर्माण झाल्यास त्यातून अधिक गुंतागुंत वाढू शकते आणि नव्या समस्या उभ्या राहू शकतात. त्यासाठी त टप्प्याटप्प्याने काम करत, प्रत्येक टप्प्यानंतर आढावा घेत पुढे जावे लागते. (अलीकडे जनुकीय सुधारीत जिवाणूंचाही या साठी वापर केला जातो. आपण जीएम पिके लावतो त्या प्रमाणेच. अर्थात, कोणत्याही जनुकीय सुधारीत घटकांबाबतची आव्हाने आणि शंका सर्वत्र व्यक्त केल्या जातात, तसेच या बाबतही आहेत.).प्रत्येक जमिनीतील समस्या नेमकेपणाने जाणून घेऊन, त्यासाठी सूक्ष्मजीव समुच्चय (मायक्रोबियल कन्सोरशिया) तयार करावा लागतो. त्यासाठी सखोल चाचण्या व प्रयोगशाळेत निरीक्षणे करावी लागतात. कारण यात फक्त रसायनांचा किंवा त्यांना नष्ट करणाऱ्या सूक्ष्मजिवाचा विचार करायचा नसतो, तर ते जिथे वाढणार आहे, त्या मातीचा प्रकार, मातीचा पोत, खाली खडकांची रचना व त्यांचे प्रकार तसेच माती व खडकांच्या मूळ भौतिक, रासायनिक आणि जैविक वैशिष्ट्ये इ. बाबीही तपासाव्या लागतात.वरील दोन्ही पद्धतीमध्ये जमिनीतील प्रदूषण करणारी रसायने खाऊन संपल्यावर या जिवाणूंना खायला काही उरत नाही. परिणामी त्यांची संख्या कमी होत संपते. त्यांची संख्या कमी होत असताना आपण जमिनीमध्ये सेंद्रिय घटकांचा योग्य प्रमाणात वापर सुरू केल्यानंतर जमिनीतील मूळ उपयुक्त जिवाणू उचल खातात. त्यांची संख्या वाढू लागते. जमीन हळूहळू उपजाऊ होण्याकडे वाटचाल करते. अशावेळी जमीन वापरात घेऊन काही काळ पिके घेणे टाळावे लागते. कारण या जिवाणूंना स्थिर होण्यासाठी आणि तिथे अन्नसाखळी ही भक्कमपणे अस्तित्वात येण्यासाठी एक ते दोन हंगामाचा वेळ देणे गरजेचे असते. त्यानंतर त्यात पहिले पीक शक्यतो अखाद्य (किमान माणसांसाठी तरी) घेतले जाते..बायो ऑगमेंटेशनचे उदाहरण ...पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषित सांडपाणी जमिनीत शिरून मातीही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली होती. या ठिकाणी बायोऑगमेटेंशन पद्धतीचा वापर करण्यात आला. या प्रकल्पाच्या सल्लागार आहेत डाॅ. सायली जोशी. त्या गेली तीस वर्षे सूक्ष्मजिवांच्या मदतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत संशोधन केले असून, व्यावसायिक पातळीवरही काम करत आहेत. त्यांनी रांजणगाव परिसरातील सांडपाणी व प्रदूषित जमिनीचा अभ्यास करून त्या संबंधी आराखडा बनवून दिला. त्याला चांगले यश मिळत असून प्रदूषित माती उपजाऊ होऊ लागली आहे. आता औद्योगिक वसाहतीमध्ये अशा जमिनीमध्ये झाडांची वाढ केली जात आहे.- सतीश खाडे ९८२३०३०२१८,(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.