Book Review : जाणून घेऊ बॅंकेची भाषा...

Language of Banks : तुम्हाला कोणत्या भाषा येतात? हा सर्वसामान्यपणे कोणत्याही मुलाखतीमध्ये विचारला जाणारा एक प्रश्‍न असतो. त्याचे उत्तरही सामान्यतः मराठी, हिंदी, इंग्रजी, किंवा आणखी एखादी भाषा अशा स्वरूपामध्ये दिले जाते.
Book Review
Book ReviewAgrowon

Agriculture News : सतीश कुलकर्णी तुम्हाला कोणत्या भाषा येतात? हा सर्वसामान्यपणे कोणत्याही मुलाखतीमध्ये विचारला जाणारा एक प्रश्‍न असतो. त्याचे उत्तरही सामान्यतः मराठी, हिंदी, इंग्रजी, किंवा आणखी एखादी भाषा अशा स्वरूपामध्ये दिले जाते. अर्थात, कोणतीही भाषा ही प्रामुख्याने समन्वय, संपर्क साधनाचे काम करत असते. एखादी स्थानिक भाषा येत नसल्यास ज्या काही अडचणी होऊ शकतात, तशाच अडचणी आपल्याला आर्थिक क्षेत्राशी संबंधित शब्द आणि कार्यपद्धती माहिती नसल्याने येत असतात.

सामान्यतः बॅंकेत गेल्यावर तिथे वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना, टर्म्स, किंवा संक्षिप्त शब्द (अब्रॅव्हेशन) माहिती नसल्यामुळे जिथे आपल्यासारख्या शिक्षित माणसांच्याही मोठ्या अडचणी होतात, तिथे अल्पशिक्षित ग्रामीण माणसांचे काय हाल होत असतील? त्यातही सर्वसामान्य माणसांना, शेतकऱ्यांना तर वेगवेगळ्या कामांसाठी सातत्याने बॅंकेत जावे लागते.

पूर्वी तिथे काम करणारी माणसे बऱ्यापैकी सहृदयी, समजूतदार आणि मदत करणारी असल्याने याला त्याला विचारून कसेबसे काम रेटले जायचे. आता राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये परराज्यांतील लोकही येथे कार्यरत असल्यामुळे त्यांच्याकडून काही समजावले जाण्याच्या शक्यताही कमी होतात. ते लोक बऱ्याच वेळा कामाशी काम अशा स्वरूपाचे वर्तन करतात.

Book Review
Book Review : अन्न प्रक्रिया उद्योगाच्या मार्गावरील महत्त्वाचा मार्गदर्शक

अशा स्थितीमध्ये बॅंकिगची कोणतीही संकल्पना समजून न घेताच तेथील कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कामे केली जातात. ही सारी कामे आर्थिक, पैशांविषयी असल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता राहते. हे टाळायचे असले तर काय करता येईल, हे सांगणारे एक सदर सकाळ अॅग्रोवन मध्ये प्रकाशित करण्यात आले. त्याचे लेखक अनिल महादार हे स्वतः बी.एस्सी. (अॅग्री) असून, बॅंक ऑफ इंडियामध्ये ३० वर्षे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

विविध बढत्यांनंतर सहायक महाप्रबंधक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमवेत असलेल्या दीर्घ अनुभवांमुळे सामान्य माणसांना, शेतकऱ्यांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात, यांची चांगली जाण आहे. या सदरामध्ये कृषी आणि कृषिपूरक क्षेत्रासंबंधी बॅंकिंग आणि कर्जविषयक विविध संज्ञा, संकल्पना किंवा संक्षिप्त शब्दांची ओळख करून दिली आहे. या आपल्या अनुभवाचे सार त्यांनी उदाहरणातून आपल्या समोर मांडले आहे.
एखादा तरुण कृषिकर्जासाठी बॅंकेच्या चकरा मारत राहतो.

Book Review
Rain Update : जाणून घेऊया पावसाची भाषा...

त्याच्या कानावर वेगवेगळे शब्द दरवेळी पडत असतात. त्या त्या कागदपत्रांच्या पूर्तता करताना त्याचा जीव मेटाकुटीला येत असतो. त्यासाठी होणारी प्रत्येक जादा फेरी ही त्याला हतोत्साहित करत असते. त्यातून त्याची उद्योजकताही मारली जात असते. वेळेवर कर्ज न मिळाल्याने केवळ एक उद्योजक आपल्या पायावर उभा राहत नाही, तर त्या परिसरातील अनेक कामगारांची रोजगारही हिरावला जातो. सोबत बॅंकही एका कायमच्या कर्ज ग्राहकाला मुकते.

म्हणजे एकाच वेळी दोघांचेही नुकसान होत असते. बॅंकेमध्ये कर्ज घेण्यासाठी जाताना आपल्याला सामान्यतः कोणत्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, अशा संकल्पनाची यादी केल्यास त्यातील बहुतांश संकल्पनांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे. आज पीककर्ज वेळेवर भरले नाही, म्हणून सिबिल खराब झाले, तर त्याचा फटका अन्य कृषी कर्जांनाही बसू शकते, हे अनेक शेतकऱ्यांना माहीतच नाही.

या पुस्तकामध्ये सिबिल, केवायसी, मार्जिन मनी अशा प्राथमिक गोष्टीपासून शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा शेतजमिनीचे व्हॅल्यूएशन, मॉर्गेजबाबतच्या अनेक शंकाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकल्प अहवाल, अनुदानाचे प्रकार, कर्जाची परतफेड आणि तिचे हप्ते कसे ठरवले जातात, कृषी कर्जासाठी विम्याची आवश्यकता, मुदत कृषी कर्जाची पुनर्रचना कधी करता येते, हे समजून देण्यात आले आहे.

कर्ज थकल्यानंतर त्याच्या वसुलीची प्रक्रिया कशी असते, एखादे कर्ज खाते एनपीए कधी मानले जाते, अशी महत्त्वाच्या बाबीही दिल्या आहेत.
एखाद्या नवीन शहरात जाताना तेथील स्थानिक भाषेतील काही मोजके शब्द जाणून घेतले तरी फायदा होतो. तसाच प्रकार बॅंकेमध्ये  जाण्यापूर्वी हे पुस्तक वाचले तर होऊ शकतो. अनेक संकल्पना, संज्ञा गोष्टीरूपामध्ये सांगितल्यामुळे सोप्या झाल्या आहेत. त्या स्पष्ट असल्या की मुद्दाम किंवा नजरचुकीमुळे होणारी फसवणूक तरी नक्कीच टाळता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com